सर्जकता, साक्षेपी विचार, कलाकृती.

सर्जकता, साक्षेपी विचार, कलाकृती.

महत्त्वाची सर्जक कलाकृती समजायला जर तशीच सर्जकता लागत असेल तर हवीय कशाला तशी कलाकॄती ?
सर्जकता, सर्जक कलाकृती, ती समजून घेण्यासाठी सर्जकता.
कलाकृती सर्जक असू शकते किंवा सर्जक नसलेली भरड कलाकृती असू शकते. 
सामान्य कोणीही माणूस चार ओळी लिहून तिला कविता म्हणू शकतो, त्याच्या दृष्टीनं ती कविताही असते. दोन पाच हजार शब्द लिहून एखादा त्या मजकुराला कथा म्हणू शकतो. साठ सत्तर हजार शब्द गोळा झाले तर  कादंबरी म्हणता येते.  कॅमेरा आणि एडिटिंग सॉफ्टवेअर वापरून क्लिप तयार करणं कोणालाही जमू शकतं, जमतं. या निर्मितीला भरड कलाकृती म्हणता येईल. ती सर्जक कलाकृती म्हणणं कठीण आहे. 
सर्जक कलाकृतीमधे म्हणजे क्रिएटिव कलाकृतीत नेहमीच काही तरी नवं असतं. भाषा, कल्पना, रचना, शब्द, कथानक, आशय, पोत, शैली यापैकी कशात तरी किंवा सर्वच गोष्टीत काही तरी नवं असतं. सर्जन करणारा माणूस खूप मेहनत करत असतो. मुख्य म्हणजे त्याच्या जीनसाखळीतली  प्रतिभा नावाची जीन सक्रीय होते. ही जीन कदाचित प्रत्येक मनुष्यमात्रात असेल. सर्जनशील माणसात एक्सप्रेस होते, प्रकट होते. प्रकट होऊन ती पेशीत आलेल्या नव्या गोष्टी समजून घेण्यासाठी आवश्यक नवी   द्रव्यं करण्याची आज्ञा इतर जीन्सना देते. झालं. पेशीमधे बाहेरून आलेल्या गोष्टीवर प्रक्रिया होतात, त्यातून काही तरी नवीच द्रव्यं तयार होतात.
मी आणि विजय तेंडुलकर काही प्रकल्पांवर एकत्र काम केलं. कित्येक माणसं, कित्येक घटना आम्ही दोघांनी एकत्रच अनुभवल्या, त्यावर तासनतास चर्चा केल्या. मी त्यावर काही तरी किडुक मिडुक लिहिलं. पत्रकारी स्वरूपाचं. ते माहितीपूर्ण असेल, रंजकही असेल पण साधारणपणे भरड या वर्गातलं. तेंडुलकरांनी जे लिहिलं ते भरड नव्हतं, ते सर्जक होतं. त्या माणसांनी, प्रसंगांनी तेंडुलकरांच्या डोक्यात गेल्यावर ितसरीच रूपं घेतली. त्यांच्या डोक्यात  आधीच्या असंख्य गोष्टी असणार, नंतरही असंख्य गोष्टी घुसलेल्या असणार. तेंडुलकरांची प्रतिभा जीन जागृत झाली. तिनं त्यातून कायच्या कायच नव्या गोष्टी घडवल्या. माझ्या जेनेटिक नकाशातली प्रतिभा नावाची जीन सक्रीय झाली नाही.
 तेंडुलकरांच्या नाटकातली, पटकथातली, पात्रं, प्रसंग, अशाच रीतीनं तयार झाले असणार.
 तर असं हे सर्जकता प्रकरण.
सर्जक नसलेलं भरड प्रकरण वाचणं, समजून घेणंही सहजासहजी घडत नाही. त्यासाठीही काही तरी पूर्वतयारी लागते. 
 माणसं भरड कविता वाचतात, भरड नाटकं पहातात, भरड सिनेमे पहातात. त्यांना वाटतं की त्यांना ते सारं समजलंय. एका परीनं ते त्यांना विनासायास समजलेलं असतं. कारण जन्मल्यापासून पाच दहा वर्षाचे होईपर्यंत त्यांच्या परिसरातून त्यांच्या कानावर जे पडलेलं असतं, त्यातून त्यांची समजूत तयार झालेली असते. ती समजूत तयार करण्यासाठी फारशी खटपट त्यांना करायला लागत नाही. साहित्य असो, ज्ञानवर्धक मजकूर असो, एकूणातच माणसं भरड वाचतात. त्यामुळं जे काही भरड वाचलं, पाहिलं, ऐकलं जातं ते थोर असतं अशी त्यांची समजूत असते. ते सारं वाचण्यासाठी आपल्याला काहीच खटपट करावी लागली नाही हे त्यांना समजत असतं. काहीही मेहनत न करता आपल्याला सारं काही उत्तम समजतं असं त्याला वाटत असतं. विनासायास जे समजतं तेच ग्रेट असतं अशी समजूत ही माणसं करून घेतात.
काही ‘ जड ‘ वाचनात वा पहाण्यात आलं की ही माणसं स्वाभाविकपणे वैतागतात. पिकासोची चित्रं असोत, अरूण कोलटकरांची कविता असो, आंद्रे वायदाची फिल्म असो. अदूरच्या किंवा सत्यजित रे यांच्या फिल्मा असोत. काहीही खटपट न करता तयार झालेली समजूत वरील गोष्टी समजून घ्यायला पुरेशी पडत नाही. आपल्याला परिचित नसलेला भूगोल, परिचित नसलेली भाषा, परिचित नसलेला धर्म आणि सांस्कृतिक परंपरा, परिचित नसलेल्या चालीरीती समोर आल्या की ही माणसं बावचळतात. 
काही वर्षांपूर्वी अँटोनियाज लाईन नावाची एक फिल्म ऑस्कर विजेती ठरली. डच समाजाचं चित्रण त्या फिल्ममधे होतं. एक वयात आलेली हुशार कलाकार मुलगी ठरवते की तिला मूल हवंय पण नवरा नकोय. ती  शहरात जाते. एका तगड्या आणि हुशार मुलाला हेरते. त्याच्या बरोबर एकाद दोन तास घालवून गरोदर होते. यथावकाश तिला मुलगी होते.   यथावकाश ही वयात आलेली आई  समलिंगी संबंधात रमते.  डच समाज, युरोपीय समाज, युरोपीय समाजात झालेलं प्रबोधन, तिथली आर्थिक आणि सामाजिक स्थिती, तिथले सिनेमे वगैरे गोष्टी भरड सिनेमे पहाणाऱ्या लोकांना माहित नसतात. ही माणसं चिडतात. डच सिनेमा, डच माणसं कशी असंस्कृत आणि विकृत आहेत असं ती माणसं म्हणू लागतात. त्यांची समजूत सामान्यतः ज्ञानेश्वर-तुकाराम इथपर्यंतच ( सदानंद मोरे यांच्या कृपेनं ) तयार झालेली असते. तेराव्या शतकानंतर आणखी सात शतकं होऊन जग आता एकविसाव्या शतकात आलं आहे हे अनेकांना कळलेलं नसतं. त्यांच्या डायरीतली तारीख १० एप्रिल २०१५ असली तरी मनातली तारीख १० एप्रिल १३१५ वगैरे असते.
अर्थात ज्ञानेश्वरांचं साहित्यही सोपं नाही. त्यात त्यात खूप अर्थ आहे. ज्ञानेश्वरांच्या साहित्यातली प्रतिकं, प्रतिमा, शब्द, शैली इत्यादी गोष्टी समजून घेणं त्या काळातही सोपं नव्हतं, आजही सोपं नाही. 
   साहित्यिक कृती  त्या त्या काळाच्या संदर्भात तपासावी लागते, त्यासाठी मेहनत करावी लागते. ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल तर आजही खूप मेहनत करावी लागेल. भरड संस्कृतीत वाढलेली माणसं मेहनत करत नाहीत,ज्ञानेश्वरीचं आंधळं पारायण करत असतात, कीर्तनकारांनी सांगितलेल्या बाष्कळ गोष्टी म्हणजे ज्ञानेश्वर अशी त्यांची समजूत करून घेतात. लता मंगेशकरांनी म्हटलेली ज्ञानेश्वरांची गाणी आणि आई वडिलांनी त्यांना सांगितलेल्या सोप्या सोप्या गोष्टी यावर त्यांचं ज्ञानेश्वरीचं ज्ञान पोसलेलं असतं. ज्ञानेश्वरी असो किंवा शिवाजी महाराज असो. कोणत्याच गोष्टीचा अभ्यास करण्याची प्रथा आपल्यात नाही.फारच थोडे म्हणजे थोडे लोक अभ्यास करतात.बाकीचे सगळे लोक ज्ञानेश्वर आणि शिवाजी महाराज यांच्या नावानं दुकानं चालवतात, आपली अकार्यक्षमता आणि भरडपण ते ज्ञानेश्वर-शिवाजीच्या स्तोत्रांच्या गजरात विसरून जातात.  कोणतीही कलाकृती मग ती भरड असो की सर्जक असो, समजून घेण्यासाठी काही एक मेहनत करावी लागत असे. ज्ञान आणि समजूत या दोन्ही गोष्टी प्रयत्नपूर्वक मेहनतीतूनच साध्य होतात. 
 एक आठवण. पिकासोच्या चित्रांचं प्रदर्शन मुंबईत लागलं होतं. चित्रकला हा माझा विषय नसल्यानं पिकासो मला समजत नव्हता.  तो आपल्याला थोडा तरी, निदान प्राथमिक तरी समजला पाहिजे असं मला वाटलं. मी व्यंगचित्रकार-चित्रकार वसंत सरवटे याना घेऊन प्रदर्शनाला गेलो. एकेका चित्रासमोर उभा राहून मी त्याना सांगितलं की मला अगदी प्राथमिक गोष्टीपासून समजून सांगा, म्हणजे रेषा, रंग, कंपोझिशन, संकल्पना इत्यादी. त्यांनी सांगितलेलं मी टिपून घेतलं. पुन्हा एकदा बसून मी काय समजलो होतो आणि ते बरोबर होतं की नाही ते त्यांच्याकडून तपासून घेतलं. माझी पिकासोची समज  चित्र समीक्षकायेवढी किंवा चित्रकारायेवढी नक्कीच झाली नाही. पण पिकासोकडं कसं पहावं लागतं हे मला समजलं. मला पिकासो एक बिंदूही माहित नव्हता. तो चारेक बिंदू समजला. ज्यांना पिकासोचा खरा आस्वाद घ्यायचा असेल त्यांना किती तरी अभ्यास आणि खटपट करावी लागत असणार हे माझ्या ध्यानात आलं.
कलाकृती निर्माण करणं, सर्जक कलाकृती निर्माण करणं हेच मुळात फार मेहनतीचं काम असतं. सर्जकाच्या जीन्ससाखळीतला प्रतिभा  जीन तिथं प्रकट होत असतो. कलाकृती समजून घेणं हेही कष्टाचं काम असतं. समजून घेणाऱ्याच्या सर्जक जीन माणसाला जागा करावा लागतो. तो सहजा सहजी जागा होत नाही. महाखट जीन. 
एकादी गोष्ट समजून घेताना माणसाची क्रिटिकल थिंकिंगची क्षमता पणाला लागत असते. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे साक्षेपी विचाराची क्षमता. समोर दिसाणारं  तसंच्या तसं न स्वीकारता ते ताडून पहायचं, तपासून पहायचं. 
समजा मला एक सिनेमा समजून घ्यायचा आहे. तर त्या सिनेमाबद्दल संशय, दुरावा, राग, पूर्वप्रेम इत्यादी न बाळगता, होता होईतो, मला तो सिनेमा पहायला हवा. मी आधी सिनेमे पाहिलेले असतात. त्यातून माझी सिनेमाबद्दल काही एक समजूत तयार झालेली असते. मला अमूक एक पठडीचा सिनेमा आवडतो, अमूक एक आवडत नाही. शिवाय माझ्या मनामधे अनेक गोष्टींबद्दल, संस्कृतींबद्दल, राजकीय वा आर्थिक विचारांबद्दल, कलाकृतीबद्दल काही समज बिमज असतात. सिनेमा पहाता हे सारे समज, ग्रह माझ्या मनामधे दडी मारून बसलेले असतात. सिनेमा पहाताना त्या समज आणि ग्रहांशी मारामारी होते, पहात असलेल्या सिनेमातून तयार होणाऱ्या ग्रहांची आणि समजुतींची. 
राडा. 
माझ्या समज आणि ग्रहांचं काय करायचं?त्यांच्यात बदल करायचे? की ते सोडून द्यायचे?  आधीचे समज-ग्रह   मनातला कोपरा सोडायला तयार नसतील तर काय करायचं?  ते कप्प्यात कुलुपबंद करायचे? नवी समजही स्विकारून वेगळा कप्पा करून त्यात कोंबायची?  दोन्ही कप्प्यांसह अस्वस्थ जगत रहायचं?
नवं माणूस भेटतं. नवी भाषा कानावर येते. नवं चित्रं दिसतं. नवं वाचायला मिळतं. अकल्पित प्रसंगांना सामोरं जावं लागतं. नवा भूगोल. राडा सुरु होतो. जीव जातो. सर्जकाला या साऱ्याचा सामना करावा लागतो. सर्जनाचा आस्वाद घेणाऱ्यालाहा सामना करावा लागतो. महा छळ.
अनेक आणि फार माणसं या छळाच्या, त्रासाच्या भानगडीत पडत नाही. तो त्यांचा पिंड नसतो. त्यांचं जगच वेगळं. कमी माणसं या छळछावणीत सापडलेली असतात. त्यांची गोची झालेली असते. इतर माणसांना ही सर्जक माणसं, छळछावणीत सापडलेली माणसं समजत नाहीत. मग सर्जक माणसं दगड खातात, शिव्या खातात, शेणगोळे आणि अंडी झेलतात. किती तरी वर्षं आणि जगभर हे चालत आलंय.
धर्म, देव यांच्याशी चिकटलेले समज आणि ग्रह माणसाच्या मनात लाखभर वर्षांपासून दडलेले आहेत. ते जाम तिथून हलत नाहीत. वैज्ञानिक या समज-ग्रह गुच्छाला मेम्स असं म्हणतात. सांस्कृतिक साठवण असंही या गुच्छाचं एक नाव आहे. सांस्कृतिक साठवण लिग्निन सारखी असते.
लिग्निन नावाचं एक प्रोटिन असतं. पाण्यात चटकन विरघळणाऱ्या साखरेचेच रेणू लिग्निनमधे असतात.   ते रेणू सहज तोडता येणार नाही अशी साखळी करतात. नारळ सुकला की त्याच्या किशा होतात. त्यात लिग्नि असतं. त्या उकळा, गाडा, काहीही करा. जाम मोकळ्या होत नाहीत, पाण्यात विरघळत नाहीत. नारळाच्या किशा जमिनीत पुरल्या तर त्यांचं खत व्हायला वर्षं जातात. सुबाभूळ नावाच्या झाडाची पानंही अशीच. काही केल्या ती कुजत नाहीत. धर्म आणि देव हे एक लिग्निन आहे. माणसाच्या डोक्यातून ते हलत नाही, त्यावर परिणामच होत नाही. याच लिग्निनचं वर्णन श्रद्धा, विश्वास, खात्री, शाश्वती, अंधश्रद्धा, खरी श्रद्धा इत्यादी शब्दांत केलं जातं.
साक्षेपी विचार आणि श्रद्धेचं लिग्निन यांचं जमत नाही.
साक्षेपी विचार, क्रिटिकल थिंकिंग, सर्जकता यात नातं आहे काय? 
युरोपात प्रबोधन घडलं, रेनेसान्स घडला. त्याची सुरवात चित्रकलेपासून झाली होती. पूर्वी प्रत्येक चित्रात एक देवदूत किंवा देव असे. खाली चित्रामधे काहीही दाखवलं तरी वर कोपऱ्यात  देव आणि देवदूत हवा. कधी तरी चित्रकाराला वाटलं की हा देव किंवा देवदूत हवा कशाला? एके दिवशी देव आणि देवदूत गायब झाले. गहजब झाला. तिथून युरोपातल्या एकूण विचारांना वेगळं वळण मिळालं.
काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडं एक पद्धत होती. काहीही लिहायला घेतलं की अगदी वर, शीर्षकासारखं लिहायचं. ।। श्री ।।, ।। अमूक देव प्रसन्न ।।
साधं पत्र असो. लेख असो. पुस्तक असो. खतावणीत केलेली नोंद असो. राजानं कोणाचे हातपाय तोडायचा आदेश दिलेला असो. लेखनाची सुरवात श्री, अमूक देव प्रसन्न.
अलिकडच्या काळात कोणी असं लिहिताना दिसत नाही. पत्रं, लेखनाला थेट सुरवात होते.

असो. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *