ओम शिनरिक्यो या अधोरी पंथाची गोष्ट

ओम शिनरिक्यो या अधोरी पंथाची गोष्ट

ओम शिनरिक्यो नावाचा एक अघोरी पंथ जपानमधे आहे. हिंदू,बुद्ध
इत्यादी विचारांचं एक अपूर्वअघटित मिश्रण या पंथानं तयार केलंय. सध्याचं युग वाईट
आहे, त्यातली माणसं वाईट आहेत, त्यातल्या संस्था वाईट आहेत, त्या नष्ट केल्या पाहिजेत
असं या पंथाचं मत आहे. सभोवतालच्या लोकांना मारून टाकायचं, त्यांचे खून करायचे असं
या पंथाचं तत्व आहे. या पंथाच्या लोकांनी केलेल्या अघोरी कृत्यांबद्दल पंथाचा प्रमुख
आणि सहा कार्यकर्ते फाशी गेले आहेत. तरीही पंथ शिल्लक असून जपानी सरकारचं त्यावर कडक
लक्ष आहे, जपानी समाज त्यांना दूर ठेवतो, अव्हेरतो.
२० मार्च १९९५ या दिवसाची सकाळ. टोकियोची भुयारी रेलवे व्यवस्था.
मेरुनिची, चियोडा आणि हिबिया या तीन मार्गावर चालणाऱ्या गाड्यांच्या पाच डब्यांमधे
पाच जण चढले.  त्यांच्याकडं सेरीन या द्रवरूप
विषारी वायूच्या पिशव्या होत्या. हा वायू हिटलरनं ज्यूंना मारण्यासाठी वापरला होता.
पाच जणांनी छत्रीच्या काठीनं विषारी वायूच्या पिशव्या फोडल्या. वायू गाडीत पसरला. फलाटावर
पसरला.
 ५४ माणसं अऩेक दिवस
हाल हाल होऊन मेली. शेकडो  माणसं जगली खरी पण
कित्येक वर्षं त्रास सहन करत होती. शेकडो माणसं वायूची बाधा झाल्यानं हॉस्पिटलमधे कित्येक
दिवस उपचार घेत होती.
वायुहल्ला करणाऱ्या पाच माणसांत एक होता इकुओ हयाशी. तो होता
लहान मुलांचा डॉक्टर. पेडियाट्रिक सर्जन. एका हॉस्पिटलमधे काम करत असे. भरपूर पगार
वगैरे. परंतू व्यक्तिगत कारणांसाठी तो दुःखी होता. डॉक्टर असून, चांगलं चालत असूनही
तो अस्वस्थ होता. जपानमधल्या आरोग्य व्यवस्थेबद्दल त्याच्या डोक्यात असंतोष होता. जपान
हा देश अती आधुनिक झाला असून सामाजिक दृष्ट्या अतीशय वाईट स्थितीत आहे असं त्याला वाटत
असे. आधुनीक विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल त्याला आक्षेप होते. आधुनीक विज्ञान-तंत्रज्ञान-अर्थव्यवस्था-राज्यव्यवस्था
यातून सत्य आणि सुख लाभणार नाही असं त्याला वाटत होतं. तो काही तरी वाट शोधत होता.
तो ओम शिनरिक्यो या एका पंथाच्या संपर्कात आला. ओम शिनरिक्यो
या जपानी शब्दांचा  अर्थ अंतिम सत्य. सभोवतालचं
सारं जग भ्रष्ट आहे तेव्हां ते नष्ट केलं पाहिजे असं या पंथाचं म्हणणं. शोको असाहारा
या माणसानं हा पंथ स्थापन केला. बुद्ध, शैव इत्यादी पंथांच्या अभ्यासातून. पतंजलीची
योगसूत्रं ओम शिनरिक्यो आपल्या पंथाच्या माणसांचं प्रशिक्षण करण्यासाठी वापरत असे.
जग नष्ट करण्यासाठी त्यानं प्रथम एक पक्ष स्थापन केला. सरकार ताब्यात घेऊन दुष्ट माणसं
नष्ट करणं आणि जपान आमूलाग्र बदलणं असा त्याचा हेतू.  निवडणुकीत भाग घेतला. त्याला मतं मिळाली नाहीत.
मग त्यानं थेट लढाई करायचं ठरवलं. रशियात जाऊन त्यानं  शस्त्रं खरेदी केली, बाँब वगैरे विकत घेतले.
 ओम शिनरिक्यो या
पंथाला असाहारनं  एका समांतर सरकारचं स्वरूप
दिलं. त्यात शिक्षण, अर्थ, विज्ञान, तंत्रज्ञान इत्यादी विभाग होते. एकाद्या सरकारचे
विभाग असावेत तसे.इकुओ हयाशी सारखे भरपूर शिकलेले लोक त्या विविध विभागात सामिल झाले.
विज्ञान या विभागात सेरिन हा वायू तयार केला गेला. या संघटनेनं अनेक उपद्व्याप केले
आहेत. अपहरणं केली आहेत. खून केले आहेत.
तर अशा ओम शिनरिक्योमधे डॉ. हयाशी पूर्णवेळ काम करत असे.
बुद्ध – शैव तत्वज्ञान, पतंजलीची योगसूत्र याचा अभ्यास त्यानं केला. त्यातून त्यानं
वैचारिक आणि शारिरीक एकाग्रता साधली. सेरिन या वायूचा अभ्यास आणि निर्मितीही त्यानंच
केली. केवळ अभ्यासक न रहाता त्यानं स्वतः कारवाईत भाग घेऊन सेरिन वायूचा वापर करून
माणसं मारली.
ओम शिनरिक्योमधे कोण माणसं जात?
एक होता हिदेतोशी टाकाहाशी. त्यानं जिऑलॉजीची पदवी  आणि खगोलशास्त्राची पदव्युत्तर पदवी घेतली होती.
विद्यार्थी असतानाच असाहाराचं भाषण ऐकून तो प्रभावित झाला आणि पंथात सामिल झाला. एकदा
त्यानं सन्यासही घेतला होता.
एक होती मियुकी कांडा. या मुलीला मुळातच अनासक्ती, अपरिग्रह
अशासारख्या गोष्टींचं आकर्षण होतं. ती हुशार होती, अभ्यासू होती. परंतू अभ्यास करून
उपयोग काय असं तिला वाटत होतं. शेवटी अभ्यास करायचा, नोकरी करायची, पैसे मिळवायचे असं
भौतिक जगायचं ना. त्याला काय अर्थ आहे असं तिला वाटायचं. ती ओम शिनरिक्योकडं आकर्षित
झाली.
एक होता मित्सुहारू इनाबा. त्यानं शिक्षणशास्त्रात पदवी घेतली
होती. शिक्षक होता. त्याचा पिंड अद्यात्मिक. धर्म हाच जगण्याचा आधार असतो असं त्याला
वाटत असे. त्यानं बौद्ध, हिंदू विचारांचा अभ्यास केला होता. ओम शिनरिक्योचा विचार त्याला
पटला. त्यानं सन्यास घेतला आणि ओम शिनरिक्योच्या कामात सहभागी झाला.
काही कारणानं निराश झालेली, जगण्यातला अर्थ डोक्यातून निसटलेली
अशी माणसं ओम शिनरिक्योकडं आकर्षित झाली होती.
जपान, जर्मनी, स्वीडन, अमेरिका इत्यादी सधन आणि सुखी समाजात
सुखी नसलेली काही माणसं असतात. त्यांच्या निराशेला सभोवतालची परिस्थिती की त्या व्यक्तींची
जेनेटिक ठेवण की मानसिक ठेवण कारणीभूत आहे हे ठरवणं कठीण आहे. ऐहिक जगाबद्दलची अनासक्ती
प्रगल्भ विचारांतूनही येऊ शकते. तुकारामालाही सभोवतालच्या ऐहिक जीवनात रस नव्हता.
 तुकारामानं आपला
विचार स्विकारा असा आग्रह धरला नाही. आपल्या विचारांपेक्षा वेगळ्या विचारांच्या माणसांना  मारून टाकायचा घाट तुकारामानं घातला नाही. प्रवचनं,
कीर्तनं करून त्यानं त्याचा विचार लोकांसमोर ठेवला. लोकांना क्लेष देण्याऐवजी स्वतःला
त्रास करून घेत तुकाराम आपले विचार लोकांपुढं मांडत राहिला.
विध्वंस कोणत्या विचारात बसतो? अमूक विचार, अमूक माणसं नष्ट
करा असं सांगणारा विचार हा मुळातच विचार असतो काय?
जबरदस्ती, अभिनिवेश, लादणं या गोष्टी धर्मात असतात?
तर असा हा ओम शिनरिक्यो आणि त्यातले निष्पाप लोकांना ठार
मारणारे लोक.
सेरिन वायूकांड झाल्यानंतर जपान सरकारनं हा पंथ दहशतवादी
आहे असं जाहीर केलं. हा पंथ समाजाला विघातक आहे असं जाहीर करून सरकारनं या पंथाची चौकशी
केली. शोको असाहारा आणि त्याचे सात सहकारी यांच्यावर खटला भरून त्यांना फासावर लटकावलं.
असाहाराच्या फाशीनंतर पंथात फूट झाली. अलेफ नावाची एक शाखा
असाहाराचे वारस चालवतात. पंथाचं एक मुख्यालय आहे. तिथं ६५० सदस्य रहातात. पंथाचे १६५०
सदस्य आहेत. पंथानं १७ जिल्ह्यात -प्रिफेक्चर्स- २६ संस्था चालवल्यात.
सरकारचं या संस्थांवर लक्ष आहे. त्यांची संपत्ती, कारवाया,
माणसं यांचे तपशील पोलिस सतत गोळा करत असतात, त्याना हालचाल करू देत नाही. या पंथाची
कार्यालयं जिथं जिथं आहेत तिथले स्थानिक लोक त्याना घालवायचा प्रयत्न करतात. तिथली
पालिका त्यांना घरं देत नाही, परवानग्या देत नाही. पंथाच्या संस्थांच्या बाहेर सतत
निदर्शनं होत असतात, पंथाच्या निषेधाचे बोर्ड कंपाऊंडवर लागलेले असतात.
ओम शिनरिक्योचं हे प्रकरणं हारुकी मुराकामी या लेखकानं बाहेर
काढलं. हारुकी मुराकामी हा जागतीक कीर्तीचा कादंबरीकार आहे. त्याची शैली, त्याची पात्रं
वाचली की अनेकांना मार्केझ या कादंबरीकाराची आठवण होते.
टोकियो भुयारी रेलवेत सेरिन हल्ला झाल्यावर हारुकी मुराकामी
अस्वस्थ झाला.  माध्यमं ज्या रीतीनं अशा घटनांकडं
त्याबद्दल मुराकामी अस्वस्थ झाला. माणसांचं मरणं हा माध्यमांच्या बातमीचा विषय असतो,
माणसांचं दुःख, माणसांना जगणं अशक्य करणाऱ्या व्यवस्था इत्यादींचा विचार करायला माध्यमं
तयार नसतात. जेवढी जास्त माणसं मरतात तेवढ्या वेगानं माध्यमं त्या घटनेकडं आकर्षित
होतात. चार दोन दिवस बातम्या दिल्या जातात, कव्हरेज होतं. मग नव्या घटनेकडं माध्यमं
सरकतात. आधीच्या घटनेत उध्वस्थ झालेल्या माणसांकडं माध्यमं पुन्हा वळत नाहीत. माणसं,
त्यांची दुःखं हा माध्यमांना केवळ एक बातमीचा विषय असतो.
मुराकामी अस्वस्थ झाला. त्यानं सेरिन घटनेत मरण पावलेल्यांच्या
घरच्यांच्या मुलाखती घेतल्या. घटनेनंतर मेल्यासारखं जगणाऱ्या लोकांच्या मुलाखती घेतल्या.
ओम शिनरिको सदस्यांच्या मुलाखती घेतल्या. साऱ्या प्रकरणाचा अभ्यास केला, माहिती गोळा
केली.  एकाद्या पत्रकारानं जे करायला हवं ते
केलं. अंडरग्राऊंड हे पुस्तक लिहिलं. मुलाखतींवर आधारलेलं पुस्तक. पुस्तकाचं नाव
underground, the tokyo gas attack and japanese psyche. पुस्तक वाचण्यासारखं आहे.
पत्रकारी कशी असते याचाही तो एक चांगला धडा आहे.
 ।।

