स्टालीनच्या खुल्या छळछावणीत जगणाऱ्या संगितकाराची गोष्ट

स्टालीनच्या खुल्या छळछावणीत जगणाऱ्या संगितकाराची गोष्ट

The Noise Of Time.
Author : Julian Barnes
Publisher : Knopf
।।
दी नॉईज ऑफ टाईम ही ज्युलियन बार्नस या मॅनबुकर बक्षिस विजेत्याची ताजी कादंबरी.  दिमित्री शोस्टाकोविच (१९०६-१९७५) या रशियन संगीतकाराच्या जीवनावर आधारलेली. शोस्टाकोविचनं अनेक ऑपेरा लिहिले, सोलो पियानो मैफिली केल्या, संगीत रचलं, चित्रपटांना संगित दिलं. त्यानं दिलेल्या सिनेमा संगिताला एकदा ऑस्करचं नामांकन मिळालं होतं.शोस्टाकोविच युरोप आणि अमेरिकेत गेला, तिथं भाषणं केली, संगीत सादर केलं. काही संगीत समीक्षकांनी त्याला ग्रेट म्हटलं, काहींनी दुय्यम दर्जाचा ठरवलं. सोवियेत युनियनच्या सरकारांनी त्याला अनेक पदकं दिली. लेनिन पदक, स्टालिन पदक, जनता पदक, समाजवादी पदक, क्रांती पदक इत्यादी इत्यादी. २००० साली त्याच्या चित्राचं टपाल तिकीट रशियन सरकारनं काढलं.
कादंबरीच्या सुरवातीला शोस्टाकोविच आपला गाशा गुंडाळत असतो, आपण आता संपलो या विचारानं हैराण असतो.
शोस्टानं निकोलाय लेस्कोव या लेखकाच्या कादंबरीवर आधारलेला  लेडी मॅकबेथ ऑफ मिटनेन्स्क हा ऑपेरा लिहिलेला असतो. १८व्या शतकातल्या एका स्त्रीच्या व्यभिचारी जीवनावर आधारलेला ऑपेरा. ऑपेराचा प्रयोग खुद्द स्टालीननं पाहिलेला असतो. स्टालीन वैतागून प्रयोग अर्धवट सोडून निघून गेलेला असतो. प्रावदा या कम्युनिष्ट पक्षाच्या मुखपत्रात स्टालीनचं मत प्रसिद्ध झालेलं असतं ‘ शोस्टाचं संगित म्हणजे नुसता गलबला असून शोस्टा हा प्रतिगामी संगितकार आहे.’
संपलं. 
‘  आता स्टालीनचे छळवादी पोलीस आपल्याला पकडायला येणार. कुठल्याही क्षणी आपल्याला अंथरुणातून उठवून अंगावरच्या कपड्यानिशी नेलं जाणार.आपली रवानगी छळछावणीत. तिथ छळ. गोळी घालून ठार मारणार. आपले कुटुंबीय, आपले मित्र, आपले सहकारी इत्यादींचेही आपल्यासारखेच हाल होणार.’ अशा विचारांच्या  गर्तेत शोस्टा सापडलाय. स्टालीन, मोठे पुढारी, कम्युनिष्ट पार्टी यांना विरोध केल्यामुळं छळछावणीत आयुष्य घालवणाऱ्या, वेदनामय मरणात गेलेल्या लाखो कहाण्या  त्याला माहित आहेत.  त्या लाखो कहाण्यात  आपली भर पडणार या विचारानं शोस्टा कासाविस झालाय. 
    लेडी मॅकबेथ ऑफ मिटनेन्स्कच्या  संगिताचं एकेकाळी समीक्षकांनी भरमसाठ कौतुक केलेलं असतं. स्टालीनचा कल पाहून. नंतर स्टालीनची खप्पामर्जी झाल्यामुळं प्रावदात त्याच संगितावर टीका होते. आता  खैर नाही असं वाटत असतानाच खुद्द स्टालीन शोस्टाला फोन करतो. न्यू यॉर्कमधे एका संगीत परिषदेत रशियाच्या वतीनं बोलायचा आदेश देतो. शोस्टा तयार नसतो. नाना सबबी सांगतो. तब्येत बरी नाहीय म्हणतो. स्टालीन डॉक्टरची व्यवस्था करतो. शोस्टा  चांगले कपडे नाहीयेत म्हणतो. स्टालीन सरकारतर्फे कपडेही पुरवतो. नाईलाजानं छळछावणीऐवजी शोस्टाला संगीत कॉन्फरन्सला जावं लागतं.  तिथं स्टालीनचे विचार अमेरिकन लोकांसमोर मांडावे लागतात.आपल्याला  आवडलेल्याच संगितावर शोस्टाला टीका करावी लागते.  
आपल्याला मान्य नसलेल्या गोष्टी जाहीरपणे कराव्या लागणं.
एक खुली  छळछावणी. 
संगिताची समज नसलेले पुढारी संगितविषयक धोरणं ठरवतात आणि ती धोरणं शोस्टाला मान्य करावी लागतात. एक कम्युनिष्ट पुढारी रागारागानं भांड्यांची आदळापट करावी तसा पियानो वाजवतो, शोस्टाला त्याचं कौतुक करावं लागतं. ज्यांना संगितातलं काहीही कळत नाही अशी माणसं संगिताची व्याख्या करतात, संगिताचं धोरण आखतात, ते सारं शोस्टाला मान्य करावं लागतं. अशा लोकांनी चालवलेल्या कम्युनिष्ट पक्षाचं सदस्यत्व कादंबरीच्या शेवटी  शोस्टाला स्वीकारावं लागतं.
पोलादी पडद्याआडच्या रशियन समाजाबद्दल इतर जगाला काही कळत  नसे. रशियन राज्यकर्ते जगभरच्या मोजक्या पत्रकारांना, लेखकांना, पुढाऱ्यांना बोलावून घ्यायचे. त्यांची उत्तम बडदास्त ठेवायचे. खाण्यापिण्याची चंगळ असायची. पढवून ठेवलेल्या लोकांच्या गाठीभेटी सरकार घडवून आणायचं.  त्यांना कधी छळछावण्या पहायला मिळाल्या नाहीत किवा जीवनावश्यक वस्तू गायब असलेली दुकानं त्यांना स्टालीननं दाखवली नाहीत. बाहेरून जाणारे सार्त्र, शॉ, रॉय, डांगे इत्यादी लोक रशियाची एक गायडेड टूर करून परतत आणि रशियाचं गुणगान करत. 
कम्युनिष्ट राजवटीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी कशी होते हे पहिल्या प्रथम जगाला कळलं ते वन डे इन दी लाईफ ऑफ आयव्हॅन डेनिसोविच या कादंबरीतून. अलेक्झांडर सोल्झेनित्सिनची ही कादंबरी नोवी मिर रशियन नियतकालिकात प्रसिद्ध झाली आणि जगभर खळबळ उडाली.  
यथावकाश रशियन पोलादी पडद्याला भोकं पडत गेली. स्टालीन ते प्युतीन अशा कालखंडात रशियात काय घडत होतं याची काहीशी कल्पना जगाला आली. आता २०१६ साली स्टालीन काय, माओ काय, त्यांनी केलेले उद्योग जगाला माहित आहेत. प्रस्तुत कादंबरीत त्या विषयावर नवा प्रकाश टाकलेला नाही. 
तरीही ही कादंबरी वाचली जातेय कारण त्यात शोस्टाकोविच या विख्यात संगीतकाराचं जगणं एका उपरोधीक शैलीत लेखकानं मांडलं आहे.  स्टालीनच्या क्रौर्याचं भीषण किंवा थरारक वर्णन या कादंबरीत नाही. शोस्टाकोविचचा झालेला वैचारिक आणि भावनात्मक कोंडमारा या कादंबरीत आहे. शोस्टाकोविचला छळछावणीत जावं लागलं नाही. त्याला मारझोड झाली नाही. सारं आयुष्य त्यानं खुल्या तुरुंगात घालवलं.  
  खरा संगितकार व्हायचं तर समाजवाद, वर्गकलह, क्रांती इत्यादी गोष्टींचा अभ्यास अत्यावश्यक असे. ते सारं शिकवण्यासाठी एक कम्युनिष्ट गुरुजी स्टालीननं शोस्टाकडं पाठवला. तो गुरुजी पहिले झूट वैतागला कारण शोस्टाच्या घरात स्टालीनचं एकही चित्र नव्हतं. शोस्टानं शिकवणी सहन केली आणि गुरुजीच्या आज्ञेनुसार एक अधिकृत स्टालीनचित्र घरात लटकावलं.
  शोस्टाला आत्महत्या करावीशी वाटायची. पण आत्महत्या करण्याचं धैर्य नव्हतं.
बार्न्सची कादंबरी अगदी सौम्यपणे शोस्टाकोविचचं जगणं दाखवते. कधी कादंबरीकार त्रयस्थाच्या नजरेतून शोस्टाचं वर्णन करतो, कधी शोस्टाच्या मनात काय येतं ते सांगतो तर कधी शोस्टा काय वाचतो त्यातून लेखक शोस्टा उभा करतो.
शोस्टा घाबरट आहे काय? तो सत्तेपुढं वाकणारा, सत्तेची चमचेगिरी करणारा आहे काय? काही प्रमाणात आहे. त्यानं कधीच सत्तेविरोधात बंड केलं नाही. संगित न समजणाऱ्या पुढाऱ्यांचं आपण ऐकणार नाही असं तो कधीच म्हणाला नाही. बूर्झ्वा संगीत, सामान्य माणसाचं संगीत, कामगारांचं संगीत, श्रीमंताचं संगीत, क्रांतीचं संगीत, गरीबाचं संगीत, पुरोगामी संगीत, प्रतिगामी संगीत असे संगिताचे नाना प्रकार कम्युनिष्ट सत्तेनं, कम्युनिष्ट पुढाऱ्यांनी कल्पिले. हा सारा प्रकार शोस्टाला पसंत नसला तरीही त्यानं त्याविरोधात आवाज उठवला नाही. स्टालीन किंवा इतर पुढाऱ्यांनी दिलेल्या आज्ञा आणि भाषणं त्यांनी निमुट पाळली. 
परंतू स्वातंत्र्याची गळचेपी त्याला मान्य होती असंही नाही. स्टालीनची झोटिंगशाही त्याला कळत होती. ती त्याला मान्य नव्हती. आपण चुकतो आहोत, आपण अयोग्य गोष्टींपुढं मान तुकवत आहोत याची जाणीव शोस्टाला होती. 
जाच दिसत होता, जात सहन करावा लागत होता पण जाच मंजूरही नव्हता. अशा दोन दबावांमधे शोस्टाकोविच हिंदकळत होता.
शोस्टाकोविचचा सहवास अनुभवलेल्या काही लोकानी त्याच्याबद्दल लिहून ठेवलं आहे. शोस्टाकोविच संकोची होता, मृदू होता, भांडण त्याच्या स्वभावात नव्हतं असं त्याचे   मित्र सांगतात. संगीत हेच त्याचं जीवनसर्वस्व असल्यानं बाकीच्या गोष्टी त्याला कधी शिवल्या नाहीत, आपण आपलं स्वातंत्र्य गमावतोय हे त्याला कळलं नाही असा एक सूर त्याला ओळखणाऱ्यांच्या कथनातून निघतो. स्टालीन क्रूर आहे, कम्युनिष्ट सत्ता क्रूर आहे हे त्याला कळत होतं.   शोस्टानं  अनेक माणसांना नोकऱ्या, सवलती द्या अशी विनंती करणारी विनंतीपत्रं  ऊच्च पदांवरच्या  राज्यकर्त्यांना लिहिली. तो कोणाला नाही म्हणू शकत नसे असं त्याचे मित्र सांगतात. विरोध करणं ही गोष्ट त्याच्या रक्तात नव्हती.
लेखक शोस्टाला भित्रा, सत्तेची लालूच असलेला, करियरिस्ट असाही रंगवत नाही. क्रूर सत्तेपुढं पड खाल्लेला एक अपयशी नायक असही शास्टोचं चित्रण बार्न्स करत नाही. कादंबरीची शैली मजेशीर आहे. कधी कादंबरीकार त्रयस्थाच्या भूमिकेतून शोस्टाचा इतिहास सांगतो, शोस्टाच्या मनात काय चाललं असेल त्याचं वर्णन करतो. कधी शोस्टा स्वतःच बोलतो. कधी शोस्टाच्या आसपासची माणसं बोलतात. या शैलीमुळं शोस्टाचा काळ समजतो, त्याच्या सभोवतालची माणसं समजतात, शोस्टाच्या विचाराचे काही पैलू समजतात. पण त्यातून शोस्टा हा थोर होता की चोर होता की खुबीनं वाटचाल करणारा एक चालू संगितकार होता की कटुंबवत्सल माणूस होता इत्यादी  एकछटा निर्णय घेता  येत नाही.
एक उल्लेख गॅलिलिओचा आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे चर्चला मान्य नसलेलं सत्य गॅलिलिओनं सांगितलं, त्यात त्याचा जीव गेला. कादंबरीकार शोस्टाच्या आडून म्हणतो की गॅलिलिओला जे सत्य उमगलेलं होतं तेच सत्य इतरांनाही उमगलेलं होतं. परंतू ते सारे गप्प बसले. कारण त्यांना बायकापोरं होती, संसार चालवायचे होते. सत्तेला मान्य नसलेलं सत्य सांगितलं तर आपण मरणार आणि आपल्या कुटुंबालाही त्रास सहन करायला लागणार असा कुटुंबवत्सल विचार इतरांनी केला. 
गॅलिलिलोला पाश नसल्यानं त्यानं  सत्य सांगण्याचं धैर्य दाखवलं. यात सत्य लपवणाऱ्यांनी फार मोठा गुन्हा केलाय असं नाही. 
सत्य सांगणारा थोर असतो हे खरं पण सत्य न सांगणारे अपराधी असतीलच असं म्हणायचं कां?
आपल्याला कुठल्याही क्षणी तुरुगात जावं लागेल या कल्पनेनं तुरुंगात ओढण्यासाठी शोस्टानं  सिगरेट जमवून ठेवलेल्या असतात. शोस्टा वाट पहातोय,  पोलीस काही केल्या येत नाहीत. काही तरी करून वेळ काढायचा म्हणून शोस्टा जपून ठेवलेली सिगरेट शिलगावतो आणि स्वतःबद्दल विचार करू लागतो.
  सिगरेट शिलगावताना शोस्टा विचार करतो की हीरो होणं हे भ्याड होण्यापेक्षा सोपं असतं.
हीरो बंदूक चालवतो, बाँब टाकतो, सत्तेला विरोध करून फाशी भोगतो. खलास होतो. अगदी थोड्या क्षणाचा मामला.  
 भ्याड माणसाला सगळं आयुष्य त्रास सहन करत जगावं लागतं.
भ्याडपणाची एक करियरच असते. जीवनभर कधी तो बिनधास्त होत नाही. भ्याडपण सतत टिकवून ठेवण्यासाठी एक सातत्य लागतं, चिकाटी लागते.
कादंबरीत सत्ता आणि स्टालीन नेपथ्य़ात आहेत.
 संगीतकार आणि क्रूर सत्ता असा झगडा थरारक रीतीनं रंगवणं शक्य होतं. कादंबरीकारानं ते केलेलं नाही. खुद्द कथानायकही तोल राखून मांडला आहे. शोस्टाकोविचचं जगणं कम्युनिष्ट सत्तेच्या क्रौऱ्यावर बेतून एक कम्युनिझमला उघडं करणारी कादंबरी उभी राहू शकली असती. एक थरारनाट्य उभं राहू शकलं असतं. लेखकानं ते टाळलं आहे.  सत्तेचं क्रौर्य आणि दाहकता लेखक दाखवत नाही.  
कट्टर कम्युनिष्ट, कट्टर कम्युनिष्ट विरोधी, कट्टर सत्तेचा आनंद भोगणारा, कट्टर स्वातंत्र्यासाठी सत्तेशी पंगा घेणारा, कट्टर बंडखोर आणि कट्टर भित्रा अशा टोकाच्या छटांची माणसं असतात. बार्न्सनं शोस्टाला अशा कोणत्याही टोकाच्या छटांनी रंगवलेलं नाही. गडद काळी किवा लख्ख पांढरी छटा टाळून मधल्या करड्या छटांत लेखकानं कथानायकाची कथा रंगवली आहे.
लेखक बार्न्स रशियात आणि पूर्व युरोपातल्या कम्युनिष्ट देशात फिरलेला आहे. तिथल्या समाजाचा, तिथल्या माणसांच्या वागण्याचा अनुभव त्यानं घेतलेला आहे. आणि अर्थातच कथानायकाचा कसून अभ्यास केलेला आहे.
एक तरल पण गुंत्याची व्यक्तिरेखा लेखकानं उभी केलीय. उण्यापुऱ्या छोट्या आकाराच्या १८० पानांत.
ज्युलिन बार्न्सवर लक्ष ठेवणारे वाचक आणि समीक्षक आहेत. त्यांनी या कादंबरीचं कौतुकही केलंय आणि कादंबरी काही खास नाहीये असं म्हटलंय.
वास्तवात होऊन गेलेली व्यक्ती कादंबरीत हाताळणं कठीण असतं. ती व्यक्ती आणि तो काळ ही चौकट तर सुटत नाही. ही चौकट लेखकाला सांभाळावी लागते. जनमान्य, जनज्ञात माहितीशी विपरीत गोष्टी वाचक स्वीकारत नाही. माहीत आणि मान्य असलेल्या गोष्टींच्या आसपास फिरून लेखकाला व्यक्ती आणि काळ रंगवावा लागतो. 
स्टालीन हा क्रूरकर्मा होता हे जगाला माहीत आहे. परंतू स्टालीन हा एक उत्तम वाचक होता, त्याला साहित्य आणि संगित चांगलं समजत असेही पुरावे आता प्रसिद्ध झाले आहेत. अशी माहिती समोर आल्यावर स्टालीनवर कादंबरी लिहिणाऱ्या लेखकाला स्टालीन हे पात्र वेगळ्या रीतीनं हाताळता येतं. स्टालीन क्रूरकर्मा आणि स्टालीन एक सुसंस्कृत माणूस अशी दोन टोकं न घेता त्याच्या मधल्या करड्या छटांमधे स्टालीन रंगवता येऊ शकतो. अशा निर्मितीसाठी एक कौशल्य लागतं, एक संयम लागतो. 
ज्युलियन बार्न्स या लेखकाकडं ते कौशल्य आणि संयम आहे याचे पुरावे कादंबरीत जागाजागी सापडतात. उपरोध, व्याजोक्ती या दोन गोष्टींचा संयमित वापर लेखकानं केला आहे.
कादंबरी सध्या गाजतेय.

।।

3 thoughts on “स्टालीनच्या खुल्या छळछावणीत जगणाऱ्या संगितकाराची गोष्ट

  1. अप्रतिम विवेचन. मी अजून ही कादंबरी वाचलेली नाही पण मनात उत्कंठा निर्माण झाली आहे. खरतर आजही स्टालिन बद्दल फारसे खुलेपणाने बोलले जात नाही – जितके हिटलरबद्दल बोलले जाते. हा देखील नवा "स्टालिनवाद" असावा!! अशा काही कादंबऱ्यामधून मी त्या काळाचे वास्तववादी चित्रण वाचले आहे. अंगावर काटा उभा राहतो. फारच सुरेख परिचय.

  2. विवेचनाने उत्कंठा खूप वाढवली. आता वाचावीच लागेल. खूप छान.

  3. रशिया अधिकाधिक गूढ आहे, असं कळतं। वाचायची इच्छा होतेय।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *