सिनेमे. मेरियुपोलमधले २० दिवस.

सिनेमे. मेरियुपोलमधले २० दिवस.

माहितीपट मेरियुपोलमधे २० दिवस.

रशियाच्या फौजा युक्रेनच्या हद्दीवर २०२२ च्या फेब्रुवारी महिन्यात उभ्या राहिल्या. युक्रेन-रशियाच्या पूर्व हद्दीवर मेरियुपोल हे शहर आहे. तिथं.

पुतीननं या घटनेला युद्ध असं नाव दिलं नाही, विशेष लष्करी कारवाई असं पुतीन म्हणाले.

एपी, असोसिएटेड प्रेस, या वृत्तसंस्थेच्या लक्षात आलं की १.५ लाख सैन्य ही काही सामान्य लष्करी कारवाई नाही. एपीनं ही घटना कव्हर करायचं ठरवलं. एपीचे कॅमेरामेन आणि बातमीदार एक टीम करून मेरियुपोलमधे पोचले.

 बातमीदार पोचले त्या पहिल्या दिवशी सारं शांत होते. दुसऱ्या दिवशीपासून मेरियुपोलपासून काही अंतरावर रशियन लष्कर पुढं सरकत असल्याच्या बातम्या आल्या.  तिसऱ्या दिवशी लष्कर मेरियुपोलच्या शिवेवर पोचले, लढाई सुरु झाली.

एपीच्या बातमीदारांनी एका हॉस्पिटलमधे मुक्काम ठोकला. तेस  शहरात फिरून घटनांचं चित्रीकरण करत, मुलाखती घेत, वाहिन्यांना पाठवत. २० व्या दिवशी रशियानं मेरियुपोल काबीज केल्यावर बातमीदारांना शहरात रहाणं अशक्य झालं. त्यांनी शहर सोडलं.

 रशियानं २५ हजार माणसं मारली. 

२० दिवसातल्या भयानक घटनांचं चित्रण प्रस्तुत माहितीपटात आहे. 

मेरियुपोलवर बाँब कोसळत होते. रशियाचे रणगाडे मेरियुपोलमधे फिरत होते आणि गोळे फेकून इमारती उध्वस्थ करत होते. एकेक रस्ता, एकेक विभाग उध्वस्थ होत होता. माणसं मरत होती, जखमी होत होती.

हॉस्पिटलवर हवाई हल्ला झाला. हॉस्पिटल समोर उभ्या ठाकलेल्या रणगाड्यांनी हॉस्पिटलाच्या आवारातल्या  अँब्युलन्सा, डॉक्टरांच्या गाड्या चिरडल्या, हॉस्पिटलवरच तोफगोळे डागले.

 हॉस्पिटलवर गोळे पडले, शेलिंग झालं. हॉस्पिटलात दाखल माणसांतली कित्येक माणसं मेली. कित्येक जखमी झाली.जखमीमधे एक गरोदर महिला होती. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तिला जखमी अवस्थेत स्ट्रेचरवर घातलं आणि दुसरीकडं नेलं. एपीचे बातमीदार त्या महिलेच्या शोधात फिरले. एक हॉस्पिटल. दुसरं हॉस्पिटल. शेवटी ती ३ नंबरच्या हॉस्पिटलमधे चौकशी करताना ती तिथं दाखल झाल्याचं कळलं. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरकडं एपीचे बातमीदार पोचले.

डॉक्टरबाईनं सांगितलं ‘ ती आली तेव्हां तिचं पोट फाटलं होतं, खूप रक्त गेलं होतं. ती तीव्र स्वरात ओरडत होती मला जगवू नका, मला मारून टाका. आम्ही तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण जमलं नाही. ती मेली. तिच्या पोटातलं तिचं मूलही मेलं होतं. ते आम्ही बाहेर काढलं. दोघंही मेले.’

बातमीदारांनी त्या स्त्रीचा घेतलेला शोध माहितीपटात पहायला मिळतो.

मरियुपोलमधल्या मैदानावर मुलं खेळत होती. एका १४ वर्षाच्या मुलावर बांबचे धातूचे तुकडे आदळले. त्याचा एक पाय तुटला. बातमीदारांना तुटलेला पाय आणि बूट दिसले. बातमीदार त्याला शोधत हॉस्पिटलमधे पोचले. तोवर त्याचा पिता एका डॉक्टरच्या खांद्यावर डोकं टेकून रडतांना बातमीदारांनी पाहिलं. लगोलग बातमीदारांना दिसलं ते स्ट्रेचरवरचं रक्तानं माखलेलं पांढरं कापड आणि त्या कापडाखाली कोणी तरी माणूस. तो माणूस म्हणजे तो मुलगा होता. कापड वर करून पित्यानं मुलाकडं पाहिलं आणि तो हमसाहमशी रडतांना बातमीदारांना दिसला.

एक तीन चार वर्षाचं मूल कार्यकर्त्यांनी स्ट्रेचरवरून आणलं. हॉस्पिटलमधे बाजारात असावी तशी गर्दी. त्या गर्दीतून वाट काढत ते मूल डॉक्टरांपर्यंत पोचलं. डॉक्टर त्याची छाती दोन हातांनी दाबत त्याचं हृदय जिवंत करण्याचा प्रयत्न करू लागले. शॉक देण्यात आले. मग दिसलं तो जमिनीवर हताश होऊन बसलेला डॉक्टर. मग दिसला डॉक्टरांचा ग्लोज घातलेला हात, त्या मुलाचे डोळे बंद करताना. मग दिसली त्याची आई किंचाळत असताना.

 चित्रीकरणाच्या क्लिप्स  जगभरच्या पेपर आणि चॅनेलना पाठवायच्या असत.  कधी वीज नसे, कधी कनेक्षन नसे. बातमीदार कारमधून शहरात कनेकशनच्या शोधात फिरत. वाटेत उध्वस्थ शहर, रस्त्यावर अन्न शिजवणारी माणसं दिसत,स्फोटांना तोंड द्यावं लागे.

 एक मॉल. लोकांनी दुकानांच्या काचा फोडून आतला मॉल लुटला.   लुटारू दुकानदार आणि पोलिसांच्या हाती लागला.  पोलीस म्हणाला ‘ अरे काय माणूस आहेस रे, आपण उध्वस्थ होतोय आणि तुला चोरी सुचतेय’

चोरानं पाणी, ब्रेड लुटला असता तर समजण्यासारखं होतं. त्यानं परफ्युम्स, डीओ वगैरे लुटले होते.

एक माणूस बोचकी लादलेली बाबागाडी खेचत शहराबाहेर निघालाय, आता त्याचं या शहरात काहीही उरलेलं नाहीये. एक स्त्री घरातल्या चाकाच्या खुर्चीवर बोचकं लादून हॉस्पिटलात पोचलीय. 

  एका स्त्रीकडं मांजराचं पिललू आहे. एकीजवळ छोटा भूभू आहे. त्या भूभूला लोकरीचा स्वेटर घातलेला आहे. एका माणसाकडं भांड्यात ठेवलेलं कासव आहे. पाळलेलं कासव जगलं पाहिजे, आपलं काहीही होवो असं त्या माणसाचं म्हणणं. 

हॉस्पीटलमधे एक स्त्री बाळंत होते. जखमी अवस्थेत. मूल जन्माला येतं. पण हालचाल करत नाही. नर्सा आणि डॉक्टर त्या मुलाला चापट्या मारतात, त्याला ऑक्सिजन देतात, उपचार देतात. मुल रडत नाही. सगळ्यांचं लक्ष आता त्या मुलाकडं. मुलाची नाळही कापली गेलेली नाहीये…मूल ट्यांहां करतं. माणसं खूप आनंदित होतात, टाळ्या वाजवतात, त्या मुलाचं या युद्धग्रस्त जगात स्वागत करतात.

लांब लचक खंदक. कार्यकर्ते ट्रकमधून प्रेतांच्या पिशव्या आणतात, खंदकात फेकतात. कित्येक प्रेतं पिशव्यात भरायला कार्यकर्त्यांना वेळ नाही, मरतांना जशी होती तशीच आणलीयत. 

एक डॉक्टर बातमीदारांना म्हणतो ‘ या माझ्या बरोबर ‘ बातमीदारांना तळघरातल्या मजल्यावर नेतो. तिथं प्रेतांचा खच पडलाय. अर्धा हात लांबीची एक कापडाची गुंडाळी. डॉक्टर गुडघ्यावर बसून ती गुंडाळी उघडतो.   काही तासांचंच वय असलेल्या मुलाचं शव. डॉक्टर ते ठीकठाक करतो. नाव लिहिलेला कागद त्या गुंडाळीला चिकटवतो. गुंडाळी जमिनीवर ठेवून निघतो. ‘हे असं मी दिवसभर अनुभवतोय. रात्री झोप लागत नाही.’

युद्ध म्हणजे एक पवित्र गोष्ट आहे असं वाटणाऱ्यांनी हा माहितीपट अवश्य पहावा. 

 माहितीपटाला यंदा ऑस्कर मिळालं.

।।

Comments are closed.