रविवारचा लेख राजपुत्र, वेटरचं काम करतोय

रविवारचा लेख राजपुत्र, वेटरचं काम करतोय

 तुमच्या पायाला भिंगरी असेल आणि तुम्ही मळलेल्या वाटा टाळून भटकणारे असाल; तर एकादे वेळेस स्पेनच्या ईशान्य भागातल्या LA BISBAL D’EMPORDÀ या गावात जाल. हे गाव फ्रान्सच्या हद्दीजवळ आहे. गावाची वस्ती सुमारे १० हजार आहे.या गावाला माद्रीद, बार्सेलोना या शहरांसारखी कीर्ती नाही, पर्यटक तिथं जात नाहीत.  

तिथं El Drac या बारमधे तुम्हाला एक मिस्टर सोला नावाचा वेटर भेटेल. आदबीनं तो तुम्ही मागवलेली वाईन किंवा व्हिस्की तुमच्या टेबलावर आणून ठेवेल. कुठल्याही वेटर सारखा वेटर. काउंटवरचा माणूस हळूच सांगेल की तुम्हाला ज्यानं मद्य टेबलावर आणून ठेवलं तो एक राजपुत्र, युवराज आहे. तो स्पेनच्या राजाचा मुलगा आहे. स्पेनच्या राजाचा अनौरस मुलगा. 

तो आपणहून त्याची कहाणी सांगेल.

‘ स्पेनचे राजे जुआन कार्लोस यांचा मी मुलगा आहे.’ सोला सांगेल.

‘ ती एक मोठ्ठी गोष्ट आहे. माझा जन्म आहे १९५६ सालचा. राजे जुआन कार्लोस यांच्या एका मैत्रिणीच्या पोटी मी जन्मलो. स्पेनमधे हा प्रकार नवा नाही. ही स्पेनमधली एक वहिवाटच आहे म्हणा ना. लग्नाबाहेरचे संबंध.त्या काळात हजारो मुलं अशा रीतीनं जन्मली. प्रेम प्रकरण म्हणा किंवा आणखी काही म्हणा. लोकांना अशी मुलं होतात.  ही माणसं दूरवरच्या एकाद्या माणसाला काही पैसे देतात, मूल त्याच्याकडं सोपवून परागंदा होतात. श्रीमंत असेल तर जास्त पैसे देतो. किंवा दरमहा काही रक्कम देण्याची सोय करतो.

बार्सेलोनापासून दूरवर असलेल्या एका बेटावरच्या युलैला मेरी या स्त्रीकडं मला सोपवण्यात आलं. तिला दरमहा ३०० पेसेटा पोचवले जात. त्या काळात हे पैसे म्हणजे फार होते. 

मी पाच वर्षाचा झालो तेव्हां मला बार्सेलोनात पाठवण्यात आलं. बार्सेलोनातलं माझं घर खूप मोठं होतं. मोठी बाग होती. शिकवण्यासाठी एक शिक्षक दररोज येत असत. एक वृद्धशी स्त्री मला नेहमी भेटायला येत असे. माझ्यासाठी खेळणी आणत असे. खेळणी खूप किमती असत, महाग असत. मला वाटतं की ती माझी आजी होती. 

दोनेक वर्ष मी तिथं होतो. नंतर मला उचलून गिरोना या उत्तरेतल्या एका गावात नेण्यात आलं. तिथं मला सोला नावाच्या एका गरीब शेतकऱ्याकडं सोपवण्यात आलं. तोच माझा पोषणकर्ता बाप झाला, त्याचंच नाव मला मिळालं. एके दिवशी कोणी तरी गृहस्थ आले आणि मला एक भारी मोटारसायकल आणि एक भारी कार देऊन गेले. त्या गावात असली कार कोणी पाहिली नव्हती. कोण तो माणूस? त्यानं कां माझ्या गरीब शेतकरी बापाला कार द्यावी?

तेव्हांच मला जाणवलं की मी कोणी सामान्य मुलगा नाही, माझ्यात काही तरी विशेष आहे. 

शाळा आटोपली. मला सक्तीच्या  लष्करी सेवेत जावं लागलं.  तिथंही मला वेगळ्या रीतीनं वागवलं जात असे, मला शिस्तीचा जाच नव्हता. मला ढील दिली जात असे. 

माझी ने आण करण्यासाठी  सरकारी अधिकारी येत असत. मला आश्चर्य वाटे की सरकारी अधिकारी माझी सरबराई कां करतात. मी तसं त्यांना विचारे. मला ते सांगत की मी एका मातबर कुटुंबातला आहे.  कुटुंब कोणतं ते मला सांगितलं जात नसे.

मी सरकारी कचेऱ्यांत जाऊन रेकॉर्ड तपासण्याचा प्रयत्न केला. मुलं   दत्तक दिली जात तेव्हां त्यांचं रेकॉर्ड ठेवलं जात असे. माझं रेकॉर्ड काही मिळत नव्हतं. शेवटी मी एका कोर्टात गेलो, न्यायाधिशासमोर उभा राहिलो, मी कोण आहे ते सांगा असं म्हणालो.

जज म्हणाले की मी राजे जुआन कार्लोस यांचा मुलगा आहे. मला जन्म दिला तेव्हां जुआन कार्लोस युवराज होते. कार्लोस राजे झाले तेव्हां त्यांना माझा मुलगा म्हणून स्वीकार करणं त्रासाचं होतं.

माझी बडदास्त कां ठेवली जात होती याचा खुलासा झाला.

 मी राजे कार्लोस यांना पत्रं लिहिलं; माझा स्वीकार करा, मला युवराजाचा दर्जा द्या अशी मागणी केली. माझी डीएनए टेस्ट करा असं मी लिहिलं. राजांकडून उत्तर आलं नाही, माझी डीएनए टेस्ट झाली झाली नाही.

मी अनौरस जीवन जगतोय. वेटरचं काम करतोय. खूप लोक मला भेटतात. पत्रकार माझी मुलाखत घेतात. 

पण त्याचा काय उपयोग? मी एक युवराज, वेटरचं काम करतोय.’

राजे जुआन कार्लोस गादीवर आले आणि त्यांचे आर्थिक गैरव्यवहार गाजू लागले. त्यांनी घेतलेले राजकीय निर्णय वादग्रस्त ठरले. ते २०१४ साली देश सोडून अरब अमिरातीत परागंदा झाले. नंतर तिथून ते अमेरिकेत गेले. अमेरिकेत ते अज्ञातवासात जगत आहेत. ते सोलाला दाद देत नाहीयेत.

सोला आशावादी आहे. 

झगडा करून युवराजपद मिळवण्याची एक घटना पूर्वी घडलेली आहे.

  Leonardo de Borbon या माणसानं भांडून युवराजपद मिळवलं. लिओनार्दो हा स्पेनच्या १३ वे राजे अल्फोन्सो यांचा मुलगा. राजाचे Carmen Ruiz नावाच्या एका अभिनेत्रीबरोबरोबर प्रेमसंबंध होते, त्यातून त्याना लिओनार्दो झाला होता. सोला प्रमाणंच लिओनार्दोलाही एका कुटुंबात पाठवून देण्यात आलं होतं. 

लिओनार्दो जिगरबाज निघाला. त्यानं The Royal Bastard हे पुस्तक लिहून आपली कहाणी जगासमोर मांडली आणि आपला हक्क मागितला. राजानं तो मान्य केला, लिओनार्दो युवराज झाला.

Ingrid Sartiau या बाईंनीही युवराज्ञीपद मिळवलंय. सोलाच्याच वडिलांपासून म्हणजे जुआन कार्लोसपासून तिचा जन्म झाला पण तिची आई वेगळी होती. म्हणजे ती सोलाची सावत्र बहीण ठरते. ती बेल्जियन आहे. तिनं बेल्जियममधे  जेनेटिक तपासणी करून घेतली. त्या तपासणीत ती जुआन कार्लोसची मुलगी ठरली.

सोलाची डीएनए तपासणी करायला जुआन कार्लोस तयार नाहीत.

सोला अजूनपर्यंत तरी अभागीच राहिलाय.

वेटरचं काम करतोय. 

पत्रकार येतात.मुलाखती घेतात. जातात. सोला जिथल्या तिथं.

।।

Comments are closed.