लोकशाही आणि एकव्यक्ती राजवट. ली क्वान यू.

लोकशाही आणि एकव्यक्ती राजवट. ली क्वान यू.

२३ मार्च रोजी ली क्वान यू यांचं ९१ व्या वर्षी  निधन झालं. ली क्वान यू १९६५ साली सिंगापूरचे प्रधान मंत्री झाले. त्या वर्षी सिंगापूर मलेशियापासून वेगळा झाला. १९९९ साली ते प्रधान मंत्री पदावरून दूर झाले पण मंत्रिमंडळाचे एक सदस्य म्हणून राहिले. २००४ साली ते मार्गदर्शक मंत्री म्हणून मंत्रिमंडळावर लक्ष ठेवून होते.  २०१४ पर्यंत म्हणजे सुमारे पन्नास वर्षं त्यांची सिंगापूरच्या सत्तेवर, राजकारणावर पकड होती. वयोमानानुसार ते मुख्य पदावरून निवृत्त झाले तरी या ना त्या स्वरूपात सिंगापूरची सत्ता त्यांच्याच हाती होती, त्यांच्या होकाराशिवाय सिंगापूरचे निर्णय होत नव्हते.
सिंगापूर हे जगभरच्या व्यापाराचं एक मोक्याचं केंद्र आहे. जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती, पूर्व-पश्चिम जलवहातुकीचं केंद्र हा सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेचा कणा. जगाचा व्यापार-उलाढाल जसजशी वाढत गेली तसतसा सिंगापूरचा फायदा वाढत गेला. जगातली अर्थव्यवहाराची वळणं लक्षात घेऊन सिंगापूरनं तेल शुद्धिकरण उद्योग सुरु केले, इल्लेक्ट्रॉनिक उद्योग विकसित केले. हे सारं करण्यासाठी भांडवल लागतं.   ७०० चौकिमीचा भूभाग आणि पन्नास लाख लोकसंख्येच्या सिंगापूरजवळ गुंतवायला पुरेसे पैसे नव्हते. सिंगापूरनं आंतरराष्ट्रीय भांडवलाला मोकळीक दिली. एका परीनं या गोष्टी जवळपास आपोआप घडत गेल्या.  परंतू सिंगापूरची ही वाढ, विकास टिकवून ठेवण्याचं श्रेय यू यांना जातं. सिंगापूरमधे चिनी, मले, भारतीय इत्यादी माणसं रहातात. बहुवंशी, बहुधर्मी समाजात तणाव असतात आणि ते तणाव शेवटी आर्थिक घात करतात. मलेशियानं ते अनुभवलं आहे. यू यांनी अशा नाना प्रकारच्या माणसांना शिस्तीत एकत्र बांधून ठेवलं, कामाला लावलं.
यू मुळातले चिनी. कनफ्युशियस विचारात ते वाढले. शिक्षण, शिस्त, आज्ञाधारकता आणि श्रेणीआदर ( हायरार्की ) म्हणजे कनफ्युशियसचा विचार. चिनी समाजाची घडण कनफ्युशियसच्या विचारांवर झाली आहे. मार्क्सवादी विचार समतेवर आधारलेला आहे, तिथं श्रेणी आणि उच्चनीचता यांना जागा नाही. तरीही चिनी मार्क्सवादी पदावरच्या माणसाचं श्रेष्ठत्व मानतो, त्यापुढं वाकतो. कनफ्युशियसनं समाजाला एक शिस्त घालून दिली. कडक शिस्त. यू हे पक्के कडक शिस्तीचे. ‘ मी जर प्रधान मंत्री असेन, देश प्रमुख असेन तर सर्वांनी माझं ऐकलंच पाहिजे, मी सांगेल त्या प्रमाणं वागलंच पाहिजे. तसं न करणाऱ्याला माझ्या समाजात वाव नाही. ‘ हे कनफ्युशियस विचाराचं मुख्य सूत्र. ते यूनी पाळलं. त्यांच्या आर्थिक वा राजकीय विचारांवर टीका करणाऱ्या माणसांना त्यांनी तुरुंगात पाठवलं. सिंगापूरमधे वीस वर्षापेक्षाही जास्त काळ तुरुंगात काढलेली माणसं आहेत. त्यांचे विचार मान्य आहेत, त्यांना विरोध नाही असं कागदावर लिहून दिलं तरच सुटका  असा ली क्वान यू यांचा व्यवहार. पत्रकारी, पत्राकाराचं स्वातंत्र्य, विचार आणि प्रकटीकरणाचं स्वातंत्र्य यावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांनी आपले मर्यादित लोकशाही विचार कधीच झाकून ठेवले नाहीत,   अभिमानानं मिरवले.
आर्थिक विकास हेच ध्येय. इतर गोष्टी बाजूला. ली क्वान यू हे सिंगापूरचे राजेच होते, हुकूमशहा होते. सिंगापूरमधे स्वच्छता होती, उत्कृष्ट जगण्याची सोय होती, कायदा होता, सुरक्षितता होती, उत्तम शिक्षण होतं. सिंगापूरच्या जनतेला ते हवं होतं, आवडलं होतं. पण या विकासात आपल्याला विचारात घेतलं जात नाही, आपला सहभाग त्या विचारात, प्रक्रियेत नाही अशी खंत सिंगापुरी जनतेत होती. आपण मोकळेपणानं बोलू शकत नाही याचं सिंगापुरी जनतेला वाईट वाटत असे. परंतु या बदल्यात मिळणारं सुख येवढं होतं की सिंगापूरमधे यू यांच्या विरोधात बंड झाली नाहीत, त्यांची सत्ता उलथवून लावण्याचे प्रयत्न झाले नाहीत, क्रांत्या बिंत्या झाल्या नाहीत.
एकहाती कारभार. कारभार करणारा शहाणा असतो, तो आपला बाप असतो, त्याचं ऐकायचं. ऐकलं नाहीत तर काय होईल असा प्रश्नच येत नाही, कारण ऐकण्यावाचून दुसरा पर्यायच नसतो. पीपल्स अॅक्शन पार्टी स्थापन करून त्या पक्षाच्या द्वारे यू यांनी सत्ता मिळवली, चालवली. पीपल्स अॅक्शन पार्टीत  माणसं विविध मतं मांडत आहेत आणि विचार विनिमयाच्या अंती धोरण ठरत आहे असं घडलं नाही. बाप घरात असतो आणि जगातही तो बाप असतो. चिनी प्रथा. 
जगात अशी व्यक्तीच्या हुकूमशाहीची कित्येक उदाहरणं आहेत. हिटलरनं नॅशनल सोशलिस्ट पार्टी काढली. माओ आणि स्टालिन यांनी कम्युनिष्ट पार्ट्या काढल्या. इथियोपियात हेले सेलासीनं १९३० ते १९७४ सम्राटपद भोगलं. त्याच्या नावानं रास तेफारी चळवळ इथियोपियात सुरु झाली. आम्हारा भाषेत रास म्हणजे प्रमुख आणि तेफारी हे सेलासीचं नाव. हेले सेलासी हा आमचा देव-प्रमुख-बाप आहे असं मानणारी माणसं त्यानं आपल्या भोवती गोळा केली. ही माणसं हेले सेलासीला देवाचा अवतार मानत, ख्रिस्ताचा अवतार मानत.
हिटलरनं जर्मनी आणि जगाचं नुकसान करून शेवटी आत्महत्या केली. स्टालिननं करोडो माणसं ठार मारून रशियाची अर्थव्यवस्था उध्वस्त केली, देशावर भीषण दुष्काळ लादले. माओनंही लाखो विरोधक मारले आणि चीनवर दुष्काळ लादले. हेले सेलासीच्या काळात इथियोपियाची धूळधाण झाली. हेले सेलासी श्रीमंत झाला आणि इथियोपिया देश भिकेला लागला. ली क्वान यू  वरील माणसांपेक्षा वेगळे निघाले.  यू यांचे विरोधक तुरुंगात खितपत पडले पण ना त्यांचा छळ झाला ना त्यांना ठार मारण्यात आलं. सिंगापूरक या देशाचं नुकसान झालं नाही. सिंगापूरची सतत भरभराट होत राहिली, सिंगापूरची जनता सुखात राहिली.
  समाजात विविध गट असतात, त्यांच्या  मागण्या वेगवेगळ्या असतात, त्यांची धोरणं वेगवेगळी असतात. प्रत्येक समाजगटाच्या काही मागण्या योग्य असतात पण अनेक मागण्या अयोग्य असतात, संकुचित स्वार्थावर आधारलेल्या असतात,  हितसंबंधी असतात. भारतात पहा. जाती आहेत. उपजाती आहेत. भाषा आहेत. भाषेत उपभाषा आहेत. जिल्हे आहेत. धर्म आहेत, धर्मात उपपंथ आहेत. आदिवासी, गिरीजन आणि समुद्रतटी गट आहेत. गरीब आहेत, श्रीमंत आहेत. वीस पंचवीस प्रकारचे गट, त्यांचे स्वार्थ. शिवाय प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंबाचे स्वतंत्र स्वार्थ. त्या कुटुंबं आणि व्यक्तींची मतं.  भारतात काहीही करायला गेलं तरी एकमत होणं शक्य नाही. लोकशाहीत प्रत्येकाला एक मत असतं. मतांचे गट होतात. ज्या गटात जास्त मतं तो गट वरचढ ठरतो आणि सामान्यतः त्या गटाची धोरणं ही समाजाची अधिकृत धोरणं ठरतात. मुंबईतल्या मल्टिप्लेक्स सिनेमात मराठी सिनेमे दाखवले पाहिजेत हे मराठी भाषक गट मोठा असल्यानं महाराष्ट्र सरकारचं अधिकृत मत ठरतं. या पेक्षा वेगळी मतं असणाऱ्या माणसांची बहुसंख्या होत असली तरीही वरील मत अधिकृत ठरून तो कायदा होतो. मतं, माणसं, त्यांची संख्या ही कसोटी लोकशाहीला अडचणीत आणते. एका छोट्या गटाचं धोरण अख्ख्या समाजाचं धोरण होतं.
हिटलर, स्टालिन, माओ, हेले सेलासी, ली क्वान यू यांनी माणसं-मतं-डोकी यांचा विचार केला नाही. पक्षांची ताकद, पक्षांवरची या नेत्यांची पकड यामुळं समाजालाही त्या  नेत्यांचं मत हेच आपल मत आहे असं मानावं लागलं.  त्यामुळं मतमतांतरातला गोंधळ, विविध हितसंबंध आणि अयोग्य आकांक्षा यांच्या बेरीज वजाबाकीतून होणारा गोंधळ टळला. अर्थाक एक खरं आहे. भारतात मतांतरांना जेवढी जागा आहे तेवढी जागा तुलनेनं जर्मनी, रशिया, चीन, सिंगापूरमधे  नव्हती. असो. हिटलर, माओ इत्यादींनी लादलेली धोरणं स्वीकारताना समाजानं खळखळ केली. पण  यू यांची राजवट  थोडासा आंबट चेहरा करून कां होईना सिंगापुरी समाजानं मान्य केली.
इतक्या वर्षात एकादाच यू.   हिटलर, स्टालिन इत्यादी बरेच.
साऱ्या जगभर जिथं लोकशाह्या आहेत, जिथं जास्तीत जास्त डोकी आणि मतं यांच्या जोरावर राज्यकारभार होतो तिथली माणसं काहीशी चिंतेत आहेत. या पद्धतीनं समाजात कोणालाच सुख लाभत नाहीत असं लोकांना वाटतंय. अमेरिकेसारखा मोकळा लोकशाही देश, तिथं बेधडक मोकळी माध्यमं. तिथले लोक आता म्हणत आहेत की फायनान्स आणि उद्योग यातले एक टक्का लोक उरलेल्या ९९ टक्के लोकांचं सुख हिरावून घेत आहेत, ते इतरांची साधनं हिरावून घेत आहेत. ब्रिटनमधली जनता तिथल्या बहुवंशीय-बहुभाषिक-बहुसांस्कृतिक-बहुधार्मिक लोकशाहीला कंटाळली आहेत. जवळपास तशीच स्थिती फ्रान्समधे आहे. भारतातली लोकशाही आणि निवडणूक पद्धत या बद्दल आक्षेप घेण्याजोग्या जागा आहेत. तरीही इथं लोक मोकळेपणानं बोलू शकतात, मतं मांडू शकतात हे सामान्यतः सर्वांना मान्य आहे. तरीही अलिकडं देशात कोणीही सुखी नाहीये, सगळेच या ना त्या कारणानं दुःखी आहेत ( मोजके राजकारणी, उद्योगी आणि सरकारी नोकर वगळता ) असं लोक आता बोलत आहेत.
नाना प्रकारची माणसं, नाना गट समाजात वावरत असताना सर्वाना सामाईक अशा सुखाच्या बाबी कशा शोधायच्या आणि त्या अमलात आणण्यासाठी सरकार-स्टेट कशा रीतीनं चालवायचं असा प्रश्न उपस्थित होतोय. 
दिल्लीत केजरीवाल यांच्या आप पार्टीला मतदारांनी सत्तर पैकी सदुसष्ट जागा दिल्या. साधारणपणे असं मतदान कम्युनिष्ट, हुकूमशाही देशातच होतं. भारतात बोंब करायला वाव आहे, आरोप प्रत्यारोपाला खुलं मैदान आहे, माणसं बहुतांशी खुलेपणानं मतदान करू शकतात. त्यामुळं हुकूमशाही देशात होते तशी दादागिरी इथं कमी शक्य आहे. त्यामुळं  इतकी मतं आणि इतक्या जागा एकाद्या पक्षाला मिळणं ही गोष्ट भयचकित करणारी आहे. 
 कल्पनाही करता येणार नाही असं बहुमत मिळाल्यावर काही दिवसातच त्या पक्षातले प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव हे दोन पक्ष संस्थापक पक्षातून बाहेर पडले. केजरीवाल आणि त्यांच्यात मतभेद झाले. पक्ष कसा चालवायचा, पक्षाची संघटना कशी असेल आणि पक्षाची निर्णय प्रक्रिया कशी असेल या विषयावर मतभेद होते. केजरीवाल यांच्या हाती सारी सत्ता केंद्रित होणं लोकशाहीच्या दृष्टीनं योग्य नाही असा भूषण-यादव यांचा मुद्दा आहे. ( ली क्युआऩ यू यांच्यावर सिंगापूरच्या लोकांचे हेच आक्षेप होते. )दिल्लीतल्या मतदार नागरिकांना सुख कसं द्यावं, त्यांचे प्रश्ण कसे सोडवावेत या विषयावर मतभेद नव्हते. केजरीवाल यांनी स्पष्टच सांगून टाकलं की वेगळी मतं असणाऱ्या लोकांबरोबर संस्था चालवण्याचा अनुभव आपल्याला नाही.
भूषण आणि यादव पक्षाबाहेर गेल्यात जमा आहेत. दोघेही तावातावात होते, प्रक्षुब्ध होते. केजरीवाल   थंड होते. टीका करणं, उल्लेख करणंही त्यांनी टाळलं. केजरीवालांचे सहकारी भूषण-यादवांवर तुटून पडले. केजरीवाल गप्प. एका पत्रकार परिषदेत केजरीवाल यांना उपस्थितांनी आणि पत्रकारांनी पक्षातली फूट आणि असंतोषाबद्दल खोदून खोदून प्रश्न विचारले. केजरीवाल थंडपणे म्हणत राहिले की गव्हर्नन्स, कारभार या गोष्टीसाठी त्याना जनतेनं निवडून दिलं आहे, कारभार  त्यांच्या दृष्टीनं महत्वाचा आहे.
काही लोक इतरांबरोबर काम करू शकतात, काही लोक करू शकत नाहीत. इतिहासात डोकावून पहा. गांधींनी स्वातंत्र्य चळवळ उभी केली, काँग्रेस पक्ष उभा केला. करोडो माणसं त्यांनी जोडली. पण टंडन, सुभाषबाबू, जिन्ना इत्यादी माणसाना त्यांनी राजकारणातून हाकून लावलं. खूप माणसांना बरोबर घ्यायचं पण आपल्या सत्तेला आव्हान देणाऱ्यांना मात्र हाकलून द्यायचं. केजरीवाल आणि गांधी यांची तुलना होऊ शकत नाही.  केजरीवालनीही दिल्लीत काम करताना, भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात काम करताना, आप पार्टी स्थापन करताना खूप माणसं जोडली आणि भूषण-यादवांना हाकललं. 
हा  एका  विशिष्ट प्रकारच्या व्यक्तिमत्वाचा,  पर्सनॅलिटीचा वर्ग आहे.  बरीच माणसं अशी असतात.
दिवस-महिने-वर्षं येतात आणि जातात. पुढारी येतात, सत्ता चालवतात, दिसेनासे होतात. शेवटी काय उरतं? हिटलर, स्टालिन, माओ, हेले सेलासी गेल्यानंतर कटु आठवणी उरल्या. ली क्यूआन यू गेल्यावर दिवस संपताना सिंगापूरवासी उद्याचा दिवस आपण सुखात जगू या खात्रीनं झोपी गेले.   शेवटी तीच कसोटी उरते.
पाच वर्ष जाऊ द्यात, दहा वर्षं जाऊ द्यात. केजरीवाल यांच्या सत्तेनं दिल्लीकरांना   सुख मिळालं, शुद्ध हवा मिळाली, पुरेसं पाणी आणि वीज मिळाली, इस्पितळात फार रांगेत उभं न रहावं लागता वाजवी किमत मोजून उपचार मिळाले तर लोक भूषण-यादव यांना विसरतील, केजरीवाल त्यांच्या लक्षात राहतील. 

००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *