तुकारामाचे अभंग तरले याचा अर्थ…..

तुकारामाचे अभंग तरले याचा अर्थ…..

दोन वेळा बेचिराख झालेलं ग्रंथालय.

जर्मनीतला नाझी काळ हा जर्मनीतला सर्वात भयानक काळ मानता येईल. हिटलर सांगेल ते खरं असं जर्मन माणसानी मानलं. शुद्ध आर्य जर्मन रक्त, ज्यू अशुद्ध आणि वाईट, डावे आणि समलिंगी जर्मनद्रोही, माणसावर प्रयोग करून एक नवीन मानवी वंश जन्माला घालता येतो, अशुद्ध लोकांना मारून टाकायचं इत्याजदी अवैज्ञानिक, क्रूर, अमानुष हिटलरी कल्पना जर्मन लोकांनी मान्य केल्या. हिटलर सांगेल तेच ज्ञान असं जर्मन जनतेनं ठरवलं आणि इतर सारं ज्ञान जर्मनविरोधी असं ठरवून विद्यापीठं, पुस्तकं नाझींनी नष्ट करायचा विडाच उचलला होता.

एक प्रातिनिधीक उदाहरण.

१० मे १९३३. बर्लिन शहरातला एक मुख्य चौक. चौकाच्या परिघावर ऑपेरा हाऊस, कॉलेज, संशोधन संस्था.

रात्रीची वेळ. हिटलरचा जयजयकार करत हज्जारो तरूण गोळा झाले. त्यांनी नाझीविचारापेक्षा वेगळा विचार असणारी आणि नाझी नसलेल्या लेखकांची पुस्तकं चौकात रचली. विचारवंतांची चित्रं आणि पुतळे त्या ढिगावर ठेवले. विज्ञान, कला, तत्वज्ञान, धार्मिक इत्यादी सर्व शाखांची पुस्तकं या ढिगात होती.

हिटलरचा जयजयकार करत ढिगाला मशाल लावण्यात आली. लोकांनी हिटलर सलाम केले.

गोबेल्सनं भाषणात सांगितलं – भविष्यातला जर्मन माणूस पुस्तकं शिकेला नसेल, तो चारित्र्यवान असेल. चारित्र्य हेच तुमचं शिक्षण असेल, पुस्तकं हे नव्हे. 

नवल नाही की संधी मिळाल्यावर जर्मनीनं ग्रंथालयं जाळली.

नेदरलँडमधलं Louvain ग्रंथालय नाझीनी दोन वेळा जाळलं.

 या विद्यापीठात एक प्रतिष्ठित ग्रंथालय आहे. आज तिथं लक्षावधी पुस्तकं आहेत, हज्जारो हस्तलिखितं आहेत, हज्जारो जुने नकाशे आहेत, चित्रं आहेत. लुवेननं नेदरलँडचा इतिहास जपलायल, युरोपचा इतिहास जपलाय, युरोपचं आणि जगातलं ज्ञान या ग्रंथालयानं जपलंय आणि पुढं वाढवलं जातंय.

१४२५ साली स्थापन झालेल्या या ग्रंथालयाचं वैशिष्ट्यं म्हणजे हे ग्रंथालय किमान दोन वेळा नष्ट झालं होतं. पूर्णपणे जमीनदोस्त झालं होतं, त्यातली पुस्तकं जळून खाक झाली होती.

पहिला विध्वंस १९१४ साली घडला. जर्मन सैनिकांनी ग्रंथालयाची इमारत पुस्तकांसह जाळली.

पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं. जर्मनीनं फ्रान्सवर हल्ला करायचं ठरवलं होतं. बेल्जियमच्या वाटेनं फ्रान्समधे जावं लागत होत. बेल्जियम तटस्थ देश होता. त्यामुळं त्या देशातून जाताना त्या देशाशी भांडायचं काहीच कारण नव्हतं. तरीही जर्मन सैनिक दंगामस्ती करत लुवेन या गावात शिरले.

जर्मनांचं म्हणणं असं की लुवेनमधे त्यांच्यावर गोळीबार झाला. बेल्जियन सरकारचं म्हणणं असं की त्यांनी लोकांकडली शस्त्रं आधीच काढून घेतली असल्यानं गोळीबार हा कल्पित गोष्ट आहे. त्या वेळचे पेपर सांगतात की जर्मन सैनिकांच्या दोन तुकड्यांमधेच अपघातानं गोळीबार झाला. शक्यता आहे की जर्मनीला मस्ती करायचीच होती, त्यांनी एक तर ही सबब शोधून काढली असेल.

१४२५ सालचं ग्रंथलाय नष्ट झालं.

जग हळहळलं. 

मँचेस्टर विद्यापीठातल्या ग्रंथलायनं पुढाकार घेतला. जगभर एक मोहिम केली.एकीकडं जर्मनीचा निषेध केला आणि दुसरीकडं नवं ग्रंथालय सुरु करायची खटपट सुरु केली. आपल्या जवळचे २०० ग्रंथ मँचेस्टरनं लुवेनला दिले. मँचेस्टरनं सुरु केलेल्या खटपटीला न्यू झीलंडमधल्या ग्रंथालयांनी प्रतिसाद दिला. बोटींच्या अनेक खेपा करून न्यू झीलंडनं ५५,७८२ ग्रंथ लुवेनला पाठवले. रॉकफेलरनी १ लाख डॉलरची देणगी दिली. १९२१ साली नव्या इमारतीचं काम सुरु झालं.१९२५ साली ग्रंथालय उभं राहिलं.

दुसरा विध्वंस १६ मे १९४० रोजी झाला. पुन्हा जर्मन सैन्यानंच हा उद्योग केला. ग्रंथालय जाळून टाकलं. या वेळी जर्मन म्हणाले की हा उद्योग इंग्रजांनी केलाय आणि आमच्या नावावर खपवत आहेत. जर्मन आणि इंग्रजांतला फरक जगाला कळत होता. खोटेपणा आणि भ्रम यावर आधारलेला नाझी जर्मनी किती खोटारडा आहे हे जगानं अनुभवलं असल्यानं लोकांनी जर्मनांच्या पुडीवर विश्वास ठेवला नाही.

जगभर जर्मनीचा निषेध झाला.

गंमत पहा. १९०७ साली नेदरलँडमधे,हेगमधे एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. युद्धाच्या काळात,वेढा घालताना, बाँबवर्षाव करत असतांना, धार्मिक स्थळं, म्युझियम, कलादालनं, ग्रंथालय इत्यादी गोष्टी वगळाव्यात, त्या जपाव्यात असं हेगमधे झालेल्या कराराच्या २७ व्या कलमात नोंदण्यात आलं. या करारावर जर्मनीनं सही केली होती. कसा योगायोग आहे पहा. ज्या नेदरलँडमधे जर्मनीनं करार मान्य केल्या त्याच नेदरलँडमधलं ग्रंथालय जर्मनीनं दोनदा नष्ट केलं.

पण एकूणातच या ग्रंथालयाच्या नियतीत गोची असावी.

नेदरलँड काही काळ फ्रेंच साम्याज्याचा भाग झाल होतं. पोपनी साम्राज्यांची मोडतोड केली तेव्हां नेदरलँड फ्रेंच झालं. ते फ्रेंच साम्राज्याचा भाग असतानाच फ्रेंच राज्यक्रांती झाली. क्रांतीकारकांनी शिक्षण क्षेत्राची पुनर्रचना करायची ठरवली. सगळी विद्यापीठं आणि कॉलेजं बंद केली गेली. विद्यापीठांना धनिकांनी देणग्या दिल्या होत्या त्या देणग्याही क्रांतीकारक सरकारनं हिसकून घेतल्या. याचा फटका लुवेन ग्रंथलायला बसला. १७९० मधे लुवेनल विद्यापीठ बंद पडलं. १७९७ मधे लुवेन ग्रंथालयातली ८०० दुर्मीळ पुस्तकं, जुनी ग्रीक आणि हिब्रू पुस्तकं, व अनेक सचित्र पुस्तकं फ्रान्समधे नेण्यात आली. क्रांती ओससरल्यानंतर १८१६ मधे ग्रंथालय पुन्हा सुरु झालं पण फ्रान्सनं पळवलेली पुस्तकं काही परत मिळाली नाहीत.

१८३० मधे एक छोटंसं संकट ग्रंथलायावर आलं. बेल्जियममधे यादवी युद्ध झालं. उत्तर आणि दक्षिण बेल्जियम असे दोन विभाग बेल्जियममधे होते, दोघांची संस्कृती आणि भाषा वेगळी होती. प्रशिया आणि रशियानं हे दोन्ही विभाग एकत्र करून बेल्जियम नावाचा देश जबरदस्तीनं जन्माला घातला होता पण दोघांची एकत्र नांदायची इच्छा नव्हती.मारामारी झाली. त्यामुळं लुवेन विद्यापीठ आणि ग्रंथालय बंद होतं. १८३५ मधे ते पुन्हा सुरु झालं.

इतकी संकटं झेलून आजही टिकलेलं कदाचित हे एकमेव ग्रंथालय असावं.

सहजपणे फाडता यावेत अशा कागदांचा गठ्ठा म्हणजे पुस्तक.  ते पुस्तक हुकूमशहा, अडाणी यांच्यावर मात करून टिकून रहातं.

तुकारामांचे अभंग पाण्यावर तरले या कथेचा अर्थ लुवेन ग्रंथालयामुळं समजतो

।।

Comments are closed.