ऑस्कर २०२३. ब्लाँड. मेरिलिन मन्रो. भरपूर सेक्स, विचार करायला लावतो.

ऑस्कर २०२३. ब्लाँड. मेरिलिन मन्रो. भरपूर सेक्स, विचार करायला लावतो.

ऑस्कर २०२३. ब्लॉंड. 

यंदाच्या ऑस्करमधे अभिनयाचं नामांकन आहे. चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे.

मेरिलीन मन्रो या गाजलेल्या हॉलिवूड अभिनेत्रीची शोकांतिका.

मेरिलीन मन्रो ही हॉलीवूडमधली एक गाजलेली अभिनेत्री. तिचा अभिनय यथातथाच असे पण ती दिसत असे खास. मादक सौंदर्य. १९५०-६० च्या दशकात हॉलीवूडमधले सिनेमे भारतात फारसे पहायला मिळत नसत. तरीही मन्रो भारतात  लोकप्रीय होती. 

मन्रोचा जन्म १९२६ साली,१९६२ साली अती ड्रग सेवनानं  मृत्यू.   दहा बारा वर्षाचं फिल्मी लाईफ म्हणजे फार नव्हे. तरीही मन्रो गाजली,  तिच्या सेक्सी सिग्नेचर प्रतिमेनं अमेरिकेला वेड लावलं. रस्त्यावर उभी असताना बाजूनं गाडी गेली, गाडीच्या वाऱ्यानं तिचा स्कर्ट उडाला. उडालेला स्कर्ट सावरत तिनं दिलेला लुक, माणसाला खुणावणारा, फार लोकप्रीय झाला होता.  

मुळात ती नॉर्मा जीन. निर्मात्यानं तिला मेरिलिन मन्रो केलं.

नॉर्मा जीन चे वडील तिच्या लहानपणीच नाहिसे झाले होते. आई खूप दारू पीत असे, तिला नॉर्मा नकोशी होती, तिनं नॉर्माला बाथ टबमधे बुडवून मारायचा प्रयत्न केला. वडील नाही, आई मनोरोगी, नॉर्मा अनाथ. मॉडेलिंग करत चित्रपट व्यवसायात आली. तिथं अनेकांनी तिच्यावर बलात्कार केले, बदल्यात तिला चित्रपटात कामं दिली, प्रसिद्धी दिली.

 नॉर्मा एक स्त्री होती. तिला लग्न करायचं होतं, मुलं व्हायला हवी होती, कुटुंब वाढवायचं होतं.  

मेरिलीन मन्रो नटी होती, सेक्स सिंबल होती. चित्रपटात कामं मिळावीत, प्रसिद्धी मिळावी यासाठी तिला आपल्या शरीराचा उपयोग करून द्यावा लागला. आधी शरीर दे नंतरच काम, प्रसिद्धी, पैसा देतो असं माणसं म्हणत. एकाच वेळी दोन पुरुष. शरीराचा वापरही अनैसर्गिक रीतीनं. अमेरिकेच्या प्रेसिडेंटनंही तिला वापरून घेतलं. 

नॉर्मा आणि मेरिलिन यांच्यात मेळ बसेना. मादक द्रव्य आणि दारूचा आश्रय. त्यातच मेली.

मेरिलीन मन्रोचं चित्रपट जीवन प्रस्तुत चित्रपटात चितारलेलं आहे.

अलीकडं हॉलीवूड सिनेसृष्टीतल्या वळणांवर चित्रपट होत आहेत. दोन वर्षांपूर्वी वन्स अपॉन ए टाईम इन हॉलिवूड झाला, यंदाच्या वर्षी बॅबिलॉन झाला. तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन यात बदल झाल्यावर चित्रपट सृष्टी कशी वागली ते या सिनेमांतून दिसलं. ट्रंबो या फिल्ममधे एकेकाळी अमेरिकेत कम्युनिझमविरोधाचं वेड पसरलं असतांना चित्रपट सृष्टीत काय गोंधळ झाला त्याचं चित्रण झालं होतं. अमेरिकन चित्रपट सृष्टी स्त्रीशी कसं वागते त्याचं चित्रण मन्रो या चित्रपटात आहे. म्हटलं तर ते मेरिलीन मन्रोचं बायोपिक आहे, म्हटलं तर ती अमेरिकन चित्रपट जगताची समीक्षा आहे.

मेरिलीननं १५ फिल्म केल्या पण तिच्यावर  १६ फिल्मा झाल्या. ब्लॉंड या नावानं दोन फिल्म झाल्या, पहिली २००१ साली आणि दुसरी २०२२ सालची, म्हणजे आत्ताची. 

ब्लॉंड ही डॉक्युमेंटरी नाही. फीचर आहे, फिक्शन आहे. मुळ आहे जॉईस केरल ओट्स यांचं पुस्तक. त्यात लेखिकेनं स्वातंत्र्य घेतलंय, ते अस्सल चरित्र नाही. दिक्दर्शक अँड्र्यू डॉमिनिक यांनी आणखी स्वातंत्र्य घेतलं. त्यामुळं मन्रोच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घटना (उदा. गर्भपात) घडल्या की नाही यावर वाद आहेत. नाट्यमयता डोळ्यासमोर ठेवून दिक्दर्शकानं त्या वापरल्या आहेत.

मेरिलीनच्या लहानपणीचा काही भाग सोडला तर तिचं चित्रपट जीवन, तिचं सार्वजनिक जीवन अमेरिकेला चांगलंच माहीत आहे, पुस्तक-चित्रपट नवं काही सांगत नाही. माहित असलेलं जीवन दिक्दर्शकानं  प्रभावीपणे दाखवलंय. मेरिलीनबद्दल माहीत असलं तरी ती कशी असेल याची  काही एक उत्सुकता असते, त्यापायी आपण फिल्म पहातो, त्या उत्सुकतेला दिक्दर्शकानं न्याय दिलाय, शेवटपर्यंत चित्रपट पहात रहावा असं वाटतं. 

मधे मधे काहीसा आचरटपणा आहे. ती गरोदर झालीय हे दाखवण्यासाठी वळवळणारे शुक्रजंतू काय दाखवले जातात, गर्भाशयात असलेलं अर्भक काय दाखवलं जातं, चित्रपट  जन्मशास्त्राची डॉक्युमेंटरी होतो.

ॲना डे आर्मास या क्युबन अभिनेत्रीनं मेरिलीनची भूमिका केलीय. उत्तम केलीय. त्यासाठी तिला ऑस्करचं नामांकन मिळालंय. ॲना डे क्यूबन आहे. तिच्या बोलण्यात क्यूबन सूर आहे, तिच्या अमेरिकन संवादात मधे मधे क्यूबन सूर येतो; असं अमेरिकन लोक म्हणतात. ते खरंही असेल. अमेरिकन नसलेल्या प्रेक्षकाला चित्रपट पहाताना तसं जाणवत नाही, पडद्यावर दिसते ती मेरिलीन प्रेक्षकाला हेलावून टाकते,झपाटून टाकते.

 लाईट्स. कॅमेरे. प्रसिद्धी. गर्दी. पैसे. दारू. ड्रग. सेक्स. या चक्रात सापडलेली अमेरिका चित्रपटात दिसते. या चक्रात माणूस किती तरी गोष्टी गमावतो. तो परावलंबी होतो, पैशावलंबी होतो, त्याला स्वतःचं काही उरत नाही, स्वतःचं असं काही ठरवता येत नाही, स्वतःचं असं काही करता येत नाही. चित्रपटच नव्हे तर खेळ, साहित्य, विज्ञान, शिक्षण, राजकारण, सर्वच क्षेत्रात अमेरिकेत असं घडत असतं याची चुणूक चित्रपट सृष्टीचं निमित्त करून दिली जाते.

अनेक दिक्दर्शक आणि अभिनेते-अभिनेत्र्या वरील चक्रात सापडत नाहीत, विचारपूर्वक स्वतःचं आयुष्य जगतात, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात ऊच्च कोटीची कामगिरी करतात. अनेकांची नाव घेता येतील. उदा.  स्पिलबर्ग, टॉम हँक्स,जुडी डेंच.

चित्रपटाची सुरवात. भक्कन येणारा तीव्र प्रकाश झोत, मिट्ट काळोख, प्रकाश झोत, पाठीमागच्या तीव्र प्रकाशात दिसणारी मेरिलिन मन्रोची आऊटलाईन, चित्रीकरणाच्या वेळी वापरला जाणारा स्पॉटलाईट. पटापट हलणारी दृश्यं दाट काळा रंग आणि दाट पांढऱ्या रंगात. प्रचंड काँट्रास्ट. चित्रपटभर अशा प्रकाशयोजनेतली काळ्या पांढऱ्या रंगातली दृश्यं दिसतात. घरातली काही दृश्यंही काळ्या पांढऱ्या रंगात आहेत, खिडकीतून येणाऱ्या तीव्र प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर दिसणारी माणसं. चित्रीकरण काळ्या पांढऱ्या रंगात आणि डिजिटल पद्धतीनं केलेलं आहे.

रंगीत दृश्यं, काळी पांढरी दृश्यं अशी वीण केलीय.

दिक्दर्शकाचं म्हणणं की या रंगवेगळेपणात फार काही सांगितलं गेलंय असं नाही. परंतू १९५२-५५ च्या काळात पेपरात व इतर ठिकाणी छापलेले फोटो काळेपांढरे असत. त्यामुळं काळ्या पांढऱ्या रंगातली दृश्यं प्रेक्षकाला त्या काळात घेऊन जातात.

दिक्दर्शकानं  पडद्यावरच्या दृश्यांच्या मिती बदलल्या आहेत. दृश्य चौकानाच्या लांबी रुंदीत बदल केला आहे. असं करण्यातही फार काही सौंदर्यशास्त्रीय विचार दिक्दर्शकानं केलेला नाही. १९५०-६० च्या काळात छापलेले फोटो विविध आकाराचे असत. ते आकार चित्रपटाच्या फ्रेमसाठी निवडल्यानं प्रेक्षकाला आपण त्या काळात गेलो आहोत असं वाटावं असा काहीसा विचार दिक्दर्शकानं केलाय. जणू वर्तमानपत्रातल्या प्रसिद्धीतून आपण चित्रपट पहातोय. चित्रपटाचं छायाचित्रण  वेधक आणि छान आहे, चित्रपट देखणा आहे. 

मेरिलिन मन्रोचं दिसणं हा एकूण कथानकाचा केंद्रबिंदू.  

मेरिलीन मन्रो व्यसनी आहे असं चित्रपटात दिसतं. तिला व्यवसायात कां जावं लागतं तेही चित्रपटातून समजतं. प्रेक्षक नॉर्माशी आयडेंटिफाय होतात, तिच्याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कणव निर्माण होते. तिच्यावर होणारे बलात्कार पहाताना वाईट वाटतं, चीड येते. चित्रपट व्यवसायात रुळलेला स्त्रीविषयक घाण दृष्टीकोन लक्षात येतो. कित्येक दृश्यं शिसारी आणणारी आहेत. देशाचा प्रेसिडेंटही एका नटीवर अत्याचार करतो, तिच्याशी शिसारी आणणारा लिंगव्यवहार करतो हे पहाताना जाम वैताग येतो, नॉर्मा ते मेरिलीन हे जीवनांतर पहाताना क्लेष होतात.

  दिक्दर्शन, चित्रपट व्यवसायाची ही गंमत आहे. चळवणारी दृश्यं दाखवून प्रेक्षकांना आकर्षित करायचं आणि ती अशा तऱ्हेनं मांडायची की त्यातून काही एक संदेशही जातो.

।।

Comments are closed.