पुस्तकं/आजच्या पिढीला कळेल असं शेक्सपियरचं नाटक. विंटर्स टेल.

पुस्तकं/आजच्या पिढीला कळेल असं शेक्सपियरचं नाटक. विंटर्स टेल.

फोल्जर्स या प्रकाशन संस्थेनं शेक्सपियरचं विंटर्स टेल या नाटकाची सटीक संहिता नव्यानं प्रसिद्ध केलीय.

शेक्सपियर इंग्रज होता. कवी होता, नाटककार होता. १५८९ ते १६१३ या काळात त्याची बहुतांश नाटकं रंगमंचावर आली.त्याची एकूण नाटकं ३८. जगात अशी एकही भाषा नाही जिच्यात शेक्सपियरचं भाषांतर झालेलं नाही. शेक्सपियरचं एक तरी नाटक आपण मंचावर आणलं पाहिजे असं प्रत्येक दिक्दर्शकाला वाटतं. शेक्सपियरच्या एका तरी नाटकात आपण भूमिका करावी असं प्रत्येक नटाला वाटतं. शेक्सपियरच्या नाटकांवरून, त्यातल्या कथानकांवरून जगातल्या मास्टर दिक्दर्शकांनी सिनेमे केलेत.

आताशा काय झालंय की माणसं कमी वाचू लागलीत, मंचावरची नाटकं कमी पाहू लागलीत, अभिजात कथानकांवरचे अभिजात ठरावेत असे कमी सिनेमे पाहू लागलीत. बदलत्या काळाचा फटका शेक्सपियरला बसलाय. शेक्सपियरलाच नव्हे तर एकूणच साहित्य, नाट्य यांना बसलाय.

भारतात, इंग्लंडमधे, अमेरिकेत, शाळा कॉलेजेसनी शेक्सपियर शिकवणं बंद केलंय. तसा ट्रेंड आहे.

या भानगडीत माणसं स्वतःचंच नुकसान करून घेत आहेत. सकसाची चव ते विसरत आहेत, भरडावर ते पोटं भरत आहेत.

हा प्रवाह उलटवला पाहिजे असं काही लोकांना वाटतं. शेक्सपियर पुन्हा मंचावर, पुस्तकालयात, वाचनालयात आला पाहिजे असं काही लोकांना वाटतं. 

अमेरिकेत एक फोल्जर्स पुस्तकालय आहे. त्यात शेक्सपियरची नाटकं, कविता इत्यादी गोष्टी जतन केल्या आहेत.शेक्सपियरवर झालेलं संशोधन, त्याच्यावर झालेला विचार याही गोष्टी या पुस्तकालयानं जतन केल्या आहेत. वॉशिंग्टनमधे (अमेरिकेत वॉशिंग्टन हे एक राज्य आहे आणि कोलंबिया राज्यात वॉशिंग्टन नावाचं एक गाव आहे, त्यातल्या कोलंबियातल्या वॉशिंग्टनमधे, हे वॉशिंग्टन अमेरिकेची राजधानीही आहे) हे पुस्तकालय आहे.

या पुस्तकालयाला जोडून एक नाटकघरही फोल्जर्सनी बांधलय. त्यात शेक्सपियरची नाटकं सादर केली जातात. शेक्सपियर नवनव्या फॉर्ममधे तिथं सादर होतात. शेक्सपियरचं विंटर्स टेल हे नाटक या नाटकघरात नुकतंच सादर करण्यात आलं. नाटक जुनंच, संहिता जुनीच, पात्रांचे पोषाख मात्र आजचे, म्हणजे पँट,शर्ट,टाय, हॅट,जॅकेट इत्यादी. 

हे नाटकघर दोन वर्षं बंद होतं, कारण त्याचं रूप पालटायचं होतं. नऊ कोटी डॉलर खर्च करून ते नाटकघर नवं झालंय, त्यात विंटर्स टेल सादर करण्यात आलं.

फोल्जर्सनं विटर्स टेल या १५९२ साली छापील रुपात प्रकाशित झालेल्या नाटकाची नवी आवृत्ती काढलीय.

या आवृत्तीत आधुनिक माणसाला शेक्सपियर समजेल असा प्रयत्न करण्यात आलाय. पुस्तकात प्रत्येक पानावर टिपणं आहेत. नाटकातले शब्द, नाटकातली वाक्यं समजावणारा मजकूर पानोपानी आहे. या आवृत्तीचं संपादन अनेकांनी केलं आहे.  हे संपादक शेक्सपियरचा काळ, शेक्सपियरचं जीवन, शेक्सपियरची भाषा, नाटकाचं सादरीकरण या मुद्द्यांचे संशोधक आहेत.

संपादकाकडं मजकूर गेल्यावर संपादक कागदावरच्या मजकुराचं जे काही करतो ते पहाण्यासारखं असतं. अमूक शब्दाचा अर्थ कळत नाही, तमूक वाक्य पुरेसं स्पष्ट होत नाही, अमूक ठिकाणी अधिक माहिती हवी, तमूक ठिकाणी अधिक स्पष्टीकरण हवं अशा नाना टिपण्या संपादक त्या कागदावर करतो, पेन्सिलीनं आणि लाल शाईनं रेषा काढून शब्द-वाक्यांकडं लक्ष वेधतो, त्यांना इकडून तिकडं फिरवतो. उत्तम संपादकानं हाताळलेली पानं देखणी असतात.

फोल्जर्सचं विंटर्स टेल किंवा इतर पुस्तकं पहात असतांना संपादनाच्या खुणा जागोजागी दिसतात.

हा उद्योग फोल्जर्सनं कां केलाय?

वाचकाला शेक्सपियर वाचायला त्रास होतो. कारण लिहिलेलं नाटक आणि वाचक यात चारशेपेक्षा अधिक वर्षांचं अंतर आहे. शेक्सपियरनं वापरलेले अनेक शब्द आता वापरात नाहीत. अनेक शब्दांचे अर्थ पूर्णपणे बदललेले आहेत. काही शब्द शेक्सपियरच्याही काळात अप्रचलित होते, शेक्सपियरला काही विशेष परिणाम साधण्यासाठी काही नवे शब्द तयार करावे लागले. ते शब्द समजले नाहीत तर नाटकाचा आस्वाद घेता येत नाही.

शेक्सपियरची वाक्यांची रचनाही एक तर त्याच्या काळातली होती आणि दुसरं म्हणजे शेक्सपियरनी ती स्वतःच्या सोयीसाठी बदलली होती. कर्ता, कर्म, क्रियापद अशा ओळीत वाचनाची सवय असलेल्या वाचकाला शेक्सपियरचे शब्द कायच्या काय पुढं मागं झालेले दिसतात, त्यातून अर्थबोध होत नाही.

शेक्सपियरचं वाक्य ही एक गाडी आहे असं समजा. त्यात शब्द हे डबे आहेत असं समजा. गाडीला इंजिन असतं, ते पुढं असतं असं आपल्याला माहित असतं. गार्डचा डबा शेवटी असतो. घाईगर्दीत आपण स्टेशनात गेलो की इंजिनापासूनचं किंवा गार्डापासूनचं डब्याचं अंतर आपण विचारात घेतो. शेक्सपियरच्या गाडीचं इंजिन सुरवातीलाच असेल याची खात्री नाही. इंजिन कुठंही असू शकतं. फोक्सवॅगन या जर्मन कारचं इंजिन मागं असतं आणि सामानाची डिकी पुढं असते.

काही विशेष परिणाम साधण्यासाठी शेक्सपियर शब्दांची फिरवाफिरव करतो. नाटक पहाताना त्यानं फिरवाफिरव कां केली ते समजतं. कारण शेक्सपिटरनं नाटकं वाचण्यासाठी नव्हे, मंचावर सादर करण्यासाठी लिहिली होती. वाक्यातल्या प्रत्येक शब्दाचं वजन शेक्सपियर ठरवत असे आणि त्यानुसार शब्द योजत असे.

दुसरं असं की शेक्सपियर कवीही होता. गद्य, पत्रकारी, प्रवचन, कथा इत्यादी मजकुरांमधे शब्दांची निवड आणि जोडणी सामान्यतः आस्वादकाला पटकन गोष्टी समजाव्यात यासाठी असते. कवितेला ते नियम लागत नाहीत. कित्येक वेळा प्रत्येक शब्द हाच अनेक वाक्यांचा ऐवज असतो. कवितेत दोन शब्दांमधलं अंतर कधी कधी शेकडो मैलाचंही असू शकतं, किंवा ते अंतर इतकं असतं की ते मोजता येत नाही, आस्वादकाच्या  कल्पनाशक्तीनुसार ते अंतर वाढत जातं. शेक्सपियरचं कवीपण त्याच्या नाटकात असल्यानं शब्द आणि रचनेचे अर्थ कळणं काहीसं कठीण असतं.

शिवाय मधे खूप काळ गेला आहे.

त्यामुळं चारशे वर्षांचं अंतर कमी करून शेक्सपियर समजून घ्यावा लागतो. तो प्रयत्न या पुस्तकांत आहे.

पुस्तकामधे एक छान सूचना आहे.

नाटक आपण पहातो, ऐकतो. संहितेत असलेला शब्द नट वाकवतो. प्रत्येक नट नाटकाचा अर्थ समजून घेतो आणि नंतर त्यानुसार शब्द उच्चारतो. नाटक काळजीपूर्वक पाहिलं, ऐकलं तरच समजतं.

पुस्तक सांगतं की शेक्सपियरचं नाटक शांतपणे वाचा.पुन्हा पुन्हा वाचा. सोबत शब्दकोष किंवा ज्ञानकोष ठेवलात तर आणखीनच उत्तम. नट जशी शब्द आणि वाक्यं समजून घेण्याची खटपट करतो, तसंच वाचकानं करावं.

त्या प्रयत्नाना पुस्तक मदत करतं.

फोल्जर्स शेक्सपियर जतन करतंय, शेक्सपियर काळानुकूल करतंय.

 Henry Clay Folger हे गृहस्थ मेसॅच्युसेट्समधल्या ॲमहर्स्ट कॉलेजमधे (स्थापना १८२१) शिकत असत. कॉलेजमधे असतानाच त्यांना शेक्सपियरचा नाद लागला. ते शेक्सपियरची नाटकं, संहिता, त्यावरच्या समीक्षा इत्यादी गोष्टी गोळा करू लागले. १९३० साली त्यांनी प्रस्तुत लायब्ररी सुरु केली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीनं इमारत, पुस्तकं इत्यादींसाठी आपली मालमत्ता खर्च केली. ॲमहर्स्ट कॉलेजनं नंतर एक ट्रस्ट केला आणि त्याकडं ही लायब्ररी सोपवण्यात आली. अमेरेकेचे प्रेसिडेंट कूलीज या ट्रस्टचे सदस्य होते. ॲमहर्स्टचे माजी विद्यार्थी या लायब्ररीसाठी देणग्या देतात.

।।

Comments are closed.