रविवार/ बोटीवर हौसमौज

रविवार/ बोटीवर हौसमौज

अमेरिकेतल्या मायामीमधल्या एका बंदरातून एक बोट हौशी प्रवाशांना घेऊन निघालीय. या बोटीचं नाव आहे आयकॉन ऑफ सीज. समुद्र भूषण.

ही बोट ३६५ मीटर लांबीची आहे. बोटीवर २० डेक्स म्हणजे मजले आहेत. सर्वात वरच्या डेकवर म्हणजे गच्चीवर वेगवान गाड्यांची शर्यत खेळता येते. बोटीवर फूटबॉल खेळता येतील अशी मैदानं आहेत, ६ स्विमिंग पूल आहेत, १७ मीटर उंचीचा एक धबधबाही केलेला आहे. उंचावरून पाण्यात उतरण्यासाठी केलेल्या ६ घसरगुंड्या आहेत,  चित्रपटांसाठी आणि संगीत जलशांसाठी सिनेघरं आहेत, गोल्फ कोर्स आहे, ४० रेस्टॉरंट्स आणि बार आहेत.

या बोटीवर एका वेळी सुमारे १० हजार प्रवासी मावतील. म्हणजे एक छोटं शहरच. बोटीवरच्या लोकांची सेवा करण्यासाठी २६५० माणसं बोटीवर काम करतील.

टायटॅनिक बोट हिमनगावर आपटून बुडल्याचा  सिनेमा आपण पाहिलाय.  ती त्या काळातली सर्वात मोठी क्रूझर बोट होती. तिचं वजन होतं २१ हजार टन. आयकॉनचं वजन आहे २.५ लाख टन.

बोट अमेरिकेतून निघालीय.  लवकरच ती सिंगापूरला पोचेल. सिंगापूरमधले लोक तिच्यावर तीन ते आठ दिवस रहायला जातील. त्यांना घेऊन ही बोट सिंगापूर, मलेशियाच्या किनाऱ्यांवर जाईल. प्रवासी तिथं काही स्थळांना भेटी देतील. दिवसा स्थळांना भेटी, रात्री बोटीवर परत. स्थळं पहायची नसतील तर बोटीवरच थांबतील. फूटबॉल. स्विमिंग. बोटीतल्या पाण्यात विहार. बोटीवरच तयार केलेल्या धबधब्याखाली स्नान.कार रेसिंग. गोल्फ. सिनेमा. बार, जगभरातल्या नऊशे डिशेसचा स्वाद वगैरे वगैरे.

भारतातही ती बोट येणार आहे. ती मुंबईत येईल. मग गोव्याला जाईल. नंतर केरळातल्या एकाद्या बंदरात जाईल.नंतर मद्रासमधे जाईल. भारतभरचे लोक मुंबई, गोवा इत्यादी ठिकाणी बोटीवर चढतील. प्रवास करतील.  स्थळं पहातील की नाही माहित नाही पण बोटीवर रहातील.

बोटीचं तिकीट किती?

सिंगापूरचा एक रात्रीचा तिकिटाचा दर सुमारे १६२५ डॉलर असेल. म्हणजे सुमारे १ लाख ३५ हजार रुपये. 

हा सुरवातीचा दर झाला. त्यावर कर बसतील. सोळाशेतली खोली सामान्य खोली असेल. त्यापेक्षा मोठी आणि मौल्यवान खोली घेतलीत तर दोन हजार होतील, तीन हजार होतील, मोठा स्वीट घेतलात तर पन्नास हजारही होतील. हे पैसे केवळ रात्री अंथरुणाला टेकण्याचे आणि टॉयलेट वापरण्याचे. त्यानंतर खेळायला गेलात तर वेगळे पैसे. स्विमिंग पूलमधे गेलात तर चड्डीचे वेगळे पैसे. बारमधे गेलात की मेलातच. अशा अशा एकेक भारी दारवा मिळतील की दोन दिवसांत तुमची आयुष्याची कमाई संपून जाऊ शकेल. अनंत ॲक्टिविटीज. 

मायामीतल्या गोदीमधे अशी ७५ जहाजं तयार होणार आहेत. 

भारतात तीस लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांची संख्या आहे ५ कोटी ६० लाख. ५० लाख उत्पन्न असणारी माणसं आहेत ५० लाख. १ कोटी उत्पन्न असणारी आहेत १० लाख. यातली बरीचशी मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपुरात आहेत. यातलीच माणसं आयकॉन ऑफ सीजवर जाणार.  

खरं म्हणजे या बोटीवर मिळणाऱ्या सर्व ॲक्टिविटीज आणि बहुतेक   चैनी भारतातल्या मोठ्या शहरांत किंवा शहरांच्या आसपास  उपलब्घ आहेत. पब्ज आहेत, डिस्को आहेत, जगातल्या सर्वोत्तम दारवा भरपूर उपलब्ध आहेत, पंचतारांकित सोयी आणि चैनी आहेत. बरं या लोकांनी गोवा आणि तत्सम ठिकाणंही अनेक वेळा पाहिलीत. तरीही क्रूझवर जायची गरज काय?

हां. आहे गरज.

या लोकांच्या वर्तुळातली कोणी तरी महिला अमेरिकेत किंवा युरोपात गेली असताना अशा क्रूझवर जाऊन आलेली असते. एका लग्नाच्या मेहंदीत आणि संगितात ती या क्रूझची अद्भुत कहाणी लग्नावळीत इतरांना सांगते. थ्रिल.   नवरा आणि कुटुंबियांत विषय पोचतो. झालं.  क्रूझवर जाणं हा प्रतिष्ठेचा प्रश्न होतो. 

मारुतीच्या बेंबीत बोट घालायलाच हवं.

 शाळा. एका मुलाचे वडील प्रख्यात सिनेनट. दुसऱ्या मुलाचे वडील उद्योगपती. तिसऱ्याचे वडील प्रख्यात वकील. चौथ्याचे प्रख्यात डॉक्टर. पाचव्याचे मुख्यमंत्री. सहाव्याचे पोलीस कमिशनर. मुलांना नाईलाजानं मुंबईतल्या शाळेत शिकावं लागतं कारण अजून अमेरिकेच्या शाळेत जाणं सुरु झालेलं नाही.  शाळा आटोपली रे आटोपली की त्यांना शिक्षणासाठी अमेरिका, युरोप गाठायचं असतं.

या शाळेतला एक मुलगा क्रूझवर गेलेला असतो. तो त्याचं वर्णन आपल्या शाळेतल्या सवंगड्यांकडं करतो. सवंगडी घरी डायनिंग टेबलवर आपल्या आईवडिलांना सांगतो ‘वर्गात माझे मित्र माझी टिंगल करतात. ते क्रूझवर गेले होते आणि मी मात्र फक्त कुलु मनाली पॅरिस लंडनला गेलो होतो.’

शाळेत क्रूझची क्रेझ असते.

घरात लग्न निघालेलं असतं. चांदीच्या करंडकात चीनमधे छापलेली लग्न पत्रिका लोकाना वाटून झालेली असते. लग्नाचा विधी विमानात करायचं ठरलेलं असतं. विमानाची अंतर्गत रचना तशी करून घेतलेली असते. मुंबईत नवरा नवरी आणि मंडळी विमानात बसतात, जॉर्डनच्या विमानतळावर विमान उतरतं तोवर सात फेरे झालेले असतात. हनीमून कुठं? ठरलंय. क्रूझवर. क्रूझच्या विसाव्या मजल्यावरच्या खास स्वीटमधे.

एके काळी विवेकानंद बोटीनं (क्रूझनं नव्हे) अमेरिकेतून भारतात परतले. तिथं बोटीवर   त्यांना भाभा भेटले. तिथंच बंगलोरच्या इन्सटिट्यूट ऑफ सायन्सची कल्पना जन्मली. लेखक, विचारवंत लोक बोटीवर जात कारण बोटीवर त्यांना निवांतपणा मिळत असे. वर आकाश, खाली पाणी, कसला म्हणून त्रास नाही, शुद्ध हवा. उगवत्या आणि मावळत्या सुर्याकडं पहात विचार करत बसा, आपल्या आवडत्या गोष्टीचा स्वाद घ्या.

 बोटीवर चार दिवस व्यतित करायचे. जसे एकाद्या हिल स्टेशनवर किंवा समुद्राकाठी व्यतीत करायचे. दैनंदीन दगदग आणि कटकटीपासून काही काळ दूर रहाणं.  स्वतःत रमायला, कुटुंबियांसोबत-मित्रांसोबत गुजगोष्टी करायला वेळ मिळतो.

इथं भलतंच. चार दिवसाचे तास ९६. यातले २८ तास नाईलाजानं झोपण्यात घालवावे लागतात. ८  तास संडासमार्जन इत्यादीत जातात. म्हणजे ६० तास मिळतात. त्यात दर तासाला इथं जा, तिथं जा, हे बघ, ते खा. जहाजावरून उतरून या ठिकाणी जा, त्या ठिकाणी जा.  

अलीकडं महाबळेश्वर, लोणावळा, नैनीताल वगैरे ठिकाणी हवा खायला किंवा हवापालटीसाठी जायचं नसतं. तिथं खेळ, दारू, पार्ट्या, कधीही न वापरल्या जाणाऱ्या वस्तू विकत घेणं. तिथं घोड्यावर, उंटावर, गाढवावर फिरायचं. आराम नसतो, खूप दगदग असते. प्रकृती सुधारणं नसतं, प्रकृती बिघडवणं असतं. हल्ली तिथं ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी मिळत नाही. पंधरा धान्य एकत्र केलेली भाकरी असते. केळं दुधात चुरडून खाल्लं जात नाही. महाग एटू गाईचं दूध, केशर, वेलची, चारोळ्या, काजू, बदाम, इत्यादी. खिसा आणि पोट, दोन्हीही फाटायचं.

क्रूझवर रहायचं, तीन दिवसात नऊ स्थळं पहायची; पासस्ठ पदार्थ खायचे. घरी जमत नाही म्हणून दररोज एक तास योगाचा क्लास. घरी जमलं नाही म्हणून दोन तास चित्रकलेचा क्लास. घरी जमलं नाही म्हणून दोन तासात भारतीय क्लासिकल संगिताचा क्लास. मानसीक स्वास्थ्य दुरुस्त करण्यासाठी मेडिटेशन.

सात दिवसांच्या टूरमधे  नऊ देश पहातात तसंच. आज लंडन, उद्या पॅरिस, परवा ॲमस्टरडॅम, तेरवा व्हेनीस, नंतर रोम, नंतर आणखी कुठे तरी, नंतर आणखी कुठे तरी. विमानातून बसमधे, बसमधून हॉटेलमधे, हॉटेलमधून बसमधे,पुन्हा बसमधे. बहुतेक वेळ वहानात. काही मिनिटं एकादी ऐतिहासिक इमारत. तेवढ्यात जेवायची वेळ होते. खास मराठी जेवण देतात राव. त्यासाठी खास मराठी शेफ नेलेले असतात राव. श्रीखंड, बाकरवड्या, खास मराठमोळी पिठलं वगैरे. हजारो मैलावर जाऊन घरचं खाणं मिळतं. काय ग्रेट राव, काय ग्रेट बाई.

 लंडन, पॅरिस, रोम इत्यादी शहरांना उभं रहायला किमान हजारभर वर्षं लागलीत. तिथं एकेक इमारत नीट पहायची तर महिना पुरणार नाही अशा असंख्य इमारती. एकेक म्युझियम पहायचं तर वर्ष पुरणार नाही अशी म्युझियम. पेंटिंग्ज. प्रयोगशाळा. युनिव्हर्सिट्या. ते सारं फक्त नऊ दिवसात, फक्त साडेचार लाखात. किती छान.  

पाच देश पाहिलेत तर इतके पैसे. सात देश पाहिलेत तर दहा टक्के डिसकाऊंट. नऊ देश पाहिलेत तर पर्यटकाला एकेक अमेरिकन सूटकेस देणार. हप्त्यानं पैसे दिलेत तरी चालेल. मोना लिसा पहा, आयफेल टॉवर पहा, पिसाचा कलता मनोरा पहा, स्विस बर्फ पहा. परतल्यावर नकाशात ही सारी ठिकाणं कुठं आहेत असं मात्र विचारू नका.

  समुद्र भूषण नावाचं जहाज निघालय अमेरिकेतून. 

तेल आणि गॅस जाळत ते फिरणार. समुद्रावर असलेल्या शुद्ध हवेत प्रचंड कार्बन डाय ऑक्साईड सोडणार. अशी आणखी साताठ जहाजंही निघत आहेत. दोन वर्षात अशी ७५ जहाजं जगभरच्या समुद्रावर सीओटू पसरवत फिरतील. तुमच्या सुखासाठी. सुखाचं तीन दिवसांचं, आठ दिवसांचं, पंधरा दिवसांचं कॅप्सुल. फक्त काही लाख रुपयात. त्वरा करा. उशीर केलात तर कॅप्सुल महाग होईल. 

चला. निघा.

।।

Comments are closed.