लेखक घडवणारा संपादक मॅक्सवेल पर्किन्स

लेखक घडवणारा संपादक मॅक्सवेल पर्किन्स

मौज प्रकाशनाचे संपादक  श्रीपु भागवत यांचा अभ्यास करत असतांना मी लेखक मिलिंद बोकिल यांची भेट घेतली. त्या वेळी  मी पर्किन्स यांचं चरित्र वाचत होतो, त्यांच्यावर केलेली फिल्म पहात होतो. तसा उल्लेख केल्यावर बोकिल म्हणाले की त्यांच्या श्रीपुंच्या झालेल्या अनेक भेटींमधे श्रीपु पर्किन्स यांचा उल्लेख करत असत. श्रीपु पर्किन्सनं प्रभावित झाले होते असं बोकिल म्हणाले.

।।

मेडलिन बॉईड एक कागदांचं बाड घेऊन मॅक्स पर्किन्सकडं पोचल्या. मॅक्स पर्किन्स हे स्क्रिबनर या न्यू यॉर्कमधील प्रकाशनामधले एक संपादक होते. म्हणाल्या की हा लेखक चांगला आहे. छापा. तुमची इच्छा असेल तर कॉपी पाठवते. मॅक्स म्हणाले, पाठवा. मेडलिन म्हणाल्या अहो कॉपी हवी असेल तर एक ट्रक पाठवावा लागेल.

दुसऱ्या दिवशी कॉपी पोचली. 1200 कागद होते. सुमारे 3 लाख शब्द होते.

थॉमस वुल्फ या लेखकाची ही पहिलीच कादंबरी होती. तिच्या लांबीमुळं अनेक प्रकाशकांनी ती नाकारली होती. टेबलावर पोचल्या पोचल्या मॅक्सनी मजकुर वाचायला सुरवात केली आणि दोनच दिवसात मेडलीनला सांगितलं की वुल्फला   बोलावून घ्या.

एके दिवशी साडेसहा फूट चार इंची  वुल्फ मॅक्सच्या दारात उभा झाला.

अस्ताव्यस्त कपडे. टाय ओघळलेला. केस अस्ताव्यस्त. वुल्फ मॅक्ससमोर बसला. आपलं आपणच न विचारता बोलू लागला की मला माहित आहे की तुम्ही माझी कादंबरी छापणार नाही आहात. सारी दुनिया मला नाकारतेय. जाम आरडाओरड केली. ऑफिसमधले इतर लोक आश्चर्यानं पहात होते. मॅक्स गप्प. वुल्फ उठला ओरडा करत बाहेर जायला निघाला.

तुमची कादंबरी छापायचा निर्णय झालाय. मॅक्स थंडपणे आवाजात चढउतार न करता बोलला.

वुल्फ थबकला.

काय म्हणालात असं विचारत मागं फिरला.

हां. मी आता जे बोललोय तेच पुन्हा सांगेन. मॅक्स म्हणाले.

मॅक्सनं एक पत्र आणि त्याबरोबर एक चेक वुल्फच्या हातात ठेवला.

वुल्फ उडालाच. खोलीच्या बाहेर जाऊन छप्पर भेदेल अशा आवाजात ओरडला. तसाच बेभान अवस्थेत रस्त्यावर आला. गाडीखाली येता येता वाचला. माझी कादंबरी प्रसिद्ध होणार असं ओरडत, हातातला लिफाफा नाचवत रस्ताभर फिरला.

कादंबरी म्हणजे वुल्फचं आत्मकथन होतं. अशविल या गावात वुल्फ वाढला होता. गावाचा परिसर, गावातली माणसं, आई वडील, भावंडं इत्यादी माणसं वुल्फनं नावं बदलून कादंबरीतली पात्रं केली होती.

मॅक्सनी पूर्ण मजकूर वाचला होता. दिवसभर, घरी परतताना ट्रेनमधे, घरी, घरातून ऑफिसमधे येताना.मॅक्सनी वुल्फची चौकशी केली. त्याला रहायला जागा नव्हती. मॅक्सनी त्याला एक अपार्टमेंट भाड्यानं घेऊन दिलं आणि चरितार्थ चालावा यासाठी अनामत रकमेचा चेक दिला. वुल्फ दररोज दुपारनंतर मॅक्सच्या टेबलापाशी पोचत असे. रात्री उशीरापर्यंत बसून मजकुराची चर्चा करत असे. खडाजंगी होत असे.

मॅक्सनी अगदी सुरवातीलाच सांगून टाकलं की कादंबरी उत्तम आहे परंतू तिच्यावर खूप काम करावं लागेल, खूप मजकूर कापावा लागेल. वुल्फ भडकला. नकार दिला. मॅक्स त्याला समजून सांगत. मग नाईलाजानं तो मजकूर कापायला परवानगी देई.

पुस्तकाच्या सुरवातीलाच नायकाच्या वडिलांच्या लहानपणाची गोष्ट होती. मॅक्स म्हणाले की ते  काही हजार शब्दांचं वर्णन कापावं लागेल. वुल्फ तयार नव्हता. मॅक्स म्हणाले की नायकाच्या डोळ्यातून कादंबरी व्यक्त झालीय. त्याचे अनुभव हे कादंबरीचं मुख्य सूत्र आहे. त्याचे वडील लहानपणी कसे होते वगैरे गोष्टी ऐकीव असल्यानं त्या नायकाच्या अनुभवाच्या नाहीत. सबब तो मजकूर कटाप.  वुल्फ म्हणाला  एक अक्षरही कापायचं  नाही.  मॅक्सनं त्याला थंडपणे सांगितलं की कादंबरी चांगली व्हायची असेल तर हा निरुपयोगी भाग काढावा लागेल. हज्जारो शब्द कापले गेले.

कादंबरीत एक प्रसंगात दोन तरुणांची भेट, त्यांची मारामारी इत्यादी दाखवलं होतं. मॅक्स म्हणाले ते कापायला हवं. वुल्फ म्हणाला की त्या प्रसंगावरून ते गाव कसं आहे ते दिसतं. मॅक्स म्हणाला ते सिद्ध करण्याची आवश्यकता नाही ते इतरत्र इतर प्रसंगांमधून सिद्द झालंय.

कादंबरीत नायकाची मावशी, भावंडं इत्यादी व्यक्तिचित्र रंगवणारे प्रसंग होते. मॅक्स म्हणाला की ते प्रसंग स्वतंत्रपणे चांगले आहेत, तिथली भाषाही उत्तम आहे. पण त्यामुळं नायकाबद्दलची समजूत अधिक विकसित व्हायला मदत होत नाही, ते भरताड आहे.

कादंबरीमधे अनेक ठिकाणी वुल्फनं त्या काळच्या (कादंबरीतल्या नव्हे तर ज्या काळात कादंबरी प्रसिद्ध व्हायची होती त्या  काळातल्या) स्थितीवर टिप्पण्या केल्या होत्या. मॅक्स म्हणाले की कादंबरीचा काळ काही वर्षांपूर्वीचा आहे, लेखकानं विद्यमान काळ त्यात घुसवून आपले विचार घुसडता कामा नयेत.

वुल्फनं लिहिलेलं हस्तलिखित मॅक्सच्या ऑफिसात टाईप होत होतं आणि त्याच वेळी दोघं जण हस्तलिखित वाचत होते. लाल पेन्सिल झिजत होती.

एकदा दैनंदिन चर्चा आणि वाद झाल्यानंतर वुल्फ म्हणाला की चल मी कुठं बसून कादंबरी लिहीलीय ती जागा दाखवतो.

दोघे जण ब्रुकलिन हाईट्स या विभागातल्या एका घराच्या दारात पोचले.   घराला कुलुप होतं. कारण तिथं आता नवे भाडेकरू रहात होते.दोघांनी मागल्या बाजूनं खिडकी तोडून घरात प्रवेश केला आणि दिवाणखान्यात बसले. तिथं एक फ्रीज होता. वुल्फ म्हणाला की या फ्रीजवर कागद ठेवून मी लिहीत असे. त्या फ्रीजजवळ खुर्च्या ठेवून दोघं जण पीत बसले.

काही वेळानं मालक जोडपं आले. दोन उपटसुंभ दारू पीत बसलेत असं पाहिल्यावर त्यांनी पोलिसांना फोन केला. मॅक्सनं मालकाला समजावलं.  आम्ही सभ्य माणसं आहोत, हा एक लेखक आहे, तो आपल्या पूर्वायुष्याबद्दल बोलतोय वगैरे. वुल्फ हा लेखक आहे आणि मॅक्स हा स्क्रिबनर या प्रकाशनातला एक संपादक आहे असं कळल्यावर तो निवळला. नव्हे खुष झाला. मग वुल्फ खुलला. त्यानं आपल्या भणंग जीवनातले किस्से सांगायला सुरवात केली. घरमालकही मैफलीत सामिल झाला. यथावकाश पोलिस आले. घरमालकानं पोलिसांना सांगितलं की चुकीच्या  समजुतीनं फोन केलाय, सॉरी. पोलिस गेले. मग ही मंडळी पहाटेपर्यंत पीत बसली.

काही दिवसांनी वुल्फ हस्तिलिखिताचा एक गठ्ठा घेऊन आला. तीस हजार शब्द होते. वरील प्रसंगाचं वर्णन वुल्फनं त्या पानांत केलं होतं आणि ती पानं कादंबरीत घालायची असं म्हणत होतं. मॅक्सनं कपाळाला हात लावला. आधीच कादंबरी जडजंबाळ. तीन साडेतीन लाख शब्दांपैकी लाखभर शब्द मॅक्सनं कापले होते. त्यात हा गडी आणि काही हजार शब्द घुसवू पहात होता.

वर्षभराच्या खटपटीनंतर सुमारे ९० हजार शब्द कापून झाल्यावर, असंख्य तास भांडणात आणि तितकेच तास दोघांनी भरपूर दारूच्या सान्निध्यात काढल्यानंतर लुक होमवर्ड, एंजल ही कादंबरी प्रसिद्ध झाली. या एकाच कादंबरीनं वुल्फला अमेरिकेतला श्रेष्ठ कादंबरीकार केलं.

वुल्फ त्याच्या दुप्पट वयाच्या स्त्रीच्या प्रेमात पडला. ती तऱ्हेवाईक होती. भांडायची. तिची मानसीक प्रकृती बिघडायची, तिला हॉस्पिटलात ठेवावं लागे. तो खर्च. तिचे उपचार, तिच्याशी झालेले संघर्ष याचं चित्रण वुल्फनं कादंबरीत केलं. त्यावरूनही ती भांडली. ती वुल्फशी भांडायची आणि मॅक्सशीही. एकदा तर ती पिस्तूल घेऊन मॅक्ससमोर बसली आणि म्हणाली की आत्महत्या, वुल्फचा खून किंवा मॅक्सचा खून यातला एक पर्याय निवडायचा होता. आत्महत्येचे प्रयत्न तिनं स्वतंत्रपणे केले होते.

मॅक्सनं तिला सांभाळून घेतलं.

वुल्फ खर्चिक माणूस. दारूला सुमार नाही. पॅरिसला जाई. लंडनला जाई. तिथं हॉटेलात उतरे. बेसुमार खर्च होई. त्याला सारखे पैसे हवे असत. लेखनाशिवाय उत्पन्नाचं दुसरं साधन नव्हतं.  मॅक्स त्याच्या कथा मासिकात छापे, त्याचे भरपूर पैसे मिळत. तरीही पैसे कमी पडत. नाना वाटांनी मॅक्सनं पैसे दिले. शेवटी अनामत इतकी वाढली की रॉयल्टीच्या पलिकडं रक्कम गेली. मग कधी तरी भविष्यात लिहिल्या जाणाऱ्या कादंबरीपोटी वुल्फ पैसे घेऊ लागला.

एकदा मॅक्सची पत्नी, वुल्फ आणि मॅक्स असे एका बारमधे बसले होते. वुल्फचं एका पेगनं कधी भागत नसे. तो चवथ्या पाचव्यावर फाटकन पोचत असे.  तिसरा झाला की त्याचा तोल सुटत असे. त्या दिवशी चार झाल्यावर तो मॅक्सवर घसरला. त्याला जाम शिव्या दिल्या. मॅक्स शांत होता.

एक एलेनॉर नावाची काउंटेस होती. सोसायटी लेडी. श्रीमंत. खानदानी. वरच्या  थरात वावर. अशा मंडळींना लेखक, कवी, नट अशा सेलेब्रिटींचं आकर्षण असतं. या बाईंनी वुल्फला भेटायचा आग्रह मॅक्सकडं धरला. मॅक्स टाळत असे. शेवटी तिनं परस्पर वुल्फची वेळ घेतली आणि एका बारमधे मॅक्स, मॅक्सची पत्नी लुईजी इत्यादींना जेवायला बोलावलं. मोठ्या लोकांचा नामी बार. वुल्फ तिथं पोचलाच तो प्यालेल्या स्थितीत. एलेनॉरची ओळख झाली. आणि वुल्फ एलेनॉरवरच घसरला. त्या आणि तशा बाया कशा खोट्या आणि उथळ असतात असं त्यानं जोरजोरात सांगायला सुरवात केली. आसपासचे लोक अस्वस्थ. मॅक्सनं वुल्फला रोखायचा प्रयत्न केला तशी तो आणखीनच खवळला. वुल्फनं मोठ्ठा तमाशा केला, शेवटी वेटर लोकांना त्याला बखोट धरून बाहेर काढावं लागलं.

वुल्फ अमेरिकेतला सर्वश्रेष्ठ कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होता त्या वेळची ही गोष्ट.

मॅक्सनी  स्कॉट फिझगेराल्ड यांचंही साहित्य प्रकाशित केलं.  पहिली कादंबरी दी ग्रेट गॅट्सबी प्रसिद्ध होतानाही स्कॉट आणि मॅक्स प्रचंड यानाही खूप मारामाऱ्या कराव्या लागल्या. स्कॉटचं आयुष्यही खूप गुंत्याचं होतं. तो आणि त्याची पत्नी यांच्यात प्रेम,राग, द्वेष यांचे गुंत्याचे संबंध होते. मॅक्सनं त्यांना सांभाळून घेतलं, स्कॉटच्या हातून चांगलं लिखाण व्हावं यासाठी.

अर्नेस्ट हेमिंग्वे हा जागतीक कीर्तीचा नोबेल विजेता लेखकही मॅक्सनी संपादित केला. हेमिंग्वे मोकळेपणानं कबूल करत की मॅक्समुळंच आपण मोठे लेखक झालो. हेमिंग्वे हाही कलंदर माणूस. जगभर फिरत असे. धाडस हा त्याचा फंडा. जंगलं, समुद्र या त्याच्या रहाण्याच्या जागा. मासेमारी, शिकार यात तो रमत असे. पण या दोन्ही गोष्टी तो राजेमहाराजांसारख्या सुरक्षितपणे करत नसे. स्वतःचा जीव धोक्यात घालून तो ते उद्योग करी.

एकदा हेमिंग्वे मासेमारी हे प्रकरण काय आहे ते दाखवण्यासाठी मॅक्सना बोटीवर घेऊन गेले. एक पाच सात फूट लांबीचा पन्नासेक किलो वजनाचा मासा गळाला लागला. हेमिंग्वेनी गळ मॅक्सच्या हातात सोपवला. मॅक्सची वाट लागली. मासा जबरदस्त होता, तो मॅक्सनाच समुद्रात खेचत होता. गळ सोडताही येईना आणि धरताही येईना. येवढ्यात वादळ सुरु झालं. बोट हेलकावे खाऊ लागली. मॅक्स टरकले. हेमिंग्वेला मजा येत होती. हेमिंग्वेनं गळ घेतला, तासभर खटपट करून त्यांनी माशाला नमवलं आणि वर काढलं.

हा मरणाचा प्रसंग घडत असतानाही मॅक्समधला संपादक जिवंत होता. त्यांनी हेमिंग्वेना सांगितलं की हा प्रसंग लिहिण्यासारखा आहे आणि हेमिंग्वेनाच ते जमेल.

दी ओल्ड मॅन अँड सी ही कादंबरी त्यानंतर प्रसिद्ध झाली, या कादंबरीला १९५४ सालचं साहित्याचं नोबेल पारितोषिक देण्यात आलं.

मार्जरी रॉलिंग्ज यांना ईयरलिग्ज या एका मुलाच्या घडपडीवर आधारलेल्या कादंबरीसाठी पुलित्झर पारितोषिक मिळालं. मार्जरी ही कादंबरी लिहिण्याच्या प्रयत्नात अनेक वर्षं होत्या. पण जमेना. एकदा निराश होऊन त्यांनी कादंबरी लिहिणं सोडून दिलं. मॅक्सनी पत्र लिहून मार्जरीना सांगितलं की त्यांनी असं करू नये. मार्जरींचं हस्तलिखित वाचून मॅक्सनी मार्जरींना त्यांच्या कादंबरीत सुधारण्याजोग्या जागा कुठल्या आहेत ते सांगितलं. अनेक पत्रं लिहून त्यांना धीर दिला, लिहितं केलं.

मार्जरींच्या कादंबरीतलं मुख्य पात्र झुडुपांच्या प्रदेशातल्या प्राण्याशी खेळत असे, ते प्राणी हेच त्याचं जग होतं. कादंबरी मुलांसाठीच होती. मॅक्सनी मार्जरींना सुचवलं की त्यांनी अस्वल शिकारीचा अनुभव घ्यावा, एकाद्या नदीत फिरावं. नदीत फिरतांना येणारे अनुभव माणसाच्या धाडसी प्रवृत्तीवर प्रकाश टाकतात असं मॅक्सनी लिहिलं. मॅक्सच्या सुचनेवरून मार्जरी अर्नेस्ट हेमिंग्वे यांनाही भेटल्या. मार्जरींचा नायक मुलगा हळूहळू विकसित होत गेला, त्याचा एकेक पैलू उघड होऊ लागला.

कादंबरीचं शीर्षक कसं असावं ते मॅक्सनी सांगितलं. हरणाचं पाडस, फॉन असं शीर्षक मार्जरीनी सुचवलं होतं. मॅक्स म्हणाले की ते फार कवितेसारखं होतं, भावनाप्रधान होतं, त्यातून कादंबरीत काय आहे याचा पत्ता लागत नाही. शीर्षक एकाद्या गावाच्या किंवा भूभागाच्या किंवा इमारतीच्या नावावरूनही असू नये. कारण त्यामुळं वाचकाची पैस फार मर्यादित होते असंही मॅक्सनी सुचवलं.

मॅक्स बराच काळ लेखकाच्या सहवासात असत. मजकुर वाचून लेखक जेवढा कळतो तेवढाच लेखकाशी बोलल्यानंतरही लेखक कळतो. हे शहाणपण मॅक्स त्यांचे सीनियर विल्यम ब्राऊनवेल यांच्याकडून शिकले. ब्राऊनवेल म्हणत ‘ पाणी त्याच्या उगमापेक्षा वरच्या पातळीवर जाऊ शकत नाही.’ लेखन हे लेखकापेक्षा अधिक उंचीवर जाऊ शकत नाही, लेखक आणि लेखन दोन्ही एकच असतं.

मॅक्सवेल पर्किन्स आणि थॉमस वुल्फ यांच्यातल्या संबंधांबद्दल बरंच लिहिलं गेलंय. वुल्फना मॅक्स मुलासारखं मानत असं म्हणतात कारण मॅक्सना पाचही मुली होत्या, मुलगा असावा ही त्यांची इच्छा अतृप्त राहिली होती. दुसऱ्या बाजूला वुल्फला त्याच्या वडिलांचा सहवास लाभला नव्हता, त्यामुळं मॅक्समधे त्यानं आपली वडिल सहवासाची भूक भरून काढली असं काहींचं म्हणणं आहे. वुल्फ आणि मॅक्स यांच्यात टोकाची भांडणं होत असत, वुल्फ मॅक्सचा द्वेष करत असे असंही अनेक उदाहरणातून सिद्ध झालं आहे. विश्लेषकांचं म्हणणं होतं की वुल्फला इडिपस गंड होता.

वुल्फ आणि मॅक्स यांच्या संबंधांवर खूप चर्चा झाल्या खऱ्या परंतू मॅक्सनी इतर अनेक लेखक मोठे केले, सर्वांशीच ते जवळिकीनं आणि आपलेपणानं वागत या वास्तवाचा हिशोब कसा मांडायचा? स्कॉट, हेमिंग्वे इत्यादी अनेक लोकांच्याही सहवासात ते दीर्घ काळ राहिले याचा अर्थ काय लावायचा?

अर्थ येवढाच की मॅक्स हे संपादक म्हणूनच जन्मले होते. त्यांच्यात साहित्यिकाची कसबं होती, ते क्रियेटिव होते. परंतू त्यानी आपलं आयुष्य संपादनातच खर्च करायचं असं ठरवलं होतं, तेच त्यांचं सत्वही होतं. लेखक एकाद्या पुस्तकापुरता संपादकाच्या, प्रकाशकाच्या सहवासात असू नये, नसतो असं मॅक्स म्हणत. पुस्तक छापलं की संपला लेखकाचा संबंध  असं संपादकाला वाटता कामा नये असं मॅक्स म्हणत असत. लेखकाच्या सर्व आयुष्याची संगत मॅक्सनी केली. वुल्फचे अलिन बर्नस्टीनशी संबंध होते. अलिन विवाहित होती, तिला दोन मुलं होती. मॅक्सनी वुल्फच्या अलीनशी संबंध ठेवण्याला वा वाढवण्याला कधी पाठिंबा दिला नाही. वुल्फ अलिनच्या प्रेमात पडला तेव्हां त्याचं वय २४ वर्षाचं होतं आणि अलीन ४० वर्षाची होती. वयातला आणि अनुभवातला फरक म्हणजे काय असतं ते मॅक्सना कळत होतं. परंतू हा प्रश्न ज्याचा त्यानं सोडवावा, आपलं काम लेखक लिहिता असला पाहिजे, लेखकाचं लिखाण सतत परिपक्व होत गेलं पाहिजे येवढंच संपादकानं पाहिलं पाहिजे असं म्हणत मॅक्स वुल्फला मदत करत राहिले.

मॅक्स चांगलेच विक्षिप्त होते. ते घरी, ऑफिसात, सर्वत्र हॅट घालून फिरायचे. घरातल्या घरगुती कपड्यांतही त्यांची हॅट असायचीच. हॅट म्हणायचे की नको असलेल्या माणसाला चुकवण्यासाठी त्यांना हॅटचा उपयोग व्हायचा. डोक्यावर हॅट असल्यानं ते बाहेर पडायच्या मार्गावर आहेत असं वाटल्यानं अनेक लोक पुन्हा भेटू असं म्हणून निघून जात. मॅक्स कधीही समारंभात गेले नाहीत, त्यांनी कधीही मुलाखती दिल्या नाहीत. एकदा त्यांच्या समोरच, त्यांच्या ऑफिसातच  हेमिंग्वे आणि ईस्टमन यांच्यात मारामारी झाली. चक्क मारामारी. सुरवातीला हेमिंग्वे यांनी ईस्टमनना झापड मारली. नंतर ईस्टमननी हेमिंग्वेना खाली पाडून ते त्यांच्या उरावर बसले. सारं ऑफिस हा प्रसंग पहात होतं. दुसऱ्या दिवशी पेपरवाले गोळा झाले. त्यांच्यासाठी तर हे घबाडच होतं. पण मॅक्सनी बोलायला नकार दिला.

मॅक्सच्या पत्नी लुईझी या रंगकर्मी होत्या. त्यांचं नाटक प्रकरण मॅक्सना आवडत नसे. मॅक्स यांच्या बौद्दिक जगण्याला लुईझी प्रतिसाद देऊ शकत नव्हत्या. तो प्रतिसाद त्यांना एलिझाबेथ लेमन या महिलेकडून मिळाला. पंचवीसेक वर्ष लेमन आणि मॅक्स एकमेकांशी पत्रव्यवहार करत असत. फार तर दोनतीनदाच त्यांच्या भेटी झाल्या. न्यू यॉर्कमधली माणसं याला इंटलेक्चुअल प्रेम प्रकरण असं म्हणत असत.

मॅक्सवेल पर्किन्स यांच्या जीवनावर जीनियस या नावाचा एक सिनेमाही झाला. मॅक्सवेल हे साहित्य आणि प्रकाशन विश्वातलं एक फार मोठं नाव आहे.

।।

 

 

 

8 thoughts on “लेखक घडवणारा संपादक मॅक्सवेल पर्किन्स

  1. दामले सर ,
    अतिशय उत्तम लेख. सहज न दिसणारं नामवंतांच जग एका वेगळ्या खिडकीतून दाखवलंत. रंजक आणि समजूत वाढवणारं.

  2. I enjoy reading your articles.your choice of subject matter is excellent.
    Pandharipande Vijay

  3. Yes, it appears that Shree. pu. had modelled himseif on Max. P N paranjpe

  4. Very nice piece. There is, however, debate about the influence of Max Perkins’ editing on Thomas Wolfe’s work. Some think that the Perkins’ cuts made Wolfe’s novels less experimental and moulded in the manner of other Scribner publications. In 2000, the “author’s cut” of “Look Homeward, Angel” was published as “O Lost”.

  5. It is very interesting read. But feel is has ended abruptly. There seems to be a lot unsaid about the editor.

  6. तुम्ही भारी आणि अनोळखी जगातलं लिहिता …मनापासून धन्यवाद !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *