पुस्तकं/चार्ली चॅप्लीनचा छळ

पुस्तकं/चार्ली चॅप्लीनचा छळ

Charlie Chaplin vs. America: When Art, Sex, and Politics Collided.

  Scott Eyman. 

{}

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ओपनहायमर या चरित्रपटात वैज्ञानिक ओपनहायमर याना अमेरिकन पोलिस आणि गुप्तचरांनी कसं छळलं त्याचं चित्रीकरण पहायला मिळालं.

आता नुकत्याच प्रकाशित झालेल्या स्कॉट आयमन यांच्या पु्स्तकात एफबीआयनं चार्ली चॅप्लीनला कसं छळलं याची गोष्ट सांगितलीय. 

आयमन चित्रपट समीक्षक आहेत.  नामांकित निर्माते, दिक्दर्शक, नट यांच्याशी त्यांचा घनिष्ट परिचय असे.चित्रपट व्यवहार आणि व्यवसाय त्यांना आतून बाहेरून माहीत आहे.

प्रस्तुत पुस्तकाचा काळ अमेरिकेतला  १९४० च्या आसपासचा. दी ग्रेट डिक्टेटर हा चॅप्लीनचा पहिला बोलपट प्रचंड लोकप्रीय झाला होता. हिटलर आणि मुसोलिनी यांच्यावरचा हा विडंबनपट होता. उत्तम चित्रपट, उत्तम अभिनय, दिक्दर्शन, पटकथा आणि संगीत अशा पाच वर्गांत चित्रपटाला ऑस्कर नामांकनं मिळाली होती. चित्रपट जगभर वाखणला गेला होता.

चित्रपटात हिटलर आणि मुसोलिनी यांच्या देशीवादावर टीका होती. चित्रपटाबद्दल बोलताना चॅप्लीन म्हणाले ‘मी अमेरिकन आहे. अमेरिका या देशावर माझं प्रेम आहे. पण त्याच बरोबर मला देशभक्ती ही गोष्ट आवडत नाही, मी आंतरराष्ट्रीयवादी आहे, मी स्वतः ला साऱ्या जगाचा नागरीक मानतो.’ चॅप्लीन यांची ही भू्मिका त्या काळात जगभरच्या विचारवंतांनी घेतली होती, तत्वज्ञ बर्ट्रांड रसेल आणि रविंद्रनाथ टागोर यांनीही अशीच भूमिका घेतली होती.

  आंतरराष्ट्रीय म्हणणं म्हणजे अमेरिकाविरोध आहे असं काही लोकांचं म्हणणं पडलं. त्या काळात सत्ताधारी असलेल्या रिपब्लिकन पक्षाला चॅप्लीनचा राग आला. अमेरिका प्रथम असं त्या पक्षाचं घोषवाक्य होतं. आपलं देशप्रेम सिद्ध करण्यासाठी या मंडळींनी चॅप्लीनला लक्ष्य केलं.

सत्ताधारी पक्षाच्या जवळ असलेल्या कोणीतरी एफबीआयकडं तक्रार केली की चॅप्लीन देशद्रोही आहे. त्या काळात कम्युनिष्ट असणं ही शिवी होती, देशद्रोह मानला जात होता.

चॅप्लिन कम्युनिष्ट पक्षाचा सदस्य असल्याची तक्रार झाली. एफबीआयनं चौकशी केली, चॅप्लीन सदस्य नव्हते. तक्रार करणाऱ्यानं चॅप्लीनचं एक स्टेटमेंट पोलिसांना दाखवलं.त्यात चॅप्लीन म्हणाले होते की अमेरिकेनं जर्मनीच्या विरोधात नवी लष्करी आघाडी उघडली पाहिजे जेणेकरून जर्मनीची सेना एकीकडं रशिया आणि दुसरीकडं अमेरिका यांच्यात विभागली जाईल आणि जर्मनीचा पराभव होईल. 

त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ ते रशियाला मदत करतात असा रिपब्लिकन पक्षाच्या लोकांनी काढला.  त्या काळात अमेरिकन लोकमत हिटलरवर प्रेम करत होतं. हिटलरनं जर्मनीचा कसा विकास केला याच्या गोष्टी पेपर सांगत. ब्रीटनच्या दबावामुळं आणि जपाननं अमेरिकन नाविक तळावर हल्ला केल्यानं अमेरिका नाईलाजानं युद्धात उतरला होता.रशिया आणि अमेरिका दोघांची जर्मनीविरोधात मैत्री झालेली होती. दुसरी गंमत अशी अमेरिकेत बहुपक्षीय लोकशाही होती आणि कम्युनिष्ट पक्ष हा एक कायदेशीर पक्ष मानला गेला होता,  रजिस्टर्ड पक्ष होता आणि त्या पक्षाचे रजिस्टर्ड असे सदस्यही होते. हे सारं कायद्यात बसणारं होतं. तरीही रिपब्लिकन लोक टगेगिरी करत.

चॅप्लीननी या आगीत आणखी तेल ओतलं. ते म्हणाले ‘मी कम्युनिष्ट पक्षाचा सदस्य नाही, होणारही नाही. पक्षीय राजकारण हा माझा विषय नाही. मी चित्रपटवाला माणूस आहे. पण कम्युनिष्ट पक्षाबद्दल मला प्रेम आहे.’

  एफबीआयनं चौकशी केली. चॅप्लिन कम्युनिष्ट असल्याचं काहीही त्याना मिळालं नाही. दुसरी तक्रार झाली. एफबीआयची तीच प्रतिक्रिया.तिसरी तक्रार. अशा खोट्या तक्रारी होत आणि एफबीआय चॅप्लीनला तपासाच्या चक्रात अडकवत असे. 

 एफबीआय सरकारची धार्जिणी होती. एफबीआय चॅप्लीनबद्दल खोट्या बातम्या पिकवे आणि पेपरातल्या त्या काळातल्या भाडोत्री पत्रकाराना पुरवत असे. चॅप्लीन यांच्या स्त्रीमैत्र्या हा पेपरांना चघळण्याचा विषय होता. एफबीआय त्या विषयी माहिती पुरवत असे.

पुढं पंधरा अठरा वर्षांनी अमेरिकेत वर्णद्वेष उफाळून आला. मार्टीन लुथर किंग यांनी काळ्यांच्या शांततामय आंदोलनानं नेतृत्व केलं. त्या वेळी किंग यांच्या अनेक सेक्सकथा एफबीआयनं तयार केल्या आणि पेपरांतून पसरवल्या. सरकारच्या सांगण्यावरून. चॅप्लीनला जसं छळलं तसंच किंग यानाही एफबीआयनं छळलं.

त्या काळात पेपरांतून काय लिहून येत होतं पहा. ‘हा चॅप्लीन कुठला कोण. बाहेरून इथं आला. आला तेव्हा फाटका होता. अमेरिकेनं त्याला अमाप संपत्ती आणि प्रतिष्ठा दिली. तरी हा माणूस अमेरिकन सरकारच्या धोरणावर टीका करतो. खरं म्हणजे सरकारनं या माणसाला तुरुंगातच टाकलं पाहिजे, त्याला देशाबाहेर घालवलं पाहिजे.’

चॅप्लीनवर येवढा राग का? व्यावसायिक यश. चॅप्लीन स्वतंत्र निर्माते होते. त्या काळात चित्रपट व्यवसायावर स्टुडियोंची मालकी होती. स्टुडियो ही कंपनी असे,ती चित्रपट काढत असे, त्याचं वितरणही तीच करत असे, दिक्दर्शक आणि नट हे त्या स्टुडियोचे नोकर असत.  स्टुडियो सांगेल तोच विषय, स्टुडियो सांगेल तशीच शैली, स्टुडियो स्वीकारेल तोच दिक्दर्शक आणि नट. एका वाक्यात म्हणायचं तर अमेरिकन चित्रपट व्यवहार स्टुडियोचा गुलाम होता.

चॅप्लीन स्वतःचे पैसे घालून चित्रपट करत असे. चित्रपट पूर्णपणे त्याचा असे. वितरणही तोच ठरवत असे. डिक्टेटर हा त्याचा चित्रपट इतका गाजला की स्टुडियोवाल्यांचं दुकान बंद होणाची पाळी आली. त्यांनी चॅप्लीनला बदनाम करण्याचा डाव टाकला.

चॅप्लीनला विरोधक, सरकार यांनी चारही बाजूनी घेरलं होतं. चॅप्लीन जाम वैतागले होते.

एका चित्रपटासाठी ते आपली टीम घेऊन युरोपकडं निघाले असता त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला. पुन्हा अमेरिकेत परत येण्याची परवानगी त्याना नाकारण्यात आली.

चॅप्लीननी अमेरिका सोडली.अमेरिकेतली आपली संपत्ती विकून ते स्वित्झर्लंडमधे स्थायिक झाले.

या घटनेनंतर वीस वर्षं ते अमेरिकेत गेलेच नाहीत. 

१९७२ साली चॅप्लीनना मानद ऑस्कर देण्यात आलं. थकलेले चॅप्लीन ती मान्यता घेण्यासाठी अमेरिकेत गेले. सभागृहात बक्षीस जाहीर झालं, ते घेण्यासाठी चॅप्लीन मंचावर गेले तेव्हां पूर्ण सभागृ़ह १२ मिनिटं  उभं होतं,टाळ्या वाजवत होतं. असं म्हणतात इतकी दीर्घ मानवंदना फक्त त्यांच्याच वाट्याला आली.

स्कॉट आयमन पत्रकार आहेत. ते चित्रपटांची परीक्षणं, समीक्षण लिहितात. जॉन वेन, जेम्स स्टुअर्ट, कॅरी ग्रँट, हेन्री फोंडा या ऑस्कर विजेत्या नटांचीही चरित्र त्यांनी लिहिली आहेत. हॉलिवूडचा इतिहास त्यांनी लिहिलाय. त्यांची एकूण १६ पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

प्रस्तुत पुस्तक हे चॅप्लीन यांचं एक छोटंसं चरित्रच म्हणायला हरकत नाही. पुस्तकाचा बाज चॅप्लीन यांची बाजू मांडल्याचा आहे.

।।

Comments are closed.