मुल्ला उमरच्या मृत्यूचं रहस्य

मुल्ला उमरच्या मृत्यूचं रहस्य

मुल्ला उमर दोन वर्षांपूर्वी वारला असं अफगाणिस्तान सरकारनं पाकिस्तानी सरकारचा हवाला देऊन ३० जुलै २०१५ रोजी जाहीर केलं. बीबीसीवर ही बातमी प्रसिद्ध झाली तेव्हां कोणाचाच या बातमीवर विश्वास बसला नाही. त्याच्या मृत्यूच्या बातम्या अनेक वेळा आल्या पण कोणतेच पुरावे कधी समोर आले नव्हते.  मुल्ला उमरसारखा नेता मेल्याची बातमी दोन वर्षं लपून कशी राहू शकते? पुरावे कां सादर झाले नाहीत? मुल्ला उमर खरोखरच मेलाय की ही एक मुद्दाम पसरवलेली अफवा आहे? 
केवळ बीबीसी बातमी देतेय म्हणून त्या बातमीवर विश्वास ठेवणं भाग होतं.
ही बातमी प्रसिद्ध होण्याआधी ७ जुलै २०१५ रोजी इस्लामाबादजवळच्या एका खेड्यात अफगाण सरकार आणि तालिबानचे नेते यांच्यात शांतता वाटाघाटी झाल्या होत्या. या वाटाघाटींचा आधी आणि नंतर खूप गाजावाजा करण्यात आला होता. या वाटाघाटी आणि त्यात झालेल्या शांतता कराराला मुल्ला उमरनं पाठिंबा आणि मान्यता दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. दोन वर्षांपूर्वीच मेलेल्या उमरनं पाठिंबा कुठून दिला? कबरीतून?  
  उजेडात आलेल्या तपशिलावरून मुल्ला खरोखरच मेलाय यावर आता विश्वास बसायला हरकत नाही. मुल्ला उमरचा व्यक्तिगत चिटणिस तय्यब आगा यानं सारा मामला उघड केलाय. तय्यब आगाची वक्तव्यं आणि गेल्या काही वर्षातल्या घटना एकत्र केल्यानंतर काय घडलं असावं याचा एक अंदाज आता येतो.
खरोखरच २०१३ च्या एप्रिल महिन्यात मुल्ला उमरचा कराचीत मृत्यू झाला होता. 
मुल्ला उमर मरताना कराचीत कसा पोचला?
अमेरिकेच्या मदतीनं २००१ साली उत्तरी मोर्चानं तालिबान सरकार पाडलं, तालिबान सरकारचा लष्करी पराभव केला. मुल्ला उमर हा तालिबानचा सर्वेसर्वा होता, अफगाण सरकारचा पंतप्रधान होता. उत्तरी मोर्चानं काबुलवर निर्णायक हल्ला करून काबूल ताब्यात घेतल्यावर मुल्ला उमर पळाला. त्यानं पाकिस्तानात क्वेट्टा शहर गाठलं. त्याच्या बरोबर तय्यब आगा इत्यादी सहकारी आणि त्याचे निकटचे सैनिक होते. उमरनं पाकिस्तानात रहावं ही पाकिस्तानची-आयएसायची योजना होती. तालिबानचा पराभव होऊ नये अशी पाकिस्तानची इच्छा होती. अमेरिकेला शेंड्या लावून पाकिस्ताननं तालिबानला खूप छुपी मदत केली होती, उत्तरी मोर्चाचा विजय होऊ नये अशी खटपट केली होती.  पाकिस्तानं  मदरशात तयार केलेले जिहादी   अफगाणिस्तानात लढत होते.  तालिबान सरकारला लागणारा आर्थिक-लष्करी पुरवठा पाकिस्तानच करत होतं.   तालिबान हरत आहे असं दिसल्यावर मुल्ला उमरचं काय करायचं हे पाकिस्ताननं ठरवलं. त्यानुसार उमर क्वेट्ट्यात दाखल झाला.
त्याच वेळी ओसामा बिन लादेनही पाकिस्तानात दाखल झाला. पाकिस्तान अफगाणिस्तानच्या हद्दीवरच्या गावांत त्यानं तळ ठोकला. उमर आणि लादेन दोघेही पाकिस्तानात होते. दोघांचीही ठिकाणं पाकिस्ताननं गुप्त ठेवली, अमेरिकेलाही त्यांचा पत्ता लागू दिला नाही. शेवटी पाकिस्तानला शेंडी लावून अमेरिकेनं स्वतंत्रपणे लादेनची माहिती काढली आणि त्याला ठार मारलं.  त्या वेळी उमर क्वेट्ट्यात मुक्कामाला होता.
आयएसआयनं क्वेट्ट्याला वेढा घातला होता. तिथं उमरला स्वतंत्र वस्ती उभारून दिली होती. त्या विभागाला स्थानिक माणसं अफगाणिस्तान असंच म्हणत असत. मोठ्ठी छावणी होती. तिथं उमर नियमित बैठका घेत असे. क्वेट्ट्यातला बैठकांना क्वेट्टा शुरा असं नाव पडलं होतं. मुल्ला उमर तिथूनच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात असलेल्या पश्तून कमांडरना आणि तालिबानांना निरोप आणि आदेश पाठवत असे. उमर कधीही कोणालाही थेट भेटत नसे. तो कधीही टीव्हीसमोर आला नाही. न्यू यॉर्कर, गार्डियन, बीबीसी यांचे प्रतिनिधी त्याला भेटण्याचा प्रयत्न करीत. महिनोनमहिने ते क्वेट्ट्यात तळ ठोकून असत. परंतू उमरच्या भोवतालचं पश्तून रक्षकांचं कडं मजबूत होतं, आयएसआयचं त्याच्या भोवतीचं कडंही अभेद्य होतं. आयएसआय कोणालाही त्याच्या पर्यंत पोचू देत नसे. अफगाणिस्तानातले, खैबर पख्तुनख्वातले पश्तून पुढारी उमरला  भेटायला जात तेव्हां नीट गाळून त्याना उमरकडं पाठवलं जात असे. उमरच्या घरात बैठका होत. तिथं आयएसायचे लोक हजर असत. तिथल्या निर्णयावर त्यांचं नियंत्रण होतं. तिथं घडलेल्या कोणत्या गोष्टी बाहेर प्रकाशित करायच्या याचा निर्णय आयएसआय करत असे. पाकिस्तानचे अफगाणिस्तानातले हितसंबंध राखणं हा आयएसायचा अजेंडा होता.
तय्यब आगा, आज उमरचा उत्तराधिकारी म्हणून जाहीर झालेला मुल्ला अख्तर मंसूर, उमरचा भाऊ आणि मोठा मुलगा ही माणसं उमरच्या सभोवताली असत. आयएसआयचा  उमरभोवती असलेला विळखा अजगरासारखा मजबूत होता. उमर पाकिस्तानच्या हिताला धक्का पोचेल असा कोणताही निर्णय करणार नाही याची खबरदारी आयएसआय घेत होती. मुल्ला मंसूर हा माणूस आयएसआयनं निवडला होता आणि त्यालाच उमर आपला उत्तराधिकारी करेल याची खबरदारी आयएसआयनं घेतली होती. 
मुल्ला मंसूर अफगाण सरकारशी शांततेच्या वाटाघाटी करेल. तालिबानच्या वतीनं. तालिबान अफगाण सरकारमधे सामिल होईल. तालिबानचं अफगाण सरकारवर नियंत्रण असेल. हे तालिबान सरकार पाकिस्तानातल्या तालिबानला आटोक्यात ठेवेल, पाकिस्तानी तालिबानला पाकिस्तानमधे दहशतवाद करू देणार नाही. हे अफगाण सरकार भारताला अफगाणिस्तानात येऊ देणार नाही.   तालिबान सरकार स्थापन झालं की पाकिस्तानातल्या दहशतवादी गटांना भारत किवा तत्सम ठिकाणी दहशतवादात गुंतवलं जाईल. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानावर पक्की मांड बसल्यावर अमेरिकेची मदतही मिळवता येईल. यासाठी तांत्रिकदृष्ट्या अल कायदाला नेस्तनाबूत केल्याचंही दाखवता येईल. ही पाकिस्तानची रणनीती होती.
मुल्ला उमरला ही नीती मान्य नव्हती. अफगाणिस्तानवर पाकिस्तानचं वर्चस्व असणं   मुल्ला उमरला मान्य नव्हतं. मुल्ला उमरचं भारताशी वाकडं नव्हतं. अल कायदा किंवा पाकिस्तानला सर्व जग इस्लामी करायचं होतं, साऱ्या जगात इस्लामी जिहाद पसरवायचं होतं. मुल्ला उमरला ते मान्य नव्हतं. मुल्ला उमरचा परिघ अफगाणिस्तानपुरताच मर्यादित होता. मुल्ला उमरचा इस्लाम अल कायदाच्या इस्लामपेक्षा किवा आयसिसच्या इस्लामपेक्षा वेगळा नव्हता. तो आधुनिकता, सेक्युलर कल्पना, सहिष्णुता, लोकशाही इत्यादी गोष्टींचा कट्टर विरोधक होता. तरीही त्याचा इस्लाम हा अफगाणिस्तानापुरताच मर्यादित होता. माझ्या भूमीवरून तू जगाची लढाई करू नकोस, अमेरिकेवर हल्ले करून नकोस असं उमरनं लादेनला सांगितलं होतं. उमर पश्तून होता, त्याचा इस्लामही पश्तून टोळीवादी इस्लाम होता. त्याचा समाज पश्तूनवालीनुसार चालत असे, शरियानुसार नव्हे.
उमरच्या भूमिका पाकिस्तानच्या पचनी पडत नव्हत्या. उमर पक्का पश्तून असल्यानं तो इतर कोणाचंही ऐकत नसे. पाकिस्तानला तेच दाचत होतं. त्याना त्यांच्या ताटाखाली एक मांजर हवं होतं.
२००१ नंतरच्या घटना मुल्ला उमरच्या मनाप्रमाणं घडत नव्हत्या. तो असहाय्य होता, पाकिस्तानच्या तावडीत सापडला होता. पाकिस्तानच्या कैदेत असल्यासारखा होता.
पाकिस्तानच्या या छळवादाला कंटाळून त्याचा सेक्रेटरी तय्यब आगा कतारमधे, दोहा या ठिकाणी पळाला. आपल्या कुटुंबाला घेऊन. तिथं त्यानं तालिबानचं आंतरराष्ट्रीय ऑफिस थाटलं. तिथून तो स्वीडन, अमेरिका, सौदी अरेबिया, ब्रिटन, फ्रान्स इत्यादी देशांच्या मुत्सद्द्यांना भेटू लागला. उमरचा माणूस असल्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला मान्यता मिळाली. अफगाणिस्तानमधे शांतता प्रस्थापित करण्यासाठी झालेल्या प्रयत्नात तो महत्वाची भूमिका बजावत असे. अमेरिका ज्याला चांगलं तालिबान ( गुड तालिबान ) म्हणत असे तो गट बहुदा तय्यब आगाचा गट होता, तय्यबच्या माध्यमातून त्या गटाला उमरचा पाठिंबा मिळत असावा. पण आतल्या आत तो आणि पाकिस्तान यांच्यात वितुष्ट आणि तणाव होते. सौदी, अमेरिका इत्यादींना ते दिसत होते. 
मुल्ला उमरच्या व्यक्तिमत्वात काही विलक्षण पैलू होते. तो अफगाणिस्तानचा कारभार चालवी तेव्हांही आपले आदेश कागदाच्या चिटोऱ्यावर, पाठकोऱ्या कागदावर लिहून पाठवत असे. एकदा एक पत्रकार त्याला भेटायला गेला होता. पत्रकाराला अफगाणिस्तानात फिरायचं होतं, मुल्ला उमरच्या कमांडरांना भेटायचं होतं. तशी परवानगी त्याला हवी होती. त्याच्या जवळ सिगरेटच्या पाकिटासारखं कसलं तरी पाकिट होतं. उमरनं ते घेतलं. फाडलं. उलटं केलं आणि त्यावर त्याच्या भाषेत दोन ओळीत याला परवानगी द्या असा मजकूर लिहिला. त्या पाकिटावरच्या परवानगीवर माणूस बिनधास्त अफगाणिस्तानात फिरू शकत होता. 
उमर सॅटेलाईट फोन, सेल फोन वापरत नसे. कारण तसे फोन टॅप करण्याची यंत्रणा अमेरिकेजवळ होती. त्याचा सगळा कारभार तोंडी निरोप आणि चिठ्ठ्यावर चालत असे. त्यानं  सरकारही याच रीतीन चालवलं. पंतप्रधान माणूस. त्याच्याकडं एकाद्या खात्यान पैसे मागितले की समोर ठेवलेल्या पेटीतली  नोटांची पुडकी उमर देत असे.
तय्यब आगा आणि मुल्ला उमर यांच्यातलं कम्युनिकेशन निरोप्ये, चिठ्ठी किवा टेप केलेला निरोप यावर चालत असे.
२०१३ च्या एप्रिलनंतर तय्यब आगाला टेप येणं बंद झालं. चिठ्ठ्या येत. पण त्यावर उमरची सही नसे. तय्यबनं सहीची चिठ्ठी मागायला सुरवात केली. तसं घडेना. क्वेट्ट्यातून निरोप येई  की आहे असंच चालवून घ्या. 
कारण २०१३ च्या एप्रिलमधे मुल्ला उमरचा कराचीत मृत्यू झाला होता.
आयएसायनं ही घटना लपवून ठेवली. मुल्ला मंसूर इत्यादींना पाकिस्ताननं नेतृत्वात बसवलं.  
 उमरच्या नातेवाईकांना, उमरच्या निकटच्या लोकाना मुल्ला मंसुरची नेमणूक मंजूर नव्हती.   ती घाईघाईनं घडवून आणली होती. बहुदा उमर मरणासन्न असताना पाच पन्नास पश्तुन पुढारी आणि तालिबान नेत्यांना आयएसआयनं गोळा केलं, उमरसमोर बसवलं, बैठक झाल्यासारखं केलं आणि मंसूरची नेमणुक करवून घेतली. मंसूर हा उमरचा विश्वासातला होता, जवळचा होता. तरीही अशा पद्धतीन वारस निवडला जाणं हे पश्तून संस्कृतीत बसणारं नव्हतं. अफगाणिस्तानातल्या पश्तून जमातींना ते मंजूर होणं शक्यच नव्हतं. मुल्ला उमरनं कंदाहारमधे स्वतःला   मोमिने मुसलमीन  जाहीर केलं होतं ते हज्जारो मुल्लांसमोर. चोरून चोरून चार भिंतींच्या आड जगातल्या मुसलमानांचा पुढारी कसा काय निवडला जाऊ शकतो असा पश्तून पुढाऱ्यांचा प्रश्न होता. पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याना ही कोंडी सोडवता येत नव्हती. त्यामुळं त्यानी उमरचा मृत्यू लपवून ठेवला, त्याच्या नावानं राज्य चालवलं.
तालिबान संघटनेत मतभेद होते. अफगाण सरकारात सामिल व्हायचं की नाही, झाल्यास कसं सामिल व्हायचं यावर अनेक मतं होती. पाकिस्तानबरोबरचे संबंध हा तर मोठाच वादाचा भाग होता. एक गट सतत मानत आला की दहशतवादाचा उपयोग करून अफगाण सरकार आपल्या हातात घ्यायचं, करझाई-घनी यांच्या सारख्या परदेशी हस्तकांच्या सरकाराचा एक भाग व्हायचं नाही. दुसरा गट काहीसा थकलेल्या,मऊ झालेल्या लोकांचा होता. आता त्याना लढावंसं वाटत नव्हतं. सत्तेत सामिल होऊन सुख उपभोगायची त्याची इच्छा होती. पाकिस्ताननं शेकडो तालिबान नेत्याना पाकिस्तानात जमिनी, घरं, पैसे देऊन सुखासीन केलं  होतं. ही माणसं दहशतवाद करून स्वतःचा जीव धोक्यात घालायला तयार नव्हती. पाकिस्तानच्या मदतीनं अफगाणिस्तानी सत्तेत शिरायचं असं त्याना वाटत असे. जमाती जमातींतले मतभेदही होतेच. पश्तून विरुद्ध इतर अफगाण जमाती असेही संघर्ष होतेच. ते आटोक्यात आणणं कठीण होतं पण निदान पश्तुनांना तरी एकत्र ठेवणं मुल्ला उमरला जमण्यासारखं होतं. पण तोच ऐकत नव्हता. शेवटी तो मेला. आता त्याच्या वारसाला पुढं करून आपला डाव रेटायचा असा पाकिस्तानचा डाव होता.
मुल्लाच्या मृत्यूची बातमी प्रसिद्ध झाल्यानं घोटाळा झालाय. आता पश्तुनांची एकी दुरापास्त झालीय. पाकवादी तालिबान, अफगाणवादी तालिबान, पाकिस्तानचा खैबर पख्तुनख्वा हा अफगाणी प्रदेश अफगाणिस्तानला जोडला पाहिजे असा आग्रह असणारे तालिबान, थकलेले तालिबान, अजूनही रग असलेले तालिबान, उमरचे समर्थक तालिबान, मुल्ला मंसूरचे तालिबान असे किती तरी गट आता तयार झालेत. 
त्यामुळंच आपण पहातोय की गेले काही दिवस अफगाण सरकारवर आणि पाकिस्तानी सैनिकांवरही तालिबान हल्ले करतेय. हे सारं प्रकरण पाकिस्तानच्याही हाताबाहेर चाललं आहे. खैबर पख्तुनख्वामधल्या दहशतवाद्यांवर ( ते पश्तून आहेत ) नवाज शरीफ यांचं सरकार लष्करी कारवाई करतेय. त्या बद्दल अर्थातच अफगाणी जनतेत, तालिबानमधे खूप नाराजी आहे. पंजाबमधे मोठ्या संख्येनं रहाणारी पश्तून जनताही नाराज आहे. ती नवाज शरीफ आणि लष्कराचा गळा धरतेय.
अफगाणिस्तान पुन्हा एकदा अवघड झालंय. अमेरिकन सैन्य बाहेर जातंय. पश्तून, हजारा, उझबेक, ताजिक, नुरिस्तानी, बलुच इत्यादी सतत आपसात भांडणाऱ्या जमाती आता पुन्हा मैदानात उतरतील.  १९८० साली रशिया बाहेर पडल्यानंतर जी स्थिती निर्माण झाली होती तीच यादवीची स्थिती पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. 
अंतर्गत यादवीतूनच मुल्ला उमर याचा जन्म झाला होता. विविध जमाती आणि त्यांच्या टोळ्या यातल्या मारामाऱ्यांना कंटाळून तरूण तालिब उमर या मुल्लाच्या मागं उभे राहिले आणि तालिबान संघटना निर्माण झाली. मुल्ला उमरच्या मृत्यूनंतर अफगाणिस्तान पुन्हा १९८० सालात पोचलं आहे. 
।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *