दी इकॉनॉमिस्टचा १७५वा वाढदिवस

दी इकॉनॉमिस्टचा १७५वा वाढदिवस

दी इकॉनॉमिस्ट या सुरवातीला लंडनहून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिकानं १७५ वर्षं पूर्ण केली. पावणेदोनशे वर्षाच्या काळात सारं जग अनेक स्थित्यंतरांतून गेलं. बहुतेक सगळी स्थित्यंतरं इकॉनॉमिस्टनं नोंदली, अभ्यासली. इकॉनॉमिस्टचे मालक संपादक विल्सन हे खटपट्ये, समाजात बदल घडवू पहाणारे सक्रीय कार्यकर्ते होते. कार्यकर्ता, विचारवंत आणि पत्रकार असं मिश्रण त्यांच्या व्यक्तिमत्वात होतं. अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, ब्रीटननं घडवलेली औद्योगीक क्रांती या घटनांनी सारं जग बदलून टाकलं. जगभरात नवनवे विचार आणि विचारधारा या प्रसंगांतून जन्माला आला. या घालमेलीत लिबरलिझमचा विचार विल्सन यांनी घडवला. अॅडम स्मिथ, जेएस मिल आणि कार्ल मार्क्स अशी माणसं समाज घुसळत होती. विल्सन त्या विचारांचा अभ्यास करत होते, चळवळ करत होते, सरकारात मंत्रीपद सांभाळत होते आणि पेपरही चालवत होते. त्यामुळंच दी इकॉनॉमिस्ट हा विचारांचा पेपर झाला, लिबरलिझम जगासमोर मांडणारा पेपर झाला.
१७५ वर्षंपूर्ण होत असताना इकॉनॉमिस्टनं आपल्या कारकीर्दीचा, जगाचा आढावा घेतला आणि भविष्यात जग कसं असायला हवं, त्यासाठी लिबरल विचारांनी कोणती वळणं घ्यायला हवीत ते एका प्रदीर्घ निबंधात मांडलं . १५ सप्टेंबर २०१८ च्या अंकात तो निबंध प्रसिद्ध झालाय.
लिबरल विचार म्हणजे काय?अर्थार्जन कसं करावं आणि कसं जगावं हे ठरवण्याचा अनिर्बंध अधिकार असावा, सरकारनं त्या भानगडीत पडू नये. सत्ता कुठंही एकवटता कामा नये, सत्तेवर लोकांचं नियंत्रण असलं पाहिजे. समाजात विविध विचार प्रवाह असतात, मतं असतात. ही मतं परस्परांना छेद देणारी असतात. त्यांची मुक्त घुसळण झाली की समाजात विचारांचा आणि धोरणाचा एक तोल तयार होत असतो. घुसळण करण्याची पद्धत म्हणजे लोकशाही. म्हणून लोकशाही असावी.माणसाचं व्यक्तिस्वातंत्र्य, माणसाला माणूस म्हणून किमत व माणसाचा माणूस म्हणून आदर या मुल्यांच्या आधारे घुसळण व्हावी. हाच लिबरल विचार, उदारमती विचार.
समाज हे एक निरंतर अस्थिर रसायन असतं. तंत्रज्ञान, उत्पादन पद्धती व उत्पादनं सतत नव्यानं येत असतात आणि ती समाजात बदल घडवत असतात, त्यातून सतत नवी स्थिती निर्माण होत असते. उदारमती विचार प्रत्येक नव्या स्थितीचा नव्यानं विचार करून सुखी समाजाची आखणी करत असतो. त्यामुळंच उदारमती विचार प्रत्येक काळात बदलत गेला, प्रत्येक समाजाच्या स्थितीनुसार तो वेगवेगळी रुपं धारण करत गेला.
इकॉनॉमिस्टची सुरवात मक्यावर सरकारनं लादलेल्या आयात जकातीला विरोध करून झाली. बाहेरच्या देशातून ब्रीटनमधे येणाऱ्या मक्यावर कर लादून देशी मक्याला संरक्षण देणं असा जकातीचा उद्देश होता. या जकातीमुळं ब्रिटीश शेतकऱ्याला संरक्षण मिळत होतं. पण अशा संरक्षणामुळं शेती आणि शेतकरी पंगू होतो आणि ग्राहकाचंही नुकसान होत असतं असं विल्सन यांनी मांडलं.
सरकार कर बसवतं, त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून लोकांना मोफत किंवा सवलतीत शिक्षण देतं हेही विल्सन यांना मान्य नव्हतं. शिक्षण व्यवस्था स्वतंत्रपणे उभी राहिली पाहिजे, सरकारचं ते कामच नाही असं इकॉनॉमिस्टचं मत होतं. अगदी सुरवातीच्या काळात फक्त कर भरणाऱ्यांनाच मताचा अधिकार असावा असंही इकॉनॉमिस्टचं मत होतं. ब्रीटनमधे दुष्काळ झाला तेव्हां दुष्काळग्रस्तांना सरकारनं मदत करावी यालाही विल्सन यांचा विरोध होता. चर्च ही संस्था स्वतंत्र असावी, सरकारनं चर्चला अनुदान, मदत देऊ नये असं इकनॉमिस्टचं मत होतं.
परंतू जसजसा काळ बदलत गेला तसतसं इकॉनॉमिस्टचं धोरण बदलत गेलं. दुष्काळात, कठीण परिस्थितीत सरकारनं जनतेला मदत केली पाहिजे हे इकॉनॉमिस्टनं मान्य केलं. प्रत्येक व्यक्तीला मत हे तत्व मान्य केलं. स्त्रियांना मताधिकार मिळाला पाहिजे हे मान्य केलं. विचारपूर्वक कां होईना, बाजारात फार हस्तक्षेप न करता कां होईना, कर बसवायला इकॉनॉमिस्टनं मान्यता दिली. मुक्त अर्थव्यवस्थेच्या तत्वाला विरोध करणारी कल्याणकारी अर्थव्यवस्था इकॉनॉमिस्टनं मान्य केली. थोडक्यात सांगायचं तर उदारमती हे तत्व इकॉनॉमिस्ट सतत नव्यानं तपासत राहिलं, त्या तत्वाला सतत नवं रूप देत गेलं. १८४३ साली जे जे सांगितलं गेलं ते ते ब्रह्मवाक्य असं न मानता इकॉनॉमिस्ट काळाबरोबर बदलत गेला. सनातनी ख्रिस्ती मतांचा पुरस्कार करणारा इकॉनॉमिस्ट आता समलिंगी, लिंगपरिवर्तन झालेल्या व्यक्ती, यांचे अधिकार मान्य करतो, त्यांचा हिरीरीनं पुरस्कार करतो.
पावणेदोनशे वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं लिहिलेल्या निबंधात इकॉनॉमिस्ट उदारमती विचारांनी आता नवं वळण घेतलं पाहिजे असं मांडतो.
आज पर्यावरण आणि कायम स्थलांतर हे जटील प्रश्न निर्माण झालेत. जगाचं उत्पन्न वाढत असताना, वस्तू व प्रक्रियांचं उत्पादन पूर्वी कधीही नव्हतं इतकं झालेलं असताना जगभरात बहुसंख्य माणसं सुखी नाहीत. विषमता वाढलीय. पर्यावरण, स्थलांतर, दुःख-हताशा हे प्रश्न हाताळणं आजच्या प्रस्थापित समाजव्यवस्था आणि राज्यव्यवस्था यांना जमत नाहीये.
माणसं म्हणतायत की लोकशाही नको, हुकूमशाही बरी. माणसं म्हणतात की कायदा आणि नियम यावर आधारलेल्या व्यवस्थेपेक्षा धर्म-संस्कृती-परंपरा या वाटा बऱ्या. लोकं म्हणत आहेत की साऱ्या जगानं एकत्र येऊन अडचणी सोडवणं हे काही खरं नाही, प्रत्येक देशानं आपापलं सुख पहावं, जग गेलं खड्ड्यात, इतर देश गेले खड्ड्यात. माणसं कर भरायला तयार नाहीयेत. आपल्याच देशातल्या गरीब वा भिन्न सांस्कृतीक गटातल्या लोकांसाठी आपण काहीही करू नये, त्यांचं त्यांनी पहावं, नाही तर मरावं असं लोकं वाढत्या संख्येनं म्हणत आहेत. देशांतर्गत किंवा एकूण जगाचे प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगी ठरतील अशी आर्थिक धोरणंही सध्या समाजाच्या हाती नाहीयेत. चीनसारखी एकहाती व्यवस्थाही अपुरी पडतेय आणि युरोप-अमेरिकेसारखी कल्याणकारी लोकशाही व्यवस्थाही अपुरी पडतेय.
इकॉनॉमिस्टचं म्हणणं आहे की एकविसाव्या शतकामधले प्रश्न हे उदारमती विचारासमोरचं आव्हान आहे. डोनल्ड ट्रंप आणि सी जिन पिंग ही समाजाला पुढं नेणारी माणसं नाहीत तर समाजाला पुढं नेण्याला विरोध करणाऱ्या जनमानसाचे प्रतिनिधी आहेत. दर पाच दहा वर्षानं नवे अध्यक्ष येतीलही परंतू वरील प्रवाह बदलणार नाहीत, ते प्रवास बदलण्यासाठी विशेष खटपट उदारमती लोकांना करावी लागेल, आपले विचार तपासून नव्यानं आकारावे लागतील असं इकॉनॉमिस्टचं सांगणं आहे.
शिकलेली माणसं अधिक जगतात, अधिक चांगलं जगतात; कमी शिकलेली माणसं कमी जगतात, अधिक मानसिक ताणाचं जीवन जगतात; असं अनेक पहाण्या सांगत आहेत. सिंगापुरात विद्यापीठीय, शालेय शिक्षणापेक्षा निरंतर शिक्षणावर भर दिला जातोय. विद्यापीठात पैसे गुंतवण्यापेक्षा माणसाला अगदी मरेपर्यंत सतत नवनवी कसबं आणि जगण्याची कला शिकवणाऱ्या शिक्षणाला प्रोत्साहन दिलं जातंय. इकॉनॉमिस्टनं त्याकडं लक्ष वेधलय.
पेन्शन देण्याच्या भानगडीत सरकारनं पडू नये. वयस्क माणसांच्या बदलत्या गरजा पेन्शनमुळं भागत नाहीत. सरकारला ते महागात पडतं आणि त्यातून लोकांचं कल्याणही होत नाही. पेन्शनची तरतूद करण्याच्या नादात जास्तीत जास्त कर गोळा करणं आणि व्यवस्थापन या भानगडीत सरकारचं कंबरडं मोडतं. आरोग्य आणि मानसीक स्वस्थता या गरजा व्यक्तिगत गरजानुसार भागवण्याची व्यवस्था ज्याची त्याला करू द्या अशी तरतूद करावी लागेल. यालाच जोडून प्रत्येक नागरिकाला काही एक बेसिक उत्पन्नाची सोय सरकारनं करून द्यावी असा विचार बळ धरत आहे. पोटापाण्याची व्यवस्था झाल्यानं माणसं आपल्या गरजांनुसार अधिक कामं करून आपल्या जीवनाचा तोल सांभाळू शकतील असा विचार यात गुंतलेला आहे. कमी उत्पन्न असणाऱ्यांवर कर लादू नयेत असाही विचार होतो आहे.
इकॉनॉमिस्ट हे वृत्तपत्र, पेपर, आहे. विचार मांडणं, विचारांची घुसळण घडवणं हे पेपरांचं काम असतं. लोकशाहीची आजची रचना, त्यातला पक्ष हा घटक, आता निरुपयोगी ठरतोय, घातक ठरतोय असं इकॉनॉमिस्ट मांडतो. ट्रंप आणि सी जिन पिंग यांच्या वर्तणुकीवर इकॉनॉमिस्ट टीका करतो आणि इमॅन्युअल मॅक्रॉन हे तरूण फ्रेंच अध्यक्ष पक्ष गुंडाळून स्वतंत्र लोकमत तयार करतात, संघटित करतात याचं कौतुक करतो.
आपल्या १५० व्या वाढदिवसाच्या निमित्तानं इकॉनॉमिस्टचा इतिहास इकॉनॉमिस्टनं प्रसिद्ध केला. एडवर्ड्स यांनी तो लिहिला होता. (The Economist- 1843-1993. Pursuit of Reason. Ruth Dudley Edwards ) त्या जाडजूड पुस्तकात इकॉनॉमिस्टने घेतलेली वळणं आहेत. इकॉनॉमिस्ट कधी कधी कसा चुकत गेला त्याचीही नोंद आहे. लोकमानस आणि सरकार यांचा रोष पत्करूनही इकॉनॉमिस्टनं लिबरल धोरणांचा पुरस्कार कसा केला याचीही नोंद त्या पुस्तकात आहे. ते पुस्तक वाचण्यासारखं आहे, पण एका दमात नाही. शांतपणे, दम खात खात, कॉफी किंवा मद्याचे घुटके घेत घेत. पावणेदोनशे वर्षांचा धांडोळा घेणारा निबंध संग्रही बाळगण्यासारखा असला तरी एका झटक्यात वाचून होतो, कारण थरारक आणि माहितीनं गच्च भरलेला आहे.
।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *