रविवार/गे माणूस पंतप्रधान होतो

रविवार/गे माणूस पंतप्रधान होतो

नेटकीच गेब्रियल एटल यांची फ्रान्सच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. 

पंतप्रधान मिस्टर एटल गे आहेत. आपला कल (सेक्स ओरिएंटेशन) समलिंगी आहे असं त्यानी पूर्वीच जाहीर केलं आहे, हा कल जाहीर करूनच ते राजकारणात आले आहेत. त्यांच्या या कलाबद्दल कॉलेजमधे असल्यापासून त्यांच्यावर समाजात टीका होत आली आहे. या टीकेला न जुमानता एटल जगतात आणि पंतप्रधान झाले आहेत.

पंतप्रधान मिस्टर एटल यांनी त्यांचं मंत्रीमंडळ तयार केलं आहे. त्या मंत्रीमंडळात परदेश मंत्री म्हणून त्यांनी मिस्टर सोजोर्न यांची निवड केली आहे. सोजोर्न हे एटल यांचे पार्टनर आहेत, सोजोर्न यांच्याशी एटल यांचं लग्न झालेलं आहे. समलिंगी लग्न.  हे लग्न सिविल युनियन या स्वरूपाचं आहे. म्हणजे मॅरेज नाही, सिविल युनियन, सिविल काँट्रॅक्ट आहे. कायद्याच्या भाषेत लग्नापेक्षा एक पायरी खाली. 

आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर गे आहेत. लपून छपून नव्हे. उघडपणे. 

सिविल युनियन मान्य करणारा कायदा ग्रीक संसदेसमोर चर्चेला आलाय. ५२ टक्के ग्रीकांचा या कायद्याला विरोध आहे. सत्ताधारी पक्षाच्या १५८ खासदारांपैकी ५८ खासदारांचा या कायद्याला विरोध आहे. त्यामुळं ग्रीसमधे तो कायदा पास होण्यात अडचणी आहेत. सिरिझा या विरोधी पक्षाचा या कायद्याला पाठिंबा आहे.  सिरिझा पक्षाचे प्रमुख गे आहेत. त्यांचा पार्टनर अमेरिकन माणूस आहे. ग्रीसमधे त्यांना लग्न करता येत नसल्यानं ते अमेरिकेत जाऊन लग्न करण्याच्या बेतात होते.त्यांच्या पाठिंब्यामुळं कायदा झाला तर त्यांना ग्रीसमधेच सिविल युनियन करारानुसार लग्न करता येईल.

युरोपियन युनियमधल्या अनेक देशांत सिविल युनियनचा कायदा असल्यानं ग्रीसलाही युरोपियन प्रवाहात यावसं वाटतंय.

ग्रीक ऑरथॉडॉक्स चर्चचा या कायद्याला कडक विरोध आहे.

पारंपरीक लग्न धार्मिक विधी करून होतात, पुरोहीत ते लग्न लावतो. लग्न हा व्यवहार पर्सनल लॉ नुसार चालतो. प्रत्येक धर्माचा पर्सनल लॉ वेगळा असतो. घटस्फोट, मुलाचा ताबा, वारशाची वाटणी इत्यादी गोष्टी त्या त्या धर्माच्या पर्सनल कायद्यानुसार होत असतात. भारतात विधी न करता नोंदणी करून लग्न करता येतं. परंतू विधीवत होणाऱ्या विवाहांना  हिंदू, मुस्लीम, ख्रिस्ती पर्सनल लॉमधील तरतुदी लागू होतात.

पण अनेक कारणांमुळं जोडपी लग्नात खुष नसतात. फ्रान्समधे दर १०० लग्नांमधे ५५ घटस्फोट होतात. युरोपातल्या कित्येक देशात हे प्रमाण जास्त आहे.   लग्न या संस्थेमधे बहुसंख्य लोकांना रहाता येत नाही, लोचे होतात. म्हणून १९९९ साली फ्रान्सनं सिविल युनियनचा कायदा केला.

सिविल युनियनचा कायदा करण्याची दोन कारणं. पैकी एक कारण नेहमीच्या भिन्नलिंगी विवाहाचा जाच नको असलेल्या लोकांना स्वातंत्र्य असलेली व्यवस्था हवी असते, ती व्यवस्था सिविल युनियनमधे असते. दुसरं कारण असं की समलिंगी व्यक्तीना विवाह करायला पारंपरीक धार्मिक पद्धतीच्या विवाहाची परवानगी नाही. त्यांची सोय सिविल युनियनमधे होते.

चर्चची समलिंगी विवाहाला मान्यता नाही. समलिंगी संबंध नैसर्गीक नाहीत म्हणून ते देवाला मान्य नाहीत, म्हणून अशा लग्नांना चर्च मान्यता देत नाही. या विषयावर चर्चमधे प्रचंड वादंग झालेले आहेत. चर्च या संस्थेमधेच अनेक समलिंगी माणसं आहेत, त्यांचं काय करायचं असाही प्रश्न चर्चसमोर आहेच. समलिंगी आकर्षण किंवा कल नैसर्गिक आहे हे विज्ञानानं सिद्ध केल्यामुळं चर्चची पंचाईत झालीय. सध्याचे पोप फ्रान्सिस यांनी एक मधली वाट काढलीय. समलिंगी माणसं ही शेवटी माणसंच आहेत, देवाचीच लेकरं आहेत, त्यामुळं देव त्यांना त्यागू शकत नाही, म्हणून चर्च त्यांच्या लग्नाला मान्यता देणार नसलं तरी माणसं म्हणून त्यांना आशिर्वाद देईल असं पोप म्हणतात. चर्चमधली बहुसंख्य माणसं पोप यांच्या या निर्णयाच्या विरोधात आहेत.

हिंदू आणि मुसलमान धर्मात अजून समलिंगी विवाहाबाबत   विचार झालेला नाही. भारतात समलिंगी संबंधांचा विषय सर्वोच्च न्यायालयात पोचला होता. न्यायालयानं समलिंगी संबंध हा गुन्हा नाही असा निकाल दिला परंतू लग्नाला मान्यता दिली नाही; तो निर्णय विधीमंडळानं घ्यावा, न्यायालय तसा कायदा करू शकत नाही; असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. समलिंगी संबंध हा विषय जरी विज्ञानाच्या कक्षेतला असला तरीही लोक भावना वेगळी असल्यानं न्यायालय त्यात पडायला तयार झालं नाही.

अमेरिका आणि युरोपात  लोकभावना बदलल्यानं सिविल युनियनचा कायदा होऊ शकला. त्याचंही कारण आहे. समलिंगी संबंध प्रकरणी त्या समाजानं खूप चटके सोसले आहेत. ॲलन टुरिंग हा कंप्यूटर शास्त्रज्ञ समलिंगी होता. टुरिंगने केलेल्या व्यवस्थेमुळं ब्रीटनला जर्मन रॉकेटं आणि बाँबर विमान आधीच हेरून नष्ट करता आली. त्यामुळंच ब्रीटन टिकलं आणि दुसरं महायुद्ध इतरांच्या मदतीनं ब्रीटन जिंकू शकलं. परंतू ब्रिटीश कायदा आणि अंज्लिकन चर्चचा समलिंगी संबंधांना विरोध असल्यानं सरकारन टुरिंग यांच्यावर घातक रासायनीक उपचार केले, लिंगभावना बदलण्याचा प्रयत्न केला, अत्याचार केले. टुरिंगनी आत्महत्या केली. अगदी परवा परवा ब्रिटीश राणीनं ॲलन टुरिंग यांची मरणोत्तर माफी मागितली.

युरोपात, अमेरिकेत लोकांनी समलिंगी कल नैसर्गिक आहे याचा स्विकार केला. फ्रेंच समाज नेहमीच वैचारिक आघाडीवर राहिला आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ही मूलभूत तत्व फ्रेंच राज्यक्रांतीनं जगाला दिली. सिविल युनियनचा कायदा फ्रान्सनं १९९९ साली केला.

  दोघांनाही समान अधिकार आणि स्वातंत्र्य असतं या पायावर सिविल युनियन आधारलेलं आहे. एकमेकाच्या जगण्यावर, विचारांवर आक्रमण करण्याचा अधिकार सिविल युनियनमधे नसतो. विचार आणि आचार दोन्हीबाबत सिविल युनियनमधल्या व्यक्ती स्वतंत्र असतात. मिळवता असणं, जात, धर्म, शारीरीक ताकद या मुद्द्यावर कोणाचं तरी वर्चस्व आणि कोणी तरी पड खाणं सिविल युनियनमधे बसत नाही.  

सिविल युनियन हा करार आहे. सिविल युनियनमधे एकमेकांच्या संपत्तीवर युनियन सदस्यांचा अधिकार असत नाही. एकाच्या पेन्शनवर दुसऱ्याचा अधिकार नसतो.आपलं पेन्शन, आपली संपत्ती, पार्टनरला द्यायची की आणखी कोणाला द्यायची हे प्रत्येक व्यक्ती स्वतंत्रपणे ठरवू शकते. लग्नाच्या बाहेर पडायचं असेल तर ते कसं बाहेर पडायचं हे दोघांनी ठरवायचं असतं. पोटगी इत्यादी तरतुदी सिविल युनियनमधे येत नाहीत. दोघांचंही समाधान होईल असा तोडगा दोघांनी काढायचा असतो.

सिविल युनियनमधे मुलं दत्तक घेता येतात.  मुलांवर मालकी, हक्क, वारसा कोणाचा? तो एका व्यक्तीचा असतो. ती व्यक्ती नंतर आपल्या इच्छेनुसार ताबा, वारसा या गोष्टी पार्टनरला देऊ शकते किेवा समाईक ठेवू शकते. निर्णय सर्वस्वी युनियनमधील दोन्ही पार्टनरचांचा, स्वतंत्र. भिन्नलिंगी लग्नामधे मूल दोघांच्या संयुक्ततेतच जन्म घेत असल्यानं ताबा, हक्क, वारसा हे प्रश्न लग्नसंस्थेशी जोडलेले असतात आणि लग्नकायद्याशी जोडलेले असतात. सिविल युनियन अधिक मोकळं असतं, अधिक न्यायी असतं.

सिविल युनियन या करारामधे सामिल होणारी माणसं परिपक्व, समजुतदार असावीत अशी अपेक्षा असते. एकमेकावर कोणतीही जबरदस्ती नाही आणि त्यामुळं कोणतीही अडवाअडवी नाही हे या संबंधांचं स्वरूप आहे. जमलं नाही, लोचा झाला, भांडाभांडी झाली तर लोक म्हणणार की तुम्हीच समजुतीनं वागायचं मान्य केलं होतंत, जे काही झालं त्याची जबाबदारी तुमचीच असणार.

आता गंमत पहा. एटल पंतप्रधान. त्यांचा पार्टनर सोजोर्न परराष्ट्र मंत्री. युक्रेन आणि गाझा युद्ध हे प्रश्न चिघळले आहेत. आता येमेननं इसरायलशी संबंधित देशांच्या बोटी बुडवायला सुरवात केलीय आणि येमेनवर अमेरिकेनं बाँब हल्ले करायला सुरवात केली. बोटी बुडवणाऱ्यांना इराणचा पाठिंबा आहे. त्यामुळं परिस्थिती स्फोटक बनली आहे. फ्रान्सला तीनही प्रश्नांबाबत भूमिका घ्यायच्या आहेत. रशियाला दुखवायचं नाही पण युक्रेनला पाठिंबा द्यायचा आहे. गाझावर अन्याय होता कामा नये असं वाटतं पण इसरायलशी भांडण करायचं नाहीये. इराणचे उद्योग मान्य नाहीत पण इराणशी संबंध टिकवायचे आहेत.तारेवरच्या कसरती आहेत.

पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री हे जोडपं आहे. दोघांची मतं वेगळी असली तर काय होईल? पारंपरीक लग्नात सामान्यतः पुरुषासमोर स्त्रीला पडतं घ्यावं लागतं. पुरुष प्रधान समाजात तसं घडणं अपेक्षित असतं. फ्रान्समधे काय होईल? एका जोडप्यांमधे मतभेद झाले आणि त्यात दादागिरी झाली तर त्याचे परिणाम त्या जोडप्यांवरच होतील असं नव्हे तर परिणाम अनेक देशांवर होतील. सिविल युनियमधे दोघं विवाहबद्ध असल्यानं ते समजुतीनं वागतील, त्यांच्या भांडणाचा दुष्परिणाम इतर देशांवर होणार नाही.अशी अपेक्षा आहे.

समलिंगी माणसांचा कल, आकर्षण नैसर्गिक असतं. तीही माणसंच असतात. इतर माणसांसारखीच माणसं असतात. बुद्धीमान असतात, कर्तृत्ववान असता. काही दिवसांपूर्वी गाजलेले कंप्यूटरवाले सॅम आल्टमन समलिंगी आहेत. आज आयटी  क्षेत्रात काम करणारी खूप म्हणजे खूप माणसं समलिगी आहेत. ही सर्व माणसं समाजाचाच एक भाग आहेत.  

लग्नामधे असणाऱ्या दोघांनीही समजुतीनं, समतेच्या भावनेनं वागावं असा मुद्दा आहे. एकूणच परिपक्वता आली, तर नेहमीची लग्नही सुखाची होतील. सिविल कराराला मान्यता दिली असली तरी पारंपरीक लग्नही होतच रहातील. माणसं शहाणी होत गेली तर समलिंगी लग्नातली आणि पारंपरीक लग्नातली अशी सर्वच माणसं लग्न नीट निभावून नेतील. 

सिविल युनियन ही समाजाची एक अधिक उन्नत अशी पायरी आहे. समलिंगींच्या लग्नामुळं त्या पायरीकडं समाज जात आहे. 

एक वेळ अशी यावी की सिविल युनियनच्या सर्व तरतुदी पारंपरीक लग्नातही केल्या जातील. सिविल युनियनची आवश्यकताच उरणार नाही. किंवा पारंपरीक लग्नाचीही आवश्यकता उरणार नाही.

।।

Comments are closed.