शुक्रवार/ कल्पित आणि वास्तव. ब्रिटीश राणी. क्राऊन.

शुक्रवार/ कल्पित आणि वास्तव. ब्रिटीश राणी. क्राऊन.

क्राऊन ही नेटफ्लिक्सवरची सहा सीझन्सची मालिका नुकतीच संपली. दृश्य माध्यमातला हा एक महत्वाचा टप्पा मानला जाईल इतकी ही मालिका प्रभावशाली होती.

ब्रीटनची राणी हे एक गुढ असतं. राणी काय करते असं कुतूहल कोणालाही वाटणं स्वाभाविक आहे. त्यातून राणी ही देशाची प्रमुख.  ती जगते कशी, ती आई म्हणून कशी असते, पत्नी म्हणून कशी असते, ती देश प्रमुख म्हणून काय करते इत्यादी गोष्टी जाणून घ्याव्यात असं माणसाला वाटणं स्वाभाविक आहे.पण राजवाडा आणि राणी प्रसिद्धीपासून दूर असल्यानं आपलं ते कुतुहूल न शमता शिल्लक रहातं. 

क्राऊन या मालिकेनं दुसरी एलिझाबेथ ही राणी व तिची कारकीर्द नाट्यमय पद्दतीनं मांडलीय. चित्रपट या माध्यमाची दृश्यात्मकता या मालिकेत पुरेपूर भरलेली आहे.

छत पहायचं तर मान १८० अंशात मागं फिरवावी लागते. दालनं, भिंती, भिंतीवर टांगलेल्या तस्विरी, दिवे, खांब आणि तुळयांवरची कलाकुसर पहायची टेनिसची मॅच पहात आहोत असं समजून  डावीकडून उजवीकडं, उजवीकडून डावीकडं  मान १८० अंशात फिरवावी लागते. 

या भव्य नेपथ्यावर राणी दिसते. तिचे चार पाच लाडके कुत्रे असतात, जेवतांना ती त्या कुत्र्यांना सोबत ठेवते, त्यांना जेऊ घालते. राजवाड्याबाहेर   कलात्मक कपड्यातल्या सैनिकानं बॅगपाईपवर वाजवलेली धून ऐकत राणीला जाग येते, तोच राणीचा अलार्म.

एक पुढारी येतो.तो विरोधी पक्षाचा खासदार असतो. राणीसमोर गुढग्यात वाकून राणीला वंदन करतो, राणी बस म्हणाली तरच समोरच्या खुर्चीत अवघडून बसतो. पंतप्रधानाबद्दल तक्रारी करतो.राणी ऐकून घेते. पुढारी सांगतो की पंतप्रधानाला घालवलं पाहिजे. राणी ऐकून घेते. तिचा चेहरा निर्विकार असतो. पंतप्रधानानं असं काय केलंय की त्याला हाकलायला हवं असं राणी विचारते. पुढारी कारणं सांगतो. राणी ऐकून घेते. वीस पंचवीस मिनिटं होतात. राणी विचारते ‘आणखी काही?’ पुढारी समजतो की त्याचा वेळ संपलाय. तो उठतो. वाकतो. ताठ उभा रहातो. म्हातारा असेल तर काठी टेकतो. पाठ न दाखवता मागं मागं जाऊन दारातून निघून जातो.

  पंतप्रधान येतो. पंतप्रधानाला माहित असतं की विरोधी नेता कटकट करून गेलाय.   तो काय बोलला हे पंतप्रधानाला माहित नसतं. राणीचा चेहरा निर्विकार. कसं काय चाललंय असं विचारते. पंतप्रधान आपल्यावर झालेले आरोप आणि त्याचं उत्तर सांगतो. राणी ऐकून घेते. पंतप्रधानाचा वेळ संपतो. तो जातो.

राणीचे अनेक सेक्रेटरी असतात. त्यातला एक येतो. त्याच्या हातात फाईल असते. उभ्या उभ्या तो सत्ताधारी, विरोधक काय करत आहेत, राज्याची स्थिती काय आहे ते सांगतो. राणी ऐकून घेते.

  आपल्याला पार्लमेंट दिसतं. तिथला कोलाहल दिसतो. कॅबिनेटची बैठक दिसते. पंतप्रधान दिसतो, कॅबिनेटमधले त्याचे विरोधक आणि पाठिराखे कायकाय बोलतात ते दिसतं.  रस्त्यावरची निदर्शनं दिसतात, मोर्चे दिसतात.

पंतप्रधानाचा राजीनामा होतो. नवा माणूस निवडला जातो. 

राणीसमोर सर्व पेपर पसरलेले असतात. सेक्रेटरी काय काय झालं ते तपशीलवार सांगतो.

राणीनं काय केलं? राणीनं कोणाचीही बाजू घेतली नाही की कोणालाही सल्ला बिल्ला दिला नाही. राणीनं ऐकून घेतलं.

बाहेर जग उलटं पालटं झालेलं असतं.राजवाड्यात? राणी, तिचे सेक्रेटरी, तिचे अंगरक्षक, सगळी सगळी माणसं निर्विकार, जणू काहीही घडलेलंच नसतं.

 एलिझाबेथ. जेमतेम विशी पार ओलांडत असते. काहीही अनुभव नसलेली राणी. 

चर्चिल येतात. 

चर्चील हा वयानं, आकारानं आणि एकूणच व्यक्तिमत्वाच्या हिशोबात कायच्या काय दांडगा माणूस. चर्चिलचा दरारा मोठा.  एलिझाबेथ हादरलेलीच होती. 

 एलिझाबेथ उभी रहाते,  चर्चिलना सांगते की महोदय, कृपा करून बसा.

चर्चिल बसणार कसे? राणीच्या समोर बसणं ही परंपरा नाही.

चर्चिल एलिझाबेथला सांगतात की ती राणी आहे, तिनं उभं रहायचं नसतं, बसूनच बोलायचं असतं. पंतप्रधानानंच उभं राहून बोलायचं असतं.

एलिझाबेथ बसते. चर्चिल उभ्या उभ्या बोलू लागतात. एलिझाबेथ अवघडते आणि सुखीही होते. 

हे सारं प्रत्यक्षात घडलं की नाही, कसं घडलं हे आपल्याला कलायला मार्ग नसतो, पण क्राऊनमधे मात्र आपण ते पहातो. 

 राणीच्या कपाळावरची एकादी आठी.  पुढारी बोलत असताना राणी त्याच्याकडं लक्ष न देता राणी पायाशी फिरणाऱ्या कुत्र्याशी प्रेमानं बोलणं. याचा अर्थ आपल्याला आणि  त्या पुढाऱ्याला समजतो.

राजवाड्यातली पार्टी आटोपून मार्गारेट थॅचर आपल्या खोलीवर परततात. नवऱ्याला सांगतात ‘ देशात गंभीर प्रश्न आहेत, संकटं आहेत आणि राजवाड्यातली माणसं असले पोरकट खेळ करत वेळ काढतात, माझा जीव गुदमरतो.’ 

डायना हे ब्रिटीश इतिहासातलं एक वादळी प्रकरण. क्राऊनमधे डायना तिच्या नवऱ्याशी भांडताना दिसते. डायना आणि मित्र डोडी मजा करताना दिसतात.  

एक झांगड, गर्दुला, पियक्कड माणूस राणीच्या दालनात घुसतो. राणी चमकते. घाबरत नाही पण तिला धक्का बसतो. येवढा मोठा राजवाडा. फुटाफुटावर पोलिस, पहारेकरी, सैनिक तैनात असताना एक माणूस थेट बेडरूममधे कसा येतो. राणी सावरते.  तो झांगड माणूस राणीशी गप्पा करतो. तिला कसा राजकारभार करता येत नाही ते सांगतो. येवढी श्रीमंत बाई असूनही बेडरूम कुती जुनाट ठेवलीय असा शेरा मारतो. आपल्याला कंत्राट द्या, आपण स्वस्तात बेडरून रंगवून देऊ असंही सांगतो. 

  चित्रपट हा कल्पनाशक्तीचा खेळ असतो. दिक्दर्शकानं म्हणजेच लेखकानं जे सांगितलंय ते त्याचं सत्य आहे असं लक्षात घेऊन चित्रपट पहायचा असतो. 

  ज्या राणीबद्दल काहीही माहित नाही अशी राणी क्राऊन मालिका आपल्याला दाखवतो.

 राजघराणं काय म्हणतं, पुढारी काय म्हणतात, समीक्षक काय म्हणतात ते चुलीत घाला. ही मालिका कधीही,कितीही वेळा पहात रहावी इतकी रंजक आहे.  

।।

Comments are closed.