पुस्तकं/प्लेगसाथीनं शिकवलेलं शहाणपण

पुस्तकं/प्लेगसाथीनं शिकवलेलं शहाणपण

प्लेगचे धडे

।।

The Wisdom of Plagues. By Donald McNeill. Simon & Schuster; 384 pages; $28.99 and £20

||

युरोपात १३४६ ते १३५३ या काळात  प्लेगची साथ झाली. अर्ध युरोप म्हणजे ५ कोटी माणसं मेली. प्लेगनंतर समाज जागा झाला.आरोग्यात सुधारणा झाली, वातावरणातले रोगट घटक कमी झाले, औषधोपचारात सुधारणा झाली आणि मुख्य म्हणजे लसीचा शोध लागला. प्लेग नाहिसा झाला. 

भारतात १८८५ साली प्लेगची साथ आली, एक कोटी माणसं मेली. 

१९१८ साली इटालीत फ्ल्यूची साथ आली. ती काही वर्षं टिकली. साथीत ५ कोटी माणसं मेली.

१९९४ साली गुजरातेत सुरतमधे प्लेगचे रोगी सापडले. आसपासच्या राज्यांत रोगाचा प्रसार झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या होती ५०.

२०१७ साली मादागास्करमधे प्लेगची साथ झाली, १०७ व्यक्ती मरण पावल्या.

 लेखक पत्रकार डोनल्ड मॅकनील यांनी साथींच्या रोगांचा अभ्यास  पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाच्या शेवटी त्यांनी आपली निरीक्षणं मांडली असून भविष्यात अशा साथींचा मुकाबला कसा करता येईल ते सांगितलं आहे.

साथीच्या रोगांचा आणि एकूण आरोग्याचा अभ्यास ते करतात, त्या विषयावर बातम्या देतात, लेख लिहितात. तीस वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी न्यू यॉर्क टाईम्ससाठी काम केलं, त्यासाठी ते जगभर फिरले. कोविड या विषयावरच्या त्यांच्या पुस्तकाला अमेरिकेतलं प्रतिष्ठित पुलित्झर पारितोषिक मिळालं.

अगदी ताजी साथ कोवीडची. ७० कोटी माणसांना कोविडची लागण झाली.७० लाख रोगी मेले. लेखकानं जगभर फिरून कोविडचा अभ्यास केला.  

लेखक म्हणतो की जग नीटपणे वागलं असतं तर इतकी माणसं मरायचं कारण नव्हतं. डोनल्ड ट्रंप वाह्यातपणे बोलले वागले नसते तर अमेरिकेतली काही माणसं कोविडच्या मरणापासून वाचली असते असं लेखक म्हणतो.

माणूस शेती करू लागला, स्थायिक झाला, जनावरं पाळू लागला आणि जनावरांच्या करवी त्याला रोगांची लागण झाली. एका व्यक्तीला रोग होतो. तो त्याच्या निकटवर्तीयांत पसरतो, नंतर वस्तीत पसरतो, नंतर देशात आणि जगात पसरतो. माणूस फिरतो, प्रवास करतो, रोगाचा प्रसार होतो. साथ टाळायची असेल तर वाहतूक, प्रवास टाळायला हवा.

रोगाबद्दल, उपचाराबद्दल माहितीचा अभाव असतो. चुकीची माहिती पसरवली जाते. समाजात अंधश्रद्धा असतात, धर्म हे अंधश्रद्धेचं मुख्य कारण असतं. अंधश्रद्धा ज्ञान प्रसाराच्या आड येते. चुकीची माहिती, अफवा आणि धार्मिक विधीनिषेध यामुळं रोगाला अटकाव करण्यात अडथळे येतात. 

कोविड पसरत असताना प्रेसिडेंट डोनल्ड ट्रंप म्हणत राहिले की कोविड नावाची गोष्टच नाहीये, ही साथ कल्पित आहे. तेव्हां लाखो लोकांना कोविड झालेला होता.  अगदी असंच ब्राझीलचे अध्यक्ष बोल्सेनारो म्हणत होते. 

लस धर्मात निषिद्ध आहे असं ख्रिस्ती आणि इस्लामी धर्मवाले आफ्रिका आणि अमेरिकेत सांगत फिरत होते. अनेकांनी लस घेतली नाही.

लस घेतली तर पुढल्या जन्मी माणूस गाढव होतो, डुक्कर होतो असं ब्राझिलचे अध्यक्ष म्हणत होते.

कोविड परलेलाच नाही असं दाखवण्यासाठी अमेरिका आणि ब्राझिलच्या अघ्यक्षांनी पुराव्यांत मोडतोड केली, खोटे पुरावे रचले.

कोविडची लस तयार करणाऱ्या कंपन्यांनी धंदा केला, पैसे कमावले. ऑक्सफर्डनं लस तयार केली, बौद्धिक संपदेची रॉयल्टी, पेटंटची रॉयल्टी ऑक्सफर्डनं घेतली नाही.  लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी मात्र त्यात पैसे कमावले, सरकारांनी श्रेय उपटलं.

  साथ पसरू नये यासाठी केलेले कायदे खुद्द ब्रीटनच्या पंतप्रधानांनीच धुडकावून लावले, माणसं जमवली, दारूकाम केलं, पार्ट्या केल्या.

एक उदबोधक माहिती. 

देवीची लस घ्यायला भारतातल्या हिंदूनी विरोध केला, आंदोलन केलं. कारण काऊपॉक्स म्हणजे त्यात गाय आली. ब्रिटीश राज्यकर्त्यांनी आयडिया केली. त्यांनी प्रचार केला की वेदांच्या काळात लस होती. कुठल्या तरी संस्कृत ग्रंथाचा हवाला दिला. मग हिंदूनी लस धेतली. गंमत अशी की तसं सांगणारा संस्कृत ग्रंथच नव्हता. मद्रासच्या म्युझियममधे असलेल्या कुठल्यातरी ग्रंथातल्या कुठल्या तरी ग्रंथाचा गैरअर्थ लावण्यात आला होता. कालांतरानं हा फ्रॉड बाहेर आला, पण तोवर देवीची साथ ओसरली होती.

जेन्नरनं गाईच्या रक्तातून देवीचे जंतू घेतले नव्हते. देवी झालेल्या रोग्याच्या फोडातूनच जंतू घेतले होते. मग काऊ हा शब्द कुठून आला? तर लस या शब्दाला लॅटिनमधे असलेल्या शब्दाचा उच्चार व्हॅक्सी असा होतो. त्या काळात प्रत्येक गोष्टीचं नामकरण करताना लॅटिन शब्द वापरण्याची फॅशन होती. जशी भारतात संस्कृत शब्द वापरला की त्याला प्रतिष्ठा प्राप्त होते. अशा रीतीनं व्हॅक्सीन असा शब्द आला.   

पुस्तकात खूप मनोरंजक माहिती आहे. 

टायफसची साथ फ्रेंच सैन्यात पसरल्यानं नेपोलियनची रशिया मोहिम कोसळली. म्हणजे नेपोलियनचा पराभव रोगानं केला, त्यात नेपोलियनच्या युद्धकौशल्याचा अभाव गुंतलेला नव्हता. प्लेग ज्यूंमुळं, त्यांनी केलेल्या पापांमुळंच आला अशी रशियातल्या ख्रिश्चनांची श्रद्धा होती.  १३३९ साली रशियनांनी ज्यूंचं हत्याकांड केलं, ज्यूना रशिया सोडून जावं लागलं. एका ज्यू माणसाकडं नाण्यांचा प्रचंड खजिना होता, तो त्या माणसाला रशिया सोडून जाताना स्वतःबरोबर नेता आला नाही.ते नाण्यांचं घबाड इतिहासाचं एक साधन बनलं. 

 बिल गेट्सनी कोविडची लस देण्याची जबाबदारी घेतली होती. अफवा पसरवण्यात आली की बिल गेट्स लसीमधून लोकांच्या शरीरात चिप्स टाकत आहेत, त्यांची माहिती गोळा करण्यासाठी. पोलियो डोसनं मुसलमान माणसं नपुंसक करण्याचा बिल गेट्स या ख्रिस्ती माणसाचा डाव आहे असं आफ्रिकेतल्या मुस्लीम जनतेत पसरवण्यात आलं होतं.

लेखक म्हणतो की साथी पसरू द्यायची नसेल तर सरकारांनी कणखर रहायला हवं, धार्मिक मतांना मनाई केली पाहिजे. लोकं, पुढारी इत्यादींना काय वाटतं याची पर्वा न करता सरकारनं हुकूमशहासारखं वागलं पाहिजे असं लेखक सुचवतो.

जाता जाता.

लेखकाला कोविडवरील मजकुराबद्दल पुलित्झर मिळण्याचं ठरलं असतानाच न्यू यॉर्क टाईम्सनं त्यांना राजीनामा द्यायला लावला. पेरू या देशात दौऱ्यावर त्यांनी न काढलेल्या वंशवादी उद्गाराची शिक्षा त्यांना देण्यात आली.

 ।।

Comments are closed.