रविवारचा लेख. पेन्सिलवाला.

रविवारचा लेख. पेन्सिलवाला.

 पेन्सिली जमवणारा माणूस

अमेरिकेत आयोवा राज्यात कोलफॅक्स नावाचं एक गाव आहे. लोकसंख्या असेल दोनहजार बावीसशेच्या आसपास. येवढंसं ते गाव. त्यात एक कोलफॅक्स म्युझियम आहे.  

  गिनेस बुक ऑफ रेकॉर्डची दोन माणसं  गावातल्या म्युझियममधे पोचली. गावातले एक नागरीक एरन बार्थोल्मी (Aaron Bartholmey) यांनी जमवलेल्या पेन्सिली त्यांना पहायच्या होत्या, मोजायच्या होता.  पेन्सिली साठवण्याचा उच्चांक बार्थोल्मी मोडताहेत का याची तपासणी त्यांना करायची होती.

बार्थोल्मीनं घरात जमवलेल्या पेन्सिली ७५० खोक्यांत भरल्या आणि आपल्या कारच्या अनेक फेऱ्या करून  म्युझियममधे नेऊन ठेवल्या.

पेन्सिली मोजणीसाठी अख्खं गाव गोळा झालं होतं. गिनेसच्या पुस्तकात गावाचं नाव जायचं होतं ना. 

मोजणी झाली. सुरवातीला संख्या झाली ७० हजार. नीट खात्री करून घेण्यासाठी दुसऱ्यांदा झालेल्या मोजणीत संख्या ठरली ६९,२२५. गिनेस बुकच्या माणसांनी निश्चिती झाल्यावर अधिकृत जाहीर केलं.

२०२० सालचा २४,०२६ पेन्सिलींचा उच्चांक बार्थोल्मीनं मोडला होता.

बार्थोल्मी पहिलीत असताना त्यांच्या वर्गशिक्षिकेनं ख्रिस्तमसच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना पेन्सिली वाटल्या होत्या. बाईनी इतक्या प्रेमानं दिलेली पेन्सील वापरायची नाही, जपून ठेवायची असं ठरवून बार्थोल्मीनं न तासताच तशीच ठेवून दिली.  त्या दिवसापासून बार्थोल्मीना पेन्सिली जमवण्याचा नाद लागला. 

घरच्यांना वाटलं असणार की ही काय अडगळ हा मुलगा जमा करून ठेवतोय. कटकट केली असणार. आजोबाला नातवाच्या या छंदाचं कौतुक होतं. रविवारी आजोबा नातवाला चर्चमधे नेत. घरच्यांना वाटे की कसा आजोबा नातवाला बायबलबद्दल प्रेम लावतोय. खरी गंमत चर्च झाल्यावरच असे.   अँटिक वस्तू विकणाऱ्या दुकानात आजोबा नातवाला नेत. तिथं दोघं मिळून पेन्सिलींचा शोध घेत. आजोबा गावातल्या त्यांच्या वयाच्या लोकांकडं घेऊन जात. त्यात पेन्सिली जमवणारे काही आजोबा आणि काका भेटत. त्या नादिष्टांची एक संघटनाही आहे हे नातवाला कळलं. बार्थोल्मी त्या संघटनेत सामिल झाले.

संघटनेच्या बैठका होत. प्रत्येक माणूस आपण गोळा केलेल्या नव्या पेन्सिलींच्या गोष्टी सांगे. आपल्याकडं वरकड असलेल्या  पेन्सिलीतली एक दुसऱ्याला द्यायची, बदल्यात त्याच्याकडून आपल्याकडं नसलेली पेन्सील घ्यायची.

 टपाल तिकीटं, नाणी जमवणाऱ्या लोकांचीही अशी संघटना होती, त्या संघटनेचे सभासद या रीतीनं आपला संग्रह वाढवत असत.

बार्थोल्मी जुन्या बाजारात जाऊ लागले.

जुना बाजार हे एक मस्त प्रकरण असतं. जगात कुठल्याही गावात आणि शहरात जावं. तिथं जुना बाजार असतोच. कुठंही कोणीही विकायला काढलेली  कुठलीही वस्तू हे विक्रेते पडत्या भावात, किलोच्या भावात विकत घेतात. प्रत्येक वस्तूला कोणी तरी गिऱ्हाईक भेटतंच. विक्रेते भंगाराच्या दुकानात जाऊनही वस्तू विकत घेतात. पथारी पसरून किंवा एकाद्या दरवाजा नसलेल्या दुकानात या वस्तू ठेवतात. अशा दुकानात फेरी मारली की माणूस चक्रावून जातो. या जुन्या वस्तू घासून पुसून दुरुस्त करून घरात ठेवल्या जातात.

 मुंबईत एक चोर बाजार आहे. खरं म्हणजे तो जुन्या वस्तूंचा बाजार आहे. पण चोरलेल्या वस्तू त्या बाजारात पोचतात असं वाटल्यावरून त्या बाजाराचं नाव चोर बाजार असं पडलं. एकदा मुंबईच्या गव्हर्नरच्या कपाटातले कपडे चोरीला गेले होते आणि ते पोलिसांना या बाजारात सापडले होते.  

सांगलीत (खरं म्हणजे कुठल्याही गावात ) आठवडी बाजार भरतो. तिथं डाव्या बाजूला भाजी विक्रेता असतो, उजव्या बाजूला धान्याचा ढीग एकानं लावलेला असतो. मधेच एकानं सतरंजी पसरलेली असते.  सतरंजीवर पाच पन्नास वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली मासिकं आणि पुस्तकं असतात. भिजल्यामुळं कडा पिवळ्या झालेल्या. कव्हरं गायब. एक मासिक उचलावं. चाळावं. आपण पन्नास वर्षं मागं जातो. तिथं जुनी पेनंही पडलेली असतात. अजब दिसणारं पेन पण त्याचं निब गायब. 

अशाच बाजारात बार्थोल्मीला पेन्सिली सापडत.

माणसं जुनी घरं पाडून नवी घरं बांधतात. जुनं घर पाडताना त्यात जुन्या वस्तू सापडतात. त्यात असतात जुन्या लाकडी पेट्या. त्यात आजोबा पणजोबांनी वापरलेल्या पण आता नकोशा झालेल्या वस्तू असतात.त्यात जुन्या पेन्सिली निघतात. बार्थोल्मीना त्या मिळाल्या.  

साठवलेल्या प्रत्येक पेन्सिलीला एक इतिहास असे. संग्राहक तो  बैठकीत सांगत. काय मज्जा. अशा बैठकांमधेच साठवलेल्या पेन्सिलींची संख्या आणि उच्चांक असा विषय निघाला. २०१९ सालची गोष्ट. बार्थोल्मींना सुचवण्यात आलं की त्यांनी गिनेस बुकात जावं. गिनेस बुकवाले म्हणाले प्रत्येक पेन्सिलीचा रेकॉर्ड लिहून काढा.

कुठली पेन्सील केव्हां घेतली, किती पैसे मोजले, पेन्सिलिचं वैशिष्ट्य काय इत्यादी गोष्टी त्यांनी लिहायला घेतल्या.  नोंदी करायला दोन वर्षं लागली.

  काही पेन्सिली १९२६ सालच्या होत्या.  अमेरिकेच्या स्वातंत्र्याला १५० वर्षं झाल्याचं निमित्त साधून  त्या खास पेन्सिली काढल्या होत्या. 

दुसऱ्या महायुद्धाच्या काळातल्या पेन्सिली सापडल्या. अमेरिका  युद्धात पडल्यावर  देशभक्तीपर वाक्यं लिहिलेल्या, जय अमेरिका वगैरे, पेन्सिली बाजारात आल्या. अनेक पेन्सिली जाहीरात म्हणून काढण्यात आल्या, त्यावर  उत्पादनाचं, वस्तूचं नाव असे. 

एकेकाळी डायल फिरवून फोन करावा लागे. डायल बोटानं फिरवायच्या ऐवजी पेन्सिलीनं फिरवावी अशी कल्पना आली, त्यासाठी पेन्सिली झाल्या. 

पेन्सिलीच्या टोकाला खोडरबर चिकटवलेला असतो. धातूच्या पातळ पट्टीच्या पुंगळीत तो खोडरबर रोवलेला असे.युद्धाच्या काळात  शस्त्रं, विमानं इत्यादींसाठी धातूचा वापर होत असल्यानं  खोडरबर प्लास्टिक किंवा कार्डबोर्डच्या पुंगळीत असे. 

पेन्सिलीला आपण शिसपेन्सिल म्हणतो. पेन्सिल हा शब्द पेनिसिलियस या  लॅटीन शब्दापासून आला. लॅटिन शब्दाचा अर्थ छोटी शेपटी असा होता. उंटाच्या शेपटीच्या केसांचा ब्रश तयार करून त्याचा उपयोग लिहिण्यासाठी, चित्र काढण्यासाठी केला जात असे.

पेन्सिलीत शिसं नसतं. त्यातलं द्रव्य असतं ग्राफाईट. ग्राफाईटमधे चिकणमाती किंवा इतर द्रव्यं मिसळून ते ‘शिसं’ लिहायला सोयिस्कर ठिसूळ केलं जातं.

इसवी १५०० च्या आसपास ब्रीटनमधे खाणीतून ग्राफाईट काढलं गेलं, प्रचंड मात्रेत. त्याचा औद्योगीक वापर सुरू झाला. ग्राफाईटच्या कांड्या लिहिण्यासाठी वापरायची  आयडिया त्या वेळी आली. नुसत्या ग्राफाईट कांड्या वापरत.

१५ व्या शतकाच्या शेवटी इटालीत त्या कांड्या लाकडाच्या कांडीमधे भरून त्याची पेन्सील तयार झाली. 

पेन्सिलीच्या टोकाला खोडबरबर चिकटवण्याची सुरवात १८५८ साली अमेरिकेत झाली. लिपमन नावाच्या माणसानं रबर चिकटवला आणि या शोधाचं पेटंट घेतलं.

जगातली सर्वात मोठी पेन्सिल तयार केली आश्रिता फरमान या महिलेनं. या पेन्सिलीची लांबी २३ मीटर आहे, तिचं वजन ८२०० किलो आहे आणि पेन्सिलीतल्या शिशाचं (ग्राफाईट) वजन आहे २००० किलो. ही पेन्सील तयार करायला तीन महिने लागले. २००७ साली तयार केलेली ही पेन्सील त्या बाईंनी चिन्मयानंदांना अर्पण केलीय.

बार्थोल्मीली नक्कीच वाटलं असणार की ती पेन्सील आपल्या संग्रहात असावी. पण जे अमळ कठीणच होतं. कारण त्या पेन्सिलिची किमत फार आणि ठेवायला एक स्वतंत्र इमारतही हवी.

असो.

तर असा हा  नादिष्ट बार्थोल्मी. 

।।

Comments are closed.