सिनेमे/माएस्ट्रो

सिनेमे/माएस्ट्रो

माएस्ट्रो

लिओनार्ड बेर्नस्टाईन (१९१८-१९९०) हे युरोपातलं एक नामांकित व्यक्तिमत्व होतं. माएस्ट्रो हा बेर्नस्टाईनचा  जीवनपट आहे. 

बेर्नस्टाईननं (लेनी) जेएफ केनेडींच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि बर्लीन भिंत कोसळल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी संगित रचना केल्या. त्यानं बीथोवन, शास्कोटोविच इत्यादींच्या रचना कंडक्ट केल्या. त्यानं विश्वशाळेत संगित शिकवलं आणि टीव्हीवर संगिताचे कार्यक्रम केले. हे सर्व सांगितिक उद्योग करत असतानाच तो वियेतनाम युद्धाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरला, मानवी अधिकारावरच्या आक्रमणांचा विरोध केला.

कंडक्टर आजारी पडल्यामुळं आयत्या वेळी काही तासांच्या नोटिशीत, तयारी न करता, लेनीला एक कार्यक्रम कंडक्ट करावा लागला. तो कार्यक्रम लोकांना फार पसंत पडला, एका रात्रीत लेनी कीर्तीवान झाला.

ही आहे चित्रपटाची सुरवात. ब्लॅक अँड व्हाईट. गडद काळा आणि सणसणीत प्रकाशमान पांढरा रंग. आणि त्यातल्या विविध छटा. उगाच नाही दिक्दर्शकाला ब्लॅक व्हाईट चित्रपट करावेसे वाटतात. 

सुरवातीच्याच दृश्यात लेनी त्याच्या बरोबर क्लॅरिनेट वाजवणाऱ्या पुरुष मित्राच्या अंथरूणातून उठतो.

चित्रपट कसा असेल याची कल्पना यायला सुरवात होते.

सुरवातीचा कॉन्सर्ट ओझरता दिसतो. लेनी हा एक संगीतकार आहे, कंडक्टर आहे येवढंच चित्रपट सांगतो. चित्रपट अर्ध्याच्या पुढं जातो तसतसं लेनीचं संगित, संगित करणं, संगित कंडक्ट करणं कळायला लागतं. शेवटाच्या जवळ त्यानं केलेला एक दीर्घ कॉन्सर्ट पहायला मिळतो. डोळे आणि कान त्या दृश्यानं भरून जातात.

गेल्याच वर्षी टार हा एक देखणा चित्रपट आला होता.लिडिया टार या एका नामांकित कंडक्टरवरचा जीवनपट. अत्यंत देखणा होता, त्या चित्रपटात  संगितातला थरार, संगितातली एक्साईटमेंट, संगितातली ऊर्जा पहायला मिळाली होती, कानावर पडली होती.

माएस्ट्रो पुढं पुढं सरकत जातो आणि लेनीच्या जीवनातली गुंतागुंत वाढत जाते, काहीशी उलगडत जाते.

तरूण लेनी. फेलिशिया माँटलेग्रेच्या प्रेमात पडलेला लेनी. प्रसिद्ध होत गेलेला लेनी. फेलिशियाबरोबर लग्न होतं. पत्नीबरोबर बेबनाव झालेला लेनी. पत्नी वारल्यावर तिच्या आठवणी काढणारा लेनी. तीस चाळीस वर्षाचा काळ चित्रपट टप्प्याटप्प्यात दाखवतो. म्हटलं तर पटापट. लेनीमधे झालेले शारीरीक बदल दाखवत. पण हा वेग फक्त टप्प्यापुरताच. प्रत्येक टप्प्यात चित्रपट सावकाश, संथ गतीनं सरकतो.

फेलिशिया आणि लेनी अंथरुणात असतात. बोलत असतात. फक्त बोलतात, सेक्स नाही. शांतपणे. संथपणे. मतभेद झालेले असताना दोघं बोलत असतात. दिसत नाहीत, दूरवर असतात. हिरवळ, झाडं, खूप अंतर आणि झाडापाठी दोघं. दिसतही नाहीत. त्यांचं बोलणं तेवढं ऐकायला येतं. दृश्य संथपणे सरकतं. एका फ्रेममधे अगदी खोलवर फेलिशियाची येवढीशी छबी दिसते. स्वच्छ पांढऱ्या कपड्यात. फ्रेमभर काळोख आणि तीव्र पांढऱ्या कपड्यात फेलिशिया. 

संथ गती.

या उलट कॉन्सर्ट कंडक्ट करणारा लेनी. बेभान असतो. वेगानं हात हलवतो. हात गळून पडतील अशी भीती वाटावी. इतक्या वेगानं वाकतो आणि सरळ होतो की क्षणार्धात धडापासून वरचा भाग कोसळेल की काय असं वाटावं. शम्मी कपूरची आठवण होते.

आठवण झाल्या शिवाय रहात नाही ती ब्लाँड ही मेरिलिन मन्रोवरची २०२२ सालची फिल्म. विलक्षण चित्रण होतं. काळ्या पांढऱ्या रंगातलं कमालीचं अंतर ठेवणाऱ्या आणि अंतर जवळपास नाहिसं करणाऱ्या छटा या चित्रपटात होत्या.

लेनी माणसांत वावरणारा माणूस. समोर माणसं हवीत. संगितात गुंतलेली माणसं हवीत, प्रतिसाद देणारी माणसं हवीत. प्रेम करणारी माणसं हवीत. लेनीच्या बाबतीत हे प्रेम समलैंगिकही असतं. पत्नीला अर्थातच ते आवडत नाही. घरच्या कोणालाच ते आवडत नाही. त्यावरून जाम भांडणं.

पत्नी फेलिशियाचं एक म्हणणं होतं. लेनी इतर कोणाला स्पेस ठेवतच नाही, तो आणि तोच सारी स्पेस व्यापून टाकतो. घरात, कॉन्सर्ट हॉलमधे, सर्व ठिकाणी. जिथं जातो तिथला सर्व ऑक्सिजन तोच एकटा शोषून घेतो, इतर माणसं प्राणवायूविना घुसमटतात. कुटुंबातही तो आणि तोच. मुलं, पत्नी इत्यादी सर्वांनी कसंबसं स्वतःला उरलेल्या स्पेसमधे सामावून घ्यायचं.

तिचं म्हणणं खरंच होतं. कोणाही मनस्वी कलाकाराच्या बाबतीत असंच होतं. पत्नी असो की सहकारी, कलाकार ताबाच घेतो. 

एक मुलगी लिडिया टारला आवडते. टार तिला जवळ घेते, शिकवते, संगीतकार करते. ती कितीही मोठी संगितकार होवो, शेवटी तिनं टारच्याच कह्यात रहायला पाहिजे. जरा कुठं ती वेगळी झाली की टार संतापणार, संबंध तोडून टाकणार.

लेनी फेलिशियाशी चांगला वागतो. फेलिशिया लेनीशी चांगली वागते. तरीही दोघांमधे अंतर असतं. 

 फेलिशिया एक परिपूर्ण कलाकार आहे, अभिनेत्री आहे, गायक आहे. ती कसं आपलं अस्तित्व संपवणार? 

लेनीही मोठा कलाकार आहे. तोही आपलं अस्तित्व आणि ओळख जपतो.

लेनी लोकांच्या गराड्यातही एकटा असतो. 

फेलिशिया लेनीच्या मिठीतही एकटी असते. 

 फेलिशियाला कॅन्सर होतो. फेलिशियाला वेदना होतात, लेनीही दुःखी होतो.  

चित्रपटाची सुरवात लिओनार्डो बेर्नस्टाईन मुलाखत देतो तिथून होते. फेलिशियाच्या आठवणीनं लेनी कातर झालेला दिसतो. चित्रपटाची शेवटही मुलाखतीतूनच होतो, तिथंही लेनी पत्नीच्या आठवणीनं कातर झालेला आहे.

लिडिया टार, मेरिलीन मन्रो, लिओनार्ड बेर्नस्टाईन. तिघंही गाजलेले, गुंतागुंतीचे आणि खाजगी जीवनात वादग्रस्त ठरलेले कलाकार.

ब्रॅडले कूपरचं दिक्दर्शन आहे. 

मार्टिन स्कॉरसेसेनं प्रथम हा चित्रपट करायला घेतला होता. किलर्स ऑफ दी फ्लॉवर मून करायला घेतल्यावर हा चित्रपट त्यानं सोडला. नंतर स्टीवन स्पीलबर्गला हा चित्रपट करायचा होता. तोही दुसऱ्या चित्रपटात गुंतला. दोघांच्या संमतीनं हा चित्रपट कूपरकडं आला, पण दोघेही चित्रपटाचे निर्माते राहिले.

बेर्नस्टाईनची भूमिका ब्रॅडले कूपरनं केलीय. केरी मलिगननं फेलिशियाची भूमिका केलीय. दोन्ही भूमिका उत्तम आणि लक्षात रहाण्यासारख्या वठल्या आहेत.

।।

Comments are closed.