माओ झेडॉंगच्या भीषण कारकीर्दीचं चित्रण

माओ झेडॉंगच्या भीषण कारकीर्दीचं चित्रण

World Turned Upside Down

यांग जिशेंग यांच्या  World Turned Upside Down या  नव्या  पुस्तकाची दखल पश्चिमी देशातली माध्यमं सध्या घेत आहेत. या पुस्तकात लेखकानं माओच्या १९६६ ते १९७६ च्या दरम्यान झालेल्या सांस्कृतीक क्रांतीवर सविस्तर लिहिलं आहे. 

माओच्या राजकीय जीवनातला पहिला टप्पा लाँग मार्चचा. खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्यांना संघटित करून माओनं चीनच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत दीर्घ यात्रा काढली. या काळात माओनं पक्ष संघटित करून देशभर पसरला. परिणामी माओ चीनचा नेता झाला.

दुसरा टप्पा होता चीनच्या झटपट आर्थिक विकासाचा. हनुमानासारखा सूर्य गिळायचा प्रयत्न माओनं केला. जगात कोणीही कल्पिल्या नव्हत्या अशा उत्पादनाच्या कल्पना माओनं केल्या. आर्थिक विकास ही एक दीर्घ काळात घडणारी प्रक्रिया असते वगैरे गोष्टी माओच्या डोक्यातच नव्हत्या. पी हळद आणि हो गोरी असं माओचं धोरण. १९५८ ते ६२ या काळात माओनं आर्थिक उलथापालथ घडवली. 

अन्नाचं उत्पादन वाढायला हवं. चिमण्या धान्य खातात. चिमण्या मारून टाकल्या तर धान्य वाचेल. माओनं आदेश काढला की दिसली चिमणी की मारा. एका झटक्यात चीनमधल्या चिमण्या गायब. एक वर्षं धान्य वाचलं. पण दुसऱ्या वर्षी टोळधाड आली. टोळ हे चिमण्यांचं भक्ष असतं.पण चिमण्या तर गायब. टोळांनी पीक फस्त केलं. चीनमधे धान्याचा भीषण दुष्काळ पडला.

उद्योग उभे करण्यासाठी पोलाद हवं. पोलादाचे कारखाने उभारणं हे काम झटपट होत नाही. कच्चं लोखंड गोळा करा, कोळसा गोळा करा, लोखंडांचं रूपांतर पोलादात करा आणि त्यानंतर पोलादातून उद्योग उभारा. त्याचं एक तंत्रज्ञान असतं, इंजिनियरिंग असतं. पण माओचा तर प्रोफेसर,इंजियनर इत्यादी बूर्झ्वा शहरी लोकांवर विश्वास नव्हता. माओ आणि कार्यकर्ते यांना विज्ञान माहित होतं.

माओच्या आदेशानुसार गावोगाव लोकांनी घरातल्या सर्व लोखडी वस्तू आणून गावठी भट्टीत टाकल्या.भांडीकुंडीही भट्टीत टाकली. त्यातून पोलाद थोडंच तयार होणार होतं. पण गावातले धातू मात्र संपले.

शेतीतल्या आणि उद्योगातल्या प्रयोगामुळे अर्थव्यवस्था कोलमडली, पावणेचार कोटी माणसं मेली.

हे दुसरं पर्व महाग पडलं. लोकंही नाराज झाले. पक्षात माओला विरोध होऊ लागला. हा विरोध मोडून काढण्यासाठी माओनं तिसरं पर्व मांडलं. हे तिसरं पर्व म्हणजेच सांस्कृतीक क्रांती. 

माओनं आपल्या विरोधकांचा काटा काढायचं ठरवलं. मध्यमवर्गी, सुखवस्तू,बुद्धीजीवी, तंत्रज्ञ, डॉक्टर इत्यादी सर्व मंडळी शोषक आहेत आणि समाजाची वाट लावत आहेत असं माओनं ठरवलं. या वर्गातल्या लोकांना धडा शिकवायचा. प्राध्यापक इत्यादीनी रस्ते तयार करायला लावायचे, खड्डे तयार करायला सांगायचे असं माओनं ठरवलं. लाखो शाळकरी मुलांना त्यांना या कामी कामाला लावलं.

मुलांनी माओचं रेड बुक हातात घेऊन वरील बूर्ज्वा आणि समाजविरोधी लोकांना घराबाहेर काढलं.ही माओची खाजगी सेना रेड गार्डस या नावानं ओळखली जाते. 

त्यांनी लोकांच्या गळ्यात ते समाजविरोधी असल्याचे बोर्ड टांगले. त्यांना कुदळी फावड्यांनी धोपटलं. जाहीरपणे त्यांची अवहेलना केली. प्रसंगी मुलानी आपल्या आई वडिलांनाही मारलं. समाजहितविरोधी ठरवल्या गेलेल्या माणसांची बायकामुलंही अवहेलनेतून सुटली नाहीत. छोटी छोटी मुलंही अमानुष वागत होती. छोट्या मुलांनी इतर छोट्या मुलांना फाडून मारल्याच्याही घटना घडल्या.

अनेक गावांत प्रेतांचा खच झाला, प्रेतं नदीत पोचली, नद्या फुगलेल्या प्रेतानी भरल्या. 

प्रकरण हाताबाहेर गेलं. तेव्हां सैन्याला हिंसा रोखण्यासाठी रस्त्यावर पाठवण्यात आलं. माओनंच तशी आज्ञा दिली की सैन्यानं माओला आटोक्यात आणण्यासाठी सैनिक पाठवले ते कळत नाही. पण परिणाम असा की सैन्य आणि रेड गार्ड्स यांच्यातच जुंपली. यादवीच्या उंबरठ्यावर देश होता.

घसरणीलाही एक मर्यादा असते, गाडं कुठं तरी थांबतंच. १५ लाख माणसांचा बळी घेऊन सांस्कृतीक क्रांती थांबली. माओला कसंबसं आवरण्यात आलं. 

प्रश्न होता की १५ लाख बळींचं खापर माओवर फोडायचं की नाही. तसं करणं म्हणजे माओ आपलाच नेता असल्यानं आपणही त्यात सहगुन्हेगार होतो असं मान्य करण्यासारखं होतं. त्यांनी वाट काढली. सांस्कृतीक क्रांतीचा हेतू चांगला होता, चांडाळ चौकडीनं क्रांतीची वाट लावली असं पसरवण्यात आलं. माओची पत्नी व इतर तीन जणांना सांस्कृतीक क्रांतीचा गैरवापर करण्यासाठी जबाबदार ठरवण्यात आलं.

झालं. माओची सुटका झाली.

यांग जिशेंग यांनी माओच्या आर्थिक उलथापालथीचा इतिहास २००८ साली टूंबस्टोन या पुस्तकात लिहिला. पुस्तक हाँगकाँगमधे प्रसिद्ध झालं. पुस्तकावर लगेच बंदी घालण्यात आली. पुस्तकाच्या भूमिगत प्रती चीनमधे पोचल्या, लोकांनी त्या लपवून छपवून वाचल्या.

त्यानंतर २०१६ साली लेखकानं प्रस्तुत पुस्तक रचलं. ते संपादित होऊन इंग्रजीत ते पुस्तक २०२०साली प्रसिद्ध झालं.

प्रस्तुत पुस्तकात लेखक चीनमधील माओची कारकीर्द सुरु होते तिथपासून चीनचा एक धावता धांडोळा घेतो. सांस्कृतीक क्रांतीपूर्व स्थिती, क्रांतीच्या काळात काय काय घडलं ते पुस्तकात मांडण्यात आलं आहे. सरकार, लष्कर, पक्ष, माओच्या जवळची माणसं आणि माओ यांच्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांची जोडणी पुस्तकात आहेत. माओची अधिकृत वचनं, आदेश, पक्षात झालेले निर्णय इत्यादींचे पुरावे लेखकानं मांडले आहेत. माओची कारकीर्द, कम्युनिष्ट पक्षाची काम करण्याची पद्धत इत्यादींचा अभ्यास करणाऱ्यांना संदर्भ म्हणून उपयोगी पडेल अशी माहिती पुस्तकात आहे.

लेखकाचा जन्म १९४० सालचा. लेखक बीजिंगमधेच रहातात. आर्थिक उलथापालथ  आणि सांस्कृतीक क्रांती, दोन्ही लेखकानं अनुभवल्या आहेत. लेखक पत्रकार होते, कम्युनिष्ट पक्षाचे सदस्यही होते. दोन्ही काळात माओनं काही वावगं केलं असं लेखकाला वाटलं नाही. लेखक म्हणतो की १९८९ मधल्या  तिएनानमेन आंदोलनानंतर त्याचे डोळे उघडले. कम्युनिष्ट पार्टी-सरकार लोकांना स्वातंत्र्य कसं नाकारतं याचा अर्थ लेखकाला तिएनाममेन चौकातल्या दडपशाही नंतर समजला. तिथून लेखकानं पुस्तकं लिहायला घेतली.

पुस्तकाच्या शेवटी लेखक लिहितो की चीनमधे विषमता, आर्थिक प्रश्न सुरवातीपासून होते, आजही आहेत. आजही लाखापेक्षा जास्त छोटीमोठी आंदोलनं होत असतात आणि सरकार ती दडपत असतं. राज्यकारभारात नागरिकाला स्थान नाही, नागरिकाला विचाराचं स्वातंत्र्य नाही, धोरणं ठरवण्यात सहभाग नाही ही चीनमधली गोची आहे. घटनात्मक लोकशाही नाही ही चीनमधली खरी अडचण आहे आणि ती अडचण केव्हां दूर होईल याची लेखक वाट पहातोय.

सत्ता हाती आल्यानंतर आकाशउडीच्या काळात पावणेचार कोटी माणसं माओनं मरू दिली, हवं तर मारली असं म्हणा. परंतू सांस्कृतीक क्रांतीच्या काळात दीड कोटी माणसं मात्र मारलीच. ते साल होतं १९७६. सांस्कृतीक क्रांतीच्या काळात सी जिन पिंग यांच्या वडिलाना, ते माओचे निकटचे सहकारी होते, माओनं छळलं. सी जिन पिंगनी ते सहन केलं, बंड केलं नाही, वेळोवेळी माओचं गुणगानच केलं.

माओचा कार्यकाळ संपल्यानंतर देंग यांचा कार्यकाळ सुरु झाला. त्या वेळी सी जिन पिंग हे पक्षाचे पुढारी होते.

देंग यांच्या काळात चीनची आर्थिक प्रगती झाली पण तरुणांना स्वातंत्र्य हवं होतं, लोकशाही हवी होती. विषमता शिल्लक होती, आर्थिक प्रश्न आणि असंतोषही होता. त्यातूनच १९८९ साली तिएनेमान घडलं. पण त्या प्रकरणात देंगनी ” फक्त दहा हजार ” माणसं मारली.

म्हणजे प्रगतीच म्हणायची.

२०१५ पासून सी जिन पिंग यांच्या कारकीर्दीत विषमता आणि आर्थिक प्रश्न शिल्लक आहेत आणि असंतोष वेळोवेळी उफाळून येतोय. चीनमधे आलबेल नाहीये. तरूण मुलांना आर्थिक विकासाबरोबरच स्वातंत्र्य हवंय. त्यांच्या परीनं सोशल मिडियाचा वापर करून ते संघटित रहातात, त्यांचं म्हणणं मांडत असतात. सी जिन पिंग त्यांना आटोक्यात ठेवायचा प्रयत्न करतात.

राजकीय, आर्थिक विषयाच्या हिशोबात चीनमधे कम्युनिझम शिल्लक नाही. सरकारच्या नियंत्रणातली मुक्त व्यवस्था असं चीनमधल्या राजकीय-आर्थिक व्यवस्थेचं वर्णन करता येईल. सत्तेची पकड, सत्तेवर एका माणसाची पकड, सत्तेपुढं समाजानं वाकलेलं रहायचं अशी परंपरा चीनच्या समाजात दिसते. त्यात फरक पडलेला दिसत नाही, विरोधकांच्या वाट्याला येणारं क्रौर्य मात्र कमी झाल्याचं दिसतंय

हाँगकाँगमधल्या लोकांची स्वातंत्र्याची मागणी सी जिन पिंग मान्य करत नाहीत.उईगूरमधल्या मुसलमानांवर अत्याचार होत आहेत. परंतू तिथं सी जिन पिंग यांनी नरसंहार केलेला नाही, तुलनेनं लोकांचा छळ कमी झालाय, तुलनेनं खूपच कमी माणसं त्यांनी तुरुंगात ढकललीयत.त्यामुळं लेखकाला आशादायी रहायला जागा आहे. 

।।

Comments are closed.