पुस्तकं.’ होय, मीच ती बलात्कार झालेली स्त्री आहे’

पुस्तकं.’ होय, मीच ती बलात्कार झालेली स्त्री आहे’

I AM THE CENTRAL PARK JOGGER

By TRISHA MEILI

Pub. Scribner.

||

त्रिशा मेली या इनव्हेस्टर बँकर स्त्रीनं हे पुस्तक लिहिलंय. 

१९८९ साली न्यू यॉर्कच्या सेंट्रल पार्कमधे एका जॉगिंगला गेलेल्या स्त्रीवर राक्षसी-क्रूर बलात्कार झाला होता. प्रकरण अमेरिकेत खूप गाजलं होतं. ती बलात्कार झालेली जॉगर मीच आहे असं लेखिकेनं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या प्रस्तुत  पुस्तकात उघड केलंय. 

 शिर्षकात जॉगिंग म्हणजे पळणं आहे, पण पुस्तक पळण्यावर नाही.  लेखिका बँकर आहे, पण पुस्तक बँकिंग या विषयावर नाही.  लेखिकेवर झालेला बलात्कार आणि अत्याचार हे पुस्तकाला ठरलेलं कारण आहे. परंतू पुस्तकाचा विषय बलात्कार हा नाही.

 अनंत शारीरीक आणि मानसीक संकटांवर त्रिशा मेली हिनं कशी मात केलीय याची गोष्ट प्रस्तुत पुस्तकात आहे.

१९८९ साली त्रिशा वॉल स्ट्रीटवरचं आपलं काम आटोपून जॉगिंगसाठी न्यू यॉर्कमधल्या सेंट्रल पार्कमधे गेली.   बलात्कार करणाऱ्यानं तिला अनेक ठिकाणी भोसकलं, डोक्यावर दगडानं प्रहार करून कवटी फोडली. तिचे दोन्ही डोळे खोबणीतून बाहेर आले. प्रचंड रक्त गेलं,शुद्ध गेली. ॲडमिट करताना डॉक्टर म्हणाले ही मरेल, न जगली तर बरं. 

 उपचार झाले.  डोळे  खोबणीत गेले. चेहरा आणि कवटी शिवण्यात आली. जखमा भरल्या. मेंदूची सूज काढली, मेंदू दुरुस्त केला. 

वैद्यकीय ज्ञान आणि कौशल्याची कमालच झाली. त्रिशा जवळपास पूर्ववत झाली.   बँकिंग कंपनीत रुजू झाली. काम पूर्ववत करू लागली. कामं इतक्या चांगल्या रीतीनं पार पाडली की तिला कंपनीत बढती मिळाली.

त्रिशानं लग्न केलं. त्रिशा पुन्हा जॉगिंग करू लागली, मॅरॅथॉन पळू लागली. बलात्कार हे एक वास्तव होतं, तो एक अपघात होता असं मानून कोणतेही गंड निर्माण न होऊ देता ती जगतेय.

अपघात घडण्याआधी त्रिशाला   अन्नाबद्दल अनास्था होती, खायचीच नाही. हडकुळी झाली होती, एकटी एकटी रहायची, मिसळायची नाही. अपघातानंतर उपचारादरम्यान तिनं स्वतःला इतकं बळकट केलं की तिची अन्नाबद्दलची डिसॉर्डर गायब झाली, ती व्यवस्थित खाऊ पिऊ लागली, शरीरानं पुष्ट झाली. 

 वैद्यकशास्त्राची कमाल आहेच पण त्यापेक्षा त्रिशाचं मनोबल, तिची लढण्याची शक्ती हेच खरं तिच्या यशश्वी जगण्याचं मुख्य कारण आहे.

हे सारं या पुस्तकात वाचायला मिळतं.

लेखिकेनं तिच्यावर झालेल्या उपचारांची चर्चा त्या त्या डॉक्टरांशी केली. त्या चर्चेतून तिनं वैद्यकीय शास्त्रातले तपशील गोळा केले आणि ते वाचकाला समजतील अशा रीतीनं मांडलेत. 

उदा. मेंदूला होणाऱ्या इजा. इजेमुळं सूज आली असेल, धक्का बसला असेल तर काही काळानं ती अडचण दूर करता येते. पूर्ण बेशुद्ध झालेल्या लेखिकेच्या सर्व आठवणी काही महिन्यांत परत आल्या. हालचाली करणं, वस्तू हाताळणं, विश्लेषण करणं, स्नायूंच्या वापर ही कौशल्य दणक्यामुळं बिघडली होती. औषधं, व्यायाम, सराव यांचा वापर करून ती कौशल्य लेखिकेनं परत मिळवली, पण त्यावर खूप वेळ आणि कष्ट खर्च करावे लागले. हा भाग उपचार, औषधं इत्यादींच्या वैज्ञानिक क्षेत्रातला, पण लेखिकेनं तो अगदी सहजपणे मांडला आहे. 

मारहाण आणि बलात्काराचा दणका येवढा होता की त्या घटना मेंदूत नोंदल्या गेल्या नाहीत, नोंद करण्याच्या स्थितीत मेंदू नव्हता. त्यामुळं बलात्कार करणारा माणूस, घटना या बाबत कोणतीही स्मृती लेखिकेकडं नाही, त्या बाबतीत तिचा मेंदू कोरा आहे.  

हातपाय हलवता येत नव्हते अशी त्रिशा नंतर मॅरेथॉन पळू लागली. तिची वाचा सुधारली. मापन, विश्लेषण, बोधनाच्या विविध पातळ्या इत्यादी तिच्याकडून डॉक्टरांनी सुधारून घेतल्या. एका मेलेल्या स्त्रीला डॉक्टरांनी एक पूर्ण मनुष्य केलं. काही आठवड्यात. अमेरिकेमधे असलेली ही क्षमता थक्क करणारी आहे, पुस्तकात आपल्याला ते कळतं.

बलात्काराचा आरोप घेऊन तुरुंगात गेलेल्या पाच जणांमधे तीन लॅटिनो होते, दोन काळे होते. दोन्ही समाजाच्या लोकांवर जाम चिखल उडवला गेला, न्यू यॉर्क आणि अमेरिकेत रंगद्वेषाचे फुत्कार ऐकू आले. त्रिशावर उपचार करणारे डॉक्टर्स,नर्सेस, थेरपिस्ट लॅटिनो आणि काळे होते. त्यांनी आपलेपणानं आणि पुर्ण व्यावसायिक कौशल्य वापरून उपचार केले. ती सर्व माणसं त्रिशाचे कुटुंबीय झाली होती.

पुस्तकामधे भावनेचे कढ न काढता लेखिकेनं तिच्या भोवतालचं वातावरण नोंदलं आहे.

पुस्तकाचा विशेष असा की लेखिकेचा बलात्कार, बलात्कार करणारी माणसं इत्यादीवर अजिबात राग नाही. कुठंही ती तिच्यावर आलेल्या संकटांचा बाऊ करत नाही, नव्हे आपल्यावर संकट आलंय असं ती म्हणतच नाही. तिचा जगण्यावर विश्वास आहे, तिचा माणुसकीवर विश्वास आहे. असंख्य अमेरिकन नागरीक, मित्र, सहकारी, कुटुंबीय, विविध चर्चपंथीय प्रीस्ट इत्यादी लोकानी तिच्यासाठी प्रार्थना केली. लेखिका नास्तिक आहे पण तरीही तिला वाटतंय की लोकांनी केलेल्या प्रार्थनेमुळंच ती पूर्ववत झालीय.

बलात्कार हा एक अपघात होता. पुरुषानं बलात्कार केला म्हणून पुरुषच वाईट असतात असं त्रिशा म्हणत नाही. काळ्या माणसानं बलात्कार केला म्हणून काळी माणसं कमी प्रतीची असतात असं त्रिशा म्हणत नाही.

एक अपघात झाला. आपण लोकांच्या सदिच्छा, डॉक्टरांचं कौशल्य आणि आपली जगण्याची दुर्दम्य इच्छा यामुळंच ठीकठाक झालो असं ती म्हणते.

त्रिशा एक नॉर्मल धडपडी स्त्री आहे. तिला महत्वाकांक्षा आहेत. तिचं सेक्स लाईफ आहे. तिला मित्र होतात, तुटतात, पुन्हा नवे मित्र होतात. त्रिशा म्हणते मी असामान्य नाही. असामान्य नाही आणि कणखरपणे जगतेय. हाच तर धडा आहे या पुस्तकाचा.

१९८९ साली बलात्कार झाला. २००१ साली त्रिशानं पुस्तक लिहायला घेतलं. २०२३ च्या शेवटल्या महिन्यात पुस्तक पूर्ण झालं.

।। 

Comments are closed.