कमला हॅरिस यांचं पुस्तक

कमला हॅरिस यांचं पुस्तक

चेन्नईत, तामिळनाडूतल्या रस्त्यांच्या कडेला, कमला हॅरिस यांची स्थानिक चित्रकारांनी रंगवलेली चित्रं दिव्याच्या खांबाला लटकली आहेत. कित्येक चित्रं तर अशी की त्यावर नाव लिहिलंय म्हणून त्या कमला हॅरिस आहेत हे लक्षात येतं अन्यथा ते इतर कोणाही स्त्रीचं चित्र वाटलं असतं. तामिळनाडूतल्या बऱ्याच राजकीय व्यक्तींच्या चित्रांच्या बाबतीत ते खरं आहे. अम्मा असोत की बाबासाहेब.

व्यक्ती पदावर पोचली की ती मोठी होते.

कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार झाल्यावर जगाचं आणि अर्थातच भारताचं लक्ष त्यांच्याकडं गेलं. गेल्या वर्षी त्यांचं The Truth We Hold हे पुस्तक प्रसिद्ध झालं. ते पुस्तक त्यांनी त्या  अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार म्हणून, प्रचाराचा भाग म्हणून लिहिलं होतं. 

कोणतीही निवडणुक लढवायची म्हटली की उमेदवाराचा परिचय होणं आवश्यक असतं. अमेरिकेत माध्यमं सर्वेसर्वा झाल्यावर (पोलिस तेच, वकील तेच, न्यायाधीश तेच) उमेदवाराचं माध्यमांत  दिसणं महत्वाचं ठरू लागलं. पुस्तक लिहिणं, ते खपवणं, पुस्तकाचा स्वतंत्रपणे प्रचार आणि मार्केटिंग करणं या गोष्टी वाढल्या. निवडणुकीच्या प्रोसीजरमधे तो एक टप्पाच झाला आहे. त्यामुळं कमला हॅरिस यांनी पुस्तक लिहिणं समजण्यासारखं आहे.

दहा धड्यांच्या या पुस्तकात कमला हॅरिस यांनी पूर्वज,बालपण,  घडण, अटर्नी जनरल आणि सेनेटर म्हणून केलेली कामगिरी वाचायला मिळते.

आई भारतीय, पिता जमेकन. दोघांचा काडीमोड हॅरिस सात वर्षांच्या असतानाच झाला. हॅरिस आणि बहीण माया यांना शामला हॅरिस यांनी वाढवलं. हॅरिस यांचा रहाता परिसर आणि शैक्षणिक जीवन बहुतांशी काळे आणि लॅटिनो होतं, तिथंच त्या वाढल्या. पती डग एमहॉफ गोरे आहेत, ज्यू आहेत, त्यांना पहिल्या घटस्फोटित महिलेपासून  दोन मुली आहेत.ते आहे कमला हॅरिस यांचं सध्याचं कुटुंब. एमहाफच्या मुली कमलाना मॉमला म्हणतात.

हॅरीस व्यवसायानं वकील. वकिली करताना त्यांनी स्त्रिया, काळे यांना न्याय दिला. मेक्सिकोतून स्थलांतरीताना अमेरिकेत  प्रवेश देताना अडथळे आणले जात असत, त्यांना मुलांपासून वेगळं केलं जात असे. हॅरिस यांनी कायद्यातल्या तरतुदी वापरून त्यांना न्याय दिला. अमेरिकन न्याय व्यवस्था काळ्यांवर अन्याय करते, तो दोष दूर करण्यासाठी हॅरिस लढल्या. २००७ च्या सबप्राईम घोटाळ्यात कॅलिफोर्नियातल्या हज्जारो नागरिकांना बेघर केलं जात होतं. हॅरीसनी त्यांना संरक्षण देणारा कायदा करवून घेतला, बँका फक्त २ ते ४ हजार अब्ज डॉलरची भरपाई द्यायला तयार असताना भांडून ती भरपाई हॅरिस यांनी २० अब्ज डॉलर केली. नागरीक केवळ काळे किवा लॅटिनो नव्हते तर गोरेही होते.

थोडक्यात पुस्तक असं सांगतं की हॅरिस काळ्यांसाठी तर लढल्याच परंतू वर्णनिरपेक्ष रीतीनं एकूण अमेरिकन समाजाच्या हितासाठी लढल्या.

सरकारी वकील या नात्यानं तुरुंगांना भेट देताना त्यांना कळलं की ८२ टक्के कैदी ड्रॉप आऊट म्हणजे शाळा पूर्ण करू न शकणारे होते. हॅरीस यांनी मुलांनी शाळेत गेले पाहिजे असा प्रयत्न केला. 

किरकोळ गुन्ह्यासाठी पोलिस माणसाला पकडतात,तुरुंगात ढकलतात, तुरुंगात गेल्याचा शिक्का बसला की माणसाला बाहेर नोकरी मिळत नाही आणि माणूस शेवटी पुन्हा गुन्ह्याच्या दुष्टचक्रात सापडतो. हे दुष्टचक्र भेदण्यासाठी गुन्हेगारांना विधायक कामं देऊन, शिक्षण देऊन तुरुंगाबाहेर काढलं, त्यांच्या रेकॉर्डमधे ते तुरुंगात गेले नव्हते अशी नोंद करून त्यांचं पुनर्वसन हॅरीसनी केलं. न्याय यंत्रणा सुधारणं आणि गुन्हेगारीची कारणं मुळातूनच दूर करणं असा प्रयत्न हॅरिस यांनी केला.

 ड्रग गुन्हे कायद्याची अमलबजावणी करतांना त्यांनी ड्रग गुन्ह्यांना मदत करणाऱ्यांना मदत केली; काळ्यांना अनेक वेळा तुरुंगात ढकललं; सेक्स वर्कर्स संघटनांना त्रास दिला असे आरोप त्यांच्यावर आहेत. मारीयुआना सेवन काही अटीवर कायद्यात मान्य करा अशीही भूमिका त्यांनी घेतली होती. अर्थात हेही खरं आहे की काळाच्या ओघात त्यांनी आपल्या भूमिका बदलल्या. 

हॅरिस यांचा जन्मच अमेरिकेत झाला असल्यानं पुस्तकातल्या व्यक्तीगत आठवणी अाणि अनुभव अमेरिकेतले आहेत. कोर्टात, सबप्राईम घोटाळ्यातल्या अन्यायग्रस्तांसाठी लढताना भेटलेल्या काही व्यक्ती आणि घटना हॅरिस यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकतात.

कमला हॅरिस राजकीय – सामाजिक कार्यकर्त्या आहेत, वकील आहेत. त्या विचारवंत, लेखक, कायदेतज्ञ नाहीत. त्या जे काही आहेत त्या या पुस्तकातून दिसतात.

कमला हॅरिस यांनी Super Heroes Are Everywhere, Smart on Crime ही पुस्तकं लिहिलेली आहेत.

हॅरिस यांचं पुस्तक वाचतांना अगदी स्वाभाविकपणे बराक ओबामा यांच्या पुस्तकांची आठवण येते. निवडणुकीत उतरण्यापूर्वी ओबामा यांनी  Dreams From My Father, The Audacity of Hope ही दोन  पुस्तकं लिहीली. ओबामा हा माणूस गंभीर विचार करणारा, अभ्यासू, संशोधक या वर्गातला आहे. कोणतंही काम ते व्यावसायीक शिस्तीनं करतात. वरील पुस्तकं लिहितांना त्यांनी इतर सर्व कामं दूर ठेवून जवळपास पूर्ण वेळ पुस्तकांसाठी दिला होता. 

पुस्तक लिहितांना त्यांचा  निवडणुकीत उतरायचा विचार होता, त्यांना राजकारणात उतरायचं होतं. पत्नी मिशेल यांनी विचारलं, तुम्ही त्या बाबतीत गंभीर आहात काय? ओबामा हो म्हणाले. पत्नीनं विचारलं, निवडणुकीसाठी लागणारे पैसे कुठून आणणार. ओबामा म्हणाले, पुस्तक खपेल त्यातून पैसे उभे रहातील. पत्नी मिशेल हसल्या. म्हणाल्या, पुस्तकातून कुठं निवडणुकीसाठी पुरतील येवढे पैसे उभे रहातात काय. ओबामा म्हणाले, पहाच.

ओबामांची दोन्ही पुस्तकं कित्येक आठवडे बेस्ट सेलरच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होती. दोन्ही पुस्तकांच्या विक्रीतून, ऑडियो पुस्तक वा अन्य उपयोगाच्या स्वामित्व हक्कातून ओबामा यांना तीस चाळीस लाख डॉलर सहज मिळाले असतील.

ओबामांच्या पुस्तकात अमेरिकन समाज, विषमता, धर्म, संस्कृती, इत्यादी विषयावर गंभीर चिंतन आहे. ओबामांच्या पुस्तकाला एक ओघवती शैली आहे, एक डौल आहे.

राजकारणात विचारवंत व्यक्ती कमी असतात. सहजपणे राधाकृष्णन, वाक्लाव हावेल अशी नावं पटकन आठवतात. ओबामा त्या पैकी एक. ओबामांची राजकीय कारकीर्द तशी गाजली नाही कारण राजकारण करताना आवश्यक व्यवहार करण्याचा त्यांचा पिंड नव्हता. अमेरिकेतील विषमता त्यांना कमी करता आली नाही, काळ्यांना न्याय देता आला नाही, अमेरिकन राजकारणावरचा पैशाचा प्रभाव त्याना कमी करता आला नाही, ओबामा केअर ही काहीशी सदोष पण चांगली आरोग्य विमा योजनाही त्यांना यशस्वी करता आली नाही. अमेरिकन राजकारणावरचा धनिकांच्या आणि धंदेवाईक राजकारणी लोकांच्या  प्रभावासमोर ओबामा हा विचारवंत माणूस कमी पडला. कोणतीही कामगिरी पार पाडलेली नसतांना शांततेचं नोबेल त्यांनी घेतलं हा त्यांचा मोठ्ठा पराभव होता. एका परीनं ती एक राजकारणातली अटळ शोकांतिकाच होती.

कमला हॅरिस या ओबामांच्या वर्गवारीतल्या नाहीत. व्यावहारीक आणि वास्तवीक राजकीय उद्दीष्ट पार पाडण्यासाठी कराव्या लागणाऱ्या हालचालींशी त्यांचा परिचय आहे. त्यामुळं उपराष्ट्रपती झाल्यानंतर त्या पुढं राष्ट्रपती होण्याकडं यशस्वी वाटचाल करू शकतील, राजकारणात त्या यशस्वीही होऊ शकतील.

पुस्तकाच्या हद्दीपर्यंत बोलायचं तर पुस्तक आणि त्यांचे स्वतंत्रपणे जगाला आलेले अनुभव यातून  कमला हॅरिस  एक राजकारणी व्यक्तिमत्व पुरेसं स्पष्ट होतं.

एका गोष्टीची मौज वाटते. सुमारे ४०० पानांच्या पुस्तकात ३०० पेक्षा कमी पानं मजकूर आहे. बाकीची पानं म्हणजे फोटो आणि लांबलचक संदर्भ व सूची आहे. अलीकडं पुस्तक जाडजूड करण्याकडं लेखकांचा कल दिसतो. संदर्भांची पाच पन्नास पानांची यादी दिली जाते. त्यातली किती पुस्तकं खरोखर लेखकांनी वाचलेली असतात ते कळत नाही. आपण किती वाचन आणि संशोधन केलं असं दाखवण्याची ही खटपट तर नव्हे ना? 

लेखकाला काय वाटतं, त्याचे विचार काय आहेत हे महत्वाचं असतं. पाच पन्नास विचारवंतांनी पाच पन्नास पुस्तकांतून काय सांगीतलंय ते सांगून लेखक काय साधतात? विचार करणारा माणूस स्वतंत्रपणे इतरांचं वाचून निर्णय घेऊ शकतो हे लेखकांच्या कां लक्षात येत नाही? 

पानं वाढली की किमत वाढते. किमत वाढली की सर्वांचाच फायदा होतो. वाचकाला आपल्याकडं फालतू चार दोन आण्याचं पुस्तक नसून हज्जार रुपयाचं जाडजूड पुस्तक आहे याचं समाधान वाटतं असं आहे की काय? कपाटात जाड पुस्तक छान दिसतात असं काही फर्नीचरी समाधान वाचकांना मिळतं काय? 

एके काळी शेसव्वाशे पानांची सुटसुटीत पुस्तकं निघायची.  दर्जेदार लेखकांची.

आता जमाना बदललेला दिसतोय.

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *