” बिघडत चाललेल्या ” समाजाला विचार करायला लावणारे निबंध

” बिघडत चाललेल्या ” समाजाला विचार करायला लावणारे निबंध

‘ अगेन्स्ट एवरीथिंग ‘ हा मार्क ग्रीफ यांचा ताजा निबंध संग्रह. संग्रहात मार्क ग्रीफ अमेरिकेच्या सामाजिक-राजकीय-आर्थिक परिस्थितीचं विश्लेषण करतात. अमेरिकेतली माणसं खातात म्हणजे काय करतात, अमेरिकेतली माणसं संगित ऐकतात किंवा व्यायाम करतात म्हणजे काय करतात, अमेरिकेतल्या लोकांचं टीव्ही वाहिन्या पहाणं म्हणजे नेमकं काय असतं याचा विचार लेखक या पुस्तकात करतात. पुस्तकातले सर्वच्या सर्व संदर्भ अमेरिकेतले असल्यानं बिगर अमेरिकन वाचकाला संदर्भ विसरून पुस्तक वाचावं लागतं. तरीही अमेरिका समजायला पुस्तकाची मदत होते. अमेरिकेत जे घडतं ते कालांतरानं जगात, भारतात घडत असतं. त्यामुळं एका परीनं बिगर अमेरिकन समाजाला एक इशारा म्हणा, ताकीद म्हणा, हे पुस्तक देतं.

वानगीदाखल एक धडा. अगेन्स्ट एक्सरसाईझ. अमेरिकन माणसं खा खा खात सुटलीत. माध्यमांतून अन्न आणि त्याचे उपयोग यावर भरमसाठ मजकूर येतो त्यामुळं. खाण्यामुळं आनंद मिळतो असं लोकांना वाटतं. शिवाय शिडशिडीत रहाणं, स्मार्ट दिसणं म्हणजेच आरोग्य असंही माध्यमांनी लोकांच्या मनावर ठसवलंय. त्यामुळं माणसं खात सुटतात नंतर व्यायाम करायला जिममधे जातात. ज्या हालचाली घरी, खाजगीत, निवांतीनं करायच्या असतात त्या माणसं जिममधे करू लागतात. त्यासाठी अब्जावधी डॉलरची यंत्रं खपवली जातात. माणसं शिडशिडीत रहाण्यासाठी उपाशी राहून लुकडी होतात, रोगट होतात. नियमित, साधा आहार घेण्याऐवजी वचावचा आहार घेणं, दैनंदिन जीवनातल्या हालचाली केल्या तरी पुऱ्या असतात असं असताना त्या करायच्या नाहीत आणि मूर्खासारखं जीममधे जाऊन पैसे उडवायचे आणि कधी कधी मरायचंही. मार्क ग्रीफ या स्थितीवर प्रकाश टाकतो.

वानगीदाखल ‘ आफ्टरनून ऑफ दी सेक्स चिल्ड्रन ‘. अमेरिकेत तारूण्याचं उदात्तीकरण असं एक फॅड पसरलंय. तारूण्य म्हणजे चांगलं दिसणं, तारूण्य म्हणजे गोरं दिसणं, तारूण्य म्हणजे स्त्रीचे स्तन-कंबर इत्यादीचं मोजमाप, तारूण्य म्हणजे सेक्सानंद असं पसरवलं गेलंय. तारूण्यही मध्यम वयात नव्हे तर षोडशे वर्षे या वयाच्या एकदोन वर्ष अलिकडचं, तेही स्त्रीचं. या कल्पनेभोवती माध्यमं फिरत असतात आणि या कल्पनेभोवती जाहिरातीचं जग आणि तारूण्यटिकवी वस्तू-उपकरणं-प्रक्रिया उद्योग. माणसाच्या एकूण जगण्यात तारूण्य हा एक भाग असतो. प्रौढत्व, म्हातारपण, त्यातलं शहाणपण आणि समजूत हाही जगण्याचा महत्वाचा भाग असतो, हे आधुनिक माध्यमं आणि उद्योग विसरायला लावतात. ग्रीफ यावर विचार करायला लावतात.

या लेखात एके ठिकाणी लेखक म्हणतात सेक्समुक्ती नव्हे, सेक्सपासून मुक्ती हवीय. सेक्स जीवनाचं अविभाज्य आणि आवश्यक अंग आहे. परंतू सेक्स म्हणजेच सर्व काही या दिशेनं जग चाललंय त्यावर विचार करा असं लेखक म्हणतो.

वानगीदाखल ‘ रेडियोहेड ऑर दी फिलॉसफी ऑफ पॉप ‘. अमेरिकेत ब्ल्यूज, जॅझ, रॉक अशा संगिताच्या परंपरा आहेत. यात लोकगीतं लोकसंगितात गुंफली जातात आणि ती उघड्यावर ऐकवली जातात. बॉब डिलन हा एक मोठ्ठा कलाकार. अमेरिकेतलं लोकसंगित जन्मलं ते विद्रोहातून. काळे, गुलाम, कामगार यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला या संगितातून वाचा फुटली. हे संगित अँटीएस्टाब्लिशमेंट  असतं. ते गोऱ्यांविरोधातही असतं आणि वियेतनाममधे विनाकारण मारल्या जाणाऱ्या लोकांच्या बाजूनंही असतं. मार्क ग्रीफ या निबंधात प्रश्न विचारतो की हे संगीत क्रांतीकारी आहे कां. हे संगीत काही नवं सांगतं का असं प्रश्न ग्रीफ विचारतो. उठाव करायला सांगणं वेगळं आणि क्रांती करणं वेगळं या बिंदूभोवती निबंध फिरतो.

‘ ऑक्टोमॉम अँड दी मार्केट इन बेबीज ‘ मथळ्याचा एक धडा आहे. नादिया सुलेमान नावाची एक स्त्री बाजाराच्या हिशोबात आपल्या गर्भाशयात बीजं पेरून घेते. आधीची सहा मुलं असताना ती एका डॉक्टरच्या हौसेवरून आणखी सहा बीजं पेरते. त्या पैकी एक बीज दुभागतं आणि त्यातून नादियाला आठ मुलं होतात. त्यातली तीन विकलांग असतात, बाकीचीही अशक्त असतात. मोठ्ठी बातमी होते. माध्यमात घनघोर चर्चा होते.

अमेरिकेत मिळवत्या नसलेल्या किंवा गरीब स्त्रीला मुलं झाली तर सरकार प्रत्येक मुलामागं काही पैसे देतं. जेवढी मुलं जास्त तेवढे पैसे जास्त. या मुद्दयावर लोक तुटून पडले. मुलं होऊ देणं हा बेजबाबदारपणा, ते जगण्याचं एक साधन, अमेरिकन जनतेवर त्याचा पडणारा बोजा या विषयावर चर्चा झाली. मुलं होऊ देणं, न होऊ देणं यावर अमेरिकेत दुफळी आहे. ती दुफळीही चर्चेत पडली. नादिया म्हणजे मुसलमान. नादिया म्हणजे आफ्रिकन. म्हणजे चर्चेला आणखी मुद्दे. गर्भाशयावर स्त्रीचा अधिकार असणं ही एक गोष्ट, ते एक  उत्पन्नाचं साधन असावं काय असा आणखी एक मुद्दा. बाप रे. अमेरिकेत काय काय चर्चा होतात, काय काय प्रश्न असतात.

लेखक या मुद्द्याला एक नवंच वळण देतो. नादिया अष्टपुत्राची  चर्चा झाली तेव्हा अमेरिकेत बाजार वितळला होता, आर्थिक संकट होतं. नादियाच्या मुद्द्याला आर्थिक संकटाचीही बाजू आहे असं लेखक म्हणतो. नादियावर चर्चा करताना माध्यमं आर्थिक संकटाचा मुद्दा बाजूला ठेवतात असं लेखक म्हणतो. माध्यमांना काहीही करून थरारक गोष्टी हव्या असतात, एकामागून एक. नादिया प्रकरण हे माध्यमांच्या थरारभुकेचाच एक भाग आहे असं लेखक सुचवतो.

पुस्तकाचा शेवट थोरो यांच्यावर आहे. थोरोनी निसर्गप्रेमी विचार मांडले, गरज आणि हव्यास यातला फरक सांगितला. अन्यायाविरोधात बंड करणं, त्यासाठी शांततेचा मार्गानं तुरुंगात जाणं थोरोनी शिकवलं. अमेरिकेत त्या काळात येऊ घातलेल्या आधुनिक औद्योगीक जगावर त्यांनी कोरडे ओढले. लेखक थोरोची आठवण काढतो, त्यावर विचार करा असं म्हणतो. ” मी मध्यमवर्गी आहे, मी  आजच्या वस्तूगंडाच्या जमान्यात वावरतो हे मला समजतंय. तरीही मला थोरोचं आकर्षण वाटतंय ” असा सूर लेखकानं पुस्तकात लावलाय.

लेखक अमेरिकन आहे, १९७५ मधे जन्मलाय. त्यानं हारवर्डमधून पीएचडी केलीय.

समाजाच्या विविध अंगांवर विचारमंथन घडवून आणण्याची परंपरा लेखक पुन्हा एकदा नव्यानं सुरु करतोय. विसाव्या शतकाच्या तिसऱ्या आणि सहाव्या दशकात विचारवंत, लेखक, चिंतक, पत्रकार, शैक्षणीक इत्यादी लोक गंभीर चर्चा आणि निबंध निर्माण होत असत. पार्टिझन रिव्ह्यू, दी नेशन अँड कॉमेंटरी, अशी नियतकालिकं गंभीर चर्चा घडवून आणत असत. लायनेल ट्रिलिंग नावाचा एक समीक्षक म्हणजे त्या काळातला एक दबदबा, टेरर होता. न्यॉ यार्क रिव्ह्यू ऑफ बुक्समधे त्याचे गंभीर निबंध प्रसिद्ध होत असत. त्याच्या दबदब्याची वूडी एलन जाम खिल्ली उडवत असे. आताशा अशी गंभीर चर्चा संपत चाललीय. उथळ टीव्ही चॅनेल्सनी चर्चेचा ताबा घेतला आहे. आता टीव्हीचर्चक, टीव्ही स्टार, टीव्हीविचारवंत निर्माण झाले आहेत. मोठमोठ्या कढयांमधून ते चॅनेलच्या गरजेनुसार ताजी ताजी विचारभजी तळत असतात. ही भजी अर्ध्या तासात निरुपयोगी ठरतात. ही भजी म्हणजे नुसतं पीठ, नुसतं तेल आणि नुसतं मीठ असतं.

मार्क ग्रीफनी एन प्लस वन नावाचं एक नियतकालिक चालवलंय. त्यात वरील प्रस्तुत पुस्तकात एकत्रित केलेले निबंध प्रसिद्ध झाले होते. इतरही अनेक तरूण विचारवंत त्यात लिहितात. या निबंधांची भाषा काहीशी जड असते. पारिभाषिक भाषिक शब्द जरा जास्तच वापरले जातात. माध्यमांतून जितक्या प्रासादिक पद्धतीनं विषय मांडले जातात त्यापेक्षा वेगळी काहीशी समजायला कठीण रचना या निबंधांत असते. गंभीर लिखाण कळायला कठीणच असावं अशी समजूत एकेकाळी होती. पण आता गंभीर विषयही समान्य माणसाला कळेल अशा भाषेत मांडले जातात. रिचर्ड डॉकिन्स जेनेटिक्सवर लिहितात, एटकिन्सन अर्थशास्त्रावर लिहितात, डॅनियल डेनेट तत्वज्ञानावर लिहितात, फ्रीमन डायसन जैविकशास्त्र आणि तत्वज्ञान या विषयावर लिहितात. ते सामान्य माणसाला समजतं. मार्क ग्रीफ काहीसे जड आहेत.

।।

Against Everything

Mark Greif

Pantheon

 

 

6 thoughts on “” बिघडत चाललेल्या ” समाजाला विचार करायला लावणारे निबंध

  1. Nilu,

    Such questions be discussed in India also, but with dur seriouseness.

    A.P.Deshpande

  2. फार सुंदर ओळख पुस्तकांची करून देता आपण. आमचे वाचन किती तोकडे आहे याची जाणीव होते व (त्यामुळे न्यूनगंडाची बाधा होते!).

  3. “बिघडत” चाललेल्या कि “बदलत” चाललेल्या?

  4. समाज बदलतोय हे नक्की. बिघडतोय की नाही हे ज्यानं त्यानं ठरवायचं. लेखकानं समाज बदलतोय याचं चित्रण केलंय आणि बिघडतोय असं न लिहिता सुचवलंय.

  5. अमेरिकेतील प्रश्न, त्यांची कारणे आणि त्यांचे संदर्भ हा एक वेगळाच प्रकार आहे. अमेरिकेतील एकंदर समाज व्यवस्था कशी घडत वा (बि)घडत गेली ह्याला त्यांचा आजपर्यन्तचा इतिहास कारणीभूत आहे. लेखकाने हल्लीची स्तिथी काय व कशी ह्याचे यथोचित वर्णन केले आहे. मात्र आपल्याकडे वा अन्य इतर देशात अमेरिकन जीवनपद्धती आणि त्यांच्या आचार -विचारांचे आंधळे अनुकरण केले जाते हा खरा काळजीचा विषय वाटतो !

  6. आपण काढलेला निष्कर्ष वाचकांनी ठरवायचा असतो -लेखक अथवा प्रेशकाने नव्हे! आज भारतात कोट्यवधी लोक देवदर्शनास जात असतात आणि आपल्याच संतांनी, “देव नाही देव्हाऱ्यात …” असे सांगून देखील केवळ ‘नास्तिक आणि बुद्धिजीवी मंडळी’ सोडल्यास हेच कोट्यवधी भक्त साधू-संताना डोक्यावर घेऊन दिंडी यात्रा काढून प्रवासातील दुर्घटना इत्यादींमुळे बळी पडत असतात. आपल्या लेखातील टीकात्मक बाबी खऱ्या असल्या तरी त्या लागू पडणारे अमेरिकेतील कोट्यवधी लोक, ‘अगेन्स्ट एवरीथिंग ‘ हा मार्क ग्रीफ यांचा ताजा निबंध संग्रह वाचत नसतात आणि जे वाचून तो डोक्यावर घेतात ती मंडळी त्याबद्दल विचार मंथन करून इतरांना बदलू पाहतात -दरम्यान ग्रीफ यांची पुस्तके देखील भरपूर खपत असतात. -डॉक्टरांनी कितीही योग्य उपदेश केले तरी त्यांची अंम्मल बजावणी रोग्यांकडून होत नसते (एरवी हॉस्पिटले व डॉक्टर्स देशोधडीस लागतील -त्याप्रमाणे). म्हणूनच आपला लेख “बिघडलेला समाज” -सुचवणे निरर्थक होय, असे मला उद्देशीत होते!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *