भीषण सत्ताकारण.

भीषण सत्ताकारण.

काबूल विमानतळावर दोन स्फोट झाले. त्यात साठेक माणसं मेली आणि सुमारे दीडशे जखमी झाली.

काबूल विमानतळाच्या  आसपास हजारो माणसं देशाबाहेर जाण्याच्या खटपटीत गोळा झाली होती, विमानतळावर  प्रवेश मिळेल, विमानात प्रवेश मिळेल, स्थलांतरीत होता येईल या आशेनं.

याच गर्दीत एक अब्दुल नावाचा माणूस होता.  दूरच्या हेलमांड प्रांतातून तो चंबुगवाळं आवरून काबूलमधे पोचला होता. त्याच्याकडं कागदपत्रं होती. गेली आठेक वर्षं तो ब्रिटीश फौजांना मदत करत असे.

त्याचं काम असं. दरी,पश्तू भाषेतील कागदपत्रं आणि संभाषणं अनुवादून ब्रिटीश फौजाना, अफगाण सैनिक व पोलिसांना  सांगणं. अब्दुल स्थानिक असल्यानं त्याला हेलमांड प्रांत खाचखळग्यांसह उत्तम परिचयाचा होता. त्यामुळं हेलमांडमधे प्रभावी असलेल्या तालिबाननं कुठं सापळे रचलेत, कुठं भूसुरुंग पेरलेत याचा पत्ता त्याला असे. ही माहिती फौजाना सांगणे आणि त्यांना वावरण्यास मदत करणं हे महत्वाचं काम अब्दुल करत असे. २०१२ पासून.

या कामाचे पुरावे आणि कागदपत्रं घेऊन अब्दुल विमानतळावर हजर झाला होता. गेलं वर्षभर त्याला कळत होतं की ब्रिटीश काढता पाय घेणार आहेत आणि आपल्या जिवाला धोका आहे. ब्रिटीशांचं संरक्षण गेलं की तालिबान आपल्याला ठार मारणार हे त्याला कळून चुकलं होतं. ब्रीटननं आपल्याला आश्रय द्यावा अशी खटपट तो करत होता. संबंधित कागदपत्रं त्यानं ब्रिटीश दूतावासाला सोपवले होते. परंतू निर्णय होत नव्हता.

अब्दुलचा एक नातेवाईक हेलमांडमधला मोठा तालिबान पुढारी होता. ब्रिटीश इंटेलिजन्सचं म्हणणं असणार की अब्दुल तालिबान संबंधित होता. आता पहा. अब्दुलचा नातेवाईक एक प्रभावी तालिबान पुढारी होता हे तर खरंच. पण त्यामुळंच तर अब्दुलला तालिबानबद्दलची बित्तंबातमी मिळत असणार आणि त्यामुळंच तर ब्रिटीशांना हेलमांडमधे सुखरूप राहून काम करता आलं असणार. नातेवाईकाबद्दलची माहिती पहिल्यापासूनच लपून राहिलेली नव्हती. ते सत्य माहित असूनही आणि माहित असल्यामुळंच  ब्रिटीशांनी अब्दुलचा वापर करून घेतला. स्थलांतराचा विषय आल्यावर ब्रिटीश म्हणू लागले की त्याची पार्श्वभूमी संशयाची, धोकादायक आहे.

याला काय म्हणावं.

असाच कोणी एक अहमद. हेलमांडचाच. त्याचाही स्थलांतराचा अर्ज ब्रिटीश अधिकाऱ्यानी नाकारला होता. त्यानं अपील केलं, खटपट केली आणि शेवटी त्याचा अर्ज मंजूर झाला. कागदं घेऊन अहमद काबूलमधे पोचला. मिनतवारीनं विमानतळावर पोचला. ब्रिटीश अधिकाऱ्यांनी कागदपत्रं तपासले आणि ते खोटे, फेक, आहेत असा निर्णय दिला, अहमदला ब्रीटनमधे स्थलांतरीत व्हायला नकार दिला.

अहमद गयावया करत होता. दररोज बायकापोराना घेऊन विमानतळावर जायचा. काबूलचं तपमान चढत होतं. पाणी आणि अन्नाचे हाल होत होते. त्याचा एक मुलगा आजारी झाला. काबूलला त्याचा जीव वाचवण्यासाठी काबूलमधेच कुठं तरी जाऊन उपचार करून घ्यावे लागले. दवाखाना आणि विमानतळ अशी येजा.

विमानतळावर स्फोट झाला. अब्दुल आणि अहमद यांचं काय झालं? ते आणि त्यांचं कुटुंबं सुरक्षीत आहेत? 

एक सप्टेंबरला अमेरिका सुटका मोहिम बंद करेल म्हणतंय. तालिबाननं जाहीर केलंय की एक तारखेनंतर ते अमेरिकन लोकांना आपल्या भूमीवर सहन करणार नाहीत. चारच दिवस उरलेत. 

अब्दुल, अहमद यांच्यासारखे किती तरी लोक विमानतळावर अजून आहेत. अब्दुल आणि अहमद अफगाण आहेत, पश्तू आहेत. तालिबान आणि ब्रिटीश-अमेरिकन, दोघांनीही त्यांना वाऱ्यावर सोडलंय.

अशीच आणखी एका माणसाची गोष्ट. उत्तर अफगाणिस्तानात एक न्यू यॉर्क टाईम्सचा पत्रकार बातमीदारी करत फिरत होता. एक अनुवादक आणि टॅक्सीचालक त्याच्यासोबत असत. 

ही २०१२ सालची गोष्ट. त्यावेळी अफगाणिस्तानात घनी यांचं सरकार काम करत होतं, त्या सरकारला अमेरिकेची भरभक्कम मदत होती. पण प्रत्यक्षात टाईम्सचा वार्ताहर फिरत होता त्या मझारे शरीफ इत्यादी भागात तालिबानचीच सत्ता चालत असे. मोठ्या शहराच्या अत्यंत सुरक्षीत भागात सरकारचं राज्य आणि उरलेल्या प्रांतावर तालिबानचं राज्य असे.

तालिबाननं बातमीदार आणि त्याला मदत करणाऱ्या दोघांचं अपहरण केलं. कित्येक दिवस या गावातून  त्या गावात फिरवत ठेवलं. जलालाबादला नेलं, नंतर तिथून  पाकिस्तानात पेशावरच्या आसपास कुठं तरी नेलं. तालिबानचे सर्व अड्डे आणि सुरक्षीत  जागा पाकिस्तानात होत्या, पाकिस्तान सरकार त्यांना पोसत असे.

तालिबान खंडणी मागत होतं. अपहरणातून मिळणारी खंडणी हे तालिबानचं उत्पन्नाचं एक महत्वाचं साधन होतं.टाईम्स खंडणी द्यायला तयार नव्हतं. टाईम्सनं अमेरिकन आणि अफगाण सरकारला धारेवर धरलं, त्यांच्या मागं धोषा लावला. पण काही उपयोग होईना.

तालिबान तिघांचाही छळ करत. शारीरीक आणि मानसीक त्रास देण्यासाठी खूप प्रभावी साधनं तालिबाननं शोधून काढली होता, त्याचा वापर तालिबान करत असे. 

काही आठवडे हा त्रास सहन केल्यावर एके दिवशी तिघंही पळाले. अमेरिकन पत्रकार कसाबसा काबूलला पोचला आणि अमेरिकेला परतला. बाकीचे दोघे अफगाण होते. ते आपापल्या घरी पोचले पण लपून छपून होते, तालिबान त्यांच्या मागावर होतं.

पैकी एकानं हुशारी करून अमेरिकेत प्रवेश मिळवला. पण अमेरिकेतही  तो सुखात नव्हता कारण त्याच्या कुटुंबाला तालिबान त्रास देत असे. त्यांच्याकडं खंडणी मागत असे. त्यानं आपली दोन मुलं आणि पत्नी अमेरिकेत आणली. उरलेला एक मुलगा आणि आईवडीलाना घेऊन  येण्यासाठी तो अफगाणिस्तानात गेला होता. त्याच्याकडं कागदपत्रं होती. अमेरिकेनं स्थलांतर सुरु केल्याकेल्या लगेच त्यानं  आई वडील आणि मुलगा यांना अमेरिकेत आणलं. अमेरिकेत परतल्यावर त्यानं हुश्श केलं. 

 त्याच्या बरोबर असलेल्या टॅक्सी चालकाचं अजून लपून छपून जगणं चालूच आहे. तालिबान त्याच्या मागावर आहे. त्याला बहुदा कागदपत्रं भेटली नाहीत. त्याचं काय होणार आहे ते कोणीच सांगू शकत नाही.

अमेरिकेनं युरोपीय देशांच्या मदतीनं अफगाणिस्तानावर  आक्रमण केलं, तिथं फौजा तैनात केल्या, तिथं राज्य केलं. हज्जारो स्थानिक लोकांची अमेरिका आणि ब्रीटनला मदत झाली. ही स्थानिक माणसं तालिबानच्या हिशोबात देशद्रोही आहेत.

अफगाणिस्तानातली करझाई, घनी यांची सरकारं भले अमेरिकेच्या मदतीवर चालली असतील. पण ती निवडणुकांमधून सत्तेवर आली होती. ती देशी सरकारं होती, ब्रिटीश राणीनं चालवलेली सरकारं नव्हती. तालिबान आणि ती सरकारं यांच्यात मतभेद होते. तालिबानला वाटे की ती सरकारं भ्रष्ट आहेत, नीट कामं करत नाहीत, अफगाणिस्तानचा विकास करत नाहीत. 

तालिबानला वाटे की त्या सरकारात पश्तू नसलेले हजारा, ताजिक, उझबेक इत्यादी लोकं आहेत. आणि एकाद दोन शियाही होते. मंत्रीमंडळात एक दोन स्त्रिया होत्या आणि लोकसभेतही काही स्त्रिया निवडून आल्या होत्या. पश्तू सोडता इतर लोकं, स्त्रिया, शियापंथीय हे लोक अफगाणच नाहीत असं तालिबानचं मत होतं.

तालिबानचं म्हणणं मान्य असलेलेच खरे अफगाण आणि बाकीचे सारे देशद्रोही असं तालिबानचं मत होतं.  सत्ताधारी माणसं, सत्ताधारी सरकारला मदत करणारी माणसं इत्यादी सर्व देशद्रोही आहेत आणि म्हणून ती जगायला लायक नाहीत असं तालिबाननं परस्पर ठरवलंय.

  तालिबान म्हणतं की ते सर्व अफगाणांना आपलंच मानतात, कोणाशीही सूडानं वागणार नाहीत.पण वागणं तर असं.

आपल्याला मान्य नसलेल्या राजकीय पक्षाशी संलग्न माणसं, आपल्याला मान्य नसलेल्या पक्षानं चालवलेल्या सरकारातली माणसं, देशद्रोही ठरवून त्यांचा काटा काढणं याला काय म्हणायचं? आपला धर्म, आपला पंथ श्रेष्ठ; इतर सर्व माणसं दुय्यम आणि जगण्याच्या लायकीची नाहीत;  या राजकीय आचाराला काय म्हणायचं? 

अब्दुल, अहमद व इतर सर्व मंडळी स्वतः पश्तू असतात. तरीही ती तालिबानला नकोशी होतात.

म्हणजे थोडक्यात असं की तुम्ही कोणत्याही धर्माचे, पंथाचे, भाषेचे, संस्कृतीचे,विचारांचे असा; तुम्ही सत्ताधारींसोबतच राहिलं पाहिजे.

कठीण आहे. उद्या तालिबानची सत्ता जाईल.नक्कीच जाईल. तालिबानेतर गट एकत्र येऊन तालिबानला हाकलून  देतील. त्यावेळी तालिबानच्या लोकांची हत्या करायची? 

आपल्याला सत्तेत पोचण्यासाठी जे लोक मदत करणार नाहीत; जे आपल्या विरोधात आहेत;जे आपले प्रतिस्पर्धी आहेत; त्यांना नेस्तनाबूत करायचं; ते आपले शत्रू म्हणून देशाचेही शत्रू.

याच दिशेनं अमेरिकेतलंही राजकारण ट्रंप आणि त्यांचे साथीदार नेताहेत. जगात बऱ्याच ठिकाणी तसा प्रवाह दिसतोय.

भीषण स्थिती आहे.

।।

Comments are closed.