युक्रेन. इतिहासाच्या विकृत कल्पनांचा भीषण परिणाम.

युक्रेन. इतिहासाच्या विकृत कल्पनांचा भीषण परिणाम.

पुतीन काल परवापर्यंत भांडं लपवून ताक मागत होते. आता त्यांनी लपवलेलं भांडं पुढं केलं आहे. रशियन ड्यूमामधे (लोकसभा)   त्यानी तासभर भाषण केलं आणि युक्रेनवर हल्ला करायची परवानगी मागितली. भाषणात पुतीन म्हणाले की युक्रेन हा रशियाचा सांस्कृतीक, राजकीय, ऐतिहासिक भाग आहे, तो रशियापासून वेगळा केलेला आम्ही सहन करणार नाही, आम्ही युक्रेनवर ताबा मिळवणार. युक्रेन आमचाच आहे आणि तो आम्ही ताब्यात घेणार असं पुतीन यांचं अगदी स्वच्छ म्हणणं होतं.

रशियन लोकसभा ही पुतीन यांची खाजगी मालमत्ता आहे. तिथं पुतीन जे बोलतील त्याला होय म्हणायचं स्वातंत्र्य असतं.

  आता चित्र स्पष्ट झालेलं आहे. रशिया युक्रेनवर आक्रमण करणार. युरोपातले देश आणि अमेरिका यांनी त्यांना काय हवं ते करावं.

पुतीन यांनी पूर्व तयारी पार पाडली आहे. 

रशिया म्हणतय ” युक्रेनमधल्या डोनबास आणि लुगान्स्क या प्रांतातल्या जनतेवर युक्रेन अत्याचार करत आहे, कारण त्या दोन प्रांतांना युक्रेनमधून दूर व्हायचं आहे, रशियात सामिल व्हायचं आहे. डोनबासमधे युक्रेनचं सैन्य स्थानिक रशियन लोकांवर तोफगोळे डागत आहे. अशा परिस्थितीत त्या दोन प्रांतांच्या बाजूनं युद्धात उतरणं रशियाला भाग आहे. प्राप्त परिस्थितीत त्या दोन प्रांतांना स्वायत्तता-सार्वभौमत्व द्यावं अशी रशियाची मागणी आहे. त्यासाठी रशिया त्यांना आवश्यक ती सर्व प्रकारची मदत करणार आहे.”

त्या दोन्ही प्रांतांच्या हद्दीवर, म्हणजेच युक्रेनच्या हद्दीवर, लाखभर सैन्य रशियानं आधीच आणून ठेवलं आहे. कुठल्याही क्षणी ते सैन्य कूच करू शकतं.

युक्रेनला युद्ध नकोय. पण रशियानं युद्ध लादलं तर लढायची त्यांची तयारी आहे. युक्रेनला साह्य करण्यासाठी युरोपातले देश सज्ज झालेत. युकेनं लष्करी सामग्री देऊ केली आहे. त्यांनी दिलेल्या रणगाडे विरोधी अत्यंत कमी वजनाच्या खांद्यावरून वापरायच्या  तोफा गेले कित्येक दिवस माध्यमांना दाखवल्या जात आहेत. अमेरिकेनं सैनिक पाठवले आहेत. रशिया जितके दिवस ताणून धरेल तेवढे दिवस युरोप-अमेरिका युक्रेनला सैनिकी कुमक पुरवतील.

रशिया आणि नेटो अशा दोन्ही बाजूनी लढाईची सिद्धता झालीय.

अलीकडं लढाईची तंत्रं बदललीत. अमेरिकेनं ड्रोनचा वापर करून माणसं, विमानं, रणगाडे  नष्ट करण्याचं तंत्रं विकसीत केलंय. अग्नीबाण, ड्रोनमधून गोळीबार आणि बाँब टाकणं, ड्रोनना  सॅटेलाईट प्रणालीतून  जागा दाखवणं आता अमेरिकेला जमलं आहे. त्यामुळं रणगाडे आणि पायदळ न नेता अमेरिका युक्रेनमधली लढाई खेळेल.

दुसरं तंत्र आहे आर्थिक. अमेरिकेनं रशियावर आर्थिक निर्बंध, सँक्शन्स, लादले आहेत.युरोप, अमेरिका, युके या ठिकाणी चालणारे रशियन अर्थव्यवहार अमेरिकेनं गोठवले आहेत. लंडन हे रशियाच्या पैसे गुंतवणुकीचं एक प्रमुख केंद्र आहे.लंडनमार्फत रशिया त्यांचे जागतीक आर्थिक व्यवहार सांभाळतं. अनेक रशियन कंपन्या लंडनमधून जागतीक व्यवहार करत असतात. त्या कंपन्यांचे व्यवहार आता थंडावतील.

रशियाचं उत्पन्नाचं एक मुख्य साधन आहे तेल आणि नैसर्गिक वायूची निर्यात. अमेरिकेच्या निर्यातीमधे तेलवायू निर्यात ६० टक्के आहे आणि त्यातून मिळणारं उत्पन्न जीडीपीच्या ३० टक्के आहे. जर्मनीनं जाहीर केलं आहे की रशियातून येणाऱ्या तेलाचा आणि गॅसचा वापर जर्मनी करणार नाही. इतर युरोपीयन देशही रशियन तेलवायूवर बहिष्कार टाकायचं म्हणत आहेत. तेलवायूची निर्यात थांबली तर रशियन अर्थव्यवस्थेला फार मोठा दणका बसेल. 

पुतीन म्हणतात की निर्यात बंद झाली तरी त्यांचं बिघडत नाही. त्यांच्याकडं सुमारे ६०० अब्ज डॉलरचा साठा आहे. तेवढ्या पैशावर आपण बराच काळ तग धरू शकू असं पुतीनचं म्हणणं आहे.

दुसऱ्या बाजूला युरोपनं काटकसर करून, उर्जेचे पर्यायी मार्ग वापरून धकवून नेण्याची तयारी केलीय. आखाती देशातून आणि अमेरिकेतून वायूचे टँकर्स युरोपात पोचवण्याची व्यवस्था अमेरिकेनं केली आहे. त्रास होईल पण जितके दिवस रशिया तग धरणार म्हणतंय तितकेच दिवस युरोपही तग धरू शकेल असं युरोपीय देशांचं म्हणणं आहे.

 युद्ध आणि आर्थिक निर्बंध यांचा परिणाम जागतीक अर्थव्यवस्थेवरही होईल. तेलाच्या आणि वस्तूंच्या किमती आकाशाकडं झेपावतील.

 कोविडमुळं वाहतूक, मालाची ने आण आधीच कोसळली आहे. वाहतूक होत नसल्यानं मालाचं उत्पादनही कमी होतंय. त्यामुळं एकूणच अर्थव्यवस्था जगभर मंदावलेली आहे. त्यात या युद्धाची भर.

हे युद्ध रशियानंच उचकवलंय. युक्रेननं रशियाचं कोणतंही नुकसान केलेलं नाहीये की जेणेकरून रशियाला युक्रेनशी युद्ध करायची वेळ यावी. युरोपला तेल पुरवणारी पाईप लाईन युक्रेनमधून जाते. या पायपाचं भाडं युक्रेनला मिळतं, ते युक्रेनच्या जीडीपीच्या ४ टक्के इतकं आहे. ती पाईप लाईन कुठं कुठं तिला गळती असली तरीही ठीक चाललीय. युक्रेननं त्या लायनीवरून बखेडा केलेला नाहीये की पायपाचं जास्त भाडं मागितलेलं नाहीये.

रशियाचं दुखणं असं आहे की युक्रेन त्यांच्या बोळ्यानं दूध प्यायला तयार नाहीये. १९९१ साली सोवियेत युनियन फुटल्यावर युक्रेन स्वतंत्र झाला. पुतीन यांना ते दाचतय. स्वतंत्र झाल्यानंतर यथातथा अर्थव्यवस्था आणि भरपूर भ्रष्टाचार असलेल्या युक्रेननं स्वतंत्रपणे जगायचं ठरवलं. पश्चिम युरोपात जायचं नाही आणि रशियाच्याही ताटाखाली जायचं नाही असं सर्वसाधारण युक्रेनचं मत होतं. त्यामुळंच नेटो या रशियाविरोधी लष्करी संघटनेतही सामिल व्हायला युक्रेन तयार नव्हतं. युरोप, रशिया, चीन, अमेरिका अशा सर्वांशीच युक्रेननं सलोखा ठेवला होता.पण पुतीननी २०१४ साली क्रिमिया हा युक्रेनचा भाग गिळल्यावर मात्र युक्रेन रशियापासून दूर गेला आणि नेटोत सामिल व्हायचा विचार युक्रेन करू लागलं.

  युक्रेनच नव्हे तर इतरही १५ देश सोवियेत युनियनच्या बाहेर पडल्यामुळं रशिया अशक्त झाला आणि त्याची नाचक्की झाली असं पुतीन यांना वाटतं.त्यामुळं फुटून निघालेल्या देशांना काही तरी दणके द्यायचे आणि आपल्या सावलीत आणायचं असं पुतीन यांचं धोरण आहे. त्या देशात रशिया धार्जिणी सरकारं यावीत आणि त्यांचं लष्कर-अर्थव्यवस्था रशियाशी जोडली जावीत असं पुतीन यांचं मत आहे.

म्हणूनच जॉर्जियामधले दक्षिण ओसेशिया आणि अबखाजिया हे प्रांत पुतीन यांना जॉर्जियामधून तोडले, त्यांना स्वायत्तता दिली आणि त्यांना आपल्या गोठ्यात बांधलं. २०१४ साली पुतीननी युक्रेनचाच एक भाग, क्रीमिया, तोडला आणि आपल्या गोठ्यात बांधला. आता युक्रेनचे दोन भाग आणि खुद्द युक्रेनला खेचायचा पुतीन यांचा डाव आहे. पाठोपाठ बेलारूस आणि कझाकस्तानचाही नंबर लागेल.

हा सर्व उद्योग पुतीन का करताहेत?

एक तर ही त्यांची सणक आहे. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांच्या दंडुकेशाहीला विरोध करणाऱ्या रशियन जनतेला त्यांना रशियाचं गेलेलं बळ परत मिळवलं ही चाखी चघळायला द्यायची आहे. माणसं भावनाप्रधान असतात. पहा रशियाचं जुनं वैभव या माणसानं परत मिळवलं असं देशातली काही टक्के माणसं समजली की विरोधकांची गठडी वळायला पुतीन मोकळे होतील.  विरोध करणारी लोकं कसे पुतीन यांच्या गौरवशाली कामगिरीला विरोध करत आहेत असं दाखवून त्यांची टाळकी फोडणं पुतिनना सोपं जाईल.

पुतीनना त्यांची हुकूमशाही, क्रूर दंडुकेशाही, व्यक्तिगत साम्राज्य टिकवायचं आहे, बळकट करायचं आहे. त्यासाठी हा सारा खटाटोप चालला आहे.

पुतीनचं म्हणणं रशियानं आणि पुर्वीच्या रशियन साम्राज्यातल्या तमाम लोकांनी ऐकलं पाहिजे अशी पुतीन यांची खटपट आहे. रशियाचं गत वैभव, रशियन राष्ट्रवाद हा त्यांच्या हुकूमशाहीचा आणि खटाटोपाचा कणा आहे.

यासाठी जितकं जास्त रक्त सांडेल, जितक्या जास्त लोकांना जास्तीत जास्त त्रास होईल, जितका जास्तीत जास्त त्याग करावा लागेल, तितकं पुतीन यांचं यश झळाळेल.

पाहूया काय होतंय

।।

Comments are closed.