‘ कोविड ‘ वर दोन डॉक्युमेंटऱ्या

‘ कोविड ‘ वर दोन डॉक्युमेंटऱ्या

कोरोना हा येवढा मोठा आणि गुंतागुंतीचा विषय आहे की त्यावर डॉक्युमेंटरी किंवा फिल्म करण्याचा मोह कोणालाही होईल. पण चित्रीकरणात अडचणी फार आहेत. चित्रीकरण करणारी माणसं संघटीत करणं फार कष्टाचं आणि जोखमीचं आहे. पण घटना घडत असताना त्या चित्रीत होणंही तितकंच महत्वाचं असतं. या पेचातून वाट काढून दोन डॉक्यूमेंटऱ्या पडद्यावर आल्यात. 

 टोटली अंडर कंट्रोल ही अमेरिकन डॉक्युमेंटरी डोनल्ड ट्रंप यांनी कोविड साथ कशा प्रकारे हाताळली ते दाखवते.

३ जानेवारी २०२० राजी  डॉ. रॉबर्ट रेडफील्ड यांना कोविडचा प्रसार झालाय  हे माहित होतं. डॉ. रेडफील्ड अमेरिकेच्या साथ नियंत्रण केंद्रात संचालक होते. ती साथ महाभयानक आहे हे रेडफील्डनी प्रेसिडेंट डोनल्ड ट्रंप यांना सांगितलं. 

 ट्रंप यांचा विज्ञानावर विश्वास नाही. विषाणू शास्त्रज्ञांच्या ज्ञानावर त्यांचा विश्वास नाही. जगातल्या सर्व म्हणजे सर्व विषयात आपण तज्ञ आहोत अशी त्यांची ठाम खात्री आहे. त्यामुळं विषाणूबाधा रोखणं, त्यावरचे उपाय इत्यादी बाबत त्यांनी लक्ष दिलं नाही.

परिणामी दोन लाख माणसं मेली. 

दिक्दर्शक अॅलेक्स जिबनी आणि त्यांचे दोन सहकारी एप्रिल २०२० पासून व्हाईट हाऊसमधल्या घटना, बैठका, चर्चा, पत्रकार परिषदांचं चित्रीकरण करत होते. डॉक्युमेंटरी करणारी माणसं विषयावर लक्ष ठेवून असतात, विषय जसजसा विकसीत होत जातो तसतसं त्यांचं चित्रीकरण वाढत जातं. जिबनी यांनी तेच केलं. प्रेसिडेंट ट्रंप, साथ नियंत्रण विभाग, व्हाईट हाऊसमधले कर्मचारी यांना वेळोवेळी भेटून त्यांनी त्यांची वक्तव्यं चित्रीत केली.

काही वेळा गुप्तरीत्याही चित्रीकरण केलं. अलीकडं खिशातून डोकावणारे, टोपीवर लावता येणारे कॅमेरे वेगानं चित्रीकरण करतात. सेलफोनमधले कॅमेरे आता अतीशय उत्तम रीत्या कमी प्रकाशातही चित्रीकरण करतात. आपण फोनवर टेक्स्ट पहातोय किंवा टेक्स्ट करतोय असं नाटक करत करत चित्रीकरण करता येतं.  

काही वेळा व्यावसायिक रीतीनं कॅमेरे, दिवे, छत्र्या इत्यादी वापरूनही मुलाखती चित्रीत केल्या.

एप्रिलमधे त्यांनी चित्रीकरण सुरु केलं तेव्हां पुढं काय होईल याची कल्पना कोणालाच नव्हती. हळूहळू गांभिर्य लक्षात येऊ लागलं. बाहेर माणसं मरू लागली. डॉक्टर्स आणि नर्सेस मरु लागल्या. धंदे बंद पडले. जसजशा या घटना घडू लागल्या तसतसं चित्रीकरण आकार आणि वेग घेत राहिलं. 

सप्टेंबर महिन्यात साथ गंभीर झाली आणि ट्रंप यांचा अडाणीपणा व अहंमन्यता टोकाला गेली तेव्हां डॉक्युमेंटरीला टोक आलं. पटापट संकलन करून विषय ताजा असतानाच दिग्दर्शकांनी डॉक्युमेंटरी सादर केली. 

ट्रंप असोत की विविध संस्थांचे प्रमुख, भविष्यात या चित्रीकरणातून एकादी डॉक्युमेंटरी उभी राहील याची कल्पना त्यांना आली नसावी. चित्रीकरण करणारा माणूस त्यांना कोविडविषयक प्रश्न विचारत असे आणि ते उत्तरं देत असत. 

कोविडनं हाहाकार माजवला असताना एका पत्रकार परिषदेत ट्रंप म्हणाले की  इट ईज टोटली अंडर कंट्रोल. तेच वाक्यं दिग्दर्शकांनी डॉक्युमेंटरीच्या शीर्षकासाठी निवडलं. 

एक मॅक्स केनेडी नावाचा माणूस होता. तो व्हाईट हाऊसमधे गेला, मदत करावी या सदिच्छेनं. तो तज्ञ नव्हता, त्याला या विषयाचं ज्ञान नव्हतं. तरीही ट्रंप यांचे जावई, म्हणजे प्रती ट्रंप, यांनी त्याला साथ नियंत्रण गटात महत्वाची जागा देऊन टाकली. कोणालाही विचारलं नाही, रेडफील्ड किवा डॉ. फॉची यांनाही विचारलं नाही. 

 साथ पसरली, उपकरणं कमी पडू लागली. कुशनरनी ट्रंप यांच्या पंटर मित्रांच्या कंपन्यांना उपकरणं आयात करणं, विकत घेणं, पुरवणं इत्यादीची कंत्राटं दिली. या कंपन्यांनाही या कामाचा अनुभव नव्हता. 

अमेरिकेची कशी वाट लागली आणि कोरियानं कोविड साथ कशी आटोक्यात ठेवली या दोन गोष्टी या डॉक्युमेंटरीत दाखवण्यात आल्या आहेत.

जिबनी डॉक्युमेंटरी करत असतात. रशिया आणि ट्रंप यांनी २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीत काय घोटाळे केले हे त्यांनी एजंट्स ऑफ केओस या डॉक्युमेंटरीत दाखवलं होतं.  सायंटॉलॉजी नावाचं थोतांड अमेरिकेत बोकाळलं होतं. त्या विषयावर जिबनी यांनी चर्च ऑफ सायंटॉलॉजी ही डॉक्युमेंटरी केली.

जिबनी यांच्या डॉक्युेंटऱ्या थेट असतात, घणाघाती असतात. परंतू टोटली अंडर कंट्रोल मात्र त्यांनी  सांभाळून केली आहे. वस्तुतः ट्रंप यांची वर्तणुक क्रूर या सदरात मोडणारी आहे. त्यांचं वागणं हुकूमशहाचं आहे, एकाधिकारशाहीचं आहे, त्यांची सत्ता कुटुंबसत्ता आहे. पण त्यावर ताशेरे झाडायचं दिक्दर्शकांनी टाळलं आहे. 

त्यामुळंच डॉक्युमेंटरी धारदार झाली आहे.

अमेरिकेत प्रेसिडेंटांवर डॉक्युमेंटऱ्या होतात, सिनेमे निघतात. त्यामधे प्रेसिडेंटांच्या चिंध्या केल्या जातात. तिथं एकाद्या चित्रपटात केनेडी यांच्या खुनात निक्सन यांचा होता असं पात्रं बोलतात. निक्सन, बुश हे प्रेसिडेंट त्यांच्यावर टीका करणाऱ्या कलाकारांवर ते कम्युनिष्ट आहेत, देशद्रोही आहेत असा आरोप करत. तरीही  चित्रपट, डॉक्युमेंटऱ्या होणं थांबत नाही. लोकं राजकीय चित्रपट-डॉक्युमेटऱ्या पहातात, त्यांची चर्चा करतात, त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी करत नाहीत किंवा निदर्शनं करून दाखवणं बंद पाडत नाहीत.

या उलट चीन.

आय वेयवे या दिक्दर्शकाची कोरोनेशन ही डॉक्युमेंटरी सध्या गाजत आहे, पण ती चीनमधे दाखवली जात नाही, तिच्यावर चीनमधे बंदी आहे. 

वुहानमधे कोविड कसा पसरला आणि सरकारनं तो कसा आटोक्यात आणला हा कोरोनेशनचा विषय आहे. वेयवेच्या  डॉक्युमेंटऱ्या चित्रपटासारख्या असतात. त्यात अनेक कथानकं, उपकथानकं असतात. पात्रं असतात. सरकारनं धसमुसळेपणानं आणि अरेरावीनं वागवलेले कामगार कोरोनेशनमधे आहेत. वुहानमधे अडकून पडलेल्या माणसांचा हाल कोरोनेशनमधे दाखवले आहेत. केवळ काही दिवसांतच मोठ्ठं हॉस्पिटल उभारतांना तिथल्या रहिवाशाना कसं हुसकावलं याचंही चित्रीकरण कोरोनेशनमधे आहे. ४० हजार वैद्यकीय कर्मी कसे बाहेरून आणले खरे पण त्यांचेही कसे हाल झाले ते कोरोनेशनमधे आहे. त्याच बरोबर  इन्फर्मेशन तंत्रज्ञान वापरून रोगी कसे शोधण्यात आले, त्यांना कसे उपचार देण्यात आले, घरात अडकवलेल्या लोकांना सर्व जीवनावश्यक वस्तू आणि औषधं कशा रीतीनं कार्यक्षमरीतीनं पोचवण्यात आली याचंही चित्रीकरण कोरोनेशनमधे आहे.

चित्रण वेधक आहे, धक्कादायक आहे, अनेक ठिकाणी प्रक्षोभकही आहे. एक उत्तम चित्रपट पहातोय असं प्रेक्षकाला वाटतं.  

 आय वेयवे हा राजकीय डॉक्युमेंटरीकार आहे. त्याचा कम्युनिष्ट राजवटीला विरोध आहे, तो लोकशाही स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आहे. डॉक्युमेंटरी करताना एक राजकीय भाष्य हा विषय त्याच्या डोक्यात असतो. म्हणूनच त्याली देश सोडून परागंदा व्हावं लागलं. तो युरोपात असतो. तिथून त्यानं नागरीक व हौशी सिनेमॅटोग्राफरना संघटित केलं. कुठं जा, कशी दृश्यं टिपा इत्यादी सूचना त्यांनी दिल्या आणि त्यांच्याकडून झालेलं चित्रीकरण मिळवून, ते संकलीत करून त्यानं डॉक्युमेंटरी केली.

टोटली अंडर कंट्रोल ही डॉक्युमेंटरी कोविडवर नाही, ती ट्रंप या माणसावर आहे. पण ती थेट नाही, सूचक आहे.

कोरोनेशन ही डॉक्यूमेंटरीही चीन आणि चीनमधली कम्युनिष्ट राजवटीवर आहे, थेट आहे. 

फीचरपटामधे विषय साहित्यासारखा मांडलेला असतो, तो थेट असेलच असं नाही. डॉक्युमेंटरी हा मामला तसा थेट असतो.

कसंही असलं तरी शेवटी डॉक्युमेंटरी हा एक चित्रपट असतो. चित्रपट म्हणून त्याच्या काही अंगभूत आवश्यकता असतात. मुख्य म्हणजे तो चित्रपट असायला हवा, दृश्यांतून गोष्ट कळायला हवी.

वरील दोन्ही डॉक्युमेंटऱ्या प्रभावी आहेत.

सहज आठवण होते ती चेर्नोबिल या दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या डॉक्युड्रामाची.  

मुळात विषय होता डॉक्यमेंटरीचा, म्हणजे माहितीपटाचा. चेर्नोबिलची दुर्घटना एका दिवसात घडलेली नव्हती,  ती घटना कणाकणानं अनेक वर्षं घडत गेली होती. प्रत्यक्ष स्फोट हा परमोत्कर्षाचा बिंदू होता, पण त्या बिंदूपर्यंत पोचवणाऱ्या घटनाही थरारक होत्या. चेर्नोबिल हा एका फीचरपटाचा ऐवज होता. नव्हे तो ऐवज येवढा मोठा होता की त्यावर मालिकाच आवश्यक होती.

चेर्नोबिलच्या निर्मात्यानं प्रती चेर्नोबिल उभं केलं, त्यात गुंतलेली पात्रं उभी केली. रीतसर एक पटकथा तयार करून, नटांची योजना करून चेर्नोबिल ही मालिका उभी केली. १९८६ साली घडलेल्या घटनेवर २०१९ साली एक मालिका तयार झाली. 

दुसऱ्या महायुद्धात डॉक्टरकी करणाऱ्या एका डॉक्टरची सत्य कहाणी चॅरिटे या डॉक्यूफिल्ममधे, मालिकेत  मांडण्यात आली आहे. सत्य घटनेला फीचर फिल्मचं रूप देण्यात आलं आहे.

कोविडवरही काही काळानं चांगल्या फिल्म आणि डॉक्युमेंटऱ्या नक्की येतील.

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *