स्टार्मरनी पंतप्रधानपद कां सोडलं
स्टार्मरनी पंतप्रधानपद कां सोडलं?
ब्रीटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी त्यांच्या कारकीर्दीला दोन वर्षं पूर्ण होण्याच्या आधीच राजीनामा दिला. लोकसभेत भक्कम बहुमत असलेल्या त्यांच्या पक्षातल्याच खासदारांनी राजीनामा द्यायला लावला, विरोधी पक्षांनी नव्हे.
गेल्या १० वर्षातले ते ६ वे पंतप्रधान.
प्रत्येक पंतप्रधान आपण देशाची स्थिती सुधारणार आहोत अशी खात्री देत पदावर आरूढ झाला. स्थिती सुधारली नाही असं सत्ताधारी पक्षातल्याच लोकांना वाटलं. न सुधारलेल्या स्थितीत पुढल्या निवडणुकीत मतदार आपल्याला नाकारतील अशी भीती वाटलानं सत्ताधारी पक्षातल्याच लोकांनी आपलं नेतृत्व बदललं.
कीर स्टार्मर विक्रमी बहुमत मिळवून पक्षाचे नेते झाले होते. आधीचे नेते जेरेमी कॉर्बिन लोकांना आवडले नाहीत, ते नेतृत्वात असतील तर पक्षाला मतं मिळणार नाहीत या भीतीनं स्टार्मरना लेबर पक्षानं निवडलं होतं.
अँडी बर्नहॅम स्टार्मर यांच्या जागी येऊ घातले आहेत. बर्नहॅम खासदारही नव्हते. ते मँचेस्टरचे मेयर होते. लोकप्रीय झाले होते. पक्षातल्या लोकांना वाटलं की २०२९ च्या निवडणुकीत बर्नहॅमच आपल्याला तारू शकतील. एका विद्यमान खासदारानं आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन जागा मोकळी केली, तिच्यावर बर्नहॅम निवडून आले.
जनता स्टार्मर यांच्यावर नाराज आहे असं खासदारांना कां वाटलं?
जनतेला वाटतं की ब्रिटीश अर्थव्यवस्था बिघडली आहे. बेरोजगारी वाढते आहे, सार्वजनिक संस्था अकार्यक्षम झाल्या आहेत, आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था बिघडल्या आहेत,महागाई वाढते आहे असं बहुसंख्य लोकांना वाटतंय. स्टार्मर यांना स्थिती सुधारता आली नाही असं लोकांचं मत झालंय. स्टार्मरना निदान त्यांची पाच वर्षाची कारकीर्द पूर्ण करण्याची संधी द्यावी असं नागरिकांना वाटत नाही. त्यांना काढा, त्यांच्या जागी दुसरा आणा असं लोकांना वाटलं.
अमेरिकेत प्रेसिडेंटला चार वर्षं दिलेली असतात. ब्रीटनमधे पंतप्रधानाला निश्चित कार्यकाळ देण्यात आलेला नाही. ब्रीटनमधे सत्ताधारी पक्षाला आपला नेता बदलावासा वाटला की फाटकन ते नेत्याला पदावरून खाली खेचू शकतात. गेल्या १० वर्षातल्या पंतप्रधानांचा कार्यकाळ सरासरी २ वर्षाचा आहे. लिझ ट्रस यांना लोकांनी फक्त ४९ दिवसात पंत प्रधानपद सोडायला लावलं होतं.
अलीकडं पश्चिमी जगात लोकांना नेतेपदावर जादूची कांडी असलेला नेता हवा असतो. नेत्यानं चमकदार आश्वासन द्यावं आणि पदावर पोचल्यावर ते आश्वासन फटकन पूर्ण करावं अशी लोकांची अपेक्षा असते. राजकीय पक्षानं देशभरच्या लोकांची विचार विनिमय करून, तज्ज्ञांशी सल्ला मसलत करून धोरणं आखावीत आणि ती लागेल तेवढा वेळ खर्च करून पूर्ण करावीत असं एकेकाळी लोकांना वाटत असे. आता तसं वाटत नाही.
चित्रपट, सोशल मिडीया, रील्स यामधे दहाव्या सेकंदाला रंकाचा राव झालेला दिसतो. लोकांना ते खरं वाटतं, त्या अपेक्षा लोक आता नेत्याकडून बाळगू लागले आहेत. समाजातल्या गुंत्याच्या आणि खूप जुन्या दुर्घर दुखण्यांवर एक गोळी किंवा एक चमचा औषध देणारा डॉक्टरनेता लोकांना हवा असतो.
अमेरिकेत डोनल्ड ट्रंप यांनी मी अमेरिका पुन्हा ग्रेट करतो असं आश्वासन दिलं. ग्रेट अमेरिका या फक्त दोन शब्दांचं आश्वासन. अमेरिकन जनतेनं डेमॉक्रॅटिक पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी या दोन्ही पक्षांना दूर सारलं. ट्रंप हे रिपब्लिकन पक्षाचे नेते नव्हते. त्यांना पक्ष वगैरे नाही, ते स्वतःलाच बांधील आहेत. ते रिपब्लिकन पक्षात घुसले, पैशाच्या बळावर पक्ष काबीज केला, दोन शब्दांची घोषणा दिली.
तिकडं ब्रीटनमधे तेच झालं. नायजेल फराज या गृहस्थांनी युरोपमधून बाहेर पडलात की सारं काही ठीक होईल असं सांगितलं. युरोपच्या जोखडातून मुक्त झालो की ब्रीटनचे सारे आर्थिक प्रश्न वळणावर येतील अशी एका ओळीची घोषणा दिली. रिफॉर्म नावाचा पक्ष स्थापला. नुकत्याच झालेल्या ब्रीटनमधल्या निवडणुकांत त्यांनी खूप मतं खाल्ली. लेबर पक्ष आणि बर्नहॅम यांना फराजची मतं इतर पक्षांकडं वळवून कसा बसा विजय मिळवता आला. ब्रीटननं ब्रेक्झिट केलं. आता लोकांना पश्चात्ताप होतोय.
चार शब्दांच्या जाहीरनाम्याचं गारूड लोकांवर आरूढ झाल्यामुळं शेदोनशे वर्षं जुन्या पक्षानाही राज्य करता येत नाहीये. गेल्या १० वर्षांत त्यांचे ५ पंतप्रधान झाले. स्टार्मर यांच्या अंगावर भ्रष्टाचाराचे डाग नाहीत. स्थलांतरीतांचा ओघ त्यांनी काहीसा थांबवला, कामगारांचं वेतन आणि अधिकार यात सुधारणा केल्या, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सुधारणा केल्या, अर्थव्यवस्थेतली तूट कमी केली, घर बांधणीला चालना दिली वगैरे. त्यांच्या सुधारणा लोकांच्या मते अपुऱ्या होत्या, फार संथ होत्या. लोकांना ते प्रश्न दोन वर्षात सुटायला हवे होते.
येऊ घातलेल्या बर्नहॅम यांनाही लोक दोन वर्ष देतील याची खात्री नाही. मँचेस्टरमधील वाहतूक व्यवस्थेत बर्नहॅम यांनी केलेले बदल लोकांना आवडले. बर्नहॅम लोकांच्या नजरेत भरले. मँचेस्टर नावाच्या एका शहरात काही सुधारणा करणं आणि देशाच्या पातळीवर समस्या सोडवणं यात खूपच फरक असतो. बर्नहॅमना देशाच्या पातळीवरचे आणि आंतरराष्ट्रीय प्रश्न सोडवायचे आहेत.
लोकांना घाई सुटलीय. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रसारामुळं लोकांच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. त्या पूर्ण करण्याची क्षमता समाजामधे आहे काय याचा विचार लोक करत नाहीत. लहान मुलासारखा हट्ट. समाजातल्या प्रत्येकाला श्रीमंत व्हायचंय. लोकांच्या श्रीमंतीच्या कल्पनाही अवास्तव आहेत, ती श्रीमंती देण्यायेवढी साधनसंपत्ती निसर्गात नाहीये. गरजा आणि त्या पूर्ण करण्याची समाजाची क्षमता यात खूप अंतर आहे असं दिसतंय. कोणताही प्रस्थापित राजकीय विचार वा संघटना लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतील असं वाटत नाहीये. अमेरिकेत ट्रंप, ब्रीटनमधे फराज, फ्रान्समधे मेरी ल पेन, जर्मनीत एलिस वायडेल यांचा उदय ही या परिस्थितीची चिन्हं आहेत.
कीर स्टार्मर यांच्या पराजयाचा हा अर्थ आहे.
।।