झुंज

झुंज

झुंज

कार्टाजेना. द. अमेरिकेतल्या कोलंबियातलं ५०० वर्षांपासून विकसित होत असलेलं शहर. ५०० वर्षांपूर्वी शहराभोवती बांधलेल्या तटभिंतीला लागून जुनी घरं आहेत.

एका घरात तीन साडेतीनशे माणसं किंचाळत आहेत.  ओरडत आहेत. एका हातात कोल्ड ड्रिंकची बाटली. दुसऱ्या हातात नोटांची चळत. माणसं बेभान आहेत.

समोर कोंबड्या झुंजत आहेत. 

  दोन्ही कोंबडे अटीतटीनं लढतात.   एक कोंबडा जखमी होतो, दूर पळायचा प्रयत्न करतो. जिंकायच्या वाटेवरचा कोंबडा उन्मादानं त्या जखमी कोंबड्यावर हल्ला करतो. चोचेनं भोसकतो. तंगडीच्या मागल्या बाजूला असलेल्या काट्यानं ओरबाडतो. रक्ताची चिळकांडी उडते. झुंजीसाठी तयार केलेल्या मिनी मैदानाच्या भिंतीवर रक्ताचा फर्राटा उमटतो. आधीच्या अनेक झुंजींमधल्या रक्ताची पुटं असतात.  त्यावर रक्ताचा नवा फटकारा. 

झुंज संपली. एक कोंबडा मेला.

ज्यानं जिंकलेल्या कोंबड्यावर पैसे लावलेत तो उन्मादानं उड्या मारतो, हातातली पैशाची चळत नाचवतो. हरलेल्या कोंबड्यावर पैसे लावलेला माणूस संतापलेला असतो, तडफडत पडलेल्या कोंबड्याला शिव्या मोजतो. झुंज आयोजकाचा माणूस येतो. जिंकलेल्या माणसाला पैसे देतो. 

मैदानात झुंजणारे. मैदानाबाहेर स्पॉन्सर.वातावरण आवाजानं भरलेलं.

कर्मचारी हातात झाडू आणि एक छोटी बादली घेऊन येतो. पसरलेली पिसं गोळा करून बादलीत भरतो. मैदान ठीक करतो. मेलेल्या कोंबड्याला टोपलीत टाकतो. जिंकलेल्या कोंबड्याला त्याचा मालक प्रेमानं कुरवाळत मैदानाबाहेर घेऊन जातो.

दोन नवे कोंबडे मैदानात येतात.

पैसे लावले जातात. आयोजकाचा माणूस पैसे गोळा करतो.

नवी झुंज सुरु होते.

झुंज संध्याकाळी  चालते. एका संध्याकाळी सुमारे १०० झुंजी होतात. त्यातले वीसेक कोंबडे मरतात. बाकीचे जखमी होऊन पुढल्या झुंजीसाठी तयार केले जातात. 

अख्ख्या कोलंबियात सुमारे १० हजार मैदानं आहेत.एकेकाळी कोलंबियावर स्पेनचं राज्य होतं. प्रजा राज्यकर्त्यांचं अनुकरण करत असतात. स्पॅनिश झुंज कोलंबियात रुजली. 

झुंजीसाठी कोंबडे तयार करणं हा एक मोठ्ठा व्यवसाय झाला आहे. झुंजणारा कोंबडा निवडतात, त्याच्या पासून नवे कोंबडे निपजतात. कोंबड्याला प्रशिक्षण दिलं जातं. कुस्ती किंवा बॉक्सिंग साठी प्रशिक्षण देतात तसं. झुंजणाऱ्या कोंबड्यांसाठी खास अन्न असतं, त्यांना व्हिटॅमिनची इंजेक्शनं देतात. ब्रीडर, झुंजीचे आयोजक, औषधं विक्रेते, झुंजीच्या ठिकाणी खपणारी पेयं, अन्नपदार्थ. सुमारे ३ लाख कुटुंब झुंजीवर जगतात.

नुकतीच कोलंबिया न्यायालयानं कोंबड्या झुंजवण्याला बंदी घातली आहे. कोंबड्या झुंजवणं ही क्रूरता आहे असं कोर्टानं म्हटलंय.एकादी गोष्ट शेकडो वर्षं चालत आलीय, एकादी प्रथा संस्कृतीचा भाग झालीय म्हणून ती योग्य आहे असं मानायचं कारण नाही असं कोर्टानं निकालात म्हटलं.

झुंजजीवी कुटुंबांनी बंदीला विरोध केला. सांस्कृतीक परंपरा हा कोर्टाचा विषय होऊ शकत नाही असा प्रतिवाद त्यांनी केला. कोर्टानं तो मुद्दा धुडकावला. झुंजजीवी म्हणाले की त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. कोर्टानं त्या कुटुंबांना सरकारनं पर्यायी उत्पन्नाची साधनं पुरवावीत असा आदेश निकालात दिला.

माणसं कोंबड्या-कोंबडे खातात. कोंबडं मारलं जातं तेव्हां पहावत नाही, ती क्रूरताच असते. कोर्ट कोंबडं खाऊ नका म्हणत नाहीत. कोंबडं खाऊ नका म्हणणं म्हणजे जवळ जवळ मांसाहार करू नका असं म्हणणं आहे. ते कसं शक्य आहे? हज्जारो वर्षं माणूस प्राणी मारून खात आला आहे. कोर्ट त्यात पडू शकणार नाही. न्यायाधीशच मांसाहार करत असतात. 

मांस खाऊ नका असा प्रचार जैन करू शकतात. जैनांवर तशी सक्तीही असेल. मांसाहार केलात तर पाप लागेल वगैरे. चोरून खाल्लंत तर चालेल.  स्वर्गात जाताना रखवालदाराला आपण हॉटेलात मांस खात होतो ते सांगू नका, किंवा रखवालदाराला चिरीमिरी द्या, स्वर्गात प्रवेश मिळेल.

 कोर्टात एक प्रतिवाद असा निघाला की कोंबड्यांमधे झुंजणं  नैसर्गिक आहे. सर्वच नसले तरी  तरी काही कोंबडे  आक्रमकच असतात. अशा कोंबड्यांनी झुंजलं तर काय बिघडतं. प्राणी नाही तरी एकमेकाशी मारामारी करून एकमेकाला मारत असतातच. झुंज हा एक खेळाचाच प्रकार नाही काय?

दुसरा प्रतिवाद असा निघाला की आक्रमक हिंसक झुंजणं हे कोंबड्याच्या डीएनएमधेच नाही. कित्येक वेळा झुंजवण्यासाठी कोंबड्यांना मैदानात सोडलं जातं तेव्हां कोंबडे एकमेकाशी प्रेमानं वागत असतात, मारामारीचा मूड अजिबातच नसतो. अशा वेळी त्यांना चिथवण्यात येतं. काही वेळा चिथावूनही उपयोग होत नाही. अशा वेळी झुंज रद्द होते. आयोजक वैतागून कोंबड्यांना शिव्या देऊन मैदानाबाहेर काढतात.  या प्रतिवादाचे समर्थक सांगतात की झुंजणं ही प्रवृत्ती मुद्दाम प्रशिक्षण देऊन कोंबड्यामधे रोवली जाते. सबब झुंज ही गोष्ट कृत्रीम आहे.

हल्ली कुठलाही वाद आला की त्याला वैज्ञानिक आधार दिला जातो. झुंज वादातही अनेक पहाण्या आणि अभ्यास न्यायालयात मांडण्यात आले. 

कोर्टानं बंदी घातलीच.

स्पेनच्या काही भागात बुल फाईटवर बंदी आहे. स्पेनमधे बुलफाईटसाठी मैदानं, स्टेडियम उभारण्यात आलीत. दोन तीन मजली इमारतीत हज्जारो माणसं बैल जखमी होण्याची, मरण्याची, वाट पहात असत. प्रख्यात साहित्यिकांनी, विचारवंतानी बुलफाईटवर बंदीची मागणी केली होती. अर्नेस्ट हेमिंग्वे या प्रख्यात लेखकाचा बुलफाईटला दणदणीत पाठिंबा होता. बुलफाईटवर कायद्यानं  बंदी  झाली. बुलफाईटची स्टेडियम आता पर्यटनाची स्थळं झालीत.

माणसाला हिंसा पहावत नाही. लाईव्ह, जिवंत हिंसा पहावत नाही. सिनेमात हिंसा पहाण्याचा आनंद माणूस घेतो. खरं म्हणजे याच न्यायानं जगानं गाझा, युक्रेन इत्यादी लढायांवरही बंदी घालायला हवी. जगानं ठरवावं की  लढाया फक्त सिनेमातच दाखवाव्यात. 

 कोलंबिया कित्येक बऱ्यावाईट गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. नोबेल विजेता कादंबरीकार मार्खेज तिथला; जगातला सर्वात मोठा ड्रग भाई पाब्लो एस्कोबार तिथला. एकेकाळी माफिया, ड्रग भाई, गुन्हेगारी,दंगली,खून,अपहरणं इत्यादीसाठी कोलंबिया प्रसिद्ध होता. 

आता चित्रं काहीसं बदललंय. आता कोलंबियातली आणि   पाचू जगभर खपत आहेत. तिथली हिंसा आता बरीच आटोक्यात आली आहे, असं म्हणतात.

।।

Comments are closed.