अती,विकृत, प्रसिद्धीचे दुष्परिणाम.

अती,विकृत, प्रसिद्धीचे दुष्परिणाम.

नेओमी ओसाका, रोलाँ गारो (पॅरिस) टेनीस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीनंतर पत्रकारांसमोर होती.

एका पत्रकारानं विचारलं ” तुला मिळणारी प्रसिद्धी,तुझं जिंकणं हे सगळं जरा अतीच होताहे असं नाही वाटत तुला?”

नेओमी गप्प झाली. गळा दाटून आलाय हे दिसत होतं. तिच्या डोळ्यात अश्रू आले.

पत्रकार परिषद आयोजित करणाऱ्या माणसाला तिनं विचारलं ” मी परिषद सोडून गेले तर चालेल? मला नाही पत्रकारांशी बोलायचंय.”

आयोजक विचार करत होते तेवढ्यात ओसाका उठून निघूनही गेली.

पत्रकारांशी बोललंच पाहिजे असा स्पर्धेचा नियम आहे. तो नेओमीनं मोडला. स्पर्धेनं तिला १५ हजार युरो दंड केला. माफी मागून पत्रकार परिषदेत बोलली तरच पुढल्या फेरीत खेळता येईल असं स्पर्धेच्या आयोजकांनी जाहीर केलं.

नेओमी स्वतःहूनच स्पर्धेच्या बाहेर पडली. लगोलग तिनं जाहीर केलं की ती विंबल्डनमधेही खेळणार नाही.

विंबल्डनवाले म्हणाले की ते स्पर्धेच्या  नियमांचा पुनर्विचार करायला तयार आहेत. ओसाका स्पर्धेच्या बाहेर रहायच्या निर्णयावर ठाम राहिली.

ओसाका जगातली दोन नंबरची टेनिसपटू आहे. तिनं चार ग्रँड स्लॅम जिंकले आहेत.

ओसाका डिप्रेशन आणि मानसीक व्याधींना तोंड देतेय. तसं तिनंच जाहीर कबूल केलंय. मानसीक ताणातून सुटका करण्यासाठी ती औषधं घेत होती, मानसोपचारही घेत होती.

ओसाका अमेरिकेत जन्मलीय. तिची आई जपानी आहे आणि   वडील कॅरिबियन आहेत. ओसाकाच्या चेहऱ्याची ठेवण आणि रंग या दोन्हीमधे तिच्या आई वडिलांचं रंगरूप दिसतं. अमेरिकेत फार माणसं अमेरिकन-गोरे-ख्रिस्ती सोडता बाकीच्यांना कनिष्ठ मानतात. अलीकडं एशियनही (त्यात चिनी, कोरियन व जपानी येतात) कनिष्ठ आणि नकोसे झालेत. 

ओसाका काळी आणि जपानी. म्हणजे डबल कनिष्ठ. 

अमेरिकन वंशद्वेषाच्या विरोधात ओसाका उघडपणे बोलते. जॉर्ज फ्लॉईडचा खून झाल्यावर ओसाका आपल्या एजंटला  घेऊन फ्लॉईडच्या नातेवाईकाना भेटली, आपलं तीव्र दुःख आणि राग तिनं व्यक्त केला. पेपरात आणि वाहिन्यांत तिच्या या वर्तनाची वाच्यता झाली.

टेनीस खेळाडूनी ओसाकावर ती खेळात राजकारण आणते अशी टीका केली.  

ओसाका म्हणाली ” यात राजकारण कुठंय? मी काळी आहे, मला काळ्यांवर अन्याय होतोय हे दिसतं, ते मी व्यक्त करते. हा अगदी मानवी प्रश्न आहे, राजकारणाचा प्रश्न नाही. मी आधी काळी आहे आणि नंतर खेळाडू आहे. माणूस म्हणून माझं चित्त थाऱ्यावर नसेल तर मी कशी खेळू शकणार? माझा खेळ चांगला व्हायचा असेल तर माझं मन स्थिर असायला हवं की नाही? अमिरिकेत काळ्यांचा द्वेष केला जातो, त्यांना त्यांचे मानवी व राजकीय अधिकार दिले जात नाहीत हे सत्य आहे. त्यामुळं काळी माणसं तणावाखाली आहेत. आणि मी ते मांडणार, कोणी काही म्हणो.”

ओसाका चांगली खेळते हे तर ती जिंकते यावरून सिद्ध होतं. परंतू अनेकाना (विशेषतः पत्रकारांना ) वाटतं की तिला मिळणारी प्रसिद्धी तिच्या खेळामुळं नाही तिच्या सामाजिक भूमिकेमुळं आहे. पत्रकार त्यांचं हे मत लिहून आणि तिच्याशी बोलतांना व्यक्त करतात, ओसाका वैतागते.

कोणी म्हणेल की तिनं तिच्या मताला चिकटून रहावं, कोण काय म्हणतंय याची चिंता कां करावी? तिनं लोकांकडं दुर्लक्ष करून खेळावर लक्ष केंद्रीत करावं.मेरिल स्ट्रीप या अभिनेत्रीनं जाहीरपणे डोनल्ड ट्रंप यांच्या धटिंगणगिरीची धुलाई केली, नाव घेऊन. ट्रंप वैतागले, ट्रंपभक्त वैतागले. पण स्ट्रीपनं त्यांना धूप घातली नाही. ती राजकीय चर्चेत गेली नाही, तिनं आपल्या अभिनयावर लक्ष दिलं, सिनेमे करत राहिली.

अर्थात हेही खरं आहे की ओसाका म्हणजे स्ट्रीप नव्हे. त्यामुळं तुलना करण्यात मतलब नाही.

 यातला महत्वाचा मुद्दा खेळाडूचं मानसिक संतुलन आणि प्रसिद्धी माध्यमांचा खेळाडूच्या मानसिग संतुलनावर होणारा परिणाम हे आहे.   

 खेळाडू आणि कलाकारांना माध्यमं अती म्हणजे अती प्रसिद्धी देतात. ती प्रसिद्धी अप्रमाण असते. प्रसिद्धीची येवढी चटकसवय त्यांना लागते की किंचितसा विपरीत सुर कानावर पडला  तरी त्यांना त्रास होऊ लागतो.

खेळताना अंपायर, रेफरी,  तिच्या विरोधात जाणारे निर्णय देतात. ती चिडते. हुज्जत घालू लागते. नाही तरी प्रेक्षक खेळ पहायला येतात ते मनोरंजनासाठीच. ओसाका अंपायरशी भांडतेय हेही त्यांचं रंजनच असतं. ते टाळ्या वाजवतात, हुर्यो उडवतात. मग ओसाका आणखी वैतागते. आणखी हुज्जत घालते.

  बियॉन बोर्ग हा ऑल टाईम ग्रेट टेनीसपटू बर्फाचा गोळा होता, स्थितप्रज्ञ होता. संथपणे खेळत असे. मॅकेन्रो बारीक सारीक कारणावरून कोर्टावर दंगा करत असे, रॅकेट फेकत असे. तो थटथयाट करे आणि लोकांना मजा येई. ओसाका मॅडम जरा वेगळ्या दिसतात.

  प्रसिद्धी माध्यमं वारेमाप, अप्रमाण प्रसिद्धी देऊन माणसांना बिघडवतात हेही तितकंच खरं आहे. खेळाडूच्या चोविस तासाच्या जीवनात ते लुडबूड करतात. बहुतेक वेळा खेळाडूला, कलाकाराला आपल्याकडं प्रेसचं लक्ष आहे म्हणजेच जनतेचं लक्ष आहे असं वाटतं, ते सुखावतात. कित्येक माणसं मग प्रसिद्धीच्या मागं लागतात.त्या नादात त्यांचं खेळावरचं लक्ष कमी होतं.ते जाहिराती करू लागतात, मिळणारे पैसे इतर उद्योगात घालून तिथल्या फायद्यावर लक्ष देतात. चार पैसे मिळवणं, व्यवसाय करणं चूक नाही, कशावर लक्ष केंद्रित करायचं हा मुद्दा त्यात गुंतला आहे. 

युरोपियन कपच्या स्पर्धेत मॅसिडोनिया, नेडरलँड यांचा खेळ बघण्यासारखा होता. धक्का लागून, अडथळे येऊन खेळाडू कोसळत, प्रतिस्पर्धी संघातले खेळाडू त्याला हात धरून उठवत, त्याच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवत. खेळाडू आपसात मुळीच भांडत नव्हते, एकमेकावर धावून जात नव्हते. याचं एक कारण त्या टीम प्रसिद्ध नव्हत्या, माध्यमांनी त्यांना डोक्यावर घेतलेलं नव्हतं. ते कॅमेऱ्यासाठी खेळत नव्हते. त्यांना खेळायचं होतं, त्यांना दिसायचं नव्हतं. गोल झाल्यावर ते थयथयाट करत नव्हते.

डायना ही चार्लस या माणसाची पत्नी होती. भले चार्लस हा राजपुत्र होता आणि डायना राजकन्या होती. मुळात ते पतीपत्नी होते. त्यांच्यात बेबनाव होता. त्यांचे नातेवाईक आणि मित्र यांच्या दृष्टीनं पाहिलं तर ही दुःखद घटना होती. पण तो त्यांचा डायना चार्लस यांचा व्यक्तीगत प्रश्न होता. डायनानं कोणाशी मैत्री ठेवायची आणि कोणाची नाही ही तिचा प्रश्न होता, त्यात इतरांना पडण्याचं कारण असू नये. माध्यमांना त्यातच जास्त रस होता. सतत तिचा पाठलाग करत. ससेमिरा चुकवण्याच्या प्रयत्नात डायनाचा अपघाती मृत्यू झाला. 

आता डानाचा मुलगा हॅरी याच्या मागं प्रेस लागलीय. 

अभिनेत्याला, खेळाडूला, चित्रकाराला, लेखकाला त्याचं काम करू द्यावं. कोणाही माणसाला हवी असते तशी स्पेस त्यांना द्यावी. त्यांच्या कलाकृतीची आणि खेळाची मीमांसा जरूर करावी पण तीही कला आणि क्रीडा या क्षेत्राच्या कसोट्या लावून. गंमत म्हणून चिमटा काढणं गोष्ट वेगळं आणि सतत पराण्या लावणं वेगळं.

ओसाकाची वंशद्वेषाबद्दलची मतं बरोबर होती की चूक होती हा मुद्दा नाही. मतं बाळगण्याचा आणि त्यांचा उच्चार करण्याचा अधिकार तिला आहे. ती खेळाडू आहे हे लक्षात घेऊन तिच्या मतांबद्दलचा विचार करावा, तिनं मांडलेला विचार महत्वाचा असूनही.

मेरिल स्ट्रीपनं डोनल्ड ट्रंप यांच्यावर तीक्ष्ण बाण सोडले. ट्रंप यांची ती लायकी होती की नाही याचा विचार स्वतंत्रपणे करावा. पण शेवटी ती अभिनेत्री आहे, ते तिचं क्षेत्र आहे हे लक्षात ठेवावं आणि तिच्या पडद्यावरच्या कामगिरीकडं पहावं. तिनं ट्रंपवर केलेली टीका स्वतंत्रपणे विचारात घ्यायलाही हवी, पण तीही एका मर्यादेतच. अभ्यासू अर्थशास्त्री किंवा राज्यशास्त्राचा जाणकार यांच्या मतायेवढं वजन स्ट्रीपचा मताना असणार नाही हे लक्षात ठेवायला हवं.

अलिकडं माध्यमं नट, नट्या इत्यादी लोकांच्या राजकीय मतांना महत्व देतात, त्या विषयातल्या तज्ञांच्या मताना महत्व देत नाहीत.

मुद्दा असा की स्ट्रीपच्या, ओसाकाच्या  राजकीय मतांसाठी त्यांना वेठीस धरू नये किंवा त्यांना मखरातही बसवू नये. त्यांची कला पहावी. 

अलिकडं जगातल्या प्रत्येक गोष्टीचं मोल गवगवा या कसोटीवर ठरवलं जातं. गवगवा करण्यात माध्यमांचा हितसंबंध गुंतलेला असतो. त्यांना त्यातून प्रेक्षक मिळतात आणि त्या प्रेक्षकांचं रुपांतर ग्राहकांमधे करण्यातून त्यांना पैसे मिळतात. त्यामुळं गवगवा आणि प्रसिद्धी या साधनांचा वापर ते सतत करतात. पण त्यातून दर्जा आणि मूल्य या गोष्टी पातळ होत जातात,  दुर्लक्षीत होतात.

प्रसिद्धीचा अतिरेक झालाय. प्रसिद्धी माणसांना बिघडवत असते.

हे सार्वजनिक वावर असलेल्या  लोकांनी आणि प्रसिद्दी माध्यमांनीही लक्षात ठेवलं पाहिजे.

।।

Comments are closed.