सहाराचे सुब्रतो रॉय निदान काही काळ तरी तुरुंगात आहेत. साधनहीन लोकांना खोटी आमिषं देऊन त्यांच्याकडून पैसे घेतले. ते बहुतांशी लबाडीच्या प्रकल्पांमधे गुंतवून पुन्हा लोकांना शेंड्या लावल्या. असं करत करत दहा वीस वर्षाच्या काळात रॉयांची संपत्ती लक्ष करोड रुपयांच्या घरात गेली. याच्या कित्येक पट कमी संपत्ती गोळा करण्यासाठी टाटा घराण्याच्या काही पिढ्या खर्च झाल्या.
मेहनत न करता, समाजाच्या आर्थिक विकासाचे प्रस्थापित दर ओलांडून, कायद्याच्या मर्यादा ओलांडून, पटकन श्रीमंत व्हावं असं माणसांना वाटतं. अगदीच म्हणजे अगदीच अपवादात्मक माणसं एकट्याच्या प्रयत्नानं, कमीत कमी गुंतवणूक करून पटकन श्रीमंत होऊ शकतात. श्रीमंती किंवा संपत्ती निर्मिती ही पटकन होणारी गोष्ट नाही ही गोष्ट माणसाला समजत नाही. त्यामुळं  आकर्षक सवलती, आकर्षक परतावा, आकर्षक योजना, आकर्षक बक्षिसं इत्यादी दाखवून पैसे मागणाऱ्या संस्था पटकन लोकांना शेंड्या लावू शकतात. सत्यानाश या पलिकडं त्याचं दुसरं फलित नसतं.
चिट फंड इत्यादी उद्योग माणसाच्या शॉर्टकटनं श्रीमंत होण्याच्या वृत्तीचा फायदा घेतात. सहकारी बँका भरमसाठ व्याजदर देऊ करतात. झाडांत पैसे गुंतवा आणि दहा वीस वर्षात करोडो रुपये कमवा असं कोणी तरी सांगतं. सध्या मुंबईच्या उपनगरातून एक प्रचार होतोय. घर घेतलंत तर टीव्ही, स्कूटर, कार, दागिने इत्यादी गोष्टी फुकट मिळतील आणि कित्येक लाख रुपयांची रजिस्ट्रेशन फी इत्यादी गोष्टीही माफ होतील.
जगात कुठलीही गोष्ट फुकट नसते. प्रत्येक गोष्टीची एक किमत असते. अगदी विकलांग, पूर्णसाधनहीन, वृद्ध इत्यादी माणसांनाच कोणाकडून तरी किमत न मोजता मदत मिळू शकते, इतरांना नाही. अर्थविचार करणाऱ्यांचं तर सोडाच, धार्मिक विचारांच्याही माणसांना कळतं की देव कोणतीही गोष्ट भक्ताला फुकट देत नाही, त्याचे रीटर्न्स मागतो, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात. नैवेद्य, भक्ती, उपासना, त्याग, अर्ध्य, परोपकार, तपश्चर्या असलं काही तरी दिल्या शिवाय देवही प्रसन्न होत नाही.
शॉर्टकनं पैसे मिळवणं ही वृत्ती वाढली की गरीब लोक फसतात आणि त्यांना फसवणारे सुब्रतोरॉय निर्माण होतात आणि या सुब्रतो रॉयांना जगवणारे आणि त्यांच्यावर जगणारे राजकीय नेते तयार होतात. त्यातूनच सारी राजकीय आणि आर्थिक व्यवस्था किडते.
आजच्या दुरवस्थेचं तेही एक कारण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *