इराणी स्त्रियांचा सरकारी अरेरावीला विरोध

इराणी स्त्रियांचा सरकारी अरेरावीला विरोध

इराणमधे स्त्रिया रस्त्यावर आल्या. त्यानी बुरखे काढून फेकले, बुरख्यांची होळी गेली. अनेक स्त्रियांनी केस कापले, कापलेले केस सरकारला अर्पण केले. 

तिथल्या सरकारला स्त्रियांचं हे वागणं पसंत नाही. तिथलं सरकार थियोक्रॅटिक आहे. इराण हे धर्मराष्ट्र आहे. तिथल्या इमामांना जो काही इस्लाम समजतो त्या इस्लामवर इराण चालतो. इस्लाम वगळता इतर धर्म इराणला मान्य नाहीत, समाज इस्लामी धर्मविचारानंच  चालला पाहिजे असं इराणी सरकारला वाटतं.  धर्माला सार्वजनिक जीवनात मर्यादित स्थान असावं असं मानणाऱ्या विचाराला इराणमधे थारा नाही.

इराणच्या इमामांना समजलेल्या इस्लामनुसार  स्त्रियांचे केस पुरुषांना दिसले तर पुरुषांची कामभावना जागृत होते. स्त्रिया बुरख्या शिवाय दिसल्या तरीही पुरुष चळतात. म्हणून बुरखा. म्हणून केस झाकायचे.

एकेकाळी इजिप्तमधे रोगाची साथ आली होती, खूप माणसं मेली होती. स्त्रियांनी बुरखा न घातल्यानं रोगराई पसरली असं त्या वेळच्या धर्मवाल्यांचं मत होतं.  समाजाची नीतीमत्ता राखणारी दलं चाबूक घेऊन रस्तोरस्ती स्त्रिया बुरखा घालतात की नाही ते पाहू लागले.

इराणमधला इस्लाम पुरुषांना त्यांच्या कामभावना आवरायला सांगत नाही. तुमची कामभावना भले जागृत होवो तिची पूर्ती करायची असेल तर स्त्रीची संमती हवी हे काही तिथल्या इस्लामला कळत नाही. अनेक इस्लामी माणसं स्त्रीवर बलात्कार करतात, स्त्रीला मनुष्य म्हणून वागवत नाहीत हे तिथल्या इस्लामला समजत नाही, स्त्रियांना छळणाऱ्या पुरुषांवर तिथले पोलिस वा सैनिक कारवाई करत नाहीत.

म्हणूनच स्त्रिया वैतागल्या. आमच्या देहाचं आम्ही पाहून घेऊ, तुम्ही त्या भानगडीत पडू नका. असं स्त्रिया म्हणताहेत.

भारतातल्या एका हिंदू माणसाची प्रतिक्रिया अशी. तिकडं इराणी स्त्रिया बुरखा फेकत आहेत आणि भारतातल्या मुस्लीम स्त्रिया शरीया लागू करा अशी मागणी करत आहेत, बुरख्याची मागणी करत आहेत.म्हणून भारतातल्या मुस्लीम मुलींना शाळेत बुरखा घालायला परवानगी नसावी असं त्या हिंदू माणसाचं म्हणणं.

बुरखा घाला अशी सक्ती करणं आणि बुरखा घालू नका अशी सक्ती करणं या दोन्ही गोष्टी सक्तीची दोन रुपं आहेत. स्त्रीला काय वाटतं याचा विचार न करता तिच्यावर सक्ती करणं असा मुद्दा यात गुंतलेला आहे. अफगाणिस्तानात स्त्रीला शिकायची परवानगी नाही, नोकरी करायला परवानगी नाही. सौदीमधे स्त्रीनं काम करायचं पण पुरुषांना सरळ सामोरं जावं लागेल अशी नोकरी करायची नाही असा नियम आहे.वैद्यकीय तपासणी करायची असेल तर पुरूष डॉक्टरनं स्त्रीला हात लावायचा नाही आणि स्त्री डॉक्टरनं पुरुषाला हात लावायचा नाही असा नियम सौदीत आहे.

या सर्वात स्त्री ही पुरुषांच्या वापराची वस्तू आहे अशी दृष्टी आणि परंपरा आहे. स्त्री हा माणूस आहे, पुरुषासारखाच माणूस आहे हे काही त्यांच्या लक्षात येत नाही. स्त्री ही वस्तू पुरुषांची कामभावना भागवण्यासाठी, पुरुषांना हवी असणारी मुलं देण्यासाठी, घर चालवण्यासाठी आहे असं या विचारांची माणसं मानतात. परिणामी स्त्रियांना खूप सोसावं लागतं.

प्रत्येक मुसलमान स्त्रीवर अत्याचार करतो असं अजिबात नाही. स्त्रीला योग्य मानानं वागवणारे पुरुष प्रत्येक इस्लामी समाजात होते आणि आहेत. पण मानवतेची वागणूक ऑप्शनल आहे, सक्तीची नाही. केस झाका, बुरखा घाला असं कोणत्याही कारणानं मानणं हीच मुळात चूक आहे, स्त्रियांना त्या बाबतचं स्वातंत्र्य द्यायला हवं. एकेकाळी केमाल पाशांनी बुरखा वापरणंच बेकायदेशीर ठरवलं आणि बुरखा वापरणाऱ्यांनाच तुरुगांत घालायला सुरवात केली. कालांतरानं या सक्तीलाही तुर्कस्तानात प्रतिक्रिया उमटली, तिथल्या स्त्रिया म्हणाल्या की कसे कपडे घालायचे किवा घालायचे नाहीत याचं स्वातंत्र्य आम्हाला द्या.

इंडोनेशिया हा जगातला सर्वात जास्त मुस्लीम लोकसंख्या असलेला देश आहे. तिथं स्त्रियांना स्वातंत्र्य आहे. खूप स्त्रिया डोक्यावरून एक रुमाल घेतात आणि तो गळ्याभोवती गुंडाळतात. केस न झाकणाऱ्याही स्त्रिया तिथं भरपूर आहेत. तिथं स्त्रिया बिनधास्त सगळी कामं करतात, शेतात आणि बांधकामाच्या ठिकाणी ट्रॅक्टरही चालवतात.

 ज्यू परंपरेत स्त्रीनं पायघोळ स्कर्ट किवा तत्सम कपडा वापरला पाहिजे आणि मनगटापर्यंत बाह्या असलेला कपडा वापरला पाहिजे असं सनातनी माणसं मानतात. एकेकाळी तशी जबरदस्तीही होती. पण काळाच्या ओघात ज्यू समाज बदलला, स्त्रीनं कोणते कपडे घालावेत यावर आता तिथं कोणी जबरदस्ती करत नाहीत. तिथं उन्हाळ्यात स्त्रिया सर्रास तंग अर्धी चड्डी आणि बनियनसारखे कपडे घालून फिरतात. इस्रायलमधे धर्माचं राज्य असायला पाहिजे असं मानणारे गट अजूनही आहेत. परंतू तिथली माणसं इस्रायलला धर्मराष्ट्र होऊ देत नाहीत. तिथं धर्माप्रमाणं वागायला परवानगी आहे सक्ती नाही.

एकूणच समाजात पूर्वापारपासून स्त्रीला वस्तू मानलं गेलंय. चूल आणि मूल हे तिचं कर्तव्य ठरवलं गेलं, पुरुष परंपरा सांगतील तसंच स्त्रीनं वागलं पाहिजे अशी परंपरा विकसित झाली. स्त्रीला तिनं काय करावं ते ठरवायचं स्वातंत्र्य नव्हतं. बाप, भाऊ, नवरा यांच्या हाती तिचं भवितव्य होतं. वैधव्य आलं तरी समाजातले पुरुषच तिचं काय करायचं ते ठरवत होते.

 काही धर्मात तसं उघडपणे सांगितलं गेलं. भारतात वेगळं आहे. स्त्रीला देवता मानणारं काव्यं, स्तोत्रं, साहित्य लिहिलं जातं. व्यवहारात तिला तसं वागवलं जातं याची खात्री नाही. बोलायचं एक आणि वागायचं दुसरंच ही हिंदू परंपरा आहे.

उदा. राजस्थानात व इतर ठिकाणी खाप पंचायत असते. तिथं कोणी मुलीनं जातीबाहेर प्रेमविवाह केला तर तिची वाट लागू शकते. तिला आणि तिच्या नवरा-प्रियकराला हुडकून काढून प्रसंगी ठार मारलं जाऊ शकतं. कर्नाटकात एकादी मुलगी पँट शर्ट घालून बारमधे गेली तर श्रीराम सेनेचे लोक तिथ जाऊन तिला बडवून काढू शकतात. कारण भगवे कपडे, टिळे आणि भस्म लावणारी माणसं सांगत फिरतात की स्त्रीनं शालीनतेनं वागावं, त्यांनी मर्यादा सोडली, उत्तान कपडे घातले तर त्यांच्यावर बलात्कार होणं स्वाभाविक आहे.

हे बरोबर नाही असं काळाच्या ओघात माणसाला कळत गेलं. समाजातले काही पुरुष समाजातल्या स्त्रीविषयक परंपरांकडं नव्यानं पाहू लागले, स्त्रीला समानतेनं वागवा असं म्हणू लागले.अर्थव्यवस्था व राज्यव्यवस्था यांच्या हिशोबात समाज जसजसा पुढं सरकला तसतसं स्त्रियाना अधिकार मिळत गेले, स्त्रीला मताधिकार मिळाला ही एक मोठी गोष्ट समाजात घडली.

परंतू या सुधारणा जगात सर्व समाजात सारख्याच पद्दतीनं झाल्या नाहीत. काही समाजात त्या आजही झालेल्या नाहीत. समाजाचं नियंत्रण धर्मानं केलं पाहिजे हा विचारही अनेक समाजांनी दूर सारला, त्यामुळं त्या समाजांत धर्मानं स्त्रीवर घातलेली बंधनं नाहिशी होत गेली.काही समाजांवर धर्माचा पगडा उरला, कालमानानुसार धर्मात होणारे बदल त्या समाजात झाले नाहीत. त्यामुळं स्त्रीवरची बंधनं त्या समाजात बऱ्याच प्रमाणात आजही आहेत. आखाती देश, अफगाणिस्तान ही त्यातली काही उदाहरणं. इराणही धर्माच्या हिशोबात अजून मागंच आहे.

इराणमधेही स्त्रीला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं म्हणणारे स्त्री पुरुष आहेत, ते चळवळी करत असतात. इराणमधे प्रचलीत असलेल्या शिया पंथाचं काळाच्या संदर्भात नव्यानं विश्लेषण करणाऱ्या खूप विचारवंत स्त्रिया इराणमधे सक्रीय आहेत. परंतू त्यांचा प्रभाव कमी पडतोय. राक्षसी धर्मसत्ता त्यांना चिरडते. आत्ताही महिना झाला, सरकार दडपशाही वाढवतच चाललंय.  स्त्रियांचं आंदोलन आणि समाजावर असलेला धर्माचा पगडा या दोन शक्तींत  येवढा फरक आहे की हे आंदोलन कधी चिरडलं जाऊन थंड पडेल ते सांगता येत नाही. 

इराणमधल्या स्त्रियांना पाठिंबा आणि मदत मिळायला हवी. परंतू दुसऱ्या देशात हस्तक्षेप करणं ही गोष्ट फार कठीण असते, तिला अनेक अर्थ चिकटत असतात. दुसऱ्या देशाच्या स्वातंत्र्यावर आणि सार्वभौमत्वावर गदा आणणं असाही हस्तक्षेपाचा अर्थ होऊ शकतो. युक्रेन या देशावर रशियानं केलेलं आक्रमण हे तशा हस्तक्षेपाचं उदाहरण आहे. तेव्हां इराणमधल्या स्त्रिया असोत वा अफगाणिस्तानातल्या, त्याना मदत देणं हे फार नाजूक आणि कठीण काम आहे. युरोपीय देश आणि अमेरिकेनं स्त्रियांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इराणवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्याचा कितपत परिणाम होईल आणि स्त्रियांना त्यातून कितपत मदत मिळेल ते सांगता येत नाही. परंतू स्त्रियांच्या बाजूनं कोणी तरी उभं रहाताय ही गोष्ट आनंदाची मानायला हवी.

।।

Comments are closed.