4 thoughts on “ओम शिनरिक्यो या अधोरी पंथाची गोष्ट

  1. What made you write that O. S. is a mixture of Hinduism and Buddhism. Which facets you found similar? Just because founder (may be) is a Buddhist by birth, it uses OM , is it obvious that OM Shinriko is based on H-B isms? The secular who are so particular about not blaming Islam for actions of Muslims, have no issues with connecting H-B-J-S to unacceptable behaviour of members of these religions. I wonder why many Hindus are overenthusiastic about displaying secular credentials by blaming Hinduism.
    Will you connect slavery in USA by whites or Massacre of Jews by hitler to Christian values/culture?
    Let me put on record that i do not believe cast system, killing people over beef etc.

  2. शोको असाहारानं बुद्ध, हिंदू धर्मातलं काय घेतलं ते कळत नाही. आपल्यापेक्षा वेगळ्या विचार आणि आचाराच्या माणसांशी कसं वागायचं हा मुख्य प्रश्न आहे. इस्लाम मानतो की इस्लाम पलिकडं चांगला विचार असूच शकत नाही. इस्लामेतर विचार नष्ट करणं, त्यांना बलानं जिंकून घेणं यावर इस्लामी परंपरांचा भर आहे. हिंदू हा मुळात धर्मच नाही. अनेक विचार, पंथ, परंपरा यांनी सांगितलेल्या गोष्टींचा संग्रह म्हणजे हिंदू समाज आहे. त्यामुळं काय मानायचं आणि काय नाही ते ठरवणं कठीण आहे. महाभारत, रामायण, पुराणकथा इत्यादीतल्या व्यक्तींचे व्यवहार पाहून त्याचं अनुकरण करा असं हिदू माणूस म्हणतो. धर्माच्या संस्थापनेसाठी ईश्वर संभवतो असं म्हणतात. महाभारतात कौरवांचा अधर्म नष्ट करण्यासाठी कृष्णाचा अवतार झाला. आजच्या काळात अधर्म कोणता असं ठरवायचं म्हटलं की घोटाळे होतात. भारतीय राज्यघटना पाळणं ही धर्माची व्याख्या ठरू शकते. तो अधर्म झाला तर त्याचं परिमार्जन कसं करायचं हेही राज्यघटनेनं ठरवून दिलेलं आहे. त्यासाठी मागं वळून पहाण्याची आवश्यकता नाही. माणसाला आचार, विचार, उपासना आणि जगण्याचा हक्क आता मूलभूत मानला गेलेला आहे. इतरांना तो अधिकार असतो असं मानून इतरांचे अधिकार काढून न घेता या अधिकाराचं पालन करायचं असतं. तो अधिकार काढून घ्यायचा असेल तर त्यासाठीही कायद्यानं प्रोसीजर ठरवून दिलेलं आहे. हे सर्व मागं वळून न पहाता ठरवता येतं, त्यासाठी कोणत्याही धर्माचा, देवाचा, पुस्तकाचा आधार शोधण्याची आवश्यकता नाही. देव आणि धर्म या गोष्टी यात येत नाहीत, त्या माणसाच्या व्यक्तिगत गोष्टी ठरतात. इस्लाम आणि ख्रिस्ती हे धर्म आहेत. त्यांना पुस्तकं आहेत. त्यात इतरांचा धर्म आणि अधिकार या बाबत वेळोवेळी लिहिलेलं आहे. इस्लामी परंपरा इतरांना नष्ट करणारी किंवा त्यांना दुय्यम स्थान देणारी आहे. ख्रिस्ती धर्मात इतर धर्मियांसोबत जगण्याची तरतूद आहे आणि त्यांचं शांततेनं परिवर्तन करण्याची तरतूद आहे. तरीही ख्रिस्ती राजे आणि पोप यांनी कित्येक शतकं तलवारीच्या जोरावर इतर धर्मियांना आपल्या धर्मात तरी ओढलं किंवा मारून टाकलं. माझा मुद्दा अगदी सरळ आहे. कोणाही माणसाचं वागणं जर कायद्याच्या चौकटीत जबाबदार वागणं असेल तर त्याच्यावर कोणतीही दादागिरी होणं, त्याला मारणं, त्याला वाळीत टाकणं इत्यादी घटना अयोग्य आहेत, मग त्या कोणत्याही देवानं-धर्मानं-पंथानं सांगितलेल्या असोत. ओम शिनरिक्योच्या बाबतीत तोच विचार आहे.

  3. I personally do not know much about O.S. However, I feel the way they operate is always resembles to the Free Meson Community. Though each member believes in some or other religion or way of life, they have their own very personalized thought process, that literally does not care about rest of the society and neither disclosed to anyone unless a person becomes a member.

    In any case, one thing is very bright and highlighted that I am convinced, when law exists for a group or society or for a country – it must be followed. Being a social animal, there must not be any deviation.

  4. मला या टोकाला पोचलेल्या अघोरी पंथाची माहितीच नव्हती. आपण ती दिल्याबद्दल आभार. आपल्या अनुदिनीतील इतर लेख सवडीने वाचीन. पुन्हा आभार मानतो.
    मंगेश नाबर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *