ट्रंप जिनपिंग कसे वावरतात?

ट्रंप जिनपिंग कसे वावरतात?

 सी जिनपिंग आणि डोनल्ड ट्रंप एका विशाल उद्यानात बसले होते. डाव्या सोफ्यावर ट्रंप, समोरच्या सोफ्यावर जिनपिंग. ट्रंप गुडघ्यावर दुसरा पाय दुमडून काहीसे वाकून जिनपिंग यांच्याशी बोलत होते. जिनपिंग सोफ्याच्या पाठीवर दोन्ही हात ताणून बसले होते.

ट्रंप काही तरी महत्वाचा मुद्दा जिनपिंगना सांगत होते. जिनपिंग अगदी आरामात,रिलॅक्स मूडमधे ‘हं, सांगा तुम्हाला काय सांगायचंय ते…’ अशा आविर्भावात होते.

 जिनपिंग ट्रंपपासून अंतर राखून होते. शरीरानं आणि मनानंही. ट्रंपचा चेहरा काहीसा ताणलेला होता. जिनपिंग यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या नव्हत्या, कोणतीही भावना त्यांच्या चेहऱ्यावर नव्हती.

असाच एक प्रसंग. मोठं दालन. आसपास भरपूर माणसं दोघांकडं लक्ष ठेवून. ट्रंप सतत फ्रेंडली असल्यासारखं वागत होते, हातवारे करत होते. जिनपिंग शांत. ट्रंपनी उजवा हात जिनपिंगच्या बाहूकडं नेला. जिनपिंग किंचितसे मागे सरकले. त्यांना ट्रंपनी त्यांच्या दंडावर हात ठेवलेला नको होता.

 जिनपिंग भव्य इमारतीच्या तळाच्या पायरीपाशी उभे होते. लाल गालिचा. 

ट्रंप उजवा हात हस्तांदोलनासाठी पसरून सी जिनपिंगकडं निघाले.  जिनपिंग यांनी त्यांचा उजवा हात जेमतेम पुढं केला होता. ट्रंप भेटीसाठी उत्सूक होते. जिनपिंग डाव्या पायावर किंचित वाकून जवळपास निर्विकार उभे होते.

ट्रंपनी जिनपिंगचा हात हातात घेतला. आपल्या डाव्या हातानं जिनपिंगचा हात थोडासा थोपटला. जिनपिंग अगदी मंदसं हसले. ट्रंप जिनपिंगची स्तुती करणारं काही तरी बोलले. जिनपिंगनी त्या बोलण्याकडं लक्ष दिलं नाही.

ट्रंपना हातमिठी सोडवायची इच्छा नव्हती. 

जिनपिंगनी हात सोडवून घेतला आणि चला असं म्हणाले.

दोघे चालू लागले. 

एकदा ट्रंपनी जिनपिंगचा हात घट्ट धरला आणि काही तरी विनोद केला. एकादं लाकूड दुसऱ्याच्या हातात दिलंय अशा आविर्भावात जिनपिंगनी हात ट्रंपच्या हाती ठेवला आणि अगदीच मंदसं हसले.

ट्रंप निवडणूक प्रचार मोहिमेत असल्यासारखं वागत होते. जयघोष करणाऱ्या छोट्या मुलांना हातवारे करत होते, समोरच्या प्रेक्षकातल्या एकाद्या माणसाकडं बोट दाखवून अमेरिकन स्टाईलनं मी तुम्हाला पाहिलंय बरं कां असं सांगत होते. फुदकत होते असं म्हणता येईल.

शेजारी जिनपिंग. थंड. हातवारे नाहीत. अत्यंत गंभीर. 

ट्रंपच्या लेखी ते एका मित्राला भेटत होते. जिनपिंग  माझा ग्रेट मित्र, जिनपिंग ग्रेट माणूस आहे, आमचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत अशा भाषेत ट्रंप बोलत होते, औपचारीक प्रसंगातही, औपचारीक मेजवानीतही. 

जिनपिंग प्रतिसाद देत नव्हते. एकदाही त्यांनी ट्रंप या व्यक्तीचं कौतुक केलं नाही, ट्रंपवर फुलं उधळली नाहीत. दोन देशांच्या राष्ट्रपतींची भेट आहे, गंभीर बिझनेस करण्यासाठी आपण जमलो आहोत असं जिनपिंग यांच्या बोलण्यात आणि वागण्यात दिसत होतं.

माणसाची देहबोली, माणसाचा सूर आणि पट्टी, माणसाचे हातवारे इत्यादींचा अभ्यास केला जातो. देहबोलीवरून माणसाच्या मनात काय आहे ते कळतं असं देहबोलीशास्त्र सांगतं. अलीकडं सरकारं आणि नेते देहबोली सल्लागार नेमतात. टीव्ही, चित्रपट, फॅशन डिझायनिंग या क्षेत्रात काम करणारी माणसं नेत्यांना सल्ला देत असतात. नेत्यांनी कसं दिसावं, कसं वागावं, कसं बोलावं याचा सल्ला व्यावसायिक लोक नेत्यांना देत असतात.

टीव्हीचं युग सुरु झाल्यापासून देहबोली आणि दिसणं या गोष्टीला महत्व आलं. अमेरिकेत राष्ट्रपती पदाचे उमेदवार टीव्हीवर वादविवाद खेळतात. तीन वेळा. त्या शोमधे उमेदवार कसा दिसतो यावर बहुतांश वेळा उमेदवाराचं यश अवलंबून असतं. 

टीव्ही युग सुरु झालं तेव्हां पहिली वादचर्चा केनेडी आणि निक्सन यांची झाली. निक्सन वैचारिक टाईप होते. कपडे, मेकअप वगैरे गोष्टी फालतू असतात असं त्यांचं मत. विचार मांडणीची तयारी त्यांनी केली. 

केनेडीना टीव्ही समजला होता. त्यांनी आपल्या केसांची स्टाईल बदलली. पाठीमागं असलेल्या पडद्याशी मॅच होणारा शर्ट घातला. आयत्या वेळी शर्टाच्या आणखी दोन तीन जोड्या आणून शर्ट बदलले. मेकअप करून घेतला.

वादचर्चा आणि प्रेसिडेंटपद, दोन्ही केनेडीनी जिंकलं.

ट्रंप यांच्या वागण्यावरून जिनपिंग यानी ट्रंपना जोखलं होतं. ट्रंप पहिल्या खेपेला निवडून आले तेव्हां जिनपिंग ओबामाना भेटले आणि ट्रंपबद्दलचं ओबामांचं मत, ट्रंपबद्दलची इंप्रेशन्स जिनपिंग यांनी समजून घेतली होती.

ट्रंप आक्रमक असतात. झेलेन्स्कींशी ते उद्धटपणानं वागले. एकदा मर्केल ट्रंपना भेटायला आल्या होत्या, त्यांनी हस्तांदोलनासाठी हात पुढं केला, ट्रंप दूर उभे राहिले, हस्तांदोलन केलं नाही. मर्केलना फार ऑकवर्ड झालं होतं. अनेक वेळा ट्रंप समोरच्या माणसाचा हात हातात घेऊन त्याला आपल्याकडं ओढतात.समोरच्या माणसाचा तोल जातो. ट्रंप हसतात, कशी गंमत केली असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर असतो.

समोरच्याशी दादागिरी, उद्धटपणानं वागून त्याला घाबरवायचं आणि आपला हेतू साध्य करायचं ही ट्रंप यांची वागण्याची पद्धत. त्यांच्या टीव्हीवाल्या व्यावसायिकांनी त्याचं अनौपचारिक शिक्षण त्या दिशेनं केलं आहे. 

पण हेही खरं की समोरचा ऐकत नसेल, झुकायला तयार नसेल तर ट्रंपचा चेहरा पडतो, ट्रंप पळ काढतात.

चीन दौऱ्यात ट्रंप आक्रमक नव्हते, सतत जिनपिंगना लोणी लावत होते. खुशामद करून जिनपिंगना वश करायचं ट्रंपनी ठरवलं होतं.  

जिनपिंग थंड होते. सल्लागारांनी ठरवून दिलेलं स्क्रिप्ट ते वाचत होते. सरकारचं धोरण ठरलं होतं, त्यापासून सूतभरही हलायला ते तयार झाले नाहीत. मित्रत्व वगैरे भानगड नाही, सारा मामला गंभीर आणि ऑफिशियल ठेवला. त्यांच्या लेखी ट्रंप ही व्यक्ती नव्हती, ट्रंप हे अमेरिका या देशाचे प्रेसिडेंट होते. तो आब राखून, ती डिग्निटी राखून जिनपिंग वागले.

ट्रंप यांच्या चीन भेटीतून ट्रंपना काय मिळालं हा एक स्वतंत्र विषय आहे. पण देहबोलीच्या हिशोबात बोलायचं तर जिनपिंगनी ट्रंप यांना त्यांची जागा दाखवून दिली असं म्हणता येईल.

।।

Comments are closed.