येमेनमधली इस्लामी मारामारी

येमेनमधली इस्लामी मारामारी

येमेनच्या राजधानीवर सौदी अरेबियाची विमानं बाँब हल्ले करत आहेत. त्यांना इजिप्त, कतार, अरब अमिराती या देशांचा पाठिंबा आहे. पाकिस्तानचाही पाठिंबा आहे परंतु पाकिस्ताननं तिथं सैनिक पाठवायचं अजूनपर्यंत टाळलं आहे. सौदी अरेबिया सानामधे घुसलेल्या हुती सरकारला हुसकावण्याच्या प्रयत्नात आहे. गेले काही दिवस उत्तर येमेनमधे बलवान असलेल्या हुती या संघटनेनं येमेनच्या राजधानीचा ताबा घेतला असून साऱ्या येमेनवरच सत्ता मिळवण्याचा हुती या संघटनेचा इरादा आहे. 
हुती या संघटनेकडंही भरपूर शस्त्रं आहेत. त्यामुळं लढाई तुंबळ आहे. येमेनी जनतेचं मत  विभागलेलं आहे. हुतीला पाठिंबा असलेले लोक आहेत, हुतीच्या विरोधात लोकं आहेत, सौदीला पाठिंबा देणारे आहेत, सौदीला विरोध करणारे आहेत. अल कायदा आणि इस्लामी स्टेट या संघटनांना पाठिंबा आणि विरोध करणारेही आहेत. भरीस भर म्हणून अनेक जमातींच्या सशस्त्र टोळ्या आहेत आणि त्याही एकमेकाला आणि इतरांना विरोध करत असतात. असे एकूण आठ नऊ तरी सशस्त्र गट सध्या स्वैर हिंसा करत आहेत. मधल्या मधे येमेनी जनता भरडून निघत आहे.
हुती या संघटनेचे सदस्य झैदी या येमेनमधल्या एका पंथाचे आहेत. फक्त येमेनमधेच हा पंथ आहे. हा इस्लामी पंथ तत्वतः सुन्नी आहे पण व्यवहारात शिया आहे. झैदी मंडळीमधे इमाम असतो, शियांप्रमाणं.  येमेनमधे झैदी मंडळी पंचवीस ते तीस टक्के आहेत. उरलेले येमेनी सुन्नी आहेत. जगभराप्रमाणं शिया सुन्नी यांच्यात इथंही हाडवैर आहे. सौदी अरेबियाची समजूत आहे की हुतींना इराणचा पाठिंबा आहे. प्रत्यक्षात इराणचा फारसा पाठिंबा असल्याचे पुरावे नाहीत. गंमत म्हणजे हुती व्हेनेझुएलाच्या युगो शॅवेझला हिरो मानतात. 
हुती या संघटनेला सत्ता हवी आहे. गेली पंधराएक वर्षं हुती संघटनेची माणसं येनेमची सत्ता घेऊ पहात आहेत. एकाद्या गावावर ते हल्ला करतात. गावातल्या जनतेला धमकावतात. गावातली मशीद ताब्यात घेतात, मशिदीत स्वतःचा इमाम नेमतात. हा इमाम लोकांना हुतीचा शब्द पाळा असं सांगतो. इमामाकडं एके सत्तेचाळीस असते, प्रवचन ऐकायला बसलेल्या समोरच्या लोकांकडंही स्वयंचलित बंदुका असतात.अमेरिका मुर्दाबाद, ज्यू मुर्दाबाद, इस्रायल मुर्दाबाद अशा या संघटनेच्या घोषणा असतात. पण त्या पेक्षा भ्रष्टाचार विरोध हा त्यांचा मुख्य मुद्दा असतो. 
२०११ साली अरब स्प्रिंग ही क्रांती झाली तोवर साले या अध्यक्षाची एकहाती सत्ता तीसेक वर्षापासून येमेनमधे होती. या माणसानं देश खाल्ला होता. चमचे आणि नातेवाईक यांनी देशाची संपत्ती लुबाडली होती. अमेरिका आणि सौदी अरेबिया यांचा साले यांना पाठिंबा होता. ओसामा बिन लादेननं येमेनचा आश्रय घेतल्यावर सौदी अरेबिया आणि अमेरिकेनं येमेनमधे प्रचंड प्रमाणावर पैसे ओतले. तेही साले यानं खाल्ले. सालेनं येमेनच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली पण स्वतःचे खिसे मात्र भरपूर भरले. अमेरिकेच्या भक्कम पाठिंब्यावर साले टिकून होता. अरब स्प्रिंगमधे तरूणांनी त्याला हाकललं. तो गेल्यावर त्याच्या जागी अब्द हादी अस्थायी अध्यक्ष झाले. परंतु परिस्थिती जैसे थे होती. अर्थव्यवस्था बिघडलेली, प्रशासन भ्रष्टाचारानं बरबटलेलं. जनता हैराण. 
या स्थितीत हुती या संघटनेनं उचल खाल्ली. गावं गावं, शहरं शहरं या संघटनेनं ताब्यात घ्यायला सुरवात केली. गावातली, शहरातली सरकारी यंत्रणा जशीच्या तशी ठेवली जाते. पोलीस, कारभार, पालिका, शाळा इत्यादी सारं जसंच्या तसं. हुती त्यांच्यावर लक्ष ठेवणार. हुतीच्या क्रांतीकारी समित्यांचे सदस्य बंदूक-पिस्तूल घेऊन शहरात फिरणार. रस्तो रस्ती हुतीच्या उघड्या जीप्स-पिक अपमधून हुतीचे कार्यकर्ते गल्लोगल्ली फिरणार आणि त्यांचं न मानणाऱ्या पोलिसांना, कारभाऱ्यांना गोळ्या घालून ठार मारणार. एकाद्या गावातल्या कोणी त्यांना विरोध केला तर तिथं बाँबस्फोट करणार. हुतीचं पसरणं इतर प्रतिस्पर्धी संघटनाना अर्थातच मान्य नव्हतं. अल कायदाचा हुतीला विरोध होता. त्यामुळं जागोजागी अल कायदा विरुद्ध हुती अशी हिंसक मारामारी आजतागायत चालू आहे. सरकार नावाची गोष्ट असून नसल्यागत. सरकारी नोकर असतात, त्यांचे पगार बिगार होतात. पालिकेची इस्पितळं चालतात, तिथं उपचार वगैरे होतात. फक्त जागो जागी त्यांचे मालक वेगवेगळे असतात. एकाद्या ठिकाणी  हुतीचा कार्यकर्ता, एकाद्या ठिकाणी अल कायदाचा कार्यकर्ता मालक-सत्ताधारी असतो.
  अशा रीतीनं हुती गेली चारेक वर्षं पसरत पसरत राजधानी सानापर्यंत येऊन पोचली आहे. सौदी अरेबियाला हुती पसंत नसल्यानं सौदीनं हुतीविरोधात कारवाई सुरु केली आहे. 
सौदीचा पापड कां वाकडा झालाय? 
सौदीचा समज आहे की हुती ही संघटना शिया आहे आणि तिला इराणचा पाठिंबा आहे. इराण हुतीचा वापर करून आखाती प्रदेशात स्वतःचं वर्चस्व स्थापू पहातेय असा सौदीचा संशय आहे. येमेन हा देश सौदी अरेबियाला चिकटून आहे. त्यामुळं सुतीनं येमेनचा ताबा घेणं म्हणजे आपल्याच छाताडावर बसणं आहे असं सौदीला वाटत आहे. सौदी सुन्नी आणि इराण शिया. सौदी अरब आणि इराण पर्शियन. दोन देशांमधलं वितुष्ट धार्मिक आहे आणि सांस्कृतीकही. दोन्ही देश तेलाच्या जोरावर श्रीमंत झाले आणि त्याच जोरावर त्यांना आखाती देशांचं वर्चस्व हवं आहे. म्हणूनच संधी मिळाल्यावर इराणला छळण्यात सौदी अरेबियाला स्वारस्य आहे.
हुती काहीसे शिया असले तरीही ते कडवे शिया नाहीत. हुतीचं मुख्य दुखणं सत्तालालसा हे आहे. येमेनमधे हुतीला सत्ता हवी आहे. सत्तेला धर्म नसतो. सत्ता नेहमीच धर्माचा वापर करून घेत असते. इस्लामचा विजय असो, अल्ला थोर आहे अशा घोषणा हुतीचे कार्यकर्ते देतात. पण नेमक्या त्याच घोषणा देत अल कायदाचे लोक हुतींवर तुटून पडतात. या दोघांच्या भांडणात इस्लामी स्टेट ही संघटनाही पडते तीही याच घोषणा देत. आणि सौदी सैनिकही अल्लाच्याच नावानं बाँब वर्षाव करत असतात. अमेरिका, ज्यू, बिगर इस्लामी लोक जर या सर्वांचे समान शत्रू आहेत तर ही माणसं एक कां होत नाहीत? एकमेकांचे जीव घेतात? अत्यंत क्रूरपणे निष्पाप माणसांची हत्याकांडं कां करतात? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात हुतीला रस नाही. हुतीला काहीही करून येमेनची सत्ता हवी आहे. आणि हुती सत्तेत येणं म्हणजे सुन्नी देशात शिया सत्ता स्थापन होणं असं वाटत असल्यानं सुन्नी सौदी अरेबिया हुतींचं निर्दालन करण्यास सरसावली आहे.
इराणही कमी नाही. एकूण मुस्लीम जगात शिया अल्पसंख्य आहेत. पंधरा वीस टक्के असतील. आपणच खरे मुस्लीम असं त्याना वाटतं. सुन्नी मंडळींनी त्यांच्यावर अत्याचार केला आहे, अन्याय केला आहे असं त्यांना किती तरी शतकांपासून वाटत आलं आहे. त्यामुळं शिया, इराण संधी मिळेल तिथं सुन्नींवर सूड उगवायला तयार असतात. अल्पसंख्य असतात त्या ठिकाणी ते दबून असतात पण जिथं डोकं वर करता येतं, शक्ती परजता येते तिथं ते सुन्नीना खतम करण्याच्या प्रयत्नात असतात. लेबनॉन, इराक आणि सीरिया या तीन ठिकाणी इराणची शस्त्रं आणि मुजाहिद सक्रीय आहेत. अल कायदालाही लाज वाटावी इतक्या क्रूरतेनं हेझबुल्ला ही शिया संघटना लेबनॉन आणि सीरियात हिंसा करत असते. तिथं त्यांना सौदी-कतार इत्यादी देश इराणच्या विरोधात उभे आहेत. 
येमेनमधली अंतर्गत यादवी आणि आखाती देशातल्या इस्लामी सत्तांमधली मारामारी. सत्तेसाठी, वर्चस्वासाठी मारामारी. या मारामारीत कोण कोणाबरोबर कुठं असेल याचा नेम नाही. सगळेच शत्रू आणि सगळेच मित्र.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *