साधूंच्या हातात राज्य

साधूंच्या हातात राज्य

 

नामदेव दास त्यागी हा माणूस त्याच्या ड्रेसवरून साधू आहे असं दिसतं. कपाळावर भस्माचे पट्टे असतात. जटा आहेत.  न शिवलेलं वस्त्र गुंडाळतात. गळ्यात रुद्राक्षाच्या आणि कसल्या कसल्या तरी मण्यांच्या माळा असतात. त्यांच्याकडं एक लॅपटॉप नेहमी असतो. लोक त्यांना कंप्यूटर बाबा म्हणतात. त्यांच्याकडं एक हेलीकॉप्टरही आहे.

कंप्यूटर बाबांना मध्य प्रदेशच्या लोकांची सेवा करायची आहे, पारमार्थिक किंवा अद्यात्मिक नव्हे, ऐहिक सेवा. २०१४ साली त्यांनी सेवा करता यावी म्हणून केजरीवाल यांच्याकडं आम आदमी पार्टीचं तिकीट मागितलं. मिळालं नाही.  त्यांनी भाजपशी जुळवून घ्यायचा प्रयत्न केला. मध्य प्रदेशातल्या कुंभ मेळ्यात भाग घेण्यासाठी आपल्या हेलिकॉप्टरची उतरण्याची व्यवस्था करा असं त्यानी मध्य प्रदेश सरकारला सांगितलं. सरकारनं परवानगी दिली नाही. आम आदमी पार्टीचं तिकीट मागितलं होतं हे कारण असावं.

कंप्यूटरबाबा वैतागले. त्यांनी संघ, भाजपवर टीका करायला सुरवात केली. टीकेचा मुद्दा होता पवित्र नर्मदा नदीचं प्रदुषण आणि भाजप सरकारने केलेली स्कँडलं.

२००३ पासून मप्रमधे भाजपचं सरकार आहे. पवित्र नर्मदा स्वच्छ करायचं आश्वासन भाजप तेव्हांपासून देत आहे. २००५ साली शिवराज सिंग चौहान मुख्य मंत्री झाले आणि त्यांनी नर्मदा शुद्धीकरणाच्या घोषणा केल्या. घोषणा पोकळ ठरल्या. चौहान यांच्या राज्यात नर्मदेचा ताबा माफियानं घेतला होता. नदीच्या पात्रातून खनीजं, वाळू काढण्याचा बेकायदेशीर उद्योग माफिया करत असते. जिथं खणणी करतात तिथं एके४७ कुरवाळणाऱ्या लोकं तैनात असतात. अनेक ठिकाणी नदीच्या पात्रातच माफियानं रस्ते तयार केले. हजार करोडपेक्षा जास्त रुपयांना सरकारला माफियानं बुडवलं. कंप्यूटर बाबा या विषयावर जाहीरपणे बोलू लागले.

नर्मदेचं शुद्धीकरण काही होईना. खुद्द साधूमंडळीही बोंबाबोंब करत होती. उपाय काय? चौहान यांनी नरेंद्र मोदींना बोलावलं. नरेंद्र मोदी यानी नर्मदेचं हिंदू संस्कृतीतलं स्थान वगैरे विषयावर भाषण करून नर्मदा सेवा प्रकल्प जाहीर केला. ७०० नर्मदा कमिट्या. त्यात ७४ हजार नर्मदा सेवक. २०९५ कोटींचा खर्च. मोदींच्या प्रेरणेनं चौहान यांनी नर्मदा सेवा यात्रा काढून रोपं लावण्याचा जागतीक विक्रम जाहीर केला. केवळ १२ तासात नदीच्या काठाकाठानं सात कोटी नऊ लाख रोपं लावली असं चौहान यांनी जाहीर केलं. जगातली माणसं हा विक्रम तपासायला मध्य प्रदेशात गेली नाहीत. कंप्यूटर बाबांच्या मते हा विक्रम आणि एकूणच नर्मदा शुद्धीकरण हा पुरता बोगसपणा होता.

कंप्यूटर बाबानी पत्रकार परिषद घेऊन १ एप्रिल ते ५ मे या काळात राज्यभर  चौहान आणि त्यांच्या भाजपचं पितळ उघड करण्याची मोहिम जाहीर केली. ३१ मार्चला घोषणा झाल्या झाल्या चौहान कंप्यूटर बाबाना भेटले. ३ एप्रिल रोजी कंप्यूटर बाबांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला. काम काय? जनतेची आणि नर्मदेची सेवा.

नर्मदेची सेवा करण्यासाठी कंप्यूटर बाबाना एक लक्झरी कार, दरमहा एक हजार किमीसाठी डीझेल, दर महा १५ हजार रुपये घरभत्ता, ३००० रुपये सत्कार भत्ता आणि मानद १३ हजार पाचशे रुपये देणार आहे. शिवाय एक कार्यालय, स्टाफ आणि एक व्यक्तिगत सचीव, अशी व्यवस्था सरकारनं केली आहे.

घोषणा झाल्या झाल्या कंप्यूटर बाबानी भोपाळच्या सरकारी गेस्ट हाऊसमधे मुक्काम हलवला आणि तिथं यज्ञ-पूजा-पाठ सुरु केले.

आणखी एक पंडित योगेंद्र महंत. ते गेली काही वर्षं भाजप सरकारच्या नर्मदा भ्रष्टाचाराची वाच्यता करत आहेत. त्यांनीही सरकारचा भ्रष्टाचार वेशीवर टांगण्यासाठी १ मे १५ मे एक वाभाडे यात्रा ४५ जिल्ह्यातून फिरवण्याचा मानस जाहीर केला होता. सरकारनं त्यांना मंत्री केलं. लगोलग त्यांनी आपली यात्रा रद्द केली.

तिसरे एक आहेत भय्युजी महाराज. हे मूळचे उदयसिंग देशमुख. अद्यात्मिक संदेश देणं हे त्यांचं काम. देखणेपणानं रहातात. उत्तम तलम कपडे वापरतात. एकेकाळी त्यांनी मॉडेलिंगचा व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला होता. ते भाषणाला जातात तेव्हां त्यांना उंच पाठीची सिंहासनासारखी खुर्ची लागते.  त्या सिंहासनावर लाल रंगाचं आणखी एक मखमली वस्त्रं पसरलं जातं, त्यावर ते बसतात. ते मर्सिडीझ एसयुवीमधून फिरतात. उच्च सनदी अधिकारी, आमदार, खासदार, मंत्री हे त्यांचे भक्तगण असतात. विलासराव देशमुख हे त्यांचे अनुयायी. अण्णा हजारी हेही त्यांचे अनुयायी. मागं अण्णा हजारी यांनी दिल्लीत आंदोलन करून कांग्रेस सरकारला जाम अडचणीत आणलं होतं. त्यांच्या आंदोलनाला भाजप-संघाचा पाठिंबा होता. आंदोलन काँग्रेसला जड जाऊ लागलं. शेवटी विलासरावांना गळ घालण्यात आली. ते भय्युजीना भेटले. नंतर भय्युजींकडून अण्णांना निरोप गेला आणि अण्णांचं आंदोलन संपलं. लोक त्यांना ” युवा राष्ट्रसंत श्री सद्गुरु भय्युजी महाराज ” या नावानं ओळखतात.

त्यांनाही शिवराज सिंग चौहान यांनी मंत्रीपदाचा दर्जा दिलाय.

बाय द वे कंप्यूटरबाबा प्रत्येक कुंभमेळ्याला जात असतात. त्यांचा एक आखाडा आहे.

हे आखाडा प्रकरण काय आहे? शंकराचार्यांनी बुद्ध आणि जैन धर्माचा बंदोबस्त करून सनातन हिंदू धर्माचं पुनरुज्जीवन केलं. भारतात भक्ती संप्रदाय निर्माण केला. ते करतांना त्यांनी देशभर चार मठ उभारले. धर्माविरोधात होणारं आक्रमण (त्यावेळी इस्लाम नव्हता), राजसत्तेचं आक्रमण यांना तोंड देण्यासाठी त्यांनी साधू मंडळींना आवाहन केलं.

साधू मंडळींनी आश्रम तयार करायचा, तिथं त्यांनी शक्तीची आराधना करायची, शस्त्रं वापरायला शिकायची आणि वेळ आल्यावर धर्माचं रक्षण करायचं. या साधूंच्या जागांना आखाडा असं म्हणतात. देशात १३ सन्यासी मंडळींनी मान्य केलेले आखाडे आहेत. प्रत्येक आखाडा स्वतंत्र असतो. आखाड्यांची एक संघटना आहे. ही संघटना कोण साधू योग्य बाबा आहे त्याचं सर्टिफिकेट देत असतात. नुकतीच या संघटनेनं एक यादी प्रसिद्ध केली असून १९ बाबा बोगस आहेत असं जाहीर केलं आहे. आखाड्यातले साधून जिथं कुठं कुंभमेळा होतो तिथं जातात. त्यांच्या स्नानाची व रहाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी लागते. संघटनेनं ज्या बाबांना नाकारलं आहे ते सध्याच्या उत्तर प्रदेश सरकारचे प्रिय बाबा आहेत. २०१९ मधे उत्तर प्रदेशमधे होणाऱ्या कुंभ मेळ्याची तयारी योगी आदित्यनाथ यांनी सुरु केलीय पण आखाड्यांची संघटना योगींच्या विरोधात आहे, त्यांनी शाही स्नानात भाग घ्यायला नकार दिला आहे.

शंकराचार्यांचा काळ आणि त्या काळात तयार केलेलं हे दल. आता सरकारवर संकट आलं तर पोलिस, सैन्य मदतीला येतात. त्यांच्यावर विधीमंडळ आणि न्याय संस्थेचं नियंत्रण असतं. धर्माचं बोलायचं तर धर्मावरचं संकट हे धर्मानं आपल्या अद्यात्मिक पद्धतीनं दूर करायचं असतं, त्याला सरकार काही करू शकत नाही, धर्म ही नागरिकांची खाजगी बाब आहे. शंकराचार्यांनी कल्पिलेले आखाडे केवळ संकटकाळी मदतीसाठी होते. आखाड्यातल्या साधूंचं कसब केवळ कुस्ती, दांडपट्टे चालवणं आणि धर्मग्रंथांचं पठण हेच होतं. राज्यशकट, अर्थव्यवस्था इत्यादी गोष्टींची त्यांना माहितीही नव्हती, त्यांचं कर्तव्यही नव्हतं.

शंकराचार्यांचे आखाडे आणि रास्वसंघाचं बजरंग दल.

।।

 

3 thoughts on “साधूंच्या हातात राज्य

  1. What we have achieved through systematic democratic system? Court cases delay till the criminal dies, justice delayed is justice denied. There are so many rapes and other crimes even though there is ‘systematic’ law and order. Even though there are people elected through systematic democratic way, still there are so many issues. Ok maybe Sadhus should not run government and system but whoever are running the system is doing any good to people?
    So let them give chance? Why not?

  2. I do not know whether anyone remembers now “DHARMAYUG” magazine, sometimes in 70’s there was cover story on “SADHU’S”
    Especially in UP and Bihar how a person becomes BABA was elaborately written then. So if you go advance in 2018 all BABA’s and Sadhu’s must be modern and equipped with all possible electronic gadgets
    So nothing wrong in making BABA a minster

  3. श्री.कोतवाल.
    माझ्या लेखात साधूंच्या कंप्यूटरचा उल्लेख केवळ ते लॅपटॉप वापरण्यासाठी ओळखले जातात म्हणून आहे. सारा लेख त्या साधूंची राजकीय सत्ता लालसा या बिंदूभोवती आहे. त्यांची साऱी खटपट ऐहिकाबद्दल आहे, अद्यात्म किवा पारमार्थिकाबद्दल नाही. ज्यांचा स्किलसेट तथाकथित पारमार्थिकासंबंधी आहे, ज्यांचं चिंतन-पठण-कार्य पारमार्थिक-अद्यात्मिक आहे अशी माणसं ऐहिक सत्ता सांभाळण्यास योग्य नाहीत.
    श्री एनन.
    आज भारतात पुढारी, माणसं गुन्हे करतात आणि सुटतात, त्यांना शिक्षा होत नाही. एकूण व्यवस्थाच बिघडली आहे. ही दुःखाचीच गोष्ट आहे. गुन्हेगार सत्ताधारी होतात म्हणजे कोणीही सत्ताधारी व्हायला हरकत नाही हा विचार तर्काला धरून नाही. साधू लोक कसे असू शकतात याचं दर्शन रामरहीम आणि आसारामबापूंनी दाखवलं आहे. अयोघ्येत अनंत आखाड्यांमधे आणि मठांमधे साधू लोक गुन्हे करत असतात. ऐहिक गुन्हेगार सत्तेत जाऊ शकतात तर पारमार्थिक गुन्हेगार सत्तेत गेले तर काय बिघडतं हा विचार तर्काला धरून नाही.गुन्हा करणारा कोणीच सत्तेत टिकता कामा नये हा मुद्दा आहे. उत्तर प्रदेशात गुन्ह्यांचा रेकॉर्ड असणारी माणसं आमदार, खासदार, मंत्री होतात. म्हणून योगी यांना मुख्यमंत्री होऊ देणं यातून उत्तर प्रदेशातली आरोग्य व्यवस्था सुधारतांना दिसत नाही. बाबा, साधू, योगी इत्यादी मंडळींनी त्यांचं आयुष्य राज्यकारभाराच्या हिशोबात व्यतीत केलेलं नसतं. भारतीय राज्यघटना हा त्यांचा आधार नसतो. त्यांचा मुख्य आधार पारमार्थिक, अद्यात्मिक असतो. त्यामुळं त्यांच्या हाती सत्ता जाणं योग्य नाही.उत्तर प्रदेशात गुन्ह्यांचा रेकॉर्ड असलेली माणसं आमदार, खासदार, मंत्री होतात. या मंडळींना आजवर उत्तर प्रदेशाचा कारभार नीटपणे चालवता आलेला नाही. म्हणून कोणालाही सत्ता सोपवायला काय हरकत आहे हा विचार तर्काला धरून नाही. नाही तरी शिकलेला ड्रायव्हर अपघात करतोच, मग ड्रायविंग न शिकलेल्या माणसाच्या हातात गाडी द्यायला काय हरकत आहे हा विचार तर्काला धरून नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *