Browsed by
Month: August 2015

शिवचरित्र, बाबासाहेब पुरंदरे, सरकारी पुरस्कार आणि भंकस वाद

शिवचरित्र, बाबासाहेब पुरंदरे, सरकारी पुरस्कार आणि भंकस वाद

महाराष्ट्र भूषण प्रकरणाचे कंगोरे. 
बाबासाहेब पुरंदरे यांनी शिव चरित्र लिहिलं. कीर्तनकार, प्रवचनकाराच्या शैलीत शिवचरित्र सांगितलं. शिवचरित्राचं नाटक किंवा  इवेंट या रुपात ‘जाणता राजा’ सादर केला.   शिवाजी मांडताना  त्यांनी इतिहासाचा आधार घेतला. त्यासाठी  अकॅडमिक इतिहास, बखरी, आठवणी, पोवाडे, स्तोत्र, काव्यं इत्यादी साधनं अभ्यासली. 
बाबासाहेब पुरंदरे शिवाजीच्या प्रेमात होते. शिवाजीचं महात्म्य लोकांसमोर मांडायचा ध्यास त्याना होता. शिवाजीचा येवढा प्रभाव त्यांच्यावर होता की दैनंदिन जगण्यातही ते मुजरा करत, रोजमर्रा घटनांमधेही शिवाजीचे दाखले देत.
 कोणाही व्यक्तीबद्दल सामान्यतः पन्नास ओळींपुरतीच माहिती सामान्य माणसांपर्यंत पोचते. अमूक माणूस महान होता, त्यानं अमूक अमूक अमूक केलं इत्यादी. बस. त्या व्यक्तीच्या कार्याचे तपशील फार थोड्या लोकांना माहित असतात. तपशिलात जाण्यासाठी  सामान्य माणसाकडं वेळही नसतो. पुरंदरेंच्या शिवचरित्रामुळं राजे शिवाजींबद्दलचे बरेच तपशील लोकांपर्यंत पोचले.
शिवाजीबद्दल पुरंदरेंची एक समज, एक प्रतिमा पक्की झाली होती. ती समज भक्तीच्या रूपात होती.  शिवाजीचं मोठेपण शोधणं आणि मांडणं हा त्यांचा शिवाजी इतिहासाचा अभ्यास करण्याचा हेतू होता. भक्तीला बळ देणारे इतिहासातले पुरावे त्यांनी वापरले.   
पुरंदरे यांचं चरित्र हा पोवाडा होता, अभ्यासपूर्वक केलेली स्तुती होती.
  इतिहास लिहित असताना, संकलित करतांना  साधनांचा वापर केला जातो. घटना, विचार, व्यक्ती इत्यादींबद्दलची माहिती मांडताना पटतील असे पुरावे गोळा केले जातात. परस्परांना छेद देणारे पुरावे हाताशी येतात तेव्हां तेही मांडले जातात. विविध पुराव्यांच्या आधारे काही तरी निष्कर्ष काढला जातो. कागदपत्रं, पत्रं, आदेश, संभाषणांच्या नोंदी, करार, प्रत्यक्षदर्शीनी नोंदलेली निरीक्षणं, फोटो, ठसे, वापरलेल्या वस्तू इत्यादी साधनं तपासली जातात. आधुनिक विज्ञानानं उपलब्ध करून दिलेली साधनं वापरून  पुराव्यांचा काळ निश्चित केला जातो. 
काळाच्या ओघात नवनवी साधनं उपलब्ध होतात, तपासणीची नवी तंत्रज्ञानं उपलब्ध होतात. ज्ञानेश्वरांनी खरोखरच समाधी घेतली होती की नाही हे तपासण्याचं एकमेव साधन एकेकाळी खणणं येवढंच होतं. समाधी खणणं मराठी माणसाच्या भावनांत बसत नव्हतं.  समाज परवानगी देईना.  न खणता विविध सेन्सिंगची उपकरणं वापरून समाधीच्या आत काय आहे ते आता तपासता येतं. मराठी समाजाच्या ज्ञानेश्वरावरच्या श्रद्धा कोणालाही समाधी तपासू देत नाहीत.  
 ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली असणं हा इतिहासाचा भाग. श्रद्धेला इतिहास मान्य असेलच याची खात्री नसते. 
बाबासाहेबांनी शिवाजीचं महात्म्य लोकांसमोर रंजक स्वरूपात, आकर्षक स्वरूपात ठेवलं.  कथन करतांना त्यांनी साहित्याची शैली वापरली.
 साहित्यामधे पात्रं, घटना काल्पनिक असतात,  त्याना खऱ्या व्यक्ती व घटनांचा आधार असो वा नसो. पुरंदरे यांनी पात्रं खरी वापरली आणि संवाद-घटना काल्पनिक तयार केल्या. हना आपटे यांनी गड आला पण सिंह गेला ही कृती तयार केली. त्याची रचनाही पुरंदरे यांच्या शिवचरित्रासारखीच होती.  शैली साहित्याची, नावं खऱ्या व्यक्तींची. 
साहित्यात स्पेसेस असतात.  संदिग्ध जागा तयार होतात. अशा जागा हेच साहित्य कृतीचं, कवितेचं, कादंबरीचं, सिनेमाचं मर्म असतं.   स्पेस जितकी मोठी तितका रसीक त्या स्पेसेसमधे स्वतःला कल्पितो, स्वतःचा काळ आणि परिसर कल्पितो. वाचक कोणत्याही काळात ती स्पेस स्वतःच्या कल्पनाशक्तीनं भरून काढतो. स्पेस जेवढी मोठी व समावेशक तेवढा लेखक मोठा, साहित्य कृती मोठी. ते साहित्य टिकतं.  महाभारत ही अनेक शतकांतून अनेक लोकांनी रचलेली साहित्यकृती. जगातला कोणीही माणूस कोणत्याही काळात महाभारत वाचत असताना आपला काळ आणि आपली समकालीन माणसं त्या कृतीत पहातो. 
बाबासाहेबांच्या शिवचरित्र रचनेत काही स्पेसेस तयार झाल्या. त्या स्पेसेसचा वापर राजकारणातल्या माणसांनी केला.
शिवाजी हिंदू राजा होता, मुसलमानांचा नायनाट करणारा राजा होता असा अर्थ काहींनी काढला. शिवाजीचं मोठेपण त्याच्याभोवती असलेल्या ब्राह्णणांमुळं आलं असं काही लोकांनी मानलं.  ब्राह्मणांचा शिवाजीच्या मोठेपणाशी काहीएक संबंध नाही,  ब्राह्णणांनी कपटीपणा केला, शिवाजीला त्रास दिला असं काहींचं म्हणणं पडलं. काहींना शिवाजी हा मराठ्यांचा राजा होता असं वाटलं. काहींना तर मार्क्स निर्माण व्हायच्या कित्येक शतकं आधी शिवाजी पुरोगामी, सेक्युलर, आधुनिक वाटला. 
शिवकथनातल्या स्पेसेस राजकारणातल्या लोकांना स्वतःच्या राजकीय हितासाठी वापरावीशी वाटली. बहुतेक राजकारणी लोकांना (आपलं कर्तृत्व सिद्ध न करता आल्यानं) शिवाजीचा उपयोग करून घ्यावा असं वाटलं.
 दोष शिवाजीचा नाही, दोष बाबासाहेब पुरंदरेंचा नाही.
 ।।
  अमळ शांतपणानं विषय समजून घेता येतात.  बाजारात सहज मिळणारी चांगली पुस्तकं, नेटवर मिळणारी पुस्तकं आणि लेख, जगात विचार करून लिहिणारे किती तरी अभ्यासू लोक नागरिकांना समतोल विचार करायला मदत करतात. 
शिवाजींची उत्तम चरित्रं बाजारात उपलब्ध आहेत. इंग्रजीत, मराठीत. शिवाजीच्या समकालीन इतिहासावर यू ट्यूबवर असंख्य फिल्म्स पहायला मिळतात. खूप मज्जा आहे. खूप आनंद आहे.
।।
सरकारनं पुरस्कार देणं ही परंपरा जुनी आहे. अभ्यासात व्यग्र असणाऱ्या माणसांना राजाश्रय दिला जात असे, कारण त्यांना अर्थार्जन जमत नसे. सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नांदत नाहीत असं म्हणायची प्रथा होती. समाजातर्फे मान्यता देणं हाही उद्देश असे.  मान्यता मिळाली, मान मिळाला, गुणांची कदर झाली की कुणालाही बरं वाटतं. कोंदट वातावरणात ग्रंथ वाचत बसणारा अभ्यासक जगाच्या दृष्टीस पडण्याची शक्यता नसते. पुरस्कार मिळाल्यावर अभ्यासकाचं काम – महत्व लोकांसमोर येतं, अभ्यासकाच्या अंगावर मूठभर मांस चढतं, अभ्यासाचं महत्व समाजाला पटतं. 
ब्रिटीश लोक व्यापारी वृत्तीचे. ते लांबलचक पदव्या देत, छातीवर लावायला बिल्ले देत आणि भिंतीवर टांगायला सर्टिफिकिटं देत. पैशाचं नाव काढत नसत. भारतानं पद्म पुरस्कार देऊन ती परंपरा सुरु ठेवली.
नंतर कधी तरी पुरस्काराबरोबर रक्कम द्यायला सुरवात झाली. सुरवातीला रक्कम अगदीच किरकोळ असे. जाण्यायेण्याचं भाडं, शाल-श्रीफळ, पत्नीसह हॉटेलमधे वास्तव्य आणि चार पाच हजार रुपये. पुरस्कार देण्यातून आपली छबी लोकांसमोर आणता येते हे सरकारला उमगलं. जेवढी पुरस्कारांची संख्या जास्त तेवढी सरकारची टामटूम जास्त. 
सरकार आपल्या मुख्य कामात फेल जाऊ लागल्यावर पुरस्कारांची संख्या वाढू लागली. दुष्काळ वाढले, महागाई वाढली, रोजगार निर्मिती मंदावली, शेतकरी आत्महत्या करू लागले तसे पुरस्कार फोफावले. खेळाडूला पुरस्कार. संघाला पुरस्कार. कोचला पुरस्कार. असं प्रत्येक खेळाबाबतीत. राज्य पातळीवर, देशाच्या पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी केल्यावर विशेष पुरस्कार. पोलिसांना पुरस्कार. लेखकाना, साहित्यिकांना, चित्रकारांना, संगितकारांना पुरस्कार. संख्याही मोजता येणार नाही इतके पुरस्कार. 
समारंभ, पुढाऱ्यांचं मिरवणं, चार दोन दिवस वर्तमानपत्रं-माध्यमांतून गवगवा. पुरस्कार मिळवणाऱ्यांच्या मुलाखती, सत्कार, त्यांच्या कर्तृत्वाचा गवगवा.
 पाच सात हजारांवर माणसं सुखी होईनात. पन्नास हजार, लाख, पाच लाख अशी रक्कम वाढू लागली. नाही तरी पैसा जनतेचाच असतो. पुढाऱ्याच्या खिशातला छदामही खर्च होत नाही.
पुरस्कार घेणाऱ्याचा धर्म, भाषा, राज्य, तो गरीब असणं,  तो अनाथ असणं, त्याची जात इत्यादी नाना कसोट्यांवर पुरस्कारांची वाटणी. आपोआप त्या त्या वर्गातली पाचपन्नास हजार माणसं मिंधी होतात. आपल्याला किंवा आपल्या कोणाला तरी पुरस्कार मिळावा यासाठी पुढाऱ्यांच्या दारात खेटे घालणारी आणखी पाच दहा हजार माणसं. आशाळभूत, मिंधी, मतांच्या हिशोबात कधी तरी उपयोगी पडणारी अशी आणखी काही हजार माणसं तयार होतात.
 पुरस्काराचे निकष पातळ होतात, कधी कधी गायब होतात.  लायकी हा मुद्दा दूर रहातो. वशिला, राजकीय फायदे, सत्तेची जवळीक, दबाव इत्यादी घटक वरचढ होऊ लागतात. लाखभराचं बक्षीस मिळवण्यासाठी वीस लाख रुपयेही पुरस्कारइच्छुक खर्च करतात. 
पुरस्काराच्या निमित्तानं माणसं अलिकडं पलिकडं बोल बोल बोलतात. पुरस्कार देणारे, घेणारे. वाट्टेल त्या विषयावर बोलतात. बक्षीस असतं कादंबरीचं.  बोलतात मात्र त्यांना माहित नसलेल्या समाजशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी विषयावर. बक्षीस मिळालेलं असतं माहिती तंत्रज्ञानासाठी. बोलतात मात्र ज्ञानेश्वर, अद्यात्म इत्यादी गोष्टींवर. 
।।
साहित्य,इतिहास, कला इत्यादि प्रांतात सरकारनं न जाणं बरं. 
सरकार तयार करणाऱ्या  राजकारणी माणसांचा   अगदीच अपवाद सोडले तर   साहित्य-कला-संस्कृती यांच्यात अगदीच दूरवरचा संबंध असतो.   ते ज्या समाजात रहातात त्या समाजात पुस्तकं वगैरे छापली जातात, संगित आणि चित्रकला वगैरे घडत असते येवढाच त्यांचा संबंध. राजकारण हा व्यवहार सिद्ध करतांना पुढाऱ्यांना वाचन, विचार, चिंतन करायला वेळ नसतो. अलिकडच्या काळात तर स्वतःसाठी आणि पक्षासाठी पैसे गोळा करणं आणि जाती गोळा करणं हे जटिल काम करण्यातच सारा वेळ जातो. 
अशा माणसांनी पुरस्काराचे निर्णय घेणं, पुरस्कार घेणाऱ्याच्या अंगावर शाल पांधरणं इत्यादी उद्योग न केलं तर बरं. 
काही वेळा ज्याच्या अंगावर शाल पांधरली जाते ती व्यक्ती पुरस्काराला लायक असते. 
काही  वेळा ते वस्त्रं म्हणजे शाल नसते, झूल असते, यशस्वी बैलाला पांघरलेली.
।।
या प्रांताना लागणारं इन्फ्रा स्ट्रक्चर सरकारनं पुरवावं, अनुदानं द्यावीत. त्यांचे निकष राजकीय वगैरे असू नयेत. त्या त्या व्यवहारातल्या माणसांकडूनच व्यवहार व्हावेत, संस्था चालवल्या जाव्यात. 
।।
राजकारणी लोकांनी वादग्रस्त ठरवली असली तरी बाबासाहेब पुरंदरे ही व्यक्ती पुरस्काराला लायक आहे.
पुरस्कार देणारे आणि त्यावर वादंग घडवून आणणारे लोक बंडल आहेत.

।।
तंदूरबाबा उत्तरार्ध

तंदूरबाबा उत्तरार्ध

 तंदूरबाबा आश्रम.
 मंडपाच्या मध्यभागी एका चौथऱ्यावर तंदूरबाबा बसला आहे. गुबगुबीत. देखणा. मानेवर रुळणारे केस. उघडा बंब. 
त्याच्या भोवती एकशेऐंशी कोनात बारा पुरोहित उभे आहेत. पुरोहितांच्या मागे  पुरुषभर उंचीची चांदीची पिंपं आहेत. पिंपाला कमंडलू लटकले आहेत.
दूरवर दोन खांबांना एक मोठा फलक लटकावलेला आहे. त्यावर ‘ शीतोष्ण अभिषेक सोहळा ‘ असे शब्द लिहिलेले आहेत.
मंडपात दहाएक हजार माणसं जमलेली आहेत. सगळ्या वयाची.  तरुणींचा भरणा लक्षात रहाण्यासारखा. छतावर कॅमेरे लटकेलेल आहेत. वर्ल्ड कपच्या मॅचेसमधे घारीसारखे फिरणारे कॅमेरे वापरले जातात. तीच टेक्नॉलॉजी इथं वापरण्यात आलीय. सोहळ्याची नाना अँगल्सची दृश्यं मंडपभर पसरलेल्या स्क्रीन्सवर दिसतात. 
कॅमेऱ्याच्या मागं उभा असलेला पत्रकार माईकवरून आपल्या प्रोड्युसरला विचारतो,  ‘ अरे यार, तू तर मला सांगितलं होतंस की आश्रमात एक शीतोष्ण देवाच्या भल्या मोठ्य़ा शिळेवर  अभिषेक होणार आहे. इथं तर दगड दिसत नाहीये. इथं तर एक बंब्या दिसतोय. मी चुकीच्या जागी तर नाही ना आलोय?’
‘ सुन यार. मी जरा चौकशी करून सागतो. तू तूर्तास रेकॉर्डिंग चालू ठेव. मी सध्या ते लाईव करणार नाही.’
‘ मग तोवर मी इतर दृश्य घेतो.’
कॅमेरा एका स्मार्ट मुलीवर जातो.  स्वतःचे गाल दोन्ही हातात गच्च धरून किंचाळतेय. तंदूरबाबाकडं पहात. ‘ किती क्यूट. किती कूल.’
तुताऱ्या वाजतात.
 एका मागोमाग एके पुरोहित मागच्या पिंपात कमंडलू बुडवायचा आणि मंत्र म्हणत तंदूरबाबाच्या अंगावर मोकळा करायचा. एक जण दूध ओतायचा. दुसरा मध. तिसरा पाणी. चौथा पुन्हा दूध.
एक पिंप संपलं की लगबगीनं दुसरं पिंप त्या जागी यायचं.
‘सुन. संपादक म्हणतोय की तू कशाला काळजी करतोस तो बंब्या आहे की दगड. तू शूट कर. दगड असो की बंब्या, लोकं त्याच्याकडं भक्तीभावानंच पहाणार आहेत. तू कंटिन्यू कर.’ 
दूध, मध, पाणी तंदूरबाबाच्या अंगावरून ओघळायचं, चौथऱ्यावरून खाली सरकायचं. खालच्या हौदात गोळा व्हायचं. हौदाच्या भोवती उभी असलेली माणसं तो द्रव प्यायची. कोणी ओंजळीतून, कोणी भाडं भरून. झुंबड. रेटारेटी. द्रव पिणाऱ्यांना मागली माणसं खेचून दूर करायची आणि त्यांच्या जागी जाऊन द्रव प्यायची. 
पवित्र द्रव वाहून नेणारी पन्हळ झऱ्यासारखी वाहत होती. टोकाला एके ठिकाणी दोन माणसं तो द्रव प्लास्टिकच्या ड्र्ममधे भरत होती.   ड्रम तंदूरबाबांचे भारतभरच्या  आणि अमेरिका-युरोपातल्या भक्तांसाठी होते. ते तडक विमानतळावर पोचत होते, उभ्या असलेल्या चार्टर विमानानं दिल्लीला रवाना होत होते.
अत्यंत प्रोफेशनल व्यवस्था होती. अमदाबादच्या आयआयएममधून पहिल्या क्रमाकानं पास झालेला बिझनेस मॅनेजमेंटचा माणूस ही व्यवस्था सांभाळत होता.
मंत्रोच्चार आणि लोकांचा गोंगाट यांचं मिश्रण स्क्रीनवर ऐकायला येत होतं.
आश्रमाच्या बाहेर दोन तीन हजार माणसं गोळा झाली होती. घोषणा देत होती.   त्यांच्या हातात फलक होते. ‘ कामांध तंदूरबाबाचा निषेध असो.’ ‘ व्यसनी तंदूरबाबाना अटक करा.’
एक पुरोहित अभिषेक करत असताना तंदूरबाबाच्या कानात पुटपुटला. ‘ पेपरात दोन दिवसांपासून बातम्या आल्यात. कोणी तरी आंदोलन उचकवलंय.’ 
तंदूरबाबानं हात वर केला.
पुरोहितानं सेलफोन तंदूरबाबाच्या हातात ठेवला. सेलफोनवर दूध, मध, पाण्याचा अभिषेक होत होता. सेलफोनवर त्याचा काहीएक परिणाम नाही. अमेरिकेतून आणलेला लिक्विड प्रूफ सेलफोन. समुद्राच्या तळाशीही त्यावरून बोलता येतं.
तंदूरबाबा फोनवर बोलतो.
बाहेर निदर्शकांची संख्या वाढते. त्यांचा कल्लाही वाढतो.
तंदूरबाबा फोनवर बोलतो.
बाहेर सायरन वाजवत पोलिसांच्या गाड्या येतात. गोलाकार करून पसरतात. त्यातून पोलिस उतरतात. जमावाच्या सभोवताली पसरतात.
एका लाल दिव्याच्या वाहनातून अधिकारी उतरतो. जिल्हा पोलिस प्रमुख. तो निदर्शकांशी बोलतो.
निदर्शकांच्या घोळक्यातून पोलिस प्रमुख बाहेर पडतो, आश्रमात कूच करतो.  त्याच्या भोवती पोलिसांचं कडं. पोलीस रेटारेटीतून वाट काढत पोलिस प्रमुखाला तंदूरबाबापर्यंत नेतात.
बाबाचे भक्त गोंधळतात. कोणी तरी त्यांना सांगितलय की बाबाला अटक होणार आहे. भक्त व्हायोलंट होतात. पोलिस प्रमुखाच्या भोवती उभ्या असलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करू लागतात. ‘ पकडलत तर याद राखा अख्खा गाव जाळून टाकू, विधानसभा जाळून टाकू, मुख्य मंत्र्यांना मारून टाकू ’ असं म्हणू लागतात.
गोंधळ.
कॅमेरे आणि माईक  पोलिस प्रमुखासमोर येतात.  स्क्रीनवर पोलिस प्रमुख दिसू लागतो.
‘ तुम्ही लोक शांत व्हा. मी अटक बिटक करणार नाहीये. मी बाबांना प्रश्न विचारायला आलोय. त्यांची चौकशी करायला आलोय. येवढंच. मी माझं सरकारी कर्तव्य पार पाडतोय. माझ्या कामात व्यत्यय आणू नका.’
भक्तांचा आवाज कमी झाला, कुजबूज पातळीवर आला.
पोलिस प्रमुखांनी बाबाकडं पाहिलं. हातानं ‘ हा खेळ आता थांबवा. माझ्या बरोबर या ’ असं खुणावलं.
बाबा थंड. हातवारा करून त्यानं उत्तर दिलं ‘ मुळीच नाही ’
पोलिस प्रमुख जाम कातावला. त्यानं पुरोहितांकडं डोळे वटारून पाहिलं. कंबरेचं रिव्हॉल्वर हातात घेतल्याचा आविर्भाव केला. 
 ‘ बंद करा अभिषेक.’ पोलिस प्रमुख म्हणाला.
अभिषेक बंद झाला.
पोलिस प्रमुख चौथऱ्यावर गेला. बाबाच्या कानाजवळ तोंड नेऊन त्यानं एक इरसाल शिवी आणि धमकी दिली.  बाबाचा चेहरा खर्रकन उतरला.
‘चल. पुरे कर नाटक.अंगावरचं दूध आणि मध  पुसून टाक. सभ्य कपडे घाल आणि तयार हो. मी तुझ्या घरात वाट पहातो.’ 
पोलिस प्रमुख चौथऱ्यावरून उतरला. मंडपाबाहेर आला. मंदिराच्या मागच्या तंदूरबाबा निवासाकडं गेला.
अभिषेक थांबला. तंदूरबाबानं अंग पुसलं. चौथऱ्यावरून उतरला. निवासाकड रवाना झाला.
पोलिस प्रमुख एका दालनात पोचले. 
दालनाच्या एका टोकाला सिंहासन. समोरच्या मोकळ्या जागेत खुर्च्या ओळीनं मांडलेल्या. एकूण थाट दरबारासारखा. 
पोलिस प्रमुख एका खुर्चीत जाऊन बसले.
तंदूरबाबा पोचला. त्याच्या सोबत त्याचे चार सहकारी. सिंहासनावर बसला. 
खाली एका खुर्चीवर पोलिस प्रमुख. 
दोघांमधे कित्येक फुटांचं अंतर.
‘ इतक्या अंतरावरून बोलायचं तर माईक आणि स्पिकरची व्यवस्था करावी लागेल. त्यापेक्षा तुम्ही माझ्या बाजूला बसा नाही तर सिंहासनाच्या बाजूला माझ्यासाठीही एक सिंहासन ठेवा.’ पोलिस प्रमुख.
तंदूरबाबाचे सहकारी एकमेकाकडं पहातात, बाबाकडं पहातात. दुसरं सिंहासन नसतंच मुळी.
बाबा खाली उतरून पोलिस प्रमुखाच्या बाजूला येऊन बसतात.
‘ हं. विचारा.’ तंदूरबाबा.
पोलिस प्रमुख नाडीनं बांधलेली फाईल उघडतात. तिच्यात काही कागद आणि वर्तमानपत्राची कात्रणं आहेत.
” तुम्ही ल ग्रांडे या हॉटेलात तीन दिवस राहिला होतात. तुमच्या सोबत xx xxx xxx ही महिला होती. हॉटेलच्या बिलावर तुम्ही काय खाल्लं प्यालात त्याची नोंद आहे. दीड लीटर व्हिस्की तुमच्या खोलीत पाठवल्याची नोंद आहे. तीन वेळा तंदुरी चिकन पाठवल्याची नोंद आहे. काही लोकांनी तुमचं चित्रण सेल फोनवर केलं आहे. त्यात तुमचं एकूण रुप, कपडे इत्यादी गोष्टी दिसत आहेत. “
पोलिस प्रमुख फायलीतले कागद चाळत बोलत होते.
तंदूरबाबा ऐकत होते. 
मागं उभे असलेल्या चार माणसांचे चेहरे निर्विकार.
” तुमचं सगळं ऐकून घेतलंय. हे सारं खोटं आहे. तुमच्याकडं पुरावे आहेत?”
” तुमच्यासमोर ते पुरावे घेऊनच मी बसलो आहे. फोटो आहेत. हॉटेलची बिलं आहेत.”
तंदूरबाबा मान थोडीशी तिरकी करतो. मागं उभा असलेला माणूस वाकून त्याचे कान बाबाच्या तोंडासमोर आणतो. 
” ऑफिसर. फोटोशॉपनं हल्ली माणसाला कपडे घालता येतात. कपडे घातलेला माणूस नागडा दाखवता येतो, लुंगी नेसलेल्या माणसाला जीन्स घालता येतात. बिलामधे दारू, चिकन असं काहीही घुसवता येतं. “
पोलिस प्रमुख हसले.
” आम्ही सारी तपासणी केलीय. हॉटेलचे रेकॉर्ड तपासलेत. सेल फोन ताब्यात घेऊन मूळ चित्रं तपासली आहेत. तुमच्या वरचे आरोप खरे दिसतात.”
तंदूरबाबा गप्प.
पोलिस अधिकारी गप्प. पुढं काय?
” तुम्ही काय करणार आहात? मला अटक करणार आहात? कोणत्या कायद्याखाली अटक करणार आहात? समजा मी दारू प्यालो. त्यात कोणता गुन्हा केला? मी सज्ञान आहे. माझ्याकडं दारु पिण्याचं लायसन्स आहे. मी जीन्स वापरल्या. कोणत्या कायद्यानुसार तो गुन्हा ठरतो. हल्ली माणसं सर्रास जीन्स वापरतात. मी चिकन खाल्लं. काय चुकलं? आणि एका मुलीबरोबर मी होतो. ती मुलगी स्वखुषीनं माझ्याकडं आली होती. ती माझी भक्त आहे. तिनं मला तिचं सर्वस्व अर्पण केलंय. ” 
” मी अटक बिटक करणार नाहीये. वर्तमानपत्रात आलेला मजकूर खरा आहे की खोटा आहे याची शहानिशा करणं हे माझं काम आहे. तुमच्या काही भक्तांनी तुमच्या वागण्याला आक्षेप घेतलाय. धार्मिक माणसानं दारु पिता कामा नये असं त्यांचं म्हणणं. अद्यात्मिक माणसानं सेक्स करता कामा नये असं त्यांचं म्हणणं. “
” ते लोक अज्ञानी आहेत. त्यांनी भारताच्या प्राचीन परंपरांचा अभ्यास केलेला नाही. तुम्ही ज्याला गुन्हा म्हणताहात त्या सगळ्या गोष्टी प्राचीन काळात सर्रास चालत असत. देवादिकांच्या दारू-सेक्सच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. ओरिसा, मध्य प्रदेशातल्या गुहांतली, देवळातली चित्रं पहा. त्यात देवांनी सेक्स कसा एंजॉय केलाय त्याचं चित्रण आहे, त्याची शिल्पं आहेत. तेव्हां मी काही विपरीत करतोय, भारतीय परंपरेशी प्रतारणा करतोय असं नाहीये.  भक्त लोकांना वाईट वाटू नये म्हणून मी या गोष्टी आश्रमात करत नाही. दूरवर जाऊन हॉटेलांत त्या करतो. पण त्यात मी काहीही चूक करत नाहीये. भक्त लोक मस्त दारू पितात, व्यसनं करतात. त्यांच्या हज्जार सेक्स भानगडी असतात. ते चिकन खातात, मटण खातात, मासे खातात. त्यानी मजा करायची आणि मी मात्र त्या गोष्टी करायच्या नाहीत. तुमच्याकडं ज्या कोणी भक्तांनी तक्रार केलीय त्यांना तुम्हीच जाऊन माझा निरोप द्या. मी दारु बंद करेन, मांसाहार बंद करेन, अगदी सेक्स करणंही बंद करेन. पण आधी या गोष्टी त्यांनी बंद कराव्यात.” 
पोलिस प्रमुखांनी शांतपणे सारं ऐकलं.
” हे पहा. तुमच्या भक्तांना भेटणं हे माझं काम नाहीये. वरिष्ठांनी हे प्रकरण काय आहे ते तपासण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली, संबंधितांचे जबाब घ्यायला सांगितलं. मी ते काम केलंय. मी माझा जबाब वरिष्ठांना देईन. “
पोलिस प्रमुखांनी फाईल बंद केली. उठू लागले.
तंदूरबाबांनी त्यांना थांबवलं. 
” तुम्ही तुमचं काम केलंत. तुमच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत म्हणूनच हा देश चाललाय. मी तुमचं अभिनंदन करतो. तुमचा पाहुणचार करणं हे माझं कर्तव्य आहे. “
पाहुणचार असा शब्द उच्चारल्यावर पोलिस प्रमुख हादरलेच. 
त्यांच्या नजरेसमोर हॉटेल ल ग्रांडे, दारुचे ग्लासेल, ताटलीतलं चिकन आणि उत्सूक महिला यांच्या प्रतिमा झर्रकन सरकल्या.
 ‘ तुमचा पाहुणचार मला परवडणार नाही, माझी नोकरीही जाईल.’
तंदूरबाबा हसले. म्हणाले ” अहो पाहुणचार म्हणजे चहा आणि समोसे. गरम गरम समोसे. गरिबाच्या  साध्या पाहुणचाराचा स्विकार करा.”
” नको. मी सकाळच्या चहानंतर दिवसभर चहा घेत नाही. दोन वेळच्या जेवणापलिकडं काहीही खात नाही. धन्यवाद. मी जातो.” 
पोलिस प्रमुख उठले. अबाऊट टर्न करून बाहेर पडले.
बाहेर हज्जारो भक्त तंदूरबाबाची वाट पहात ताटकळत होते. त्यांच्यातून वाट काढून पोलिस प्रमुख आश्रमाबाहेर पडले.
आंदोलकांनी पोलिस प्रमुखांना घेरलं आणि प्रश्न विचारायला सुरवात केली. पत्रकारांनी मुसंडी मारून पोलिस प्रमुखांच्या निकटची जागा काबीज केली. टीव्हीचे माईक आणि कॅमेरे पोलिस प्रमुखांवर रोखले गेले.
सर्वांचा एकच गिल्ला होता. ‘ तंदूरबाबांनी काय सांगितल? तुमचं काय बोलणं झाल? सरकार तंदूरबाबावर कारवाई करणार आहे की नाही?’ 
‘ मी बाबाचा जबाब घेतला आहे. गोळा झालेली माहिती मी वरिष्ठांकडं पाठवणार आहे. येवढंच मी करू शकतो.’
पोलिस प्रमुखांच्या उत्तरानं पत्रकारांचं आणि निदर्शकांचं समाधान झालं नाही. ते वरच्या पट्टीत प्रश्न विचारू लागले. एकाच वेळी अनेक माणसं प्रश्न विचारीत होती. पोलिस प्रमुखांचं म्हणणं त्या गोंधळात विरून जात होतं. 
पोलिस प्रमुख लोकांना दूर सारत आपल्या गाडीकडं पोचले. हुश्श करत गाडीत बसले. गाडीत त्यांचा उपप्रमुख त्यांची वाट पहात होता.
गाडीचे दरवाजे खाडखाड बंद झाले.  शेवटची संधी गाठण्यासाठी माध्यमांचे कॅमेरे आणि माईक गाडीच्या खिडकीतून आत जायचा प्रयत्न करू लागले.
पोलिसांनी काचा वर केल्या.
पोलिस प्रमुखांनी हुश्श केलं.
उपप्रमुख म्हणाले ” सर. आता वायरलेसवर निरोप आला होता. डीजी साहेबांचा. तुमची बदली झालीय, तुम्हाला भुवनेश्वरला पाठवण्यात आलंय.”
पोलिस प्रमुखांनी उपप्रमुखाकडं पाहिलं.
उपप्रमुख चाचरत बोलले ” सर. डीजीपी म्हणत होते की तंदूरबाबाची चौकशी करायला तुम्हाला कोणी सांगितलं होतं. ते रागावल्यासारखे वाटत होते.”
पोलिस प्रमुख ” ठीक आहे ” येवढंच म्हणाले.

।।
तंदूरबाबाची गोष्ट- पूर्वार्ध.

तंदूरबाबाची गोष्ट- पूर्वार्ध.

तंदूरबाबा नगरमधलं  शीतोष्ण देवाचं मंदिर.
सव्वाशे एकराचा परिसर. एक गावच म्हणाना. मधोमध एक मंदीर. मीनाक्षी मंदिराची आठवण व्हावी असं आर्किटेक्चर. 
मंदिराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला एक भव्य मंडप. पक्क्या सिमेंट स्लॅबचा. मंडपाला दीडेकशे खांब सहजच असावेत. खांबांवर शृंगाराची शिल्पं. पाणी  पिण्याच्या लोट्याच्या आकाराचे गोलाकार स्तन, स्तन हाताळणारी माणसं. त्या खाली अनेक स्त्रिया आणि अनेक पुरुषांचा सांघिक समागम. फूटभर लांबीची शिश्नं हाताळणाऱ्या स्त्रिया. समागमावर आकाशातून पुष्प वृष्टी करणारे स्त्री पुरुष, देव असल्यागत. त्यांच्या चेहऱ्यावर कौतुकाचा भाव. 
मंडपात सहज पन्नास साठ हजार माणसं बसू शकतात. खांब नसते तर वर्ल्डकप फूटबॉलची मॅच सहज होऊ शकली असती.
ऊंच खाबांवर दहा फूट उंचीवर मोठ्ठे टीव्ही स्क्रीन्स खिळवलेले. 
देवळाच्या दारात आणि मंडपाच्या एकदम मधोमध एक प्रचंड चौथरा. सजवलेला. चौथऱ्यावर एक सिंहासनासारखं काही तरी. एक नव्हे चार माणसं आरामात बसू शकतील असा सिंहासनाचा आकार.
मंदिराच्या पाठीमागं एक विस्तीर्ण बंगला. बंगला कसला राजवाडाच. इंग्लंड, फ्रान्समधे राजांचे असतात तसा. तीन मजली, अनेक खोल्यांचा. 
मंदिर आणि बंगला हा सारा पसारा एकूण परिसराच्या साधारण मध्यभागी. गोलाकार परिसराच्या परिघावर दोन दोन मजल्यांच्या चाळी. 
हा सारा परिसर तंदुरीबाबाचा आश्रम या नावानं ओळखला जातो.
लोक आश्रमाचा इतिहास कौतुकानं सांगतात.
२००० साली या जागी एक मोकळं रान होतं. झुडुपं पसरलेली होती. बाभळीच्या जाळ्या जागोजागी पसरलेल्या होत्या. बाभळीच्या झाडांमधे तयार होणाऱ्या एकांती जागेत गावकरी विधी उरकत असत. 
एके दिवशी अचानक एक तरूण दिसला.  कुऱ्हाड घेऊन बाभळीची झाडं तोडत होता.
 विधीसाठी जागा शोधत असताना लोकं अवघडली. हळू हळू करत करत बरीच झुडुपं तोडून बरीच जागा त्यानं मोकळी केली.  
माणसं त्रासली.  त्यांची परंपरागत विसर्जनाची जागा  हिरावून घेतली जात होती. माणसं आपसात चौकशी करीत की हा कोण नवा माणूस उपटलाय.
बाभुळतोडीकडं पाठ करून माणसं विधी उरकत.
काही दिवसानं बाभूळतोड थांबली. लोकांना हायसं वाटलं. 
 तरूणानं एक झोपडी तयार केली. 
 एके दिवशी झोपडीवर गेरू रंगाचा जरीची किनार असलेला पटका लागला. 
एके दिवशी झोपडीच्या दारात एक भाला उभा राहिला, भाल्याला एक हार  लटकावलेला.  
 झोपडीतून आरतीचे आवाज 
लोकांची उत्सूकता वाढू लागली.
लोटा विधी आटोपला की एका हातात लोटा आणि दुसरा हात कंबरेवर ठेवून लोक   झोपडीत काय चाललंय ते पाहू लागले. काही दिवसानी गावकरी झोपडीत गेले. झोपडीत  दोन तीन फूट उंचीचा दगड जमिनीत रोवलेला होता.  त्याला शेंदूर आणि गंध फासलेलं होतं, हार घातला होता.
आरती.  गावकरी आरतीत सामिल. 
गर्दी वाढू लागली. 
हां हां म्हणता झोपडीचा आकार वाढला. 
आख्यायिका पसरली. 
देवानं या माणसाला पाठवलाय. गावाचा उद्धार करायला. आता गावाची भरभराट होणार. 
 गावातल्या लोकांच्या कानावर आलं की पाच मैलावर कंपनी निघालीय. खाण होणारेय.
 पलिकडच्या गावातली लोकं विस्तारलेल्या झोपडीत यायला लागली. बाबाचे आशिर्वाद घ्यायला. झोपडमंदिरातला तरूण आता बाबा झाला होता.
शेजारच्या गावातले बाबाकडे येणारे लोक आता मंदिराच्या आसपासच्या जागेत झोपडया ठोकू लागले. हां हां म्हणता सगळी बाभळीची झुडुपं नाहिशी झाली, झुडुपांच्या जागी झोपड्या.
 नव्या वस्तीत मीटिंगा सुरु झाल्या. झेंडे लागले.   गावातल्या लोकांच्या लक्षात आलं की ही  खाणगावातून विस्थापित झालेली माणसं आहेत.
वस्तीत एसयुव्ही गाड्या येऊ लागल्या. लाल दिव्याच्या गाड्या येऊ लागल्या. कलेक्टर आणि पोलिसांच्या घिरट्या सुरु झाल्या.
वस्तीतल्या लोकांच्या बाबाकडल्या फेऱ्या वाढल्या. 
कलेक्टर, पोलिस बाबाच्या भेटीला यायला लागले.
पुढारी लोकांची बाबाकडील वर्दळ वाढली.
बाबाच्या झोपडीच्या जागी मंदिराची इमारत उभी राहिली. मंदिरापासून अंतरावर   चाळी उभ्या राहिल्या. कलेक्टर आणि इंजिनयर लोक नकाशे घेऊन येऊ लागले. बांधकामाचं सामान येऊ लागलं. चाळींची संख्या वाढली.
मंदिराच्या मागं भव्य इमारत उभी झाली.   
मंदिरापाठच्या विस्तीर्ण वास्तूत बाबा राहू लागला.
चाळीतल्या एकेका खोलीत दहादहा माणसांची कुटुंब राहू लागली. चाळी वाढत गेल्या.
 मंदिरात हवन होई, होम होत.   दूरवरून माणसं मंदिरात येऊ लागली.
बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी हॉटेलं उभी राहिली. एक स्टार, दोन स्टार, तीन स्टार. सारा परिसर आता बाराही महिने गजबजला.
तंदूरबाबाचा आश्रम हे एक गाव तयार झालं. इथल्या लोकांची संख्या कोणी म्हणतात की वीस पंचवीस हजार झाली होती. आश्रम वासियांना आधार कार्ड मिळालं होतं आणि निवडणुक ओळखपत्रंही मिळालं होतं. आधारकार्डावरचा पत्ता असे तंदूरबाबा नगर.
  आश्रमातले विधी आणि सोहळे स्थानिक टिव्ही चॅनेल दाखवू लागले. प्रत्येक चॅनेलवर दिवसातले सहाएक तास  बाबा आणि आश्रमावरचे कार्यक्रम दिसत.
आश्रमापासून चार किलो मीटर अंतरावर  विमानतळ तयार झाला.  तळाचं नाव तंदूरबाबा नगर विमानतळ. कलकत्ता, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, अमदाबाद आणि दिल्लीहून दररोज एक फ्लाईट दररोज येऊ लागलं.
तंदूरबाबानं भाद्रपदातला एक आठवडा उत्सवासाठी निवडला.  शीतोष्णदेव अभिषेक सोहळा. 
टीव्ही चॅनेल्सनी अभिषेक सोहळ्यावर कर्टन रेजर करायला सुरवात केली. बॉलिवूडमधले झाडून सर्व मोठे नट आणि नट्यांच्या मुलाखती झाल्या. क्रिकेटरांनी मुलाखती दिल्या.
‘ तंदूरबाबांच्या आशिर्वादामुळ माझे सिनेमे चालले… तंदूरबाबा मला सिनेमासाठी विषय सुचवतात….’ 
‘ आज मी एकशे तीस सेंच्युऱ्या ठोकल्या त्या बाबाच्या आशिर्वादामुळं. प्रत्येक षटकार मारताना मी बाबाचं स्मरण करत असे. … बाबाचं स्मरण केलं की माझ्या बाहूत काय फुरफुरत असे ते कळत नाही, इकडे चेंडू टाकला की तिकडे  स्टंप पंचवीस फूट दूर उडून जात असत.’
तंदूरबाबाची एक मॅरॅथॉन मुलाखत चॅनेलनं चालवली. देशातल्या एका उद्योगानं ती स्पॉन्सर केली होती.  एक अभिनेत्री आणि एक क्रिकेट खेळाडू मिळून ही मुलाखत घेत होते.
  बाबाचं पाच मिनिटांचं बोलणं झालं की एक माणूस जाहीर करे ‘ ब्रेकनंतर बाबा शीतोष्ण देव आणि सोहळा या बद्दल माहिती देणार आहेत.’ 
तीस मिनिटांचा ब्रेक होई. 
बाबाची पाच मिनिटं. शीतोष्ण देव आणि उत्सवाचा उल्लेख नाही. 
 तीस मिनिटांचा ब्रेक.
पाच मिनिटाचं बाबाचं वक्तव्य. त्यातही शीतोष्ण उत्सवाचा उल्लेख नाही.
ब्रेक. 
ब्रेक, बाबा, ब्रेक, बाबा.
संध्याकाळी पाचच्या सुमार होता. प्रेक्षक येव्हांना  पेंगुळले होते. दर्शकांची पेंग घालवण्यासाठी  चॅनेलनी ढॅणढॅण ढोल वाजवले, झांजा वाजवल्या.  बाबाचा चेहरा,  मागं पुढं, डावीकडं उजवीकडं, वरून खाली अशा कोनातून झॅन झॅन आवाज करत फिरवला. जेणेकरून झोपलेल्या लोकांना जाग यावी.
आता  बाबा पडद्यावर दिसतो.
‘ शीत म्हणजे थंड. ऊष्ण म्हणजे गरम. माणूस या दोन टोकांमधे हेलकावत असतो. कधी त्याच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात, त्याच्या वासना उद्दीपित होतात, म्हणजे माणूस ऊष्ण होतो, गरम होतो. तो मागणी करायला लागतो. खायला हवंय, प्यायला हवंय, सेक्स हवाय, प्रेरणा हवीय, शक्ती हवीय, देवाशी एकरूप व्हायचंय, अद्यात्मिक शांतता हवीय. मागणी कोणतीही असली तरी तिची तीव्रता खूप. 
गरम झालेला माणूस मागणी पूर्ण होत नाही तोवर वाट्टेल ते करायला तयार होतो.
 तर माणसाचं हे एक रूप. 
शीत म्हणजे थंड हे माणसाचं दुसर रूप. मागण्या पूर्ण झाल्यावर माणूस शांत होतो. थंड होतो. शीतल होतो. काही काळ शीतल रहातो. नंतर पुन्हा काही काळ गरम होतो. असं चक्र अविरत चाललेलं असतं. 
माणसाच्या या वृत्ती शीतोष्ण या देवाकडून आल्या आहेत.   या देवाची मूर्ती मी आश्रमात विधीवत स्थापली आहे. या मूर्तीवर आळीपाळीनं थंड आणि गरम द्रवांचा अभिषेक केला जातो. शीतोष्ण देव हे मानवी जीवनाचं वास्तव रूप आहे. आपला धर्म कसा वास्तवाशी जोडलेला आहे ते या देवामुळं कळतं. 
आज पश्चिमेतून आलेल्या  चंगळवादाचा  बोलबाला आहे. आज आपल्या देशात लोक चैनीच्या मागण्या करू लागले आहेत.  त्यांना हे कळायलं हवं की या चैनी पश्चिमी नसून याच देशात त्यांचा जन्म झाला आहे. पश्चिमी लोक त्याला चैन म्हणतात आपण त्याला उपभोग म्हणतो. पश्चिमेतले लोक जन्मलेही नव्हते किंवा वल्कलं लावून हिंडत होते किंवा युरोपच्या बर्फयुगात गुहेत अडकले होते तेव्हां आपल्या देशात शीतोष्ण देवाची उपासना होत होती. आपल्या या दिव्य परंपरेची जाणीव भारतीय माणसाला झाली तर त्याचा आत्मविश्वास वाढेल, तो पश्चिमेकडं अपराधी भावनेनं पहाणार नाही, तो प्रगतीपथावर घोडदौड करू लागेल. लोकांना आपल्या गतवैभवाची जाणीव करून देण्यासाठी हा शीतोष्ण देवाचा उत्सव मी सुरु करत आहे. “
ब्रेक.
ब्रेकमधे मॅगीची जाहिरात. मॅकडोनल्डची जाहिरात. सॅनिटरी टॉवेलची जाहिरात. रात्रभर जोम टिकवणाऱ्या औषधाची जाहिरात. आश्रमातून वाटल्या जाणाऱ्या प्रसादाची जाहिरात. हा प्रसाद ऑन लाईन कसा मिळतो ते सांगणारी जाहिरात. पाठोपाठ संडास साफ करणाऱ्या लिक्विडची जाहिरात. नंतर कपडे धुवायच्या साबणाची जाहिरात. .. तीसेक मिनिटांच्या जाहिराती.
जाहिराती संपल्या. 
पडद्यावर  मध्यम वयीन गोरा माणूस येतो. त्यानं कोट घातलाय पण टाय लावलेला नाही. अमेरिकेतल्या कोलंबिया  विद्यापिठात तो धर्मशास्त्राचा इतिहास शिकवतो. इंडॉलॉजीत त्याची पीएचडी आहे. तंदूरबाबानं  त्याला खास चार्टर विमानानं भारतात आणलंय. 
 तो संथ लयीत बोलतो. बोलतांना हातातल्या नोट्स रिफर करतो. चार पाच वाक्य झाली की पॉज घेतो आणि बिनकाडीचा चष्मा नीट करत पुढली वाक्यं बोलतो.  
” शीतोष्ण देव या देवतेचे उल्लेख हिमालयातल्या एका गुहेत सापडले. गुहेतल्या एका भिंतीवर चित्रं आणि काही आकृत्या होत्या. अमेरिका आणि जर्मनीतल्या खास संशोधकांनी तेरा वर्षं तीन अब्ज डॉलर खर्च करून चित्रं आणि आकृत्यांचे अर्थ लावले आहेत. भारत, अमेरिका, जर्मनी या तीन देशांच्या सहकार्यानं हा प्रकल्प पार पडला आहे. पैसे भारतानं पुरवले आणि तंत्र अमेरिका-जर्मनीनं पुरवलं. अभ्यासातून सिद्ध झालंय की ही देवता आजपासून सव्वा तीन लाख वर्षांपूर्वी हिमालय आणि लगतच्या प्रदेशात प्रचलित होती. हिंदू धर्मशास्त्रात या काळाला क्रेता युग असं म्हटलं जातं. गुहेव्यतिरिक्त अन्य पुरावे अजून मिळालेले नाहीत. नव्यानं उपलब्ध झालेल्या तंत्रज्ञानाचा वापर या देवतेचा प्रसार कुठं आणि किती झाला होता हे शोधण्यात येईल. भारत सरकारनं या कामासाठी चाळीस अब्ज डॉलरची रक्कम मंजूर करायचं ठरवलं आहे. देश जगतो संस्कृती –  इतिहासाच्या बळावर.  बाजार आणि उत्पादनं यांच्या बळावर नव्हे. असं भारताचे पंतप्रधान म्हणतात. पंतप्रधानांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळं आणि मदतीमुळं  आम्ही संशोधक उत्साहित आहोत. ….”
ब्रेक.
जाहिराती.
रात्री अकरापर्यंत हा कार्यक्रम.
सोहळ्याचा दिवस उजाडला.
पंतप्रधान सक्काळी सक्काळी आश्रमात आले. बाबाची भेट. बाबा बरोबर जलपान. बाबांचे आशिर्वाद. सोहळ्याला शुभेच्छा देऊन लगोलग दिल्लीला परत. 
   विमानतळ ते आश्रम,  रस्त्याच्या कडेला, आश्रमाच्या परिघावर सर्व राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांचे फ्लेक्स लागले. पंतप्रधानांचं स्वागत. सोहळ्यात येणाऱ्यांचं स्वागत. तंदूरबाबाभक्तांचं स्वागत. 
 पंतप्रधानांचा कार्यक्रम दोन तासाचा.   त्याआधी चार तास चॅनेल भेटीच्या तयारीची वर्णनं करत होते. अँकर मंडळी आळीपाळीनं दर्शकांना माहिती पुरवत होते –  पंतप्रधानांच्या विश्रांतीसाठी कसा हायटेक शामियाना उभारला होता – भेटीच्या वेळी जेवणात कोणते पदार्थ होते – त्या पदार्थासाठी बेळगावहून तूप  कसं मागवलं होतं – अन्न शिजवण्यासाठी देशाच्या प्रत्येक राजधानीतल्या पंचतारांकित हॉटेलातून कसं शेफना आणलं होतं… प्रत्यक्ष भेट आणि जेवण मात्र दाखवलं नाही.
पंतप्रधान विमानतळावर परतले त्याची लाईव्ह दृश्यं चॅनेलनी दाखवली. विमानाच्या शिडीवर पंतप्रधानांनी हात हलवत साऱ्या भारत वर्षाला टाटा केलं. ते दृश्य दाखवत असतानाच अँकरची कॉमेंटरी ऐकू आली … ” काही क्षणातच आम्ही आश्रमात परतू. सोहळा दाखवायला …”

।।
मुल्ला उमरच्या मृत्यूचं रहस्य

मुल्ला उमरच्या मृत्यूचं रहस्य

मुल्ला उमर दोन वर्षांपूर्वी वारला असं अफगाणिस्तान सरकारनं पाकिस्तानी सरकारचा हवाला देऊन ३० जुलै २०१५ रोजी जाहीर केलं. बीबीसीवर ही बातमी प्रसिद्ध झाली तेव्हां कोणाचाच या बातमीवर विश्वास बसला नाही. त्याच्या मृत्यूच्या बातम्या अनेक वेळा आल्या पण कोणतेच पुरावे कधी समोर आले नव्हते.  मुल्ला उमरसारखा नेता मेल्याची बातमी दोन वर्षं लपून कशी राहू शकते? पुरावे कां सादर झाले नाहीत? मुल्ला उमर खरोखरच मेलाय की ही एक मुद्दाम पसरवलेली अफवा आहे? 
केवळ बीबीसी बातमी देतेय म्हणून त्या बातमीवर विश्वास ठेवणं भाग होतं.
ही बातमी प्रसिद्ध होण्याआधी ७ जुलै २०१५ रोजी इस्लामाबादजवळच्या एका खेड्यात अफगाण सरकार आणि तालिबानचे नेते यांच्यात शांतता वाटाघाटी झाल्या होत्या. या वाटाघाटींचा आधी आणि नंतर खूप गाजावाजा करण्यात आला होता. या वाटाघाटी आणि त्यात झालेल्या शांतता कराराला मुल्ला उमरनं पाठिंबा आणि मान्यता दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. दोन वर्षांपूर्वीच मेलेल्या उमरनं पाठिंबा कुठून दिला? कबरीतून?  
  उजेडात आलेल्या तपशिलावरून मुल्ला खरोखरच मेलाय यावर आता विश्वास बसायला हरकत नाही. मुल्ला उमरचा व्यक्तिगत चिटणिस तय्यब आगा यानं सारा मामला उघड केलाय. तय्यब आगाची वक्तव्यं आणि गेल्या काही वर्षातल्या घटना एकत्र केल्यानंतर काय घडलं असावं याचा एक अंदाज आता येतो.
खरोखरच २०१३ च्या एप्रिल महिन्यात मुल्ला उमरचा कराचीत मृत्यू झाला होता. 
मुल्ला उमर मरताना कराचीत कसा पोचला?
अमेरिकेच्या मदतीनं २००१ साली उत्तरी मोर्चानं तालिबान सरकार पाडलं, तालिबान सरकारचा लष्करी पराभव केला. मुल्ला उमर हा तालिबानचा सर्वेसर्वा होता, अफगाण सरकारचा पंतप्रधान होता. उत्तरी मोर्चानं काबुलवर निर्णायक हल्ला करून काबूल ताब्यात घेतल्यावर मुल्ला उमर पळाला. त्यानं पाकिस्तानात क्वेट्टा शहर गाठलं. त्याच्या बरोबर तय्यब आगा इत्यादी सहकारी आणि त्याचे निकटचे सैनिक होते. उमरनं पाकिस्तानात रहावं ही पाकिस्तानची-आयएसायची योजना होती. तालिबानचा पराभव होऊ नये अशी पाकिस्तानची इच्छा होती. अमेरिकेला शेंड्या लावून पाकिस्ताननं तालिबानला खूप छुपी मदत केली होती, उत्तरी मोर्चाचा विजय होऊ नये अशी खटपट केली होती.  पाकिस्तानं  मदरशात तयार केलेले जिहादी   अफगाणिस्तानात लढत होते.  तालिबान सरकारला लागणारा आर्थिक-लष्करी पुरवठा पाकिस्तानच करत होतं.   तालिबान हरत आहे असं दिसल्यावर मुल्ला उमरचं काय करायचं हे पाकिस्ताननं ठरवलं. त्यानुसार उमर क्वेट्ट्यात दाखल झाला.
त्याच वेळी ओसामा बिन लादेनही पाकिस्तानात दाखल झाला. पाकिस्तान अफगाणिस्तानच्या हद्दीवरच्या गावांत त्यानं तळ ठोकला. उमर आणि लादेन दोघेही पाकिस्तानात होते. दोघांचीही ठिकाणं पाकिस्ताननं गुप्त ठेवली, अमेरिकेलाही त्यांचा पत्ता लागू दिला नाही. शेवटी पाकिस्तानला शेंडी लावून अमेरिकेनं स्वतंत्रपणे लादेनची माहिती काढली आणि त्याला ठार मारलं.  त्या वेळी उमर क्वेट्ट्यात मुक्कामाला होता.
आयएसआयनं क्वेट्ट्याला वेढा घातला होता. तिथं उमरला स्वतंत्र वस्ती उभारून दिली होती. त्या विभागाला स्थानिक माणसं अफगाणिस्तान असंच म्हणत असत. मोठ्ठी छावणी होती. तिथं उमर नियमित बैठका घेत असे. क्वेट्ट्यातला बैठकांना क्वेट्टा शुरा असं नाव पडलं होतं. मुल्ला उमर तिथूनच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात असलेल्या पश्तून कमांडरना आणि तालिबानांना निरोप आणि आदेश पाठवत असे. उमर कधीही कोणालाही थेट भेटत नसे. तो कधीही टीव्हीसमोर आला नाही. न्यू यॉर्कर, गार्डियन, बीबीसी यांचे प्रतिनिधी त्याला भेटण्याचा प्रयत्न करीत. महिनोनमहिने ते क्वेट्ट्यात तळ ठोकून असत. परंतू उमरच्या भोवतालचं पश्तून रक्षकांचं कडं मजबूत होतं, आयएसआयचं त्याच्या भोवतीचं कडंही अभेद्य होतं. आयएसआय कोणालाही त्याच्या पर्यंत पोचू देत नसे. अफगाणिस्तानातले, खैबर पख्तुनख्वातले पश्तून पुढारी उमरला  भेटायला जात तेव्हां नीट गाळून त्याना उमरकडं पाठवलं जात असे. उमरच्या घरात बैठका होत. तिथं आयएसायचे लोक हजर असत. तिथल्या निर्णयावर त्यांचं नियंत्रण होतं. तिथं घडलेल्या कोणत्या गोष्टी बाहेर प्रकाशित करायच्या याचा निर्णय आयएसआय करत असे. पाकिस्तानचे अफगाणिस्तानातले हितसंबंध राखणं हा आयएसायचा अजेंडा होता.
तय्यब आगा, आज उमरचा उत्तराधिकारी म्हणून जाहीर झालेला मुल्ला अख्तर मंसूर, उमरचा भाऊ आणि मोठा मुलगा ही माणसं उमरच्या सभोवताली असत. आयएसआयचा  उमरभोवती असलेला विळखा अजगरासारखा मजबूत होता. उमर पाकिस्तानच्या हिताला धक्का पोचेल असा कोणताही निर्णय करणार नाही याची खबरदारी आयएसआय घेत होती. मुल्ला मंसूर हा माणूस आयएसआयनं निवडला होता आणि त्यालाच उमर आपला उत्तराधिकारी करेल याची खबरदारी आयएसआयनं घेतली होती. 
मुल्ला मंसूर अफगाण सरकारशी शांततेच्या वाटाघाटी करेल. तालिबानच्या वतीनं. तालिबान अफगाण सरकारमधे सामिल होईल. तालिबानचं अफगाण सरकारवर नियंत्रण असेल. हे तालिबान सरकार पाकिस्तानातल्या तालिबानला आटोक्यात ठेवेल, पाकिस्तानी तालिबानला पाकिस्तानमधे दहशतवाद करू देणार नाही. हे अफगाण सरकार भारताला अफगाणिस्तानात येऊ देणार नाही.   तालिबान सरकार स्थापन झालं की पाकिस्तानातल्या दहशतवादी गटांना भारत किवा तत्सम ठिकाणी दहशतवादात गुंतवलं जाईल. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानावर पक्की मांड बसल्यावर अमेरिकेची मदतही मिळवता येईल. यासाठी तांत्रिकदृष्ट्या अल कायदाला नेस्तनाबूत केल्याचंही दाखवता येईल. ही पाकिस्तानची रणनीती होती.
मुल्ला उमरला ही नीती मान्य नव्हती. अफगाणिस्तानवर पाकिस्तानचं वर्चस्व असणं   मुल्ला उमरला मान्य नव्हतं. मुल्ला उमरचं भारताशी वाकडं नव्हतं. अल कायदा किंवा पाकिस्तानला सर्व जग इस्लामी करायचं होतं, साऱ्या जगात इस्लामी जिहाद पसरवायचं होतं. मुल्ला उमरला ते मान्य नव्हतं. मुल्ला उमरचा परिघ अफगाणिस्तानपुरताच मर्यादित होता. मुल्ला उमरचा इस्लाम अल कायदाच्या इस्लामपेक्षा किवा आयसिसच्या इस्लामपेक्षा वेगळा नव्हता. तो आधुनिकता, सेक्युलर कल्पना, सहिष्णुता, लोकशाही इत्यादी गोष्टींचा कट्टर विरोधक होता. तरीही त्याचा इस्लाम हा अफगाणिस्तानापुरताच मर्यादित होता. माझ्या भूमीवरून तू जगाची लढाई करू नकोस, अमेरिकेवर हल्ले करून नकोस असं उमरनं लादेनला सांगितलं होतं. उमर पश्तून होता, त्याचा इस्लामही पश्तून टोळीवादी इस्लाम होता. त्याचा समाज पश्तूनवालीनुसार चालत असे, शरियानुसार नव्हे.
उमरच्या भूमिका पाकिस्तानच्या पचनी पडत नव्हत्या. उमर पक्का पश्तून असल्यानं तो इतर कोणाचंही ऐकत नसे. पाकिस्तानला तेच दाचत होतं. त्याना त्यांच्या ताटाखाली एक मांजर हवं होतं.
२००१ नंतरच्या घटना मुल्ला उमरच्या मनाप्रमाणं घडत नव्हत्या. तो असहाय्य होता, पाकिस्तानच्या तावडीत सापडला होता. पाकिस्तानच्या कैदेत असल्यासारखा होता.
पाकिस्तानच्या या छळवादाला कंटाळून त्याचा सेक्रेटरी तय्यब आगा कतारमधे, दोहा या ठिकाणी पळाला. आपल्या कुटुंबाला घेऊन. तिथं त्यानं तालिबानचं आंतरराष्ट्रीय ऑफिस थाटलं. तिथून तो स्वीडन, अमेरिका, सौदी अरेबिया, ब्रिटन, फ्रान्स इत्यादी देशांच्या मुत्सद्द्यांना भेटू लागला. उमरचा माणूस असल्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला मान्यता मिळाली. अफगाणिस्तानमधे शांतता प्रस्थापित करण्यासाठी झालेल्या प्रयत्नात तो महत्वाची भूमिका बजावत असे. अमेरिका ज्याला चांगलं तालिबान ( गुड तालिबान ) म्हणत असे तो गट बहुदा तय्यब आगाचा गट होता, तय्यबच्या माध्यमातून त्या गटाला उमरचा पाठिंबा मिळत असावा. पण आतल्या आत तो आणि पाकिस्तान यांच्यात वितुष्ट आणि तणाव होते. सौदी, अमेरिका इत्यादींना ते दिसत होते. 
मुल्ला उमरच्या व्यक्तिमत्वात काही विलक्षण पैलू होते. तो अफगाणिस्तानचा कारभार चालवी तेव्हांही आपले आदेश कागदाच्या चिटोऱ्यावर, पाठकोऱ्या कागदावर लिहून पाठवत असे. एकदा एक पत्रकार त्याला भेटायला गेला होता. पत्रकाराला अफगाणिस्तानात फिरायचं होतं, मुल्ला उमरच्या कमांडरांना भेटायचं होतं. तशी परवानगी त्याला हवी होती. त्याच्या जवळ सिगरेटच्या पाकिटासारखं कसलं तरी पाकिट होतं. उमरनं ते घेतलं. फाडलं. उलटं केलं आणि त्यावर त्याच्या भाषेत दोन ओळीत याला परवानगी द्या असा मजकूर लिहिला. त्या पाकिटावरच्या परवानगीवर माणूस बिनधास्त अफगाणिस्तानात फिरू शकत होता. 
उमर सॅटेलाईट फोन, सेल फोन वापरत नसे. कारण तसे फोन टॅप करण्याची यंत्रणा अमेरिकेजवळ होती. त्याचा सगळा कारभार तोंडी निरोप आणि चिठ्ठ्यावर चालत असे. त्यानं  सरकारही याच रीतीन चालवलं. पंतप्रधान माणूस. त्याच्याकडं एकाद्या खात्यान पैसे मागितले की समोर ठेवलेल्या पेटीतली  नोटांची पुडकी उमर देत असे.
तय्यब आगा आणि मुल्ला उमर यांच्यातलं कम्युनिकेशन निरोप्ये, चिठ्ठी किवा टेप केलेला निरोप यावर चालत असे.
२०१३ च्या एप्रिलनंतर तय्यब आगाला टेप येणं बंद झालं. चिठ्ठ्या येत. पण त्यावर उमरची सही नसे. तय्यबनं सहीची चिठ्ठी मागायला सुरवात केली. तसं घडेना. क्वेट्ट्यातून निरोप येई  की आहे असंच चालवून घ्या. 
कारण २०१३ च्या एप्रिलमधे मुल्ला उमरचा कराचीत मृत्यू झाला होता.
आयएसायनं ही घटना लपवून ठेवली. मुल्ला मंसूर इत्यादींना पाकिस्ताननं नेतृत्वात बसवलं.  
 उमरच्या नातेवाईकांना, उमरच्या निकटच्या लोकाना मुल्ला मंसुरची नेमणूक मंजूर नव्हती.   ती घाईघाईनं घडवून आणली होती. बहुदा उमर मरणासन्न असताना पाच पन्नास पश्तुन पुढारी आणि तालिबान नेत्यांना आयएसआयनं गोळा केलं, उमरसमोर बसवलं, बैठक झाल्यासारखं केलं आणि मंसूरची नेमणुक करवून घेतली. मंसूर हा उमरचा विश्वासातला होता, जवळचा होता. तरीही अशा पद्धतीन वारस निवडला जाणं हे पश्तून संस्कृतीत बसणारं नव्हतं. अफगाणिस्तानातल्या पश्तून जमातींना ते मंजूर होणं शक्यच नव्हतं. मुल्ला उमरनं कंदाहारमधे स्वतःला   मोमिने मुसलमीन  जाहीर केलं होतं ते हज्जारो मुल्लांसमोर. चोरून चोरून चार भिंतींच्या आड जगातल्या मुसलमानांचा पुढारी कसा काय निवडला जाऊ शकतो असा पश्तून पुढाऱ्यांचा प्रश्न होता. पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याना ही कोंडी सोडवता येत नव्हती. त्यामुळं त्यानी उमरचा मृत्यू लपवून ठेवला, त्याच्या नावानं राज्य चालवलं.
तालिबान संघटनेत मतभेद होते. अफगाण सरकारात सामिल व्हायचं की नाही, झाल्यास कसं सामिल व्हायचं यावर अनेक मतं होती. पाकिस्तानबरोबरचे संबंध हा तर मोठाच वादाचा भाग होता. एक गट सतत मानत आला की दहशतवादाचा उपयोग करून अफगाण सरकार आपल्या हातात घ्यायचं, करझाई-घनी यांच्या सारख्या परदेशी हस्तकांच्या सरकाराचा एक भाग व्हायचं नाही. दुसरा गट काहीसा थकलेल्या,मऊ झालेल्या लोकांचा होता. आता त्याना लढावंसं वाटत नव्हतं. सत्तेत सामिल होऊन सुख उपभोगायची त्याची इच्छा होती. पाकिस्ताननं शेकडो तालिबान नेत्याना पाकिस्तानात जमिनी, घरं, पैसे देऊन सुखासीन केलं  होतं. ही माणसं दहशतवाद करून स्वतःचा जीव धोक्यात घालायला तयार नव्हती. पाकिस्तानच्या मदतीनं अफगाणिस्तानी सत्तेत शिरायचं असं त्याना वाटत असे. जमाती जमातींतले मतभेदही होतेच. पश्तून विरुद्ध इतर अफगाण जमाती असेही संघर्ष होतेच. ते आटोक्यात आणणं कठीण होतं पण निदान पश्तुनांना तरी एकत्र ठेवणं मुल्ला उमरला जमण्यासारखं होतं. पण तोच ऐकत नव्हता. शेवटी तो मेला. आता त्याच्या वारसाला पुढं करून आपला डाव रेटायचा असा पाकिस्तानचा डाव होता.
मुल्लाच्या मृत्यूची बातमी प्रसिद्ध झाल्यानं घोटाळा झालाय. आता पश्तुनांची एकी दुरापास्त झालीय. पाकवादी तालिबान, अफगाणवादी तालिबान, पाकिस्तानचा खैबर पख्तुनख्वा हा अफगाणी प्रदेश अफगाणिस्तानला जोडला पाहिजे असा आग्रह असणारे तालिबान, थकलेले तालिबान, अजूनही रग असलेले तालिबान, उमरचे समर्थक तालिबान, मुल्ला मंसूरचे तालिबान असे किती तरी गट आता तयार झालेत. 
त्यामुळंच आपण पहातोय की गेले काही दिवस अफगाण सरकारवर आणि पाकिस्तानी सैनिकांवरही तालिबान हल्ले करतेय. हे सारं प्रकरण पाकिस्तानच्याही हाताबाहेर चाललं आहे. खैबर पख्तुनख्वामधल्या दहशतवाद्यांवर ( ते पश्तून आहेत ) नवाज शरीफ यांचं सरकार लष्करी कारवाई करतेय. त्या बद्दल अर्थातच अफगाणी जनतेत, तालिबानमधे खूप नाराजी आहे. पंजाबमधे मोठ्या संख्येनं रहाणारी पश्तून जनताही नाराज आहे. ती नवाज शरीफ आणि लष्कराचा गळा धरतेय.
अफगाणिस्तान पुन्हा एकदा अवघड झालंय. अमेरिकन सैन्य बाहेर जातंय. पश्तून, हजारा, उझबेक, ताजिक, नुरिस्तानी, बलुच इत्यादी सतत आपसात भांडणाऱ्या जमाती आता पुन्हा मैदानात उतरतील.  १९८० साली रशिया बाहेर पडल्यानंतर जी स्थिती निर्माण झाली होती तीच यादवीची स्थिती पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. 
अंतर्गत यादवीतूनच मुल्ला उमर याचा जन्म झाला होता. विविध जमाती आणि त्यांच्या टोळ्या यातल्या मारामाऱ्यांना कंटाळून तरूण तालिब उमर या मुल्लाच्या मागं उभे राहिले आणि तालिबान संघटना निर्माण झाली. मुल्ला उमरच्या मृत्यूनंतर अफगाणिस्तान पुन्हा १९८० सालात पोचलं आहे. 
।।