सत्यशील देशपांडे यांची मैफिल

सत्यशील देशपांडे यांची मैफिल

सत्यशील देशपांडे यांनी ग्रंथालीच्या वाचक दिनासाठी जमलेल्या  श्रोत्यांपुढं संगितातील सौंदर्यस्थळं सादर केली. मागे एकदा  त्यांनी पुलंच्या साहित्यातील संगीत असा विषय मांडला होता. 

सत्यशील देशपांडे अनेक अंगांनी संगिताला भिडतात, संगिताच्या अनंत पैलूंचा माग काढतात. अनेक नामांकित गायकांचं गाणं त्यांनी ऐकलंय, त्यांच्याशी संगित या विषयावर ते बोललेत आणि कित्येक म्हणजे कित्येक तासांचं संगित त्यांनी साठवून ठेवलं आहे. 

Satyasheel Deshpande, Indian Classical Vocalist

विषय मांडत असताना ते बोलतात आणि गातात.

एक मार्मिक वाक्यं  सत्यशील देशपांडे उद्गारले.  बॅले हे नृत्य करता येण्यासाठी जिम्नॅस्टिक्स/ॲक्रोबॅटिक्स  यावं लागतं,  जिम्नॅस्टिक्स/ॲक्रोबॅटिक्स म्हणजे बॅले नव्हे.

संगिताची आठ अंगं मानली जातात. ताल, लय, सरगम, तान  इत्यादी. ही आठ अंगं एकत्र केली म्हणजे संगित होतं असं काही लोकं मानतात.देशपांडे खुबीनं दाखवतात की गोळा केलेली अंगं म्हणजे गाणं होत नाही. संगितात आठ अंगं असतील पण सौंदर्य असेलच असं सांगता येत नाही. 

  सौंदर्य ही गायकाची स्वतंत्र निर्मिती असते. ती गायकाच्या प्रतिभेतून जन्मते. कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर , गाण्यात अशा काही जागा घेतात ज्या अंगांच्या गणितात बसतीलच असं नाही. आरोलकर बुवांच्या गायकीचा उल्लेख देशपांडे यांनी केला.  

 प्रत्येक बैठक हा एक स्वतंत्र प्रयोग प्रयत्न असतो. गायकाच्या डोक्यात काही तरी असतं. रागातले सूर तर ठरलेले असतात पण त्या सुरांची तालात गुंफण करताना गायक काही तरी धुत्रुम करतो. सुरातलं अंतर वाढवतो कमी करतो, गती कमी करतो वाढवतो.कधी नुसते सूरच. कधी वळणं, कधी सरळ रेषा.  काही तरी भानगड करून ठेवतो. ऐकणारा ऐकताना थरारून जातो. तो थरार पुन्हा कधी येत नाही. पुन्हा येतो तो थरार नवा असतो, नवी रचना असते. सोंदर्याच्या नव्या जागा.

भीमसन जोशींचे  एक शिष्य म्हणाले की भीमसेन जोशींनी पाच हजार मालकंस गायलेत. मालकंसाची चौकट ठरलेली असते पण भीमसेन जोशी प्रत्येक वेळी काही तरी धुत्रूम करून नवाच मालकंस मांडतात.

कोणी नुसत्या तालाशी  खेळेल, कोणी नुसत्या ताना घेईल. प्रतिभावान गायकाच्या डोक्यात काय असेल ते सांगता येत नाही. प्रतिभावान गायक स्वतःच्या डोक्यानं गातो. त्याचं गाणं नियमात बसवण्यासाठी निर्मिलेलं नसतं. 

श्रोत्यांना विशिष्ट प्रकारची गाणी आवडतात. सवयीनं. श्रोत्यांच्या जगण्यात संगित हा एक विरंगुळा, रंजन असतं, इतर अनंत भानगडींच्या घालमेलीत गाणं ही एक घालमेल असते. त्यातूनच त्याची आवड तयार होते. 

बाजारात वावरणारे एकादा साचा करतात;  साच्यात वस्तू घालायच्या आणि माणसाला द्यायच्या.  साचा जेवढा जास्तीत जास्त काळ चालेल तेवढा उत्पादकाचा फायदा. नवा साचा काढायचा म्हणजे वेळ खर्च करावा लागतो, बुद्धी गुंतवावी लागते. पुन्हा नवी वस्तू  खपण्याची खात्री नसते.  त्यापेक्षा लोकांना आवडलेली वस्तू व साचा वापरत रहाणं फायद्याचं.

गायक साचा तयार करतात. साच्यातून काढलेली गाणी खपतात, लोकांना आवडतात. गायक आणि लोकांची अभिरुची त्यातून तयार होते. साच्यातली गाणी चांगलीही असतात. पण शेवटी तो एक साचलेला जलाशय असतो. तो प्रवाही नसतो.

कला निर्मिती प्रवाही असते म्हणजे काय असतं याचं विवेचन सत्यशील देशपांडे त्यांच्या भाषणात करतात. प्रवाही गायक आपल्यासमोर ठेवतात.

सत्यशील देशपांडे चौफेर विचार करतात. ते गाणी ऐकतात आणि सिनेमे पहातात. ते गाणी ऐकतात आणि नाटकं पहातात. ते गाणी ऐकतात आणि कविता कादंबऱ्या वाचतात. अभिव्यक्तीचे सर्व कलाविष्कार ते अभ्यासतात, त्या सर्वांतल्या सौंदर्याच्या जागा  ते  शोधतात.  ते गायन, संगित याच्या खूप पलिकडं जाऊन विचार करतात.

अष्टांग हा विषय संगित शिक्षणात मांडला जातो. एक झटपट शिक्षण.  संगिताला शिक्षणक्रमात बसवलं की झपाट्यानं प्रसार होतो.  शाळांचा फायदा,   पाचपन्नास मुलं या गल्लीत, पाच पन्नास त्या गल्लीत, शेसव्वाशे या गावात, हजार पाचशे त्या शहरात. प्रत्येक अंगाचा एक धडा की झालं पाठ्यपुस्तक तयार. होते प्रश्नपत्रिका तयार. मुलांच्या वहीत चौकट लिहिलेली असते, गायक लिहिलेलं असतात, अष्टांगं लिहिलेली असतात. मणभर पदवीधर, पायलीभर डॉक्टर्स. पंडितांची संख्या मोजताही न येण्यायेवढी.

पण संगित शिकणाऱ्याला सौंदर्य समजलेलं असतं कां?

सत्यशील देशपांडे याच बिंदुभोवती फिरतात.

सत्यशील देशपांडे दर काही मिनिटाला एक अशा वेगानं थोर गायक श्रोत्यांसमोर ठेवतात. त्यांचे किस्से सांगतात. किश्श्यांच्या आडून हळूच त्यांचा मुद्दा पुढं सरकवतात.

   गवई मुलाला कित्येक आठवडे नुसता सूर लावायला लावतो. दिवसभर,जागा झाल्यापासून झोपेर्यंत शागिर्द सूर धरून असतो. एकादी तान, एकादा पलटा वगैरे वगैरे सौंदर्यस्थळं गवई शागिर्दाच्या गळ्यावर बसवायचा प्रयत्न करतो.  या प्रयत्नात गवई स्वतः नवी सौदर्य स्थळं शोधत असतो आणि साधना करणारा शागिर्दही.गायक शिकवत असतो म्हणजे गातच असतो आणि शागिर्द ऐकून ती सौंदर्यस्थळं निर्माण करत असतो.  गायकांना शागिर्दाची संगत उपयोगी पडते.

मुद्दा असा की गवई शागिर्दाला अंगाच्या वाटेनं संगित शिकवत नाही. संगिताचं सौंदर्य तो शागिर्दाला दाखवत जातो आणि त्या नादात वाटेत अंगं येत जातात, त्यांचा परिचय शागिर्दाला होत जातो.

सौंदर्य बंदिस्त नसतं, ते प्रवाही असतं. सौंदर्य सतत नवी रुपं घेत असतं. सौंदर्याची आकृती पहाताना सोयीसाठी ते कुठल्यातरी नियमांशी ताडून पाहिलं जातं, पण ते नियम म्हणजे सौंदर्य नसतं.

सौंदर्यस्थळ  म्हणजे बसस्टॉप नसतो असं पुल देशपांडे म्हणत असत असं सत्यशील देशपांडे सांगतात. संगीत प्रवाही असतं हे समजावण्याची दोन्ही देशपांड्यांची ही तऱ्हा.

सत्यशील देशपांडे यांनी मांडलेला विचार खरं म्हणजे वाचून समजण्यासारखा नाही. तो विचार ऐकला तरच समजतो. थोर गायकांनी निर्माण केलेली सौंदर्यस्थळं कागदावर मांडता येत नाहीत, ती ऐकावीच लागतात. म्हणूनच संगितातील सौंदर्यस्थळं हा सत्यशील देशपांडे यांचा विचार ऐकावाच लागतो, तो देशपांडे यांच्या ऐसपैस दिसण्यातून आणि हावभावातून पहावाच लागतो. त्या अनुभवाची सर प्रस्तुत लिखाणाला नाही.

सत्यशील देशपांडे बोलतात तेही गाण्यासारखंच. म्हणजे ते परवा जे बोलले ते अंतिम नव्हे. पुन्हा ते कुठं तरी बोलतील तेव्हां ते आणखी वेगळं असेल. जशी प्रयोगशील क्रिएटिव गाण्याची गंमत असते तशीच ती देशपांडे यांच्या बोलण्याचीही आहे. बोलण्याचीही मैफिलच असते आणि तीही जमवावी लागते. देशपांडे यांची मैफिल जमली होती.

अभिव्यक्तीतील सौदर्यस्थळं,  विषय मांडण्यातली सौंदर्यस्थळं,  देशपांडे यांच्या कार्यक्रमात भरपूर सापडतात.

असो, आत्ता इतकंच.

।।

Comments are closed.