मीठ तयार करणाऱ्या कुटुंबाची गोष्ट

मीठ तयार करणाऱ्या कुटुंबाची गोष्ट

माय नेम ईज सॉल्ट.
।।
नजर पोचेस्तवर दिसणारी उजाड जमीन.डोंगर नाही. झाड नाही. घर नाही. एकही प्राणी नाही. एकही माणूस नाही. वर तळपणारा सूर्य, खाली रखरखीत जमीन.
एक बाईक. मग बाईकपाठून येणारा एक ट्रक. ट्रकवर पाच सात माणसं. बाजलं. पत्रे. पिंपं. भांडीकुंडी. बांबू. माणसं घर बदलतात तेव्हां असं सामान ट्रकवर लादून नेतात.
माणसं कुठल्या नव्या घरात निघालीत? समोर तीनशेसाठ अंशात एकही घर दिसत नाहीये.
 ट्रक थांबतो. 
उजाड आसमंत.
ट्रकमधली माणसं खाली उतरतात. ट्रकवरचं सामान उतरवतात. बांबू उभे करून, पत्रे जोडून एक आसरा तयार करतात. बाजली उतरवतात. एका पत्र्याच्या भिंतीला एक आरसा टांगला जातो. भांडी रचली जातात. 
घर उभं रहातं. 
दोन मुलं एका डब्यातून भातुकलीची भांडी काढतात. बाहुल्या काढतात. त्यांचा खेळ सुरु होते.  
स्त्री चूल मांडते. धूर आसमंतात पसरतो.
आसमंतात एकही झाड नाही. काही म्हणजे काही नाही. मग ही इथं आली कशाला? इथं ती जगणार कशी? करणार काय? 
पुरूष सरसावतात. पहारी घेऊन जमीन खणतात. पाच फुटाखाली चिखल असतो. चिकट जमीन असते. बऱ्याच खटपटीनंतर खड्डा मोठा होतो. खड्ड्यातून  एक तेलावर चालणारं इंजिन, पंप, निघतात.  पाईप बाहेर येतात. 
पुरूष माती काढून इंजिन साफ करतात. पंप साफ करतात. प्लास्टिकमधे गुंडाळलेला पाईप काढतात. जोडणी करून पंपइंजिन तयार करतात. ट्रकवरून उतरवलेल्या पिंपातलं तेल इंजिनात भरतात.  
इंजिन सुरु होतं. भक. भक. भकभक. भकभक. भकभक. भक.
नीरव आसमंतातला पहिला आवाज.
जमिनीच्या पोटातलं पाणी पायपातून बाहेर येतं. सुरवातीला करंगळीयेवढं. नंतर मनगटायेवढं. नंतर मांडीयेवढं जाड. धो धो. सुरवातीला गढूळ. नंतर स्वच्छ. धोधो. 
कुटुंब गोळा होतं. उदबत्ती लावतं. पूजा. डोळे मिटून नमस्कार. पत्र्याच्या आडोशाला मुलं आपल्याच नादात. त्यांची भातुकली. दोऱ्याच्या तुकड्यांनी तयार केलेल्या छोट्ट्या तराजूत दोन तीन खडे तोलणं, भाव करणं, खडे विकत घेणं.
  हे सानाभाई या माणसाचं कुटुंब आहे. 
जागा आहे छोटं कच्छ रण. 
सानाभाई कुटुंब आणि  दोन मजूर घेऊन दरवर्षी इथं येतो. रणाच्या पोटात साठलेलं मिठानं संपृक्त झालेलं पाणी उपसून काढतो. जमिनीवर वाफे तयार करतो. वाफ्याची जमीन प्रेमानं मन लावून  सारवतो. वाफ्यातलं खारं पाणी दररोज भर उन्हात सतत हलवत रहातो. यथावकाश पाणी आटून पांढऱ्या मिठाचे खडे तयार होतात. 
आठ महिन्यांच्या एकाद दोन सण येतात, उत्सव येतात, जत्रा येतात. आर्थिक व्यवहार पहाणाऱ्या दलालाचा माणूस सानाभाईचं कुटुंब घेऊन दूरवरच्या  उत्सवाच्या गावी जातो.  सानाभाईचं कुटुंब देवदर्शन करतं, चविष्ट पदार्थ खातं, खोटे दागिने आणि मुलांना कपडे बिपडे घेतं. मौजमजा करून संध्याकाळी सानाभाई मीठशेतात परततो. 
सानाभाईचं कुटुंब गावात मौजमजा करत असताना सूर्य  पाण्याची वाफ करत असतो.
मिठाचे ढीग होतात. व्यापाऱ्याची माणसं ट्रक आणतात.  मिठाची तपासणी करतात. मिठाची प्रतवारी, भाव ठरवतात. दरवर्षी मिठाचे भाव बाजाराप्रमाणे वर खाली होत असतात.  भाव कमी मिळाला तर सानाभाई नाराज होतो. सानाभाई फार ओढाताण करू शकत नाही. तयार झालेलं मीठ तो स्वतः विकू शकत नाही. जे काही पैसे मिळतील ते घेऊन पावसाळा आल्यावर त्याला त्याच्या गावात जायचं असतं. 
रात्रीची वेळ.ट्रक भरले जातात. सानाभाईच्या हातात रोख रक्कम पडते.  
  दुसऱ्या दिवशी सकाळी सानाभाई आवराआवर करतो. पत्रे, बांबू, काठ्या काढून घर मोडतो. सामान ट्रकमधे भरतो. पाण्याची – तेलाची पिंपं, बाजली ट्रकवर चढवली जातात. पंप, इंजीन,पाईप जमिनीत खड्डा करून पुरले जातात. 
जमीन सपाट होते.इथे इंजिन वगैरे याची पुसटशी खूणही नाही. 
सानाभाई ट्रकवर सवार होऊन गावाकडं निघतो. पावसाळा संपल्यानंतर पुन्हा याच जागी परत येण्यासाठी.
आपण खातो ते मीठ अशा रीतीनं तयार होतं. असे  किती तरी सानाभाई. सानाभाई आणि त्याचं कुटुंबं, मुलं. वर्षाचे आठ महिने रिकाम्या आसमंतात मिठाच्या संगतीत. तेच जगणं. तेच शिक्षण. 
आपण मिठाला जागत जगत असतो. 
फरीदा पाचानं हा माहितीपट केलाय. फरीदानं सीडकीपर्स नावाचा माहितीपटही केलाय. त्यात आंध्र प्रदेशात सामुहिक शेती करणाऱ्या दलित स्त्रियांचं चित्रण आहे. फरीदानं वुमेन इन ब्ल्यू बेरेट्स नावाचा माहितीपट केलाय. त्यात युद्धगर्क लायबेरियामधे शांतता प्रस्थापित करू पहाणाऱ्या भारतीय महिला पोलिसांचं जीवन दाखवलंय.
जग घडवणारी किती तरी माणसं. जगाच्या दृष्टीआड. फरीदा त्या माणसांना दृष्टीसमोर आणते. 
माय नेममधे एकूणात ध्वनी अगदीच कमी. पंपाचा आवाज. मधेच कधी तरी मुलांचं खिंदळणं. माणसं कमी बोलतात, तुटक बोलतात, गुजरातीत बोलतात. त्यांचं बोलणं उपशीर्षकांमधून आपल्याला कळतं.   
मुलांची करमणूक? आरशाचे तुकडे उन्हात धरून  भातुकली आणि एकमेकांवर कवडसे टाकणं. बस.
परिसर, पंप, पाणी, मीठ, झोपडी, अवकाशात नजर लावून शांत बसलेली माणसं, सभोवताल जणू नाहीच अशा आनंदात खेळणारी मुलं. लुझ कोनेरमान या छायाचित्रकारानं टिपलेली चित्रं खिळवून ठेवतात. अनेक वेळा  सिनेमा पहातोय की पेंटिंग पहातोय असं वाटावं इतकी देखणी दृश्यं. 
  सुरवातीची काही मिनिटं पत्ताच लागत नाही की चाललंय तरी काय. अर्धाअधिक माहितीपट उलगडल्यानंतर पत्ता लागतो. 
रणात असलेले किंवा नसलेले आवाज. बाहेरून कोणताही आवाना चिकटवलेला नाही. रणात दिवसा आणि रात्री असलेला प्रकाश. दिवे लावून मुद्दाम टाकलेला प्रकाश नाही. असतात तशा गोष्टी, सजावट नाही. 
 कोनेरमान या जर्मन छायाचित्रकारानं Sony EX1R हा अगदी साधा, व्यावसायिक नसलेला कॅमेरा वापरून चित्रण केलंय.  
कॅथिरिना फिडलर यांनी संकलन केलंय. संकलन ही महागोची असते. हातात प्रचंड चित्रण असतं, त्यातलं कोणतं ठेवायचं, किती लांबीचं ठेवायचं आणि त्या तुकड्यांचा क्रम कसा लावायचा हे महाकठीण काम.  फिडलर  सुंदर चित्रणाच्या प्रेमात पडलेली दिसते. काही वेळा चित्रणातून नवी माहिती मिळत नाही, जुनीच माहिती पुन्हा दिली जातेय  हे दिसत असतानाही केवळ सुंदर दिसतात म्हणून अनेक दृश्य दाखवलेली दिसतात. ती दृश्यं कमी केली असती तर माहितीपट अधिक आटोपशीर झाला असता.
चित्रपट हा कलाप्रकार निर्माण झाल्यावर लगोलग माहितीपटही निर्माण झाला. भारतातले पहिले माहितीपट १८८८मधे झाले. माहितीपट म्हणजे खरे  कलाकार आणि खरी लोकेशन्स. फीचर चित्रपटात कलाकार आणि जागा तयार केलेल्या असतात.  पहिल्या महायुद्धामधे युद्धाची स्थिती दाखवणारे माहितीपट तयार झाले. ते सरकारानी तयार केले. सरकारांची बाजू त्यात मांडलेली असे. आपले सैनिक कसे शूर आहेत, ते कठीण परिस्थितीत कसे लढत आहेत आणि शत्रूवर विजय मिळवत आहेत ते माहितीपटात दाखवलं जात असे. त्या त्या देशांचे पुढारी माहितीपटाचे नायक असत. दुसऱ्या महायुद्धात हिटलर, मुसोलिनी, स्टालीन, आयझेनहॉवर, चर्चिल इत्यादी माणसं माहितीपटाचे नायक होते.
माहितीपट  एका बाजूला कललेले असत. पट निर्मात्यांच्या डोक्यात जे असेल ते माहितीपटात येत असे. ब्रिटीश माहितीपटात ब्रिटीश धार्जिणी माहिती.  तोच विषय जर्मन माहितीपटात जर्मन धार्जिणा असे. उपलब्ध असेल्या माहितीत गाळसाळ करून माहिती दिली जात असे. अनेक वेळा खोटी माहितीही दिली जात असे. त्यामुळं माहितीपट वास्तव दाखवतच असेल असं नसे. माहितीपटात काही प्रमाणात आणि काहीसं वास्तव असे.
 स्पॉन्सर्ड माहितीपटाचा तो काळ.   भारतात सुरवातीला माणसं स्वतंत्रपणे माहितीपट करत होती. सरकार वगैरे भानगड नव्हती. भारत स्वतंत्र झाल्यावर सरकारी माहितीपट यायला लागले. गेल्या दहा वर्षात राजकीय पक्षांनी प्रचारासाठी माहितीपट काढायला सुरवात केली.
अलिकडं भारतात आणि जगभरच स्वतंत्र माहितीपट निघू लागले आहेत. माहितीपट काढणाऱ्या व्यक्तीचा काही एक कल स्वाभाविकपणे असतो. विषय निवडताना  कल सुरु होतो. अमूक एक विषय निवडला म्हणजे जगातले अब्ज गुणिले अब्ज विषय नाकारले. पण हा कल प्रचारपटासारखा नसतो. प्रचारासारखे बटबटीत, उघड उद्देश या स्वतंत्र माहितीपटात नसतात. मानवी जीवनाचे कंगोरे त्यात दाखवले जातात. निवडलेल्या माणसांबद्दलची आस्था असा या माहितीपटाचा कल असतो. स्वतंत्र माहितीपटाला खूप सूक्ष्म कंगोरे असतात, पदर असतात, छटा असतात. कधी कधी त्यात अंगावर येणारा दाह असतो तर कधी कधी त्यात खूप हळुवारपणे मनाला शिवणं असतं.  
अशा चित्रपटाची एक गंमत म्हणजे त्यामधे अज्ञात माणसांचा-विषयांचा उलगडा असतो. अरेच्च्या, आपण खातो ते मीठ अशा तऱ्हेनं तयार होतं हे आपल्याला माहितच नव्हतं अशी प्रेक्षकाची  प्रतिक्रिया असते. नवी माहिती मिळाल्यानं प्रेक्षक अधिक समृद्ध होतो. 
अलीकडल्या काळात माहितीपटाच्या निर्मितीत फीचर चित्रपटासाठी करतात ती सारी खटपट केली जाते, संदर्भ गोळा केले होतात, संशोधन होतं. विषय, प्रत्येक फ्रेम विचारपूर्वक, कलाविचारपूर्वक.  सानाभाई आणि कच्छचं रण हे निव्वळ माहितीचे तुकडे रहात नाहीत. चित्रीकरण आणि संकलनाच्या प्रक्रियेत सानाभाई आणि रण ही व्यक्तिमत्वं होतात. माहितीपट जवळपास फीचरपट होतो. 
शैली फीचर फिल्मची विषय माहितीपटाचा.
माय नेम इज सॉल्ट करत असताना दोनेक वर्षँ पूर्वाभ्यास केल्यानंतर फरीदा पाचा आपल्या सहकाऱ्यांना घेऊन कच्छच्या रणात पूर्ण आठ महिने मुक्काम करून होत्या. पिण्याच्या पाण्यापासून प्रत्येक गोष्टीच्या मर्यादा सोसत त्यांनी सनाभाईचं जगणं अनुभवलं आणि चित्रीत केलं.  
डिजिटल तंत्रज्ञानानं, नव्या तंत्रज्ञानानं ढोर मेहनत कटाप झालीय. कल्पकतेला वाव मिळालाय. 
  वास्तव, वास्तवातली माणसं माणसं कल्पनाही करता येत नाही इतकी गुंत्याची असतात. त्यामुळं माहितीपट कधीकधी फीचरपटापेक्षा अधिक देखणे, वेधक, विचार करायला लावणारे आणि सुंदर असतात.
।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *