नवी संस्कृती निर्माण होईल?

नवी संस्कृती निर्माण होईल?

माझ्या परिचयातले, माझे समवयीन आता फोनवर बोलतात आणि आपण आपलं दैनंदिन जीवन कसं बदललंय याच्या गोष्टी सांगतात.

म्हणजे ते आता बाहेर पडत नाहीत.लग्न समारंभ आणि मयताला जात नाहीत. लग्नबाधित लोकांना फोनवरून, झूममधून शुभेच्छा देतात. एकाच्या नातवाचा वाढदिवस होता. त्यानं नातवाला झूमवरून शुभेच्छा दिल्या आणि त्यानं कापलेला केक, आपली बोटं चाटून, कल्पनेत, खाल्ला.

एक मित्र आहेत. त्यांचं खाण आता मर्यादित झालंय. नियमीतपणे आणि नियमीत खातात. त्याचा मुलगा आणि सून डॉक्टर आहेत. ते दोघं जे सांगतात ते मित्र निमूट ऐकतो. मित्र कोविडच्या सुरवातीला मुलाची टिंगल करत असे, आता मुलाचं कौतुक करतो.

शिक्षणासाठी परदेशी निघालेला एक मुलगा आशिर्वाद घेण्यासाठी घरी येणार होता. आमच्या मित्रानं त्याला घरी यायला मनाई केली. फोनवरून आशिर्वाद दिला, त्या वेळीही त्याच्या तोंडावर मास्क होता. फोनवर तो त्या मुलाला म्हणाला ” हे बघ. कोणी काहीही म्हणो, मी लोकांमधे मिसळणं अगदी मर्यादित केलंय, कोणी काहीही म्हणो मी मास्क लावणार आणि सतत हात धूत रहाणार. मी जपानी आणि कोरियन लोकाना हसत असे. ती माणसं माकडासारखी दिसतात, हातात मोजे घालतात, याची मी टिंगल करत असे.   आता मला वाटतंय की आपणही तसंच वागायला हवं, बदलता काळ पहाता पुढलं जगणं असंच असायला हवं.”  

मित्राची ही गोष्ट समवयस्कांच्या गप्पांमधे गोलगोल   फिरली.

एका मित्राचं समयवस्क मित्रानं केलेलं  वर्णन असं.” तो आता संत झालाय, साधू झालाय. दारू आठवड्यातून दोनदा, प्रत्येक वेळी फक्त साठ मिली. दारुबरोबर चखणा नाही, उकडलेलं गाजर मीठ लावून खातो. घरातच डास चावला  आणि त्याला मलेरिया झाला.  मलेरियाची औषधं सुरु झाली आणि दारू एकदमच बंद झाली.’दारूण’ परिस्थिती झालीय त्याची.”

बहुतेक जणांच्या घरी मुलं, सुना घरूनच कामं करत होती.   मधेच फोन बंद होई कारण घरात मुलाला दुसऱ्या फोनवर   ऑफिसची मीटिंग करायची असे, मुलाचा ऑन लाईन क्लास सुरू व्हायचा असे आणि सुनेचा फोनवरून योगा क्लास सुरु व्हायचा असे. तीन खोल्यांच्या घरात चार जणांना प्रायव्हसी हवी. 

कोविड नव्हता तेव्हां माणसं घराबाहेर असत, एकट्या दुकटयाला घरात भरपूर स्वातंत्र्य. घरात एकाद दोनच भांडी असत, कमीवेळा एकमेकावर आपटत. आता? मुलगा, सून, नातवंडं अशी सगळीच माणसं घरात. फारच भांडी एकत्र आल्यानं एकमेकावर आपटतात. 

एक मित्र म्हणाला घरात वस्तू इतक्या वाढल्यात की आता माणसं बाहेर फेकायची वेळ आलीय. घरबसल्या काय करायचं , टाईमपास म्हणून, खाणं वाढलंय, नवनव्या वस्तू विकत आणल्या  जाताहेत. कारण घरपोच वस्तू मिळू लागल्या आहेत..  अरे आता आपल्याला साधी रहाणी ऊच्च विचारसरणी अंगिकारायला हवी.. गरजा कमी करा, पचवण्यासाठी फार एनर्जी खर्च करावी लागेल असे पदार्थ खायचे नाहीत,  मुळात अनावश्यक खाणं आणि वस्तू बंद केलं पाहिजे. कशाला ते इतके बूट आणि चपला. आमच्या लहानपणी;  घरात, बाहेर, ऑफिसात, देवळात जाताना, एकच चप्पल असे. कपडेही किती. एक जोड. एक गांडीवर एक दांडीवर. एकदा  मावशी मला कोल्हापूरला घेऊन गेली होती तेव्हां माझे सगळे कपडे एका बोचक्यात मावले.

।।

दोन माणसांमधे अंतर. सामुहीक गोष्टी टाळणं. माणसाची जगण्याची नवी रीत.

माणसांचं एकत्र येणं. कुटुंब, कबीला, सामुहीक प्रार्थना, मैदानात हज्जारो माणसांसमोर खेळाचं प्रदर्शन, हज्जारो माणसांना एकदम मार्गदर्शन करणारं भाषण, ताकद आणि विचार ठसवण्यासाठी मिरवणूक-मोर्चा.मास. मोठा समूह. मोठा समूह ही प्रवास उद्योगातली एक महत्वाची अट. फार माणसं एका जागेत मावणं, कोंबणं. 

ही नवी संस्कृती.

संस्कृती म्हणजे काय?

संस्कृती म्हणजे वहिवाट. संस्कृती म्हणजे जगणं घडवणारे अनंत घटक. खाणं, पिणं, कपडे, सेक्स, संगीत, वाचन, नाटकं,खेळ, वस्तू हाताळणं, शस्त्रं, हत्यारं, दैनंदिन जीवनात येणाऱ्या वस्तू इत्यादी इत्यादी फार फार गोष्टी म्हणजे संस्कृती. आणि हे सारं ज्यातून व्यक्त होतं ती भाषा म्हणजे संस्कृती. जेवढं जगणं व्यापक आणि गुंत्याचं तेवढी भाषा आकारानं आणि आशयानं आणि शब्दछटांनी मोठी. जगणं आक्रसलं की भाषाही आक्रसते.

देव आणि धर्मही याचाच एक भाग. म्हटलं तर एक अगदी लहान भाग. तोही माणसानंच घडवलेला असल्यानं संस्कृतीचा भाग.

अरबी भाषेत शरीया नावाचा शब्द आहे. या शब्दाचा अर्थ पाणवठ्याकडं जायची वाट. पाणवठा आणि पाणवठ्याकडं जायची वाट ही एक वाळवंटी प्रदेशातली संस्कृती आहे. 

अरब प्रदेशात सर्वात दुर्मिळ गोष्ट म्हणजे पाणी. पाणवठ्याच्या भोवती वस्ती तयार होत असे. माणसांनी पाणी शोधलं, पाण्यापर्यंत पोचण्याची वाट तयार केली. ही वाट ठीक असली पाहिजे, सुरक्षित असली पाहिजे, सर्वाना ती वाट वापरता आली पाहिजे यासाठी लोकांनी जमवलेले नियम म्हणजे शरीया. 

पाणवठा टिकला पाहिजे, सर्वांना तो वापरता यायला हवा. एकाची दादागिरी असून चालणार नाही. तिथं येणाऱ्या माणसांचे आपसात तणाव असतील, दुरावे असतील, मारामाऱ्या असतील, प्रियसंबंध असतील, हज्जार भानगडी असतील. पण त्या सर्वाचा तोल असा की पाणी, पाणवठा सर्वाना मोकळा असावा.

इस्लामपूर्व काळात शेकडो नव्हे हज्जारो वर्षं पाणवठा आणि पाणवठावाट होतीच. शरीया हा शब्दही इस्लामपूर्व. महंमदांनी तो धर्म संघटित करतांना जगण्याचे नियम अशा अर्थानं योजला  आणि तो शब्द धर्माच्या मालकीचा झाला.

शरीया ही जगण्याची रीत, संस्कृती. तिचा आणि धर्माचा  संबंध लावण्याचं कारण नाही. अरबस्तातानातला पाणवठा, कोकणातला पाणवठा, पश्चिम महाराष्ट्रातला पाणवठा. प्रदेशानुसार त्यांची रुपं बदलतात, त्यांच्या भोवती वेगवेगळे नियम तयार होता, वहिवाटी तयार होतात.

पाणवठ्याच्या जागी सार्वजनीक नळ आला. नंतर घरोघरी नळ पोचले. पाणवठाच शिल्लक राहिला नाही. लोकांची जगण्याची रीत बदलली. पाणवठ्याचं नियोजन पालिका करू लागली. नवं तंत्रज्ञान, पाणी कर इत्यादी गोष्टी आल्या.

चौदाव्या शतकात प्लेगची महाभयंकर आणि दीर्घकाळ टिकलेली साथ युरोपात आली. युरोपात दर तीन माणसांत एक माणूस मेला. युरोपीय माणसाचं जगणं बदललं. चर्चमधे फाटाफूट झाली, प्रोटेस्टंट हे एक स्वतंत्र चर्च जन्माला आले. रेनेसान्स झालं. राज्यव्यवस्था बदलली, क्रांत्या झाल्या. आधुनिक विज्ञान जन्मलं,लोकशाही व्यवस्था निर्माण झाली.

हे सारं लोकानी केलं, लोकांच्या व्यवहारातून तयार झालं, सरकारी अनुदानं आणि निर्णयातून नव्हे. लोकरीती, वहिवाटी लोक तयार करत असतात, त्याचा संबंध ना देवाशी असतो ना सरकारशी असतो.

।।

कोविडनंतर जग बदलेल? संस्कृती बदलेल? 

लॉकडाऊन. झूम. वायरस. व्हॉट्सअप. फेसबुक. ऑन लाईन. अँटीबॉडी. अँटीजेन. आरटीपीसीआर. व्हिडियोकॉल. मास्क. सॅनिटायझर. क्वारंटाईन.ऑक्सीमीटर. सोशल डिस्टन्स. 

वरील शब्द निव्वळ शब्द नाहीत. त्यात व्यवहार गुंतलेले आहेत. 

प्रवास, प्रार्थना, समारंभ, खेळ, घराबाहेरचं जेवणं आणि दारू पिणं, घराबाहेर चालणारे सेक्सव्यवहार. सारं सारं बदलू पहात आहे, नवा आकार घेऊ पहात आहे.

नवी संस्कृती आकार घेतेय.

।।

Comments are closed.