पॅलेस्टाईन, प्रश्न भावनिक.
पॅलेस्टाईन संघर्ष समजून देणारं पुस्तक
।।
Tomorrow Is Yesterday.
Robert Malley, Hussein Agha
।।
पॅलेस्टिनी, इस्रायल यांच्यात १९९३ चे १९९५ या काळात झालेल्या ऑस्लो कराराबद्दल हे पुस्तक आहे.
१९४८ मधे इस्रायल स्थापन झाल्यापासून इस्रायल संघर्ष सुरु झाला. पॅलेस्टिनी म्हणत होते ज्यूंनी आपल्याला न विचारता पॅलेस्टाईनमधे घुसखोरी केलीय, त्यांना घालवून द्या, पॅलेस्टाईन आमचं आहे. बरोब्बर दुसरं मानस ज्यूंचं म्हणजे इस्रायलचं होतं. ही आमची मूळ भूमी आहे, ती पूर्णपणे आमच्या ताब्यात आली पाहिजे, तिथं पॅलेस्टिनी नकोत.
युद्ध झाली. दंगे झाले. दुभंगलेलं पॅलेस्टाईन रक्त आणि भग्नावशेषांनी माखलं.
जगभर चर्चा होत होती. अमेरिकेनं पुढकार घेतला. पॅलेस्टाईन आणि इस्रायलला एकत्र बसवून प्रश्न सोडवायचं ठरवलं. या चर्चेचा शेवट पॅलेस्टाईन आणि इस्रायल या दोन सार्वभौम देशांच्या निर्मितीत व्हावा अशी अमेरिकेची आणि जगाची इच्छा होती.
चर्चा गुप्त स्वरुपाची होती. कोणताही निश्चित आराखडा किंवा प्रस्ताव अमेरिकेकडं नव्हता. इस्रायल आणि पॅलेस्टाईनचे प्रतिनिधी आपसात भांडले. दोघांनी आपापले पूर्वग्रह आणि ठरलेल्या मागण्या घट्ट धरून ठेवल्या. चर्चा निष्फळ झाली.
पुस्तकाच्या शीर्षकातून लक्षात येणारं, भविष्य घडवायला निघाले घडवला भूतकाळ, हे लेखकांचं म्हणणं पुस्तकात लख्ख स्पष्ट होतं.
वरील चर्चा घडवण्यासाठी लागणारं पडद्यामागचं संशोधन लेखकांनी केलं होतं. अनेक वर्षांच्या अभ्यासांती चर्चेचा आराखडा दोघांनी तयार केला होता. पण शेवटी दोन्ही बाजूंच्या नेत्यांचा विचार महत्वाचा होता, निर्णय त्यांनी घ्यायचा होता. तसंच चर्चा घडवून आणणाऱ्या अमेरिकेचा काही तरी निश्चित विचार असायला हवा होता. लेखकांनी मैदान तयार करून दिलं, खेळ शेवटी इस्रायल, पॅलेस्टाईन आणि अमेरिका या तिघांनी करायचा होता.
लेखक या पुस्तकात चर्चा कशी घडली ते मांडतात. नेते आपसात कसे बोलत होते, त्यांची समजूत आणि भाषा कशी होती, त्यांची पूर्व तयारी कशी होती, त्यांची कामाची पद्दत काय होती याचं वर्णन लेखक करतात. हे वर्णन प्रथम पुरुषी आहे. पत्रकार, विचारवंत, लेखक, क्रीटिक ही माणसं जसं लिहितात तसं लेखकांनी लिहिलेलं नाही. लेखकांना जे दिसलं, जे ऐकू आलं ते पुस्तकात आहे. सगळं ऑथेंटिक आहे. त्यात सांगोवांगी असं काही नाही. घटना घडत असताना तिथं हजर असणाऱ्या माणसांनी हे लिहिलंय.
लिहीत असताना लेखकांनी कराराच्या आधी केलेली तयारी, विचार, लेखकांची मतं त्यात येतात. दोघंही मध्य पूर्वेचा अभ्यास करणारे असल्यानं घटनांबद्दल त्यांची मतं तयार झाली होती.ती मतं लेखकांनी हळुवार अनाग्रही पद्धतीनं मांडली आहेत, त्यात अभिनिवेश नाही. याचं मुख्य कारण घटना घडवणारे आपण नाहीयोत, आपण मदतनीस आहोत याचं भान दोघांना आहे. अडीचशे पानात लेखकांनी आपली निरीक्षणं मांडली आहेत.
पुस्तकातून लक्षात येतात ते मुख्य मुद्दे असे. एकूण चर्चेची आखणी सदोष होती. अमेरिकेनं कोणताही निश्चित अजेंडा किंवा कार्यक्रम आखला नव्हता. ढोबळ मानानं पॅलेस्टाईनची विभागणी करावी आणि दोन देश निर्माण व्हावं इतकंच अध्यक्ष क्लिंटन यांच्या डोक्यात होतं. विभागणी नेमकी कशी, सीमा रेषा कोणत्या, विभागणी केव्हां पूर्ण होईल, विभागणीचं काम कोण पूर्ण करणार, त्यासाठी लागलेली साधनं कुठून येणार इत्यादी कोणताही विचार क्लिंटन यांनी केला नव्हता. अनौपचारीक चर्चा व्हावी आणि त्यातून योजना ठरावी असं त्यांच्या डोक्यात होतं. फारच घोळ आणि गोंधळ.
क्लिंटन इस्रायल धार्जिणे होते, ते इस्रायलला झुकतं माप देत होते.
लेखकांनी मांडलेला मुख्य मुद्दा असा की अमेरिकेला पॅलेस्टाईन संघर्षाचं खरं रूपच समजलेलं नव्हतं. वास्तवाची कल्पना अमेरिकेला नव्हती. भांडण जमिनीचं नव्हतं, भांडण अस्मितेचं होतं, भांडण आयडेंटिटीचं होतं. काही शतकांपासून झालेल्या जखमा दोन्ही बाजूंमधे अजूनही ओल्या होत्या. दोन्ही बाजूंचा एकमेकावर कमालीचा अविश्वास होता.कोणीही एक इंच मागं यायला तयार नव्हतं. एकमेकावर सूड घेण्यासाठी दोघे सज्ज होते. हा होता भूतकाळ, हा होता ‘काल’. तो अमेरिकेनं समजून घेतला नाही, अमेरिका एक वेगळाच ‘उद्या’ तयार करायला निघाली.
म्हणूनच ऑस्लो अपयशी ठरलं असं लेखक म्हणतात. लेखकाचं म्हणणं आहे की पॅलेस्टाईन संघर्ष जमिनीची देवाण घेवाण करून सुटणार नव्हता, दोन देश निर्माण करून प्रश्न सुटणार नव्हता, भविष्यातही तो त्या वाटेनं सुटण्याची शक्यता नाही. शेकडो वर्षांपासून पडलेल्या गाठी सुटायलाही तितकाच वेळ लागेल असं लेखक म्हणतात. लेखक राजकारणी नसल्यानं किती वर्षं लागतील, त्यासाठी काय करावं लागेल, किती पैसे खर्च करावे लागतील या भाषेत बोलत नाहीत. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ निघतो तो असा की दोन्ही बाजू एकमेकांना समजून घेऊन सामंस्यानं वागले तर कालांतरानं हा प्रश्न सुटेल.
लेखकाचं एक वाक्य महत्वाचं आहे. फाळणीनं प्रश्न सुटत नाही.
दाणकन भारताची फाळणी आणि फाळणी विरोधाची गांधीजींची भूमिका डोळ्यासमोर येते.
रॉबर्ट मॅली अमेरिकन आहेत.त्यांनी क्लिंटन, ओबामा आणि बायडन यांच्या काळात अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यासाठी मध्य पूर्वेवरच्या धोरणावर काम केलं. अमेरिकेच्या बाजूनं त्यानी ऑस्लो चर्चेची तयारी केली.
हुसेन आगा आई, वडील, आजोबा,आजी अशा बाजूनी इराकी,इराणी,लेबनीज, पॅलेस्टिनी आहेत. पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनमधे ते सक्रीय कार्यकर्ते होते. धकाधकीच्या काळात ते पॅलेस्टाईन आणि लेबनॉनमधे कार्यकर्ता या नात्यानं वावरले आहेत. त्यांचं शिक्षण ऑक्सफर्डमधे झालं, तिथंच ते प्राध्यापक आहेत. ऑस्लो चर्चेत त्यांनी पॅलेस्टाईनची बाजू तयार करण्यात भाग घेतला.
।।