‘ सर ‘ एक चांगली फिल्म

‘ सर ‘ एक चांगली फिल्म

सर ही फिल्म २०१८ साली तयार झाली होती, आता ती नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालीय.

रत्ना आणि आश्विन अशा दोघांमधल्या संबंधांची ही गोष्ट आहे.  आश्विन या एका श्रीमंत तरूणाच्या घरी रत्ना मोलरीण म्हणून कामाला लागते. रत्ना गावाकडून आलेली, आश्विन न्यू यॉर्क-मुंबईवाला. चित्रपटाच्या सुरवातीला आश्विन हा रत्नाचा सर असतो, चित्रपट संपता संपता तो रत्नाचा आश्विन होतो. अगदीच भिन्न परिस्थितीत वाढलेल्या दोन  व्यक्ती एकजीव होण्याचा प्रवास चित्रपटात आहे.

चित्रपटाचा विशेष असा की त्यात दृश्याला, दिसण्याला महत्व आहे. ऐकणं कमी आहे. रत्ना आणि आश्विन यांच्यातले बदलत गेलेले संबंध दृश्यांतून दिसतात. संवाद  कमी आहेत.पात्रं फारच कमी बोलतात.

रत्नाला मोलकरीण म्हणून आश्विनच्या घरात करावी लागणारी कामं आपल्याला दिसतात. अधिक पैसे मिळवण्यासाठी तिला टेलरकडं जावं लागतं, तिथं तिला राबवून घेतलं जातं. ड्रेसच्या ताज्या फॅशन पहायला रत्ना एका बूटिक दुकानात जाते.   अशी अगदी साधारण बाई दुकानात शिरली या बद्दल मालकीण वॉचमनला झापते.   आश्विनचे पाहुणे रत्नाशी उर्मटपणे वागतात.

आश्विन पहिल्या पासून रत्नाला  प्लीज, सॉरी असं म्हणतो. कोचावर बसून उंची दारू पिताना रत्ना खायला आणून देते  आणि आश्विन थँक्स म्हणतो.

भिंतीच्या एका बाजूला कोचावर बसून आश्विन त्याच्या मोठ्ठ्या स्क्रीनवर सिनेमा पहातो.  त्याच भिंतीच्या दुसऱ्या बाजूला, दुसऱ्या खोलीत रत्ना जमिनीवर बसून तिला दिलेल्या लहान टीव्हीवर सीरियल बघत असते. रत्ना बेस्टच्या १७४ नंबरच्या बसनं प्रवास करते आणि आश्विन त्याच्या कारनं.

गगनाला भिडणारी मुंबई, बैठी मुंबई. एका खोलीतली मुंबई आणि आलिशान फ्लॅटमधली मुंबई. वरळीची आलिशान इमारत आणि रत्नाचं चाळीतलं घर ही दोन वास्तवातल्या भिंती मात्र दिसत नाहीत. 

हे सारं आपल्याला दिसत असतं. 

चित्रपट हा एक मिश्र कला प्रकार आहे. त्यात दिसणंही असतं आणि ऐकणंही असतं. ऐकणं कधी पात्रांच्या तोंडून घडते तर कधी पडद्यावर न दिसणारा माणूस ऐकवतो. दिसणं आणि ऐकणं यात दिसणं जास्त असणं हे चित्रपटाचं प्रमुख वैशिष्ट्यं.

चित्रपटात जास्तीत जास्त म्हणजे अगदी नव्वद वगैरे टक्के दिसणंच असावं असं मानणारे दिद्गर्शक आहेत. त्या दिग्दर्शकांच्या चित्रपटात कॅमेराच बोलत रहातो. हिचकॉक, सत्यजीत रे, बर्गमन असे काही दिग्दर्शक या वर्गात येतात.

भारतीय चित्रपटांची प्रेरणा लिखित मजकूर आणि नाटकं ही होती, आजही आहे. त्यामुळं चित्रपटात पात्रं फार बोलतात आणि दिग्दर्शक आकाशवाणी सारख्या कॉमेंट्स करत असतो. कथा कादंबऱ्या आणि नाटकं कॅमेऱ्यात कोंबण्याचा कल अजूनही दिसतो.  

अलीकडं भारतीय चित्रपटात कॅमेरा बोलतांना दिसू लागला आहे. तो अनुभव सर या चित्रपटात येतो. 

सर या चित्रपटात भारतातली सामाजिक आणि आर्थिक विषमता दिसते. स्त्रीला मानानं जगण्यासाठी काय करावं लागतं याचंही दर्शन चित्रपटात घडतं. चित्रपटात ते अंगावर येत नाही, त्यावर मुद्दाम बोट ठेवून भाष्य केलेलं नाही, मा पात्रांकरवी, ना अदृश्य संदेशातून.

चित्रपटात अभिनेते एका सापळ्यात सापडतात. आपली शब्दफेक, आपल्या लकबी इत्यादी प्रेक्षकाला दाखवाव्याशा वाटतात. ग्रेट   म्हणून मान्यता पावलेले किवा तसं स्वतःला समजणारे अभिनेते प्रत्येक सिनेमात दिसतात अभिनेते म्हणूनच दिसतात, त्या चित्रपटातली पात्रं म्हणून दिसत नाहीत.तीच ती संवादफेक आणि त्याच त्या लकबी. 

सर मधे रत्ना ही कठीण परिस्थितीशी संघर्ष करणारी स्त्री तिच्या दैनंदिन जगण्यातून दिसते.श्रीमंत असूनही माणुसकी असणारा आश्विन त्याच्या वागण्यातून दिसतो. मी बाबा असा आहे असं काही तो सांगत नाही.   

 ‘सर’मधे रत्नाची भूमिका करणारी तिलोत्तमा शोम दिसत नाही, रत्ना दिसते.   आश्विनचं काम करणारा विवेक गोंबर दिसत नाही, आश्विन दिसतो.  

पटकथेनं पात्र कसं असतं ते स्पष्ट केलं असेल आणि ते पात्र कसं असेल याची स्पष्ट कल्पना दिग्दर्शकाला असेल तर नटनट्या आटोक्यात रहातात असा अनुभव आहे.

सर हे रोहेना गेरा या दिग्दर्शकाचं किंवा पटकथेचं यश मानायला हवं. 

रत्ना आणि आश्विन यांच्यातली अबोल भाषा प्रेक्षकाला दृश्यांतून दिसते ही चित्रपटाची गंमत आहे.

Comments are closed.