पुस्तक. लेखक-पत्रकार यांच्या मजकुरात सत्य कधीच नसतं.

पुस्तक. लेखक-पत्रकार यांच्या मजकुरात सत्य कधीच नसतं.

——-

प्रयोगव्यक्ती (subject) आणि लेखक (पत्रकार) यातील नातं असा या पुस्तकाचा विषय आहे. 

थोडंसं विस्तारानं पाहूया. पत्रकार एकाद्या व्यक्तीला भेटतो, त्याची मुलाखत घेतो, त्यातून एक बातमी करतो, एक लेख लिहितो. ती व्यक्ती ही त्याची प्रयोग व्यक्ती असते. ती व्यक्ती, त्या वक्तीचं म्हणणं पत्रकार समजून घेतो आणि जसं समजलं तसं लिहितो.

फिक्शनलेखक ज्या व्यक्ती रंगवतो त्या कागदावरच्या असतात, त्याच्या कल्पनेतल्या असतात. त्या खऱ्याखुऱ्या असायलाच पाहिजेत असं बंधन लेखकावर नसतं. त्या व्यक्ती काल्पनिक असल्या तरी वाचकांच्या अनुभवसमज विश्वात त्या बसायला हव्यात याची काळजी लेखकाला घ्यावी लागते. पण मुळात लेखकही कोणाला तरी पहात असतो, कोणाचं तरी ऐकत असतो, ते त्याच्या लिखाणाचं बीज असतं, त्यातून शेवटी आकाराला येणारा मजकूर मूल बीजापासून वेगळा असतो.

पत्रकाराची प्रयोगव्यक्ती खरी असते, त्या खऱ्या प्रयोग व्यक्तीशी पत्रकाराचं एक नातं तयार होतं. प्रयोग व्यक्ती, प्रयोग व्यक्तीचं म्हणणं १०० टक्के मजकुरात उतरणं ही पत्रकाराची जबाबदारी असते, असं मानलं जातं.

फिक्शन लेखकाला शंभर टक्के जुळण्यातून सूट असते. कारण त्याची प्रयोगव्यक्ती खरी असण्याचंच बंधन त्याच्यावर नसतं, ती काल्पनीक असते. तरीही ती काल्पनिक प्रयोगव्यक्ती आणि लेखक यांच्यात एक नातं असतं.

लेखिका म्हणतात की बातमी किंवा साहित्यात जे उमटतं ते बहुतांशी पत्रकार, लेखकाचं असतं; प्रयोग व्यक्तीनं सांगितलेल्या गोष्टीशी ते जुळणारं नसतं. पत्रकार-लेखकाची निर्मिती ही अनैतिक असते असं प्रस्तुत लेखिका सांगतात, कोणाही डोकं ताळ्यावर असणाऱ्या पत्रकार-लेखकाला आपण अनैतिक वागलो हे कळत असतं, कळायला हवं असं लेखिकेचं म्हणणं आहे.

प्रस्तुत पुस्तकाच्या लेखिका जेनेट माल्कम एक पत्रकार आहेत (म्हणजे होत्या, त्या नुकत्याच वारल्या), त्यांचा स्वतंत्रपणे मानसशास्त्राचा अभ्यास आहे. माणसाचं मन कसं विचार करतं, तिथं विचार कसे घडतात, कॉग्निशन म्हणजे बोधनाची प्रक्रिया काय आहे याचा अभ्यास त्यांनी केलाय. 

बोधनामधे काय घडतं? समोर जे घडतं, जे दिसतं, जे ऐकू येतं, ते जसंच्या तसं माणसाला समजतच नाही. माणसाच्या मनात ते उतरतं तेव्हां ते त्या लेखकाचा कल, त्याचा अनुभव, त्याचे हेतू,  त्याच्या मर्यादा इत्यादी गाळण्यांतून, वळणांतून माणसाच्या मनात उतरतं.

पत्रकार एकादी व्यक्ती रेखाटतो तेव्हां ती व्यक्ती जशी असेल तशी त्याच्या बातमीत येत नाही, ती पत्रकाराला जशी समजलेली असते तशी मजकुरात येते. 

माल्कमनी काढलेला हा निष्कर्ष पत्रकारी-लेखन व्यवहारातल्या लोकांना धक्का देणारा आहे. त्यासाठीच तर  त्यांचं प्रस्तुत पुस्तक अमेरिकेत पत्रकारी, जर्नालिझम शिक्षणामधे एक पाया तयार करणारं पुस्तक म्हणून अभ्यासायला सांगितलं जातं.

प्रस्तुत पुस्तकामधे मॅकडोनल्ड या एका खुनी माणसानं मॅकगिनीस या लेखकावर भरलेल्या बदनामीच्या खटल्याचा सविस्तर अभ्यास लेखिकेनं केला आहे.

मॅकडोनल्डनी पत्नी, दोन मुलं आणि पत्नीच्या पोटात असलेलं तिसरं मूल यांचा खून केला. खटला झाला. मॅकडोनल्ड यांना शिक्षा झाली. मॅकडोनल्ड यांचं म्हणणं होतं की आपण खून केला नाही, आपल्यावर अन्याय झालाय. खून कसा झाला याचं वर्णन मॅकडोनल्ड करतो. 

 आपण खून केला हा लोकांचा झालेला समज कोणीतरी खोडून काढावा या विचारानं मॅकडोनल्ड यांनी मॅकगिनीस या पत्रकार-लेखकाला पुस्तक लिहायचं कंत्राट दिलं. पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा अमूक टक्के भाग आपल्याला मिळाला पाहिजे असा करार केला. मॅकगिनीसला खटल्याच्या कामकाजात सहभागी करून घेण्यात आलं,मॅकगिनीस अनेक आठवडे मॅकडोनल्ड यांच्या सहवासात राहिले, त्याच्या अनेक तासांच्या मुलाखती घेतल्या. लेखकानं खुन्याला अनेक पत्रांत लिहीलं की तो दोषी नाही,  त्यांच्यावर अन्याय झालाय.

पण फेटल व्हिजन हे पुस्तक लिहिलं त्यात मात्र मॅकडोनल्ड खुनी आहे, तो एक विकृत माणूस आहे असं लिहिलं. 

लेखकानं आपल्याला फसवलं, आपली बदनामी केली असा खटला मॅकडोनल्डनं भरला. लेखिका जेनेट माल्कम यांनी खुनी, लेखक, खटल्यातले ज्युरी, दोन्ही बाजूचे वकील, मानसशास्त्राचे अभ्यासक अशांच्या दीर्घ मुलाखती घेतल्या. त्यातून त्यांनी खुनी म्हणजे प्रयोग व्यक्ती; लेखक म्हणजे मॅकिगिनीस यांच्या संबंधांचा अभ्यास केला.

खुनी लेखकाला फसवत होता. लेखक खुन्याला फसवत होता. प्रत्येक जण स्वतःच्या सोयीचं बोलत होता. खुन्याला स्वतःची एक प्रतिमा तयार करायची होती, त्यासाठी लेखकाचा उपयोग करून घ्यायचा होता. लेखकाला आपलं पुस्तक खपलं पाहिजे, सनसनाटी झालं पाहिजे असं वाटत होतं कारण तो कर्जात होता, त्याला भरपूर खपणारं पुस्तक लिहायचं होतं. 

खुनी समजा निष्पाप निघाला तर पुस्तक फुस्स झालं असतं म्हणून लेखकाला काहीही करून खुनी विकृत दाखवायचा होता.

फेटल व्हिजनमधे ना खुनी समजतो ना लेखक. तिसरंच काही तरी असतं. 

खटला निकाली निघाला नाही, तोडपाणी झालं, लेखकानं खुन्याला पैसे दिले, बदनामी झाली की नाही हा प्रश्न अनुत्तरीत राहिला.

पण लेखिकेनं मात्र तो प्रश्न तडीस लावला, लेखन व्यवहाराचं विश्लेषण केलं. 

खुद्द लेखिकेला नेमक्या याच संकटातून जावं लागलेलं आहे.In the Freud Archives, Jeffrey Masson या शीर्षकाचं पुस्तक माल्कम यांनी लिहिलं. या पुस्तकात लेखिकेनं दिलेल्या अवतरणात जे लिहिलं ते आपण बोललोच नव्हतो असा दावा करून लेखिकेवर बदनामीचा खटला मेसन यांनी भरला.

फिर्यादीनी पुरावे मागितले, टेप रेकॉर्डर, वहीतल्या नोंदी इत्यादी गोष्टी मागवल्या.

लेखिकेनं कोर्टाला लेखनाची प्रक्रिया सांगितली. लेखिकेनं मेसन यांच्याशी कित्येक तास, वेगवेगळ्या स्थळी बातचित केली होती. मेसन हज्जारो शब्द बोलले होते. त्यांच्या बोलण्यातले सारांश काढून लेखिकेनं ते अवतरीत केले होते. हीच लेखनाची पद्दत असते. प्रत्येक वाक्यनवाक्य जसंच्या तसं कधीच बोललेलं नसतं हे लेखिकेनं कोर्टाला सांगितलं.

कोर्टात घनघोर चर्चा झाल्या. इंग्रजी साहित्य आणि पत्रकारीतली नामांकित उदाहरणं कोर्टात चर्चिली गेली. ज्युरी होते. ज्युरी लेखक नव्हते किवा त्यातल्या कित्येकांनी काहीही वाचलंही नव्हतं. लेखन प्रक्रियेतले बारकावे त्याना समजत नव्हते. त्यामुळं लेखिकेची बाजू त्यांना समजत नव्हती.

लेखन प्रक्रिया माहित नसलेल्या लोकांच्या लेखी जे जे लिहिलेलं असतं ते ते खरं तरी असतं किंवा खोटं तरी असतं. लेखिका त्यांना समजून देत होत्या की तसं नसतं. पत्रकारीत खरंखुरं लिहायचं असं म्हणतात पण ते शेवटी पत्रकाराला समजलं ते सत्य असतं.

लेखिका म्हणतात की पत्रकाराला वास्तव लिहित असताना फिक्शनच्याच वाटेनं जावं लागतं आणि फिक्शन लिहिणाऱ्यालाही शेवटी वास्तवाचा भास वाचकाना होईल याचं भान ठेवावं लागतं.

लेखिकेवरचा खटला १० वर्षं चालला आणि शेवटी न्यायालयानं लेखिकेला निर्दोष सोडलं.बहुदा कोर्टातल्या चर्चा ऐकून जजेसच्या डोक्यात चिखल झाला असणार.

असो.

लेखिका म्हणते की पत्रकार शेवटी खोटंच लिहित असतो, अनैतिकच वागत असतो. पण असं खोटं लिहिणं म्हणजेच पत्रकारी आहे काय? प्रयोगव्यक्तीशी पूर्ण तद्रूप झालेलं लिखाण शक्य आहे काय? या प्रश्नांची उत्तरं लेखिका देत नाहीत.

कोणताही नैतिक शुद्धतेची भूमिका लेखिका घेत नाहीत.

लेखिका येवढंच म्हणतात की पत्रकारानं आपण काय करतो हे नीट लक्षात ठेवावं आणि जास्तीत जास्त बरं लिहिण्याचा प्रयत्न करावा.

मॅकडोनल्ड यांच्यावरील खून खटला आणि मॅकगिनीस यांच्यावरचा बदनामीचा खटला याचा तपशीलवार अभ्यास या पुस्तकात आहे. लेखन व्यवहारावरातला गुंता जागोजागी लेखिकेनं मांडला आहे. पत्रकार आणि लेखकांना खूप विचार करायला लावणारं असं हे पुस्तक आहे.

लेखिका नैतिक धडे देत नाही पण लेखक-पत्रकारांचे व्यवहार तपासते. मुख्य म्हणजे पुस्तक वाचकाना विचार करायला लावतं.

।।

The Journalist and the murderer.

Janet Malcolm.

||

Comments are closed.