पुस्तकं. हिटलर १९२३

पुस्तकं. हिटलर १९२३

पुस्तकं. हिटलर. 

1923. 

By Mark Jones. Basic Books; 432 pages; $32 and £25

÷÷

८ जून १९२३ या दिवशी ॲडॉल्फ हिटलर म्युनिखमधल्या बियर हॉलमधे गेला. सोबत एसएस या त्याच्या खाजगी सैन्याचे जवान होते. या जवानांनी बियर हॉलला गराडा घातला. हॉलच्या बाहेर मशीन गन होती. ती हॉलवर रोखलेली होती.

हॉलमधे बव्हेरिया प्रांताचे कमिशनर कार आणि त्यांचे सहकारी प्रशासक होते. ते एका सभेत बोलत होते.

हिटलर सभेत घुसला. स्टेजवर गेला आणि बोलू लागला. हिटलर त्या वेळी प्रसिद्ध पुरुष नव्हता. श्रोत्यांनी हिटलरकडं लक्ष दिलं नाही. हिटलरनं कंबरेवरच्या पट्ट्यातून पिस्तूल काढलं आणि हवेत गोळी झाडली. श्रोते चमकले. थंड झाले.

हिटलरनं भाषण केलं आणि कारना म्हणाला की क्रांती झालीय, तुम्ही मला पाठिंबा द्या. कारनं नकार दिला. हिटलरनं त्याच्यावर पिस्तुल उगारलं. म्हणाला-चला माझ्याबरोबर. कारसह तिघांना घेऊन हिटलर शेजारच्या खोलीत गेला. त्यांच्यावर पिस्तूल उगारलं आणि म्हणाला ‘पिस्तूलाच चार गोळ्या आहेत. तुम्ही माझं ऐकलं नाहीत तर यातल्या तीन गोळ्या तुमच्यासाठी आणि चौथी माझ्यासाठी.’

तिघंही थिजले. हिटलरसोबत सभेत परतले. हिटलरनं एक जबरदस्त भाषण करून क्रांतीनंतर आपण काय करणार आहोत ते सांगितलं. लोकशाही बरखास्त करू, ज्यूना मारून टाकू, राष्ट्रद्रोही कम्युनिष्टांना मारून टाकू, विरोधक शिल्लक ठेवणार नाही इत्यादी इत्यादी. 

भाषण प्रभावी होतं. लोकांची चुळबूळ झाली. बाहेर त्यांच्यावर रोखलेल्या बंदुका होत्या. लोक हळू हळू पांगले. हिटलर बाहेर पडला. म्युनिख शहरातल्या सरकारी कचेऱ्या आणि महत्वाच्या इमारती ताब्यात घेण्यासाठी त्यानं आपल्या सैनिकांसह शहरात एक मार्च काढला. मोर्चा सैनिकांनी अडवला. गोळीबार झाला. चौदा नाझी आणि चार पोलिस ठार झाले. हिटलर सहा इंचांनी वाचला. त्याच्या शेजारच्या नेत्याला गोळी लागून तो मेला. हिटलर गुल झाला. काही दिवसांनी त्याला अटक झाली. पाच वर्षांची शिक्षा झाली.

आठ महिन्यातच हिटलरला सोडून देण्यात आलं. बाहेर पडल्यावर हिटलरनं संघटना वाढवायला सुरवात केली. नंतरची दहा वर्षं जर्मनीत अस्थिरता होती. सतत निवडणुका होत होत्या. हिटलर लढवत होता. शेवटी १९३३ मधे झालेल्या निवडणुकीत ३४ टक्के मतं मिळवून हिटलर संसदेत पोचला. राष्ट्राध्यक्षांनी त्याला चॅन्सेलरपदी नेमलं.

बस.

नंतर ज्यूंचा नरसंहार. लोकशाहीचे तीन तेरा. विद्यापीठं बंद. पुस्तकं जाळण्यात आली. सारं जग जिंकायला निघाला. दुसरं महायुद्ध झालं. शेवटी जर्मनीचा पाडाव झाल्यावर हिटलरनं आत्महत्या केली.

हिटलरच्या बियर हॉल बंडाला शंभर वर्षं झाल्याचं निमित्त साधून पुस्तकं प्रसिद्ध झाली, प्रस्तुत पुस्तक हे त्या पैकी एक.

पुस्तकात लेखकानं १९२३ सालची जर्मनीची स्थिती सविस्तर सांगितली आहे. पहिल्या महायुद्धाला कारण झाल्याबद्दल जर्मनीवर आंतरराष्ट्रीय निर्बंध लादण्यात आले होते, फ्रान्स जर्मनीकडून नुकसान भरपाईची रक्कम मागत होतं. उध्वस्थ जर्मनीला ती रक्कम देता येत नव्हती, जर्मन अर्थव्यवस्था घसरत चालली होती. फ्रान्सनं र्हूर हा खाणींचा प्रदेश ताब्यात घेतला. मार्क या त्यांच्या चलनाला कागदाचीही किमत उरली नाही. एका डॉलरची किमत काही अब्ज मार्क्स झाली होती. राजकारणात कम्युनिष्ट, भांडवलशाही, उदारमतवादी, मध्यमवर्गी इत्यादींचे पक्ष निर्माण झाले होते. पार गोंधळ होता. अराजक माजलं होतं. पण लोकशाही होती. म्हणजे संसद भरत असे, गोंधळ होत असे, निर्णय होत असत पण अर्थव्यवस्था सावरत नव्हती.

या पोकळीत हिटलर घुसला. मुसोलिनी या इटालियन हुकूमशहाची नक्कल करत १९२३ मधे हिटलरनं सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला.

लेखकाचं म्हणणं आहे की मुळात जर्मन संस्कृती मोकळी, ओपन, होती; लोकशाही परंपरा जर्मनीत रुजलेल्या होत्या. परंतू नुसत्या परंपरा आणि विचार असून भागत नाही. लोकशाही टिकवण्यासाठी एक सामाजिक स्थिती आवश्यक असते, शक्तीवान संस्था आवश्यक असतात. हिटलरनं सर्व लोकशाही आणि सामाजिक संस्था एकेक करत खतम केल्या, समाजात निर्नायकी झाली. त्यामुळंच हिटलर १९३३ साली सत्ताधीश होऊ शकला. लाखो लोकांची कत्तल होत असताना जर्मन समाज चुप राहिला यातूनच लक्षात येतं की जर्मन समाज किती हतबल झाला होता.

बियर हॉल घटना घडायच्या आधी एक वर्षं  ज्यू असलेल्या परराष्ट्र   मंत्र्याचा खून झाला होता. त्या घटनेचं चित्रदर्शी वर्णन लेखकानं पुस्तकात केलं आहे.  व्यवस्थित योजना आखून तो खून पार पडला होता. खूप दिवसांनी खुनी पकडले गेले, खटला चालला.  खुनी हीरो झाले होते. समाज खुन्यांच्या पाठी उभा होता. खून करणारे उघडपणे जर्मनीच्या दुरावस्थेला ज्यूना जबाबदार धरत होते, ज्यूंचा नायनाट केला तरच जर्मनी वाचेल असं त्यांचं, त्यांच्या संघटनेचं मत होतं. ही संघटना हिटलरची नव्हती.

जर्मनीत ज्यू द्वेष मुरलेला होता. त्यामुळंच ज्यूंचा नायनाट करणं या मुद्द्यावर हिटलर सत्तेत जाऊ शकला, सत्तेचा अनिर्बंध वापर करू शकला.

लेखक म्हणतो की बियर हॉल बंड हिंसक होतं, देशद्रोह होता. या गुन्ह्याला पाच वर्षाची शिक्षा देणं चुकीचं होतं, सामान्यपणे अशा गुन्ह्याला जन्मठेप सुनावली जाते.  न्यायालयानं, सरकारनं, पोलिसांनी माती खाल्ली. एक न्यायाधीश तर हिटलरच्याच विचारांचा होता. 

१९२३ मधे म्युनिखच्या ज्या रस्त्यावर हिटलर मरता मरता वाचला, त्याच रस्त्यावर हिटलरनं १९३३ साली विजयी मिरवणुक काढली, हज्जारो लोक त्याचं स्वागत करायला उत्सूक, उत्साही होते.

 सरकार, न्यायालयानं हिटलरला सोडण्याची चूक केली त्याची किंमत जर्मनी आणि जगानं मोजलीय पहा.

।।

Comments are closed.