बुचर ऑफ दिल्ली

बुचर ऑफ दिल्ली

नेटफ्लिक्सवर तीन भागात दिल्लीतल्या बिहारी खुन्याची कथा ‘ बुचर ऑफ दिल्ली ‘  प्रदर्शीत झालीय.  

या एका घडलेल्या कथानकावर वेब सीरियल आधारलेली आहे. डॉक्युमेंटरी आहे, अभिनेते घेऊन डॉक्युमेंटरी तयार केलीय. 

गोष्ट चंद्रकांत झा नावाच्या एका खुन्याची आहे. त्यानं किती खून केलेत त्याची गणती नाही पण तीन खुनांच्या बाबतीत पोलिसांना काही पुरावे सापडले. त्या आधारावर त्याला जन्मठेपेची शिक्षा झालीय, तो दिल्लीच्या तिहाड तुरुंगात आहे.

 चित्रपटाच्या रूपात गोष्ट सांगितलेली आहे. डॉक्युमेंटरीत  तपास करणारे पोलिस अधिकारी, पत्रकार, चंद्रकांत झा याचे समकालीन, बळी पडलेल्या व्यक्तींचे नातेवाईक, घोषई गावातले नागरीक, चंद्रकांत झाने केलेले खून आणि त्याचं व्यक्तिमत्व या बद्दल  बोलतात.

शब्दांत न सांगितलेल्या सांगितलेल्या पण दृश्यांतून दिसणाऱ्या फार फार गोष्टी या डॉक्युमेंटरीत आहेत.

दिल्लीची गजबजलेली वस्ती. एकाला एक अशा चिकटून उभ्या असलेल्या इमारती.एकमेकाला चिकटलेल्या इमारती. इमारतींच्या गच्चीवर पाण्याच्या टाक्या. रस्त्यावर इंचभरही जागा मोकळी नाही. माणसं, वहानं यांची इतकी गर्दी की मुंगीलाही शिरकाव नाही. आकाश पहायचं म्हटलं तर तेही  दिसत नाही इतकं तारांचं जाळं. भिंतीला चिकटून दुसऱ्या घराची भिंत. एक घर कुठं संपतं आणि दुसरं घर कुठं सुरू होतं तेच कळत नाही. प्रायव्हसी नावाची गोष्टच नाही. खाजगीपण नाही. शेजारची कुजबूज आणि खुसखुसही ऐकायला येते. आपल्या घरात टीव्हीची आवश्यकता नाही, शेजारचा टीव्ही सुरु झाला की आपल्याच घरात तो आहे असं सारं ऐकायला मिळतं. 

 अशा शहरात एक माणूस लोकांचे गळे दाबतो, हात बांधून ठेवतो, त्यांना मारतो, त्यांचे तुकडे करतो, तुकडे वेगवेगळे करून जागोजागी टाकतो. कोणालाच कसं कळत नाही? कोणीच कशी तक्रार करत नाही? कोणीच कसं वाच्यता करत नाही?

बुचर ऑफ दिल्ली  आपण पहातो  २०२२ सालात. या सालात ईडीचे लोक घरोघरी जातात, धाड घालतात, माणसांना पकडून नेतात. ईडीनं शंभर धाडी घातल्या तर त्यातल्या चार दोन घाडीमधेही काही पुरावे सापडत नाहीत.  पकडलेली माणसं छळवाद आणि दहशत अनुभवून घरोघरी परततात. पण देशात कोणी चकारशब्द काढत नाही. कोणी न्यायालयात जात नाही. संसद आणि विधानसभांत कोणी ओरड करत नाही. कोणी पेपरात बोंब करत नाही. कोणी रस्त्यावर उतरत नाही.

हातोहाती सेल फोन आहेत. सेल फोन आणि कंप्यूटरवर क्लिप्स येतात, व्हॉट्सॲपवर मेसेजेस येतात. निरर्रगल भाषा असते. धमक्या असतात. असत्य गोष्टी असतात. मॉर्फ केलेले फोटो असतात. २०१४ सालापूर्वी भारत अस्तित्वातच नव्हता,  मोदींनीच देश निर्माण केलाय असं सतत सांगितलं जातं. २०१४ पूर्वी काही वर्षं अटल बिहारी वाजपेयींचं सरकार या देशात होतं. व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवणारे लोक वाजपेयी वगैरेंनाही ओळखत नसतात. 

इतका अपप्रचार, खोटेपणा, छळवाद प्रचंड प्रमाणावर सोशल मिडियात फिरत असतांना  पोलिसांचं सायबर गुन्हे खातं काय करतं?  अपप्रचार करणारी यंत्रणा सत्ताधारी पक्षानं तयार केलीय. पैसे देऊन माणसं कामाला लावलीत. हे सगळं दुनियेला माहित आहे पण पोलिस खात्याला मात्र माहीत नाही. 

मग बरोबर. चंद्रकांत झा नावाचा माणूस राजरोस तीस चाळीस खून करतो आणि त्याची खबर पोलिसांना मिळत नाही, जनतेत त्या बद्दल क्षोभ निर्माण होत नाही हे समजण्यासारखं आहे. कारण समाज आणि सरकारी यंत्रणाच अशा तऱ्हेनं वाढलेल्या दिसतात. 

डॉक्युमेंटरी आपल्याला बिहारमधे घेऊन जाते. घोषई या गावात. गावकरी आणि चंद्रकांत झा यांचे समकालीन झाच्या उद्योगांच्या गोष्टी सांगतात. दहा बारा वर्ष हा माणूस आपल्या घरात माणसं घेऊन जातो, त्यांचे हात पाठी बांधून त्यांची तोंडं करकचून  बंद करतो. गावातल्या लोकांना या बांधलेल्या लोकांच्या सोबत बसवतो आणि फोटो काढतो. 

लोक सांगतात की त्यानं दहा खून केलेत, वीस खून केले, चाळीस खून केलेत.

गावात पोलीस खातं होतं की नाही? गावाची खानेसुमारी होत होती की नाही? मतदारांच्या यादीतली काही माणसं प्रत्यक्षात दिसत नाहीयेत, यादी सुधारायला हवी असं निवडणुक आयोगाची माणसं म्हणत नाहीत? इतकी माणसं कां नाहिशी होतात आणि नाहिशा झालेल्या लोकांबद्दल गावात काहीही रेकॉर्ड कां नाही? ते मेले कां? त्यांचं डेथ सर्टिफिकेट कुठंय? त्यांच्या घरची माणसं काय म्हणतात?

या देशात रेकॉर्ड ठेवण्याची पद्धत का नाहीये आणि रेकॉर्ड कां सापडत नाही याचं काहीसं उत्तर ही सीरियल  पहातांना मिळतं. 

खरं बोलणं अडचणीचं असतं. सत्य जर अडचणीचं असेल तर ते नोंदायचं नसतं. काय नोंदवायचं? खोटी स्तुती नोंदवायची. स्तुती असल्यानं कोणाचा आक्षेप असायचं कारण नाही. म्हणून तर इतिहास नावाची गोष्ट भारतात फारच घोटाळ्याची आहे. 

कोविडच्या काळात किती माणसं मेली? आहे विश्वास ठेवण्यालायक आकडा? नोटबंदीच्या काळात नेमका किती पैसा बाजारात होता, किती परत मिळाला, गायब झालेल्या पैशाचं काय झालं? बँकांचं किती नुकसान झालं? या सगळ्या प्रकरणावर किती पैसा खर्च झाला आणि किती काळा पैसा सापडला? आहे रेकॉर्ड? 

दिल्लीतली घरं एकमेकाला चिकटून बांधली गेलीत. गच्च्यांवर इतक्या टाक्या कां असतात? आरोग्याचा लोचा दिसतोय. दिल्लीतल्या दाटवस्तीत कॅमेरा फिरतो. फार भयानक स्थितीत काही हजार, काही लाख माणसं रहातात. अशी आहे भारत नावाची महाशक्ती?

घोषई हे गाव डॉक्युमेंटरीत ड्रोनवरून चित्रीत केलंय. पेंटिंग पहातोय असं वाटतं. सुरेख, शांत, हिरवंगार. ड्रोन संपून हातातला कॅमेरा सुरु होतो तेव्हां सगळं सौदर्य वगैरे नाहिसं होतं, माणसाचं आणि समाजाचं एक ओंगळपण दिसू लागतं.भारतातली पेंटिंग अशीच सुखावण्यासाठी केलेली असतात.या पेंटिंगमधे दिसणारी घरं प्रत्यक्षात कशी?  घरांना धड भिंतीही नाहीत. छप्परं चंद्रमौळी. म्हणजे त्यातून चंद्र दिसतो. रस्ते नाहीत. घरात किती कमी कपडे आणि किती कमी वस्तू दिसतात. 

बिहारमधली सगळी माणसं अद्यात्मिक असावीत असं वाटतं. त्यांनी अद्यात्मिक विचार करून स्वतःच्या गरजा इतक्या कमी करून ठेवल्या आहेत की घरं मोकळी मोकळी दिसतात.

डॉक्युमेंटरीतले पोलीस सांगतात की त्यांनी किती मेहनतीनं गुन्हेगार पकडलाय वगैरे. डॉक्युमेंटरीतले नागरीक पोलिस कसे तक्रारीही घेत नाहीत ते सांगत असतात, सतत.

पोलिसांना पुरावे सापडतात ते अपघातानंच. 

डॉक्युमेंटरी खून या विषयावर आहे, गुन्हेपट आहे. अर्धा भाग गुन्हा या विषयावर आणि अर्धा  भाग सामाजिक आहे.

घोषई गावातली माणसं फार प्रत्ययकारी बोलतात. आपण डॉक्युमेंटरी पहात आहोत असं वाटत नाही. नटांचाच वापर केलाय हे खरं आहे पण ते नट म्हणूनही चांगलेच ठसतात.

अलिकडं हिंसात्मक दृष्य खूप प्रत्ययकारी रीतीनं घेतली जातात. रक्ताचे ओहोळ दिसतात. कपाळात गोळी लागलेली असते, कपाळावरचं भोक दिसतं, भोकाभोवती साकळलेलं रक्त दिसतं. 

सारं प्रकरण चंद्रकांत झा याच्या जबानीवर बेतलेलं आहे. त्यानं सांगितलं ते खरं आहे असं सिद्ध करणं अशा रीतीनं पोलिस आणि तज्ज्ञ बोलतात.

डॉक्युमेंटरी रहस्यकथा अशा शैलीत मांडलेली नाही. अगदी सुरवातीलाच घटनेचा अंदाज येतो आणि नंतर माहित झालेलं सत्य डॉक्युमेंटरीत उगाळलं जातं. ज्याला सामाजिक अभ्यास करायचाय तो माणूस चिकटून राहील. सामान्य माणूस शेवटपर्यंत टिकेल?

 हा दिक्दर्शकाच्या मर्जीचा प्रश्न असल्यानं वेगळी हाताळणी करता आली असती काय हा प्रश्न अप्रस्तुत ठरतो.

।।

Comments are closed.