ऑस्करसाठी नोमॅडलँड. न दिसणारी अमेरिका.

ऑस्करसाठी नोमॅडलँड. न दिसणारी अमेरिका.

नोमॅडलँड.

कलाकार वास्तवापासून दूर राहू शकत नाही. वास्तव कितीही दाहक असो. कवी असो, कादंबरीकार असो,चित्रकार असो की चित्रपट करणारा. कोण काय म्हणेल याचा विचार न करता कलाकार वास्तव चितारतो.

वास्तव चितारण्याची पद्धत, व्यक्त होण्याची कलाकाराची पद्धत मात्र वेगळी असते.वास्तव थेट असतं पण त्यावर भाषणं वगैरे कलाकार झोडत नाही. रसिकानं कला अनुभवायची, त्याचा आस्वाद आपापल्या पद्धतीनं घ्यायचा. मांडण्याची मोकळीक कलाकाराला आणि पहाण्याची मोकळीक रसिकाला.

संदर्भ आहे नोमॅडलँड या चित्रपटाचा. जेसिका ब्रुडर यांच्या याच नावाच्या एका पुस्तकावर सिनेमा आधारलेला आहे.

फर्न ही मध्यम वयीन महिला बेघर झालीय. तिचा नवरा वारला, तिला काम नाही, तिला घर नाही. ती एक जुनी व्हॅन विकत घेते आणि तिच्यात नाना दुरुस्त्या आणि सोयी करून घेते. झालं तिचं चाकांवरचं घर. 

हे घर घेऊन ती गावोगाव हिंडते. कुठंतरी काम मिळतं. कामाच्या जागेपासून काही अंतरावर रिकाम्या जागेत ती आपलं घर पार्क करते, तिथून ती कामावर येजा करते. काम मिळेल त्या गावाला अमेरिकेत तिला कुठंही जावं लागतं. घर एकच, परिसर बदलतो.

ती जिथं जिथं जाते तिथं तिथं तिच्यासारखेच चाकावरच्या घरातले लोक असतात. तेही बेघर असतात. एक छोटा समाजगट काही काळ तयार होतो. सतत आकार बदलणारा गट. एक माणूस येतो,काही काळ रहातो, निघून जातो. मग आणखी कोणी तरी येतो.

क्षणभंगूर समाज.

२००८ साली झालेल्या सबप्राईम घोटाळ्याची पार्श्वभूमी या सिनेमाला आहे. अमेरिकेत लोकं कर्ज काढून घर घेतात. सगळं आयुष्य गहाण ठेवून घरं घेतात. परवडत नसलं तरी कर्ज मिळतं म्हणून घर घेतात. हे घरांचं वेड अमेरिकेतल्या वित्त संस्थांनी तयार केलंय. 

वित्तसंस्था घर गहाण ठेवून कर्ज देतात. नंतर हे गहाणखत तिसऱ्या संस्थेकडं गहाण ठेवतात आणि त्यातून पैसा काढतात. तिसरी संस्था चवथीकडं गहाणखत गहाण ठेवते आणि त्यावर पैसा उचलते. गहाणखतं गरगर फिरत रहातात, घर जागच्या जागी. कालांतरानं घराची बाजारातली किंमत कमी होते, घर जुनं होतं, त्याची देखभाल झालेली नसते.

इथं लोचा होतो. गहाण घर घ्या आणि मला पैसे द्या अशी मागणी होते. घर बाजारात विकलं तर शंभर रुपये मिळतील पण त्याची किमत कागदावर हजार रुपये लावलेली असते. पैशाची मागणी वित्तसंस्थेकडं आली आणि वित्तसंस्थेची तीन हात फाटली. कारण एक रुपयाच्या वस्तूसाठी शंभर रुपये द्यायची पाळी आली.

घरकर्ज यावर आधारेला वित्तव्यवहार आणि अर्थव्यवस्था दाणकन कोसळली. लक्षावधी मध्यम वर्गीय आणि तळातले लोक कंगाल झाले, बेघर झाले. सरकारनं वित्तसंस्थांना शिक्षा केली नाही उलट त्यांना आर्थिक मदत दिली. लक्षावधी नागरीक मात्र मातीत गेले.

तर बेघर झालेली ही माणसं नोमॅडलँडमधे दिसतात.

रंगाचे डबेबादल्या हे यांचे संडास. शहरापासून थोडं दुरवर यांचं मलमूत्र विसर्जन. जुने कपडे फाडून त्यातून तयार होणारे कपडे हे यांचे कपडे. बर्फ पडलं की ही माणसं थिजतात. जुन्या पान्या वस्तू एकत्र करून होळी करून त्या भोवती माणसं नाचतात, स्वतःला शेकतात. 

शेकोटीभोवती जमणारी माणसं परिस्थितीवर चर्चा करतात. बाजारवादी अर्थव्यवस्थेवर टीका करतात. 

कोणाकडं सिगरेट असते पण लायटर नसतो. कोणाकडं लायटर असतो पण सिगरेट संपलेली असते.

फर्न कॉफी करते आणि लोकांना वाटत फिरते.

एकदा बर्फ पडतं. एक सेवाभावी कार्यकर्ती येते आणि सांगते की पलिकडं चर्चमधे आसरा आहे. फर्न म्हणते की आपण आपल्या चारचाकी घरातच ठीक आहोत.

अशी ही माणसं. त्याही जगण्यात सौंदर्य शोधत असतात. नेवाडाचं वाळवंट, उत्तर पॅसिफिकचा उफाळता समुद्र हे सारं सारं फर्न आणि तिच्यासारखे भटके उपभोगत असतात. बाजार, नफा या पलिकडंही एक जग आहे आणि ते सुंदर आहे असं ही बेघर माणसं सांगतात.

काय गंमत पहा. ही बेघर माणसं आनंदात दिसतात. आणि पलिकडं  वस्तूंची आणि घरांची रेलचेल असलेली माणसं मात्र व्यसनाधीन होतात, खून करत फिरतात, दंगे करतात.

स्वँकी नावाची एक स्त्री अशीच फर्नच्या सहवासात येते. एकटी आहे. पण समाधानी आहे. आपण खूप जगलोय, आनंदात जगलोय, आपल्याला आता कशाचीही इच्छा उरलेली नाहीये असं म्हणत बाई आपल्या वस्तू इतरांना देऊन मोकळी होते.

फर्नवर बेघर होणं एका परीनं लादलं गेलंय. पण फर्न म्हणते की आपला तो स्वभावच आहे. घर नावाच्या गोष्टीत माणसानं बांधून घेणं निरर्थक आहे असं ती म्हणते. फर्नची बहीण छान सेटल झालेली आहे, तिला छान घर वगैरे आहे. फर्न तिच्याकडं जाऊन तिच्या घरात रहायला तयार नाही.

सिनेमा आपल्याला अनेक प्रश्न विचारतो, जीवनाचा अर्थ विचारतो. अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था यांच्यातला फोलपणा दाखवतो. 

गावाबाहेरचं माळावरचं जगणं दृश्यांतून दिसत रहातं. 

दिक्दर्शक क्लोई चाव हिची एक स्वतंत्र शैली दिसतेय. धुरकट, धुंद, अस्पष्ट अशी दृश्यं आहेत. एक दृश्य मिनीटभर लांबीचं आहे. त्यात फर्न चालत असते आणि कॅमेरा बाजूनं तिच्या मागून फिरतो. ती जे बघते ते कॅमेरा आपल्याला दाखवतो. दृश्यांना एक कधी संथ तर कधी जराशी जलद अशी गती आहे. 

चाओची ही तिसरी फिल्म. दी साँग्ज दॅट ब्रदर टॉट मी हा तिचा पहिला चित्रपट. त्यातही भणंग माणसं, भणंग वस्ती आहे. कॅलेंडवर दिसणारी एक चकचकीत अमेरिका आपण नेहमी अनुभवतो, कधीही न दिसणारी अमेरिका चाओ आपल्याला त्या चित्रपटात दाखवते.

अमेरिकेचा हिंसक चेहरा स्कॉरसेसे इत्यादी दिक्दर्शक दाखवतात. चाओ अमरिकेचा भणंग चेहरा दाखवते.

चाओचे आईवडील अमेरिकेत स्थलांतरीत झाले, चाओ मेसॅच्युसेट्समधे वाढली. तिनं अमेरिकेतलं विदारक वास्तव दाखवल्यामुळं चिनी मंडळी तिच्यावर खूष असत. भांडवलशाही अन्यायी अमेरिकन समाजातलं शोषण पहा ती कसं दाखवतेय असं चिनी पेपर तिच्याबद्दल लिहीत.

गेल्यावर्षी हाँगकाँगमधे लोकशाही आंदोलन झालं, उईगूरमधल्या मुसलमानांशी चीन सरकारचं अमानुष वागणं उघड झालं तेव्हां चाओ थेटपणे व्यक्त झाली. चीनमधे स्वातंत्र्य नाही अशी खंत तिनं व्यक्त केली. तिच्यातला कलाकार गप्प कसा बसणार.

झालं.

चिनी माध्यमं, सरकार तिच्यावर तुटून पडलं. नोमॅडलँड हा सिनेमा भले अमेरिकेची वस्त्रं वेशीवर टांगणारा असेल, तरीही तो सिनेमा चीनमधे दाखवला जाऊ नये असं पेपरात छापून आलं. म्हणजे नोमॅडलँड हा अमेरिकेला उघडं पाडणारा सिनेमा अमेरिकन अकॅडमी वाखाणणार आणि चीन सरकार मात्रं चाओच्या नावानं खडे फोडणार.

घरंदारं सोडून भणंग वगैरे जगा असं नोमॅडलँड सांगत नाही. १९६० च्या दशकात हिप्पी तरूण जग नाकारून, जगण्याची परिपाठी नाकारून रस्त्यावर उतरली होती. तसलं काहीही फर्न सांगत नाही, स्वँकी सांगत नाही, डेव सांगत नाही. 

कपडे कसेही आणि कितीही असतील, घरात एसी नसेल आणि हीटर नसेल, वस्तूंची रेलचेल नसेल, काहीही नसेल. नसू दे. तरीही आनंदात जगता येतं असं फर्न सांगते.

मूळ पुस्तक कादंबरी नाही, नॉन फिक्शन आहे. पण त्या नॉन फिक्शनचं रुपांतर कसं दृश्य फिक्शनमधे होऊ शकतं ते नोमॅडलँडमधे पहायला मिळतं.

।।

Nomadland.

Director- Chloé Zhao

Based on Nomadland: Surviving America in the Twenty-First Century
by Jessica Bruder

Actors -Frances McDormand, David Strathairn, Linda May, Swanki.

Comments are closed.