सिनेमा. सतलज.

सिनेमा. सतलज.

।।

चित्रपटाच्या सुरवातीला श्रेयनामावली येते. त्यात आपल्याला कळतं की ही मॅकगफिन (MacGuffin) पिक्चर्सची निर्मिती आहे.

मॅकगफिन? ही काय भानगड आहे.मॅकगफिन नावाचा कोणी माणूस आहे? मॅकगफिन नावाच्या माणसानं सुरु केलेली ही चित्रपट निर्मिती कंपनी आहे?

मॅकगफिन ही एक कल्पना आहे, ती आल्फ्रेड हिचकॉक या दिक्दर्शकानं तयार केलीय. मॅकगफिन या शब्दाला व्युत्पत्ती नाही.  हा शब्द हिचकॉकनं घडवलाय. ती कहाणी हिचकॉकनं त्रुफॉ या दिक्दर्शकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलीय.

हिचकॉकने ट्रुफॉला सांगितलेला प्रसिद्ध किस्सा असा. 

दोन माणसे स्कॉटलंडला रेल्वेने प्रवास करत आहेत. एकाच्या हातात एक विचित्र पॅकेज आहे. दुसरा विचारतो:

“या पॅकेजमध्ये काय आहे?”

तो उत्तर देतो:
“हा मॅकगफीन आहे.”

“मॅकगफीन कशासाठी?”

“स्कॉटलंडच्या डोंगरात सिंह पकडण्यासाठी.”

“पण स्कॉटलंडमध्ये सिंह नसतात.”

“मग हा मॅकगफीन नाही.” 

मॅकगफिन असं काही नसतंच मुळी. ती वस्तू नसते, ती एक निव्वळ कल्पना असते. आपण तिचा पाठलाग करत रहातो. पाठलाग करता करता आपल्याला अनेक गोष्टी दिसतात. त्या सर्व गोष्टी महत्वाच्या,मॅकगफिन हे निमित्त.

हिचकॉकची सायको ही गाजलेली फिल्म. चित्रपटाच्या सुरवातीला नायिकेचा बॉस मोठी रक्कम तिच्याकडं देतो आणि बँकेत भर म्हणून सांगतो. नायिका बँकेत जायच्या ऐवजी ती रक्कम घेऊन प्रवास सुरु करते. प्रेक्षकाच्या डोक्यात भुंगा शिरतो. ही बया आता पैसे घेऊन कुठं जाणार? काय करणार? सिनेमा पुढं सरकत जातो, ते पैसे वगैरे मागं पडतात. नायिकेचा खून होतो. खून करणारा एक मनोविकृत माणूस असतो वगैरे वगैरे. नायिकेजवळची रक्कम हे मॅकगफिन. चित्रपट काही तरी वेगळंच सांगत जातो. 

 हिचकॉक ही कल्पना त्याच्या खूप चित्रपटात वापरतो, त्यानंच निर्माण केलेल्या एकाद्या रहस्यापाठी प्रेक्षकांना पळायला लावतो.

सतलजच्या निर्मात्यानं कुठलं मॅकगफिन वापरलंय?

चित्रपटातलं पहिलंच दृश्य. पोलिस अधिकारी ग्लासात दारू ओतताना बोलत असतो. जीप चाललेली असते. एक जण विचारतो की अजून किती अंतर जायचंय?इन्सपेक्टर उत्तर देतो, दोन पेग.थोड्याच वेळात आपल्याला बँकेत काम करणारा खालरा नावाचा एक सदगृहस्थ दिसतो. त्याच्या मित्राला पोलिसांनी मारून टाकलेलं असतं. मित्राची आई बेपत्ता असते. खालरा तिचा शोध घ्यायला लागतो. आईला पोलिसांनी मारलेलं असतं, बेवारशी असा शिक्का मारून तिच्या प्रेताची विल्हेवाट लावलेली असते.

पोलिसांनी मारलेल्या माणसांचा शोध लावणं आणि ती माहिती त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोचवणं.खालराचा शोध सुरु होतो. दोन तास शोध चालतो. त्यात पंजाब पोलिस काय उद्योग करतात त्याचा पत्ता लागतो. 

खालिस्तानवादी दहशतवादी वाटेनं जातात.माणसांना मारत सुटतात. पोलीस त्याच वाटेनं दहशतवाद्यांचा मुकाबला करतात. बेहिशोबी माणसं मारत सुटतात. मारलेल्या माणसांची संख्या वाढली की पोलिसाला वरचं पद मिळणार. पोलिस या खटाटोपात मृतांच्या नातेवाईकांकडून पैसेही उकळत. 

किरपाल मरतो. मानसीक तोल गेलेली त्याची आई किरपालला भेटायचं म्हणते. पोलिस अधिकारी तिला सांगतो, चल तुझी किरपालची गाठ घालून देतो. किरपालच्या आईला मारून टाकतो.  

पोलिस अगदी सहजगत्या पूर्ण कुटुबाला गोळ्या घालतात. माणसं मारायची. सतलज नदीत फेकायची. माणसं मारायची, बेवारशी ठरवून ती जाळून टाकायची.

हज्जारो माणसं पोलिसांनी मारली. हिशोब नाही. 

दहशतवादी आणि पोलीस. दोघेही क्रूर आणि गुन्हेगार. दोघांनाही आपल्या भूमिकाच बरोबर असं ठामपणानं वाटतं. 

या प्रकरणाला   एक आंतरराष्ट्रीय कंगोराही आहे. दहशतवादाला पाकिस्ताननं मदत आणि चिथावणी दिली होती. कॅनडात दहशतवादाला नव्हे पण खालिस्तानवादी-फुटीर लोकाना आश्रय आणि पाठिंबा मिळाला होता. भारतात तर या प्रश्नावर राजकारण खेळलं गेलं. भिंद्रानवाला हा भस्मासूर तयार करण्यात आला, नंतर त्याचा खातमा करण्यात आला. सुवर्ण मंदिर कारवाई झाली, इंदिरा गांधींचा खून झाला.

चित्रपट राजकीय बाजूना स्पर्ष करत नाही. 

सतलज चित्रपट म्हणून चांगला आहे. व्यवस्थित बांधलेली पटकथा आहे. कॅमेरा किंवा स्पेशल इफेक्टची करामत केलेली नाही. तशी आवश्यकताही नाही इतकी ताकद कथानकात आहे. राजकीय व इतर भानगडीत सामान्य माणसं कशी भरडली जातात, त्याना किती भीषण संकटांचा सामना करावा लागतो याचं थरारक, भीषण चित्रण चित्रपटात आहे.

खालराची भूमिका दिलजित दोसांझनं केलीय. त्याची देहबोली, त्याचा वावर कोरीव आहे, तो नट आहे असं वाटत नाही. इन्सपेक्टर सुग्गाची भूमिका सुविंदर विक्की यांनी केलीय. अप्रतीम अभिनय.  सुग्गा पहाताना तळ पायाची आग मस्तकात जाते. एक नट आपल्याला एक भीषण व्यक्तिमत्व दाखवतोय पण तो स्वतः त्या व्यक्तिमत्वापासून दूर आहे असं वाटत रहातं. हे एक अजब कसब आहे.

चित्रपट सेन्सॉरकडं गेला तेव्हां सेन्सॉरनं अनेक तुकडे गाळायला लावले. चित्रपट राजकीय नाही पण पोलिस व्यवस्था उघडी करतो. हे काटछाटीचं कारण असावं.मान्य झालेला चित्रपट सिनेघरात गेला, सरकारकडून आलेल्या दबावामुळं  गायब झाला. नंतर तो ओटीटीवर आला. पण तिथूनही तो गायब झाला. पण तोवर किती तरी लोकांनी तो पाहिला होता, डाऊनलोड केला होता. आता त्या चित्रपटाच्या प्रती जगभर फिरत आहेत, पाहिल्या जात आहेत.

पोलिस मंडळीना चित्रपटाचा राग येणं स्वाभाविक आहे. पोलिस व्यवस्थेतले दोष या चित्रपटात उघडे पडतात. पोलिस व्यवस्था सुधारा असं सांगणारे अनेक आयोग झाले, कमीट्या झाल्या. त्यांनी खूप उपायही सुचवले. पोलिस खातं सुधारलं नाही. एकादा काना, एकादी वेलांटी, एकादी मात्रा कमी जास्त झाली, तेवढंच. 

सतलज हा चित्रपट आहे. चित्रपट म्हणूनच तो तयार झालाय, तो तसाच पहायला हवा. चित्रपट म्हणून सतलज चांगला आहे.

।।

Comments are closed.