पोस्टर रंगवणारे कलाकार, चित्रपट सृष्टीचा काळाआड गेलेला टप्पा

पोस्टर रंगवणारे कलाकार, चित्रपट सृष्टीचा काळाआड गेलेला टप्पा

गेल्या वर्षभरात दोन  डॉक्युमेंटरी प्रेक्षकांच्या नजरेत भरल्यात. ओरिजिनल कॉपी आणि इन सर्च ऑफ फेडिंग कॅनव्हास. 
ओरिजन कॉपी हा माहितीपट मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आणि नंतर आंतरराष्ट्रीय माहितीपट महोत्सवात सादर झाला. २०१५ साली प्रदर्शित झालेला हा माहितीपट अमेरिका, कॅनडा, जपान, जर्मनी, नेदरल्डँड्स आणि ऑस्ट्रियात भरलेल्या चित्रपट महोत्सवात सादर करण्यात आला.  इन सर्च ऑफ कॅनव्हास कोची-मुझिरी द्विवार्षिक महोत्सवात २०१४ साली प्रदर्शित झाला, त्याला २०१६ साली राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पेशल ज्युरी अवार्ड मिळालं.
‘ इन सर्च’ मधे मनोहर सिंग बिश्त यांनी डी अंबाजी, बालकृष्णन, दिवाकर करकरे, जी कांबळे, चिनप्पा इत्यादी कलाकारांची गोष्ट सांगितलीय. त्या कलाकारांची पोस्टर रंगवण्याची पद्धत, स्वतःच्या घरात त्यांचा वावर, पोस्टर आणि चित्रपट सृष्टीबद्दलचं त्यांचं म्हणणं इत्यादी गोष्टी मुलाखतींच्या रूपात या माहितीपटात मांडलेल्या आहेत. दिवाकर करकरे मुंबईचे, शिवाजी पार्कचे रहिवासी. अमिताभच्या जंजीर चित्रपटाचं पोस्टर त्यांनी तयार केलं. नाईफच्या फटकाऱ्यांनी त्यांनी अमिताभचं व्यक्तिमत्व उभं केलं. अमिताभच्या वक्तिमत्वाची  धाडसी, अॅक्शनी वैशिष्ट्यं त्यांनी  वापरलेल्या नाईफ शैलीमुळं उभं राहिलं असं करकरे मुलाखतीत सांगतात.
ओरिजिनल कॉपी आहे  रहमान या पोस्टर चित्रकाराभोवती. मुंबईतल्या आल्फ्रेड थेटरसाठी रहमान पोस्टर रंगवत असत.
दोन्ही माहितीपटात सिनेमाची महाकाय पोस्टर हातानं रंगवणारे कलाकार हा विषय आहे. 
१९६०-७० पर्यंत सिनेमाघराच्या बाहेर सिनेमाच्या पडद्याच्या आकाराची हातानं रंगवेली पोस्टर्स लावली जायची. मोठाल्या गोदामात ही पोस्टर्स रंगवली जायची. प्रचंड कॅनव्हास. त्यावर चारकोल काडीनं चित्राची आऊटलाईन काढली जायची. कधी कधी चौरसाचे तुकडे काढून त्यात तुकड्या तुकड्यात चित्र विभागलं जायचं. नंतर मुख्य कलाकार मोठाले ब्रश घेऊन चित्रं, पेंटिंग करायचा. नंतर कलाकाराचे मदतनीस चित्राचं फिनिशिंग करायचे. चित्र तयार व्हायला आणि वाळायला बरेच दिवस लागायचे. चित्र वाळलं की ते सिनेमाघराच्या बाहेर उंचावर नेऊन बांधलं जायचं.
सिनेमा तयार होत आला की पोस्टरची तयारी सुरु व्हायची.
मुंबईत गिरगावात इंपेरियल सिनेमा आजही आहे. बैठी इमारत. कंपाऊंड. कंपाऊंडच्या बाहेरच्या बाजूला प्रचंड स्पेसमधे पहिल्या मजल्याच्या उंचीवर पोस्टर लावली जायची. उडन खटोला नावाचा सिनेमा आला होता. त्यात एक उडता रथ होता. त्या रथाचं पोस्टर तयार करण्यात आलं होतं. ते पोस्टर पहायला अलोट गर्दी होत असे. गिरगाव चौपाटीजवळच ऑपेरा हाऊस हे सिनेमाघर आहे. ऑपेरा हाऊसला मोकळं मैदान आणि मैदानाच्या भिंतींच्यावर भरपूर मोकळी जागा. तिथं अनेक पोस्टर लावली जायची. ती पहायला माणसं गर्दी करत.
या पोस्टरची स्वतंत्र वैशिष्ट्यं होती. त्यात चित्रकला तर होतीच. सैगल पासून अमिताभ बच्चनपर्यंत; दिलीप कुमार, राजकपूर, देवानंद. कलाकारांची शारीरीक आणि पडद्यावर दिसणारी व्यक्तिमत्वं या पोस्टरमधे ठळकपणे दिसायची. ती चित्रं म्हणजे पोर्ट्रेट्स असत. कुठल्याही चांगल्या पोर्ट्रेटमधे असलेले गुण या पोस्टरमधे असत. परंतू छोट्या कॅनव्हासवर होणाऱ्या पेंटिंगपेक्षा ही पोस्टर मुळातच वेगळी असत. यांचा आकार महाकाय असे. पोस्टरपासून पंचवीस तीस फुटापेक्षा जास्त अंतरावरून ती पहायची असत. 
अंतर हा एक मोठा मुद्दा असतो. एकादं चित्र जवळून पाहिलं की रंगलेपनातले पदर, फटके इत्यादी दिसतात, रंगलेपनाची पद्धत दिसते. परंतू चित्र समजतं ते काही अंतरावरून. अंतरावरून चित्रं कसं दिसेल त्याचा अंदाज घेऊन चित्रकारानं ते जवळून काढायचं. पंचवीस तीस फुटावरून चित्र कसं दिसेल त्याची कल्पना करायची आणि  दोन तीन फुटावरून चित्र रंगवायचं हे एक स्वतंत्र कसब आहे.  
दोन्ही माहितीपटातून   दृष्टीआड गेलेलं जग समोर येतं. नव्या जमान्यात  पोस्टर कंप्यूटरवर तयार होतात, डिजिटल पद्धतीनं छापली जातात, फ्लेक्सवर. सिनेमाची पोस्टर असोत की सेलफोनची जाहिरात असो, हातानं कॅनव्हासवर चित्रं काढली जात नाहीत. आताची पोष्टर लाकडी फ्रेमवर ठोकली जात नाहीत, ती स्टीलच्या फ्रेमवर ताणली जातात. 
तंत्रज्ञान बदललं. कंप्यूटरचा वापर आला. चित्रं कंप्यूटरच्या पडद्यावर तयार केली जातात. फोटो किवा चित्रावर संस्कार करणारे अनेक सॉफ्टवेअर आता वापरले जातात. चित्रात वाट्टेल ते इफेक्ट आणणं शक्य झालंय, कंप्युटर ते करतो, ती खटपट माणसाला करावी लागत नाही.  
हातानं पोस्टर रंगवणं ही एक कला होती आणि कंप्युटरवर चित्रं काढणं हीही एक कला आहे. दोन्ही कलांमधे कल्पनाशक्ती, कौशल्य, मेहनत, प्रतिभा  या गोष्टी येतात. ब्रश जाऊन माऊस आला. रंगाची ट्यूब आणि डबा जाऊन कंप्यूटरनं तयार केलेल्या रंगाच्या छटा आल्या. हातानं रंगवणाऱ्यांना कंप्यूटर जमत नाही, कंप्यूटरवाल्यानं हातानं चित्रं काढायला आवडत नाही. 
हातानं भलेमोठे कॅनव्हास रंगवण्याचं तंत्र, ती प्रक्रिया पार पडते त्या ठिकाणची पैस आणि वातावरण, त्यात गुंतलेली माणसं, तो काळ या गोष्टी चित्रपट संस्कृतीचा एक भाग आहेत. चित्रपट संस्कृती त्या टप्प्यातून गेली आणि आताच्या टप्प्यावर पोचली.  हातानं पोस्टर रंगवणं या पर्वाला ऐतिहासिक महत्व आहे. तो एक वारसा आहे. वरील दोन्ही माहितीपटांनी तो वारसा आजच्या रसिकांसमोर ठेवलाय, कायमसाठी डॉक्युमेंट केलाय. संस्कृती आणि चित्रपटाच्या अभ्यासाची साधनं या माहितीपट निर्मात्यांनी तयार करून ठेवली आहेत.
 ओरिजिनल कॉपीमधे आहेत रहमान हे मुंबईच्या आल्फ्रेड टॉकीजसाठी पोस्टर तयार करणारे चित्रकार. माहितीपटाच्या सुरवातीला ते कॅमेऱ्याकडं  ‘ सुरु करू? ‘ असा प्रश्न विचारून स्वतःबद्दल बोलायला सुरवात करतात. त्यांच्या या प्रश्नानं लक्षात येतं की हा एक माहितीपट आहे आणि रहमान मुलाखत देत आहेत. 
रहमान यांच्या उमेदीच्या काळात  धंदा-व्यवसाय-नोकरी बापाकडून मुलाकडं जात असे. रहमान यांचे वडीलही  पोस्टर रंगवत. रहमान सांगतात की ते एक पेंटर होते, एक चित्रकार होते. रहमान यांची खंत आहे ‘ आपण पोस्टर रंगवणारे रंगारी झालो, वडिलांसारखेच चित्रकार होऊ शकलो नाही ‘. 
दिद्गर्शक चित्रपटचा निर्माता असतो. नट नट्या पडद्यावर कशा दिसतील ते दिद्गर्शक ठरवतो.  परंतू पोस्टरवर ती माणसं कशी दिसावीत ते  पोस्टर कलाकार, रहमान ठरवतात. मधुमती असो, आन असो किंवा अमिताभचा सिनेमा असो. दिलीप कुमार आणि अमिताभ लोकांना कसे दिसावेत ते रहमान ठरवतात. एक पोस्टर पाहूनही जनतेला सिनेमा कसा आहे ते कळलं पाहिजे याची दक्षता पोस्टर कलाकार घेतात. सिनेमा मारधाड आहे की भावनाप्रधान आहे ते लोकांना पोस्टर पाहून कळतं.   कित्येक सिनेमे आतून बंडल असत पण रहमाननी तयार केलेल्या पोस्टरमुळं सिनेमा पहायलाच हवं असं लोकांना वाटे.   पोस्टर पाहून लोक असा सिनेमा पहायला जात आणि सिनेमा पाहून बाहेर पडतांना शिव्या देत, पैसे वसूल झाले नाहीत असं म्हणत. रहमान म्हणतात की आपलं काम लोकांना आकर्षिक करण्याचं असल्यानं ते आपण प्रामाणिकपणे करतो. सिनेमा बंडल असेल तर त्याला आपला इलाज नाही. 
पोस्टर तयार करण्यापूर्वी थेटराचे मॅनेजर आणि मालक दोघांशीही चर्चा होते. ही माणसं कलाक्षेत्रातली नसतात.  त्यांची पोस्टर कसं असावं याबद्दल मतं असतात. ती मतं ते रहमानसमोर मांडतात. रहमान आपल्याच मतानुसार पोस्टर तयार करतात.
पोस्टर तयार करण्यापासून ते टांगण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया माहिती पटात दिसते
तंत्र माहितीपटाचं असलं तरी हा दीड तासाचा माहितीपट फीचर फिल्मसारखा होत जातो. त्यात अनेक व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्या स्वतंत्र कथा आहेत. मुंबई शहर या माहितीपटात येतं. आल्फ्रेड थेटर हेच एक व्यक्तिमत्व आहे,  थेटरचे मालक आणि मालकीण बाई या स्वतंत्र कॅरॅक्टर्स आहेत.
 रहमान यांचे सहकारी माहिती पटात येतात. आल्फ्रेड थेटर येतं. त्या थेटरात सिनेमा पहाताना सिगरेट ओढणारी माणसं दिसतात, थेटरात जाणारं मांजर दिसतं. थेटरात झोपलेली माणसं दिसतात. सिनेमा संपल्यानंतर थेटर साफ करणारे कर्मचारी दिसतात. मध्यंतरात खायच्या वस्तू विकणारे विक्रेते दिसतात,  विक्रेते वस्तू कशा विकत आणतात ते दिसतं, त्यांची हिशोबाची भांडणं दिसतात.
आल्फ्रेड थेटराचा जन्मापासूनचा इतिहास माहितीपटात उलगडत जातो. थेटर कसं चालतं ते मॅनेजर आपल्याला सांगतो. जुनं थेटर, जुनं तंत्रज्ञान त्यामुळं थेटर नीट चालत नाही. तरीही थेटरचे मालक थेटर बंद करत नाहीत.  थेटरात काम करणाऱ्या माणसांना जगवायचं आहे असं त्यांना वाटत असतं. तोटा सहन करून मालक थेटर चालवतात. 
हा चित्रपट मुंबईत महोत्सवात दाखवला गेला तेव्हां थेटरात निवडक माणसं होती. महोत्सव प्रामुख्यानं फीचर फिल्मचा असल्यानं माहितीपट पहावा असं अनेकांना वाटलं नाही. 
पट दाखवला तेव्हां चित्रपटाचा दिग्दर्शक, चित्रपटातली पात्रं, संकलक इत्यादी कलाकार हजर होते. माहितीपट पहाताना  रहमान हा माणूस खराखुरा माणूस आहे, व्यावसायिक नट नाहीये असं मुळीच वाटत नव्हतं. रहमान यांचा माहितीपटातला वावर इतका सहज आणि कॅमेरास्नेही होता की माहितीपट माहितीपट न रहाता फीचरपट झाला होता. माहितीपटात पोस्टर काढताना मदत करणारा एक सिंगल फसली मुलगा भारी होता. कसलेल्या नटासारखा दिसत होता. तो सिंगल फसली आणि रहमान माहितीपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी थेटरात उपस्थित होते.
उरस्थित प्रेक्षकांपैकी काहींनी माहितीपट संपल्यानंतर  रेहमान आणि सिंगल फसलीला कडकडून मिठी मारली. 
।।
इन सर्च ऑफ फेडिंग कॅनव्हास.  दिद्गर्शक : रीटा हेमराजानी..
ओरिजनल कॉपी. दिद्गर्शक : Heinzen-Ziob & Georg Heinzen

3 thoughts on “पोस्टर रंगवणारे कलाकार, चित्रपट सृष्टीचा काळाआड गेलेला टप्पा

  1. तुमच्या या लेखाने माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाया. नासिकला आमच्या सर्कल सिनेमात मागच्या व्हरांड्यात पोस्टर रंवली जायची ते रंगवणारे कलाकार मुंबईहून येत असत. सिनेमाच्या आवारात रहात. रात्री प्रखर दिव्यांच्या प्रकाशात काम चाले. मुख्य कलाकार आधी चार्कोल्ने पोस्त्रच्या डिझाईन प्रमाणे सर्व आकृत्या काढीत. आदी मग रंगकाम सुरु होई. त्यांच्या रंगाच्या मोठ्या मोठ्या मिश्रानांचे डबे आणि पॅलेटवरील रंगाचे ढीग आणि त्यांचे मिश्रण आणि लेपन बघत आम्ही मुले तासन तास रात्री उभे रहात असू. आणि ते बघून मी कागदावर चित्र काढीत मोठी झाले! नायक-नायिका गुलाबी, खलनायक निळे-काळे तोंड असलेले, कजाग पात्रे हिरवी असे मजेशीर संकेत त्यात असत. डोळे रंगविणे आणि त्यातील शेवटचा पंधरा चमकणारा ठिपका दिला कि सर्व पात्रे भाव्भारीत होऊन जिवंत होत! आणि गावभर लावण्यासाठी अशी १० ते ३०-४० पोस्टर तयार होत. मोठ्या सिनेमा जास्त फलक असे गणित असे! मजा होती ते बघण्यात! तुमच्या लेखाने ते पुन्हा सर्व डोळ्यासमोर आले! धन्यवाद….सुलक्षणा महाजन

  2. प्रिय श्री . निळू दामले ,
    आपला लेख वाचून लगेच comment box मध्ये लिहिले होते .
    पण माझ्याकडून कुठले तरी चुकीचे बटन दाबले गेल्याने ते तुमच्याकडे पोचू शकले नाही .
    माझ्या अगदी जिव्हाळ्याच्या विषयावर तुम्ही लिहिले आहे .
    या दोन्ही documentaries अवश्य पाहीन .
    सोलापूरला मी असताना तिथे 'यल्ला -दासी' या banner पेंटर्स ची मी काही कामे पाहिलेली
    अजूनही स्मरणात आहेत . अतिशय उत्तम दर्जाचे त्यांचे काम होते . त्या तोडीची cinema ची
    भव्य पोस्टर्स मला इतरत्र कुठेही पाहायला मिळाली नाहीत .
    गोपी, जॉनी मेरा नाम, तेरे मेरे सपने, मजबूर, गहरी चाल, रोटी कपडा और मकान अशी नावे
    उच्चारताच ती ती अजोड banners माझ्या डोळ्यासमोर साकारतात .
    'यल्ला -दासी' या जोडगोळीवर सोलापूरचे माझे मित्र दीपक देशपांडे आणि विजय कुलकर्णी
    आता एक documentary तयार करत आहेत . त्यात माझाही थोडा सहभाग आहे .
    पूर्ण झाल्यावर तुम्हाला नक्की कळवेन .
    या निमित्ताने पत्राद्वारे का होईना आपली भेट झाल्याचा आनंद आहे .
    तुमचा,
    रविमुकुल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *