बोेहेमियन चित्रपट दिक्दर्शक यिरी मेंझेल

बोेहेमियन चित्रपट दिक्दर्शक यिरी मेंझेल

यिरी मेंझेल हा झेक दिग्दर्शक नेटकाच वयाच्या ८२ वर्षी वारला. त्याच्या क्लोजली वॉच्ट ट्रेन्स या चित्रपटाला १९६६ साली ऑस्कर मिळालं होतं. 

भारतात परदेशी चित्रपट खूप कमी पाहिले जातात, झेकोस्लोवाकिया नावाचा देश आहे हेही माहित नसलेले लोक फार. त्यामुळं यिरी मेंझेलनं केलेले चित्रपट भारतीय माणसाला परिचित नाहीत. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पहाणाऱ्या प्रेक्षकांना मेंझेल फार आवडला होता.

क्लोजली वॉच्ट ट्रेन्स . अगदीच आडवाटेला असलेलं रेलवे स्टेशन. दिवसातून तीन चार डब्यांची एकादी गाडी येते जाते. तिच्यातून चार दोन माणसांची चढउतार होते. स्टेशनात सगळी मिळून चार माणसं काम करतात. त्यातला एक मिलोस,गार्ड. 

घडून घडून काय घडणार या मिलोसच्या जीवनात? गाड्यांना सिग्नल द्यायचा. रूळ बदलायचे खटके बदलायचे. बस.

मिलोस वयात आलेला असतो. अजून सेक्सचा अनुभव आलेला नसतो. माशा ही एक गार्डचं काम करणारी मुलगी  त्याच्या आयुष्यात आलेली बहुदा पहिली मुलगी. तिच्या प्रेमात पडतो. तीही प्रेमात पडते. 

पहिली भेट. गाडी थांबलीय. गार्डच्या डब्यात वरच्या बाजूला माशा उभी आहे. खाली जमिनीवर मिलोस उभा आहे. माशा खाली वाकलीय, मिलोस वर तोंड वर करून उभा आहे. आता दोघांचं चुंबन जमणार येवढ्यात दुष्ट स्टेशन मास्टर शिटी वाजवतो. ट्रेन सुटते. दोघं एकमेकांपासून दूर जातात, चुंबन होतच नाही. 

असं तीन वेळा घडत. 

 माशा धाडसानं एके रात्री मिलोसला गाठते. इकडलं तिकडलं झाल्यावर तो शेवटला उन्मादाचा क्षण येऊन ठेपतो. पण त्या आधीच मिलोसचं वीर्यपतन होतं.फुस्स.

 मिलोस अती दुःखी होतो. दुसऱ्या दिवशी  मनगटाची नस कापून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. 

चित्रपट पुढं सरकत असतो. आपण सेक्समधे यशस्वी होत नाही याचं काय करायचं याचा सल्ला कोणाकोणाकडून मिलोस घेतो. किलकिल्या दारांतून इतरांचा सेक्स पहातो. स्टेशनमधली नित्य कामंही पार पाडत असतो.

यथावकाश एक अनुभवी कनवाळू बाई त्याला सेक्सचा धडा शिकवते. मिलोसची निराशा जाते, त्याला आत्मविश्वास येतो. 

मिलोसच्या आयुष्याला आता अर्थ येतो.

आता माशाबरोबर त्याचं जुळणार असतं. 

आणि 

मिलोसवर दारूगोळा घेऊन जाणाऱ्या जर्मन लष्करी गाडीवर बाँब टाकण्याची जबाबदारी येते. मिलोस खुष असतो. हे थरारक धाडस आणि सेक्स अशा दोन्ही गोष्टी आता त्याच्या हाती असतात. 

सिग्नलच्या टॉवरवरून मिलोस खालून जाणाऱ्या गाडीत बाँब टाकतो. थांदरटपणातून तो स्वतःच त्या गाडीत पडतो. 

स्फोट होतो. त्यात मिलोस मरतो. 

मिलोसची वाट पहात असलेल्या माशाच्या हातात मिलोसची वाऱ्यावर उडून आलेली टोपी तेवढी पडते. 

नस कापून घेणं आणि शेवटला स्फोट सोडला तर चित्रपटात कोणतीही थरारक घटना नाही. अगदीच सामान्य माणसं आणि त्यांचं अगदीच सामान्य जगणं.

  पण मेंझेल या छोट्या माणसांच्या जगण्यातल्या अगदी छोट्या छोट्या रंजक घटना चित्रपटात उचलतो. चोरून केले जाणारे सेक्स. बायकांच्या अंगाअंगाला हात लावणारा फोटोग्राफर. तरूण मुलीच्या मांड्या आणि ढुंगणावर रबर स्टँप मारणारा स्टेशनाधिकारी. कबुतरांत रमलेला स्टेशन मास्तर. धांदरट म्हातारा पोर्टर. दादागिरी करणारा नाझी अधिकारी. फटीतून चोरून पाहिला जाणारा सेक्स. सेक्स ऐन रंगात येत असताना घडलेले घोटाळे. 

इतक्या बारीक गोष्टी गुंफून पटकथा तयार केली गेलीय.

जर्मन लष्कराची एक दारूगोळा घेऊन जाणारी गाडी भूमिगत दहशतवाद्यांनी उडवणं या एका मोठ्या घटनेच्या येवढ्याश्शा धाग्याभोवती  एका अगदी सामान्य माणसाची प्रेम कहाणी गुंतवली आहे. काहीही थरारक न घडवता मेंझेल प्रेक्षकाला गुंतवून ठेवतो.

तेराएक फीचरपट मेंझेलनं केले. सर्व चित्रपटांत इरसाल म्हणता येतील अशी पात्रं घुमाकूळ घालताना दिसतात.

क्लोजली वॉच्ट ट्रेन्स झेकोस्लोवाकियाच्या बोहेमिया या विभागात घडते. शिष्टाचाराची पर्वा न करता वावरणाऱ्या माणसाला इंग्रजीत बोहेमियन म्हणतात. मेंझेलचे चित्रपट बोहेमियन आहेत. 

मेंझेलचा सिग्नेचर चित्रपट म्हणून, बोहेमियनपणाचा नमुना म्हणून,  त्याचा माय स्वीट लिटल विलेज हा चित्रपट पहाता येईल.

एक गाव. त्यात ओटेक नावाचा एक मंदगती माणूस. माणूस म्हणजे वय वाढलेला निष्पाप मुलगा. त्याचं काय करायचं हा साऱ्या गावाचाच प्रश्न. टुरेक नावाच्या ट्रक ड्रायव्हरकडं त्याला असिस्टंट म्हणून ठेवलं जातं. टुरेकला तो नकोसा असतो. खळं झालं की त्याला प्राहामधे हाकलून द्यायचं टुरेक ठरवतो.

   एक तरूण इंजिनियर.  ओटेकला सिनेमाचं तिकीट काढून देतो,  सांगतो की सिनेमा पूर्ण पहायचा, त्याचा शेवट चुकवायचा नाही. थोडक्यात दोनेक तास त्याला फुटवतो. ओटेक गेल्या गेल्या इंजिनियरची  मैत्रिण सायकलवरून तिथे पोचते.  पोचल्या पोचल्या दोघं एकमेकांना भिडतात, कपडे उतरवायला सुरवात करतात. दोघांची बेभान झटापट सुरु होते. दोघं जमिनीवर कोलमडतात. नंतर फक्त तिचे पाय दिसतात, तिची अंतर्वस्त्रं फेकलेली दिसतात, दोघांचे फक्त हात आणि पाय दिसतात. बस. बाकी सारं प्रेक्षकाच्या कल्पनाशक्तीवर सोडलेलं. प्रेक्षक जाम हसतात.

ही मैत्रिण गावातल्या एका माणसाची बायको असते. 

मैत्रिणीचा नवरा पोहायला जातो. मैत्रीण काठावर बसलेली असते. नवरा बुडकी मारून किती काळ पाण्यात रहातो हे मैत्रिण मोजत असते. माणूस बुडकी मारतो. तो पाण्याखाली असताना इंजिनियर आणि मैत्रिण यांची जाम झटापट. माणूस वर आला की इंजियर लपतो. माणूस पुन्हा पाण्याखाली गेला की यांची मौज सुरु.  अधिकाधीक पाण्याखाली रहाण्याचा सराव कर असं आपल्या नवऱ्याला सांगत असते. म्हणजे ही मौज करायला मोकळी.

एकदा गावातल्या पबमधे मैत्रीणीचा नवरा या इंजिनयरला बुकलतो.

सारं प्रकरण गावाला माहित असतं. 

टुरेक या ड्रायव्हरला दोन मुलं.   मुलगी अभ्यासाला कच्ची असते. मुलगा तिच्या अभ्यासाला मदत करण्यासाठी तिच्या टीचरकडं जातो आणि त्या टीचरवरच लाईन मारू लागतो. तेवढ्यात गावात एक पेंटर येतो. लोकांना वाटतं की पेंटर म्हणजे भिंती रंगवणारा माणूस, लोकं त्याला घर रंगवायला सांगतात. पेंटर कॅनव्हासवर चित्रं काढत असतो. त्याचं आणि टीचरचं जुळतं. एके रात्री पेंटरच्या बेडमधे टीचर. त्यांचे फक्त पाय दिसतात, अंतर्वस्त्रं भिरकावलेली दिसतात, धमाल होत असते. टुरेकचा मुलगा ते खिडकीतून पहातो. निराश होतो आणि आत्महत्येचा प्रयत्न करतो.

सारं गाव त्या मुलाकडं जमा होतं, त्यांना टीचर-पेंटर-मुलगा हा त्रिकोण माहित असतो.

कम्युनिष्ट पक्षाच्या एका अधिकाऱ्याला ओटेकची जागा हडप करायची असते आणि तो ओटेकला प्राहामधे एक फ्लॅट देऊ करतो. गावातले लोक ओटेकला फशी पाडत असतात. पण ओटेकवर वैतागलेला टुरेकच त्याला पुन्हा आपल्याकडं कामाला ठेवतो, प्राहामधे जाण्यापासून परावृत्त करतो. ओटेकचं प्राहा या शहरावर नव्हे आपल्या छोट्या सुंदर गावावर व घरावर प्रेम असतं.

टुरेकचं घर कबरस्तानाला लागून. कबरस्तानात दुःखी संगित वाजत असतं, एका माणसाला पुरलं जात असतं आणि भिंतीच्या या बाजूला डॉक्टर आणि टुरेक दारू पीत गप्पा करत बसलेले असतात.

डॉक्टरला सारं गाव माहित. तो औषध देण्याऐवजी सल्लेच देत असतो. 

गावातल्या लोकांचं इरसालपण, स्वार्थ, लग्नाबाहेरचे संबंध, लुटालूट, पोलिटिकल उद्योग सारं सारं मेंझेल दाखवतो.  जे दाखवणं शिष्टपणाचं ठरणार नाही ते सारं दाखवतो, गावाचं रांगडेपण दाखवतो.  पण दाखवण्याची पद्धत मात्र अशिष्ट नाही.

दोन माणसं एकमेकाला चिकटतात आणि नेमकं घड्याळातला पक्षी बाहेर येऊन कुक कुक करून अमूक वाजले असं सांगतो. प्रेमी दचकतात, त्यांचा सेक्स थांबतो. सिनेमाभर अशी धमाल चालते. सेक्सच्या धमाल भानगडी मेंझेलच्या चित्रपटात असतात पण त्या कधी अश्लील वाटत नाहीत.

झेकोस्लोवाकियात कम्युनिष्ट राजवट असतानाचा काळ चित्रपटात असतो. मेंझेल कम्युनिष्टांची भरपूर थट्टा करतो.

डॉक्टर टुरेकशी बोलताना म्हणतो- पश्चिमेतल्या भांडवलदार देशात हल्ली स्त्रिया ब्रा शिवाय हिंडतात. आपल्याकडंही आता ती फॅशन आलीय ते बरं आहे.

गावाच्या सरपंचाचं  सगळं घर टीव्हीसमोर बसून हॉलिवूडचा सिनेमा एकटक पहातं. अमेरिकी भांडवलशाहीला शिव्या देत देत.

मेंझेलच्या लार्क्स ऑन ए स्ट्रिंगमधे कम्युनिष्टांची यथेच्छ टिंगल आहे.   क्रांतीनंतर कम्युनिष्ट राज्यकर्ते बुर्झ्वा लोकाना, म्हणजे प्रोफेसर-डॉक्टर इत्यादीना श्रम करायला लावतात, भंगार यार्डात कामाला लावतात. भंगारातून म्हणे पोलाद तयार करायचं असतं. हे काम इतक्या भंगारपणे चालतं की जे काही तयार होतं ते पोलाद नसतंच. कोणी त्यावर  टीका केली की त्याची रवानगी तुरुंगात. तुरुंगही फार भारी. असून नसल्यासारखा. स्त्री पुरुषांना वेगळे तुरुंग. गावात जनरल नागरीक कमी, कैदीच जास्त. कम्युनिष्ट पुढारी भंगार यार्डात येतो, कारमधून उतरतो. कारमधे असताना घातलेली बुर्झ्वा हॅट आणि बूर्झ्वा टाय काढून ठेवतो आणि कामगारांची टोपी घालून कपडे अस्ताव्यस्त करून कामगारांत वावरतो.

मेंझेलगिरी याही चित्रपटात सुसाट पसरलेली. दोन पुरुष एकाच वेळी एका नग्न स्त्रीला आंघोळ घालताना दिसतात, तिचं सर्व अंग बोळ्यानं पुसतांना आणि साबणानं घासताना दिसतात. ती स्त्री आणि दोघे पुरुष सारं एंजॉय करत असतात. प्रेक्षकाचीही हसता हसता पुरेवाट होते.

झेक समाजातलं वास्तव मेंझेल दाखवतो, हसत खेळत. कुठंही व्याख्यान, संदेश वगैरे नाही. चित्रपटाच्या पटकथा आणि संकलन पाहिलं की मेंझेल सत्यजीत रे, बर्गमन यांच्या वर्गातला आहे हे पटतं.

काम, सेक्स, माणसाला घडवत असतं. मेंझेल हा मुद्दा आपल्या चित्रपटातून हळूवारपणे दाखवतो.

कधी काळी झेकोस्लोवाकियाला नाझींच्या छळाला तोंड द्यावं लागलं. नंतर कम्युनिष्टांचा छळवाद सहन करावा लागला.  सेन्सॉरशिपचा त्रास होत असे, अनेक चित्रपट डब्यात पडून रहात. मेंझेल म्हणतो की सेन्सॉरशीप ही राजकीय असते, कम्युनिष्टांची आणि नाझींची असते हे कुणी सांगितलं. सेन्सॉरशिप तर माणूस जन्मतो तिथंच सुरु होते. आईबाप, समाज आपल्याला सतत हे कर ते करू नको असं सांगत असतो.

मेंझेलं आपल्या चित्रपटातून याच सेन्सॉरशीपला वाकुल्या दाखवल्या. 

एक गंमत. 

डुंगरपूर नावाचा एक भारतीय चित्रपटवेडा मेंझेल यांच्यावर डॉक्युमेंटरी करायला झेकोस्लोवाकियात गेला. मेंझेल म्हणाला की माझ्यात डॉक्युमेंटरी करण्यासारखं काहीही नाही, मी अगदीच भरड माणूस आहे. डुंगरपूरला त्याच्या मुलाखती मिळतांना जड गेलं. पण मेंझेलचा अभ्यास करताना त्याला कळलं की झेकोस्लोवाकियात इतरही अनेक (Karel Lamač,Karl Anton,Svatopluk Innemann, Jan S. Kolár, Přemysl Pražský, Gustav Machatý, Martin Frič, Josef Rovenský) दिग्दर्शक होऊन गेले. त्यांचाही अभ्यास डुंगरपूरला करावासा वाटला. 

डुंगरपूर चार सहा महिन्यासाठी झेकोस्लोवाकियात गेला आणि साताठ वर्षं तिथं ये जा करत राहिला. इतक्या खटपटीनंतर तयार झालेली   डॉक्युमेंटरी आहे  ७ तास ३० मिनिटं लांबीची. २०१८ साली आम्ही ती मुंबईतल्या मामी उत्सवात पाहिली.

इतका दीर्घ पट एका बैठकीत पाहणं अशक्य असल्यानं दोन मध्यंतरं देण्यात आली, पाय मोकळे करण्यासाठी, चहापाण्यासाठी. डॉक्युमेंटरी  सकाळी सुरु झाली, संध्याकाळी संपली.

एकच शो झाला. आम्ही सुमारे ४० माणसांनी नेटानं ती पाहिली. डुंगरपूर उपस्थित होते. ती डॉक्युमेंटरी हाही एक स्वतंत्र विषयच आहे.

असो. 

तर असा हा यिरी मेंझेल. असा एक हिलॅरियस फिल्लमवाला.

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *