चर्च आणि राजसत्ता यातील संघर्ष. सिनेमा,’ सर्वंट्स ‘.

चर्च आणि राजसत्ता यातील संघर्ष. सिनेमा,’ सर्वंट्स ‘.

Servants.

Ivan Ostrochovsky.

Slovakia. 2020.

बर्लीन चित्रपट महोत्सवात सर्वोत्तम दिक्दर्शक आणि सर्वोत्तम ओरिजिनल स्कोअर अशी दोन पारितोषिकं.

||

एक कार. रात्रीच्या काळोखात रस्त्यावरून जात असते.काही अंतर गेल्यावर एका पुलाखालच्या बोगद्याच्या तोंडाशी थांबते. दोघं जण खाली उतरतात. गाडीची डिकी उघडून पोतं वाटावं अशी वस्तू उचलून रस्त्यावर ठेवतात. त्यातला एक माणूस किती दिसतो? फक्त कंबरेबर्यंत, कोट, लटकणारा  स्टेथोस्कोप आणि खाली बूट. दृश्य संपतं.

पुढलं दृश्य. घरात माणूस वॉश बेसिनमधे बूटावरचा चिखल धुताना दिसतो. अरे हे बूट तर आधीच्या दृश्यातल्या माणसाचे दिसताहेत आणि तिथं रस्त्यावर चिखलही होता. हम्म.

नंतरच्या दृश्यात तो माणूस व्यवस्थित कपडे घालून एका ऑफिसात पोचतो. दीर्घ कॉरिडॉर. रिकामा. एकच माणूस ओलांडून जाताना  दिसतो. बूट साफ करणारा  माणूस एका खोलीच्या दारात उभा असतो. दृश्य संपतं.

टायटल येतं- सर्वंट्स.

Servants (2020) - IMDb

कोणीही बोलत नाही. काहीही आवाज, ध्वनी नाही. 

ही काय भानगड आहे? अगदी दुरून कारमधून उतरवलेली अंधुकपणे दिसलेली वस्तू काय होती? ते प्रेत तर नव्हतं?

चित्रपटाची अशी थेट सुरवात.एका राजकीय थ्रिलरची सुरवात.

चित्रपट घडतो १९८० साली स्लोवाकियात. कम्युनिष्टांचं राज्य असतं. कारमधून खाली टाकलेली वस्तू म्हणजे एक चर्चमधला माणूस असतो. त्याचा खून झालेला असतो. रस्त्यावर त्याला टाकून दिल्यावर त्याच्या अंगावरून ट्रक-गाडया जातात. (ते चित्रपटात दाखवलेलं नाही) दुसऱ्या दिवशी पेपरात बातमी येते की चर्चमधला एक माणूस रस्त्यावर गाडीखाली चिरडला गेला, ओळख पटू शकली नाही असं त्याचं शरीर होतं.

कम्युनिष्ट सरकार आणि चर्च यांच्यात वाकडं असतं. चर्चचा कम्युनिष्ट राजवटीला विरोध असतो. स्लोवाक माणसं धर्मानं ख्रिस्ती असल्यानं स्लोवाकियात कॅथलिक चर्च यंत्रणा-व्यवस्था असते. पण सरकार चर्चला दाबून टाकत असतं. 

कम्युनिष्टांनी एक स्वतःची धर्मशाखा काढलेली असते. तिचं नाव ‘ पृथ्वीवर शांती’  असं असतं. ही शाखा चर्चवर नियंत्रण ठेवत असते. चर्चमधे काही लोक सरकार धार्जिणे होते. काही लोक सरकार विरोधी होते.  ते कॅथलिक चर्चच्या मुख्यालयाला कम्युनिष्ट सरकार चर्चची दडपशाही कशी करते, खून वगैरे कसे घडवते इत्यादी माहिती पाठवत असे. ती माहिती जर्मनीतला फ्री युरोप रेडियो जगभर प्रसारित करत असे.

सरकारनं आपले खबरे चर्चमधे घुसवलेले असतात. बातम्या फोडणारे लोक कोण आहेत याची माहिती ते सरकारला सांगत आणि सरकार मग त्यांचा काटा काढत असे.

असं सरकार आणि चर्च यातलं शीतयुद्ध.  

चर्च आणि सरकार यांच्यात वर्चस्वाची मारामारी.

युराय आणि मिखाल हे दोन तरूण ब्राटिस्तावातल्या सेमिनरीत दाखल होतात. चित्रपट त्यांच्या मागं मागं सेमिनरीत घुसतो आणि सेमिनरीत काय चालतं ते दाखवतो.

चर्चचं म्हणणं की ख्रिस्ती लोकांनी,सेमिनरीतल्या विद्यार्थ्यांनी, होऊ घातलेल्या बिशपांनी चर्चचं ऐकलं पाहिजे. चर्चचे कडक नियम असतात. हे करा, ते करा, हे वाचा, ते वाचा, दिवसाचं टाईट वेळापत्रक, चुकलात तर शिक्षा, चूक झाली तर कन्फेशन द्या आणि शिक्षा भोगा.

नेमकं तेच कम्युनिष्टांच्या सरकारचं. ते सांगतात ते पुरोगामी,बाकी सगळे प्रतिगामी. ते सांगतात तेच खरं, बाकीचे लोक हितसंबंधी. सरकार सांगतं त्या पलिकडं इतर विचाराला वावच नाही.

चर्च सांगतं ते ऐकलं नाहीत तर नरकात जाल.

कम्युनिष्ट सांगतात ते ऐकलं नाहीत तर तुरुंगात जाल.

दोघांचाही जाच. 

कोणाला पोलिस मारून टाकतात. कोणी कंटाळून आत्महत्या करतो.

अनेक प्रसंग. सेमिनरीतले विद्यार्थी उपोषण करतात. सेमिनरीतले विद्यार्थी सेमिनरीतल्या घटना टाईप करून बाहेर पाठवतात. सेमिनरीतल्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या चौकशा पोलिस करतात, चौकशा करतांना त्यांना थोबाडतात. एका विद्यार्थ्याला नागडा उभा करून चार जणं त्याला पिडतात. एक विद्यार्थी छळाला कंटाळून मनगटाची नस कापून आत्महत्या करतो. 

Servants | Loco Films

चित्रपटभर या घटना घडत असतात, निःशब्द. आपण घटना पहातो, घटनांमधे गुंतलेली माणसं बोलत नाहीत. संवाद अगदीच मोजके. कित्येक मिनिटं माणसं दिसतात, फक्त दिसतात, बोलत नाहीत. त्यांच्या मनात वादळं असतात, त्यांचा जीव टांगणीला असतो, ती घुसमटत असतात, बोलत नाहीत.  चकारशब्द काढत नाहीत.

बोलतात तेव्हां अगदी खालच्या आवाजात, कुजबुजल्यागत. वीसेक विद्यार्थ्यांच्या वर्गात शिक्षक व्याख्यान देत असतो. तेही अगदी खालच्या पट्टीत, आपल्यालाही कान देऊन ऐकावं लागतं. 

हुकूमशाहीमधे बोलायचं नसतं,  कुजबुजायचं असतं. बोलणं तिसऱ्या माणसाला ऐकू जाता कामा नये. तिसऱ्या माणसालाच नव्हे तर स्वतःलाही ऐकू जाता कामा नये. वाच्यता नसावी.

सर्वंट चित्रपटाचं वैशिष्ट्य त्यातलं साऊंड इंजिनियरिंग आहे. आवाजच नाही. संगीत अगदीच कमी. ड्रोनचा वाटावा असा आवाज ऐकू येतो. जात्यावरची घरघर असते तसे विचित्र आवाज येतात.दोघे जण चर्चची घंटा वाजवतात. ती घंटाही फार कष्टानं, तीन वेळा हलवल्यानंतर वाजते.

दृश्यांची रचना पहा. प्रचंड लांबरूंद कॉरिडॉर. दोन माणसं चालत येतात आणि डावीकडं जातात. समोर कॉरिडॉर मोकळाच दिसत रहातो. मोकळा. प्रेक्षक विचार करत रहातात, काय बरं झालं असेल त्या दोन माणसांचं, त्या दोन माणसांनी काय केलं असेल.

चित्रपटभर प्रेक्षकाला दृश्यं बुचकळ्यात टाकतात, काय घडेल किंवा घडलं असेल याचे अंदाज बांधायला लावतात.

रस्त्यावर, कॉरिडॉरमधे, शिक्षक- विद्यार्थी चालत येतांना दिसतात, त्यांचं चालणं परेडसारखं असतं. 

नदीत, पुरात, भोवरा होतो तसा गोलगोल जिना. विद्यार्थी जिना चढून येतात. त्यांच्या पायाचा  आवाज परेडमधल्या सैनिकांच्या चालण्यासारखा येतो.

भिंती, कॉरिडॉर, जिने, वर्ग, छतं, हॉल, सारं कोरं करकरीत. फोटो नाहीत, टांगलेल्या वस्तू नाहीत, कपाटं नाहीत, रंग तर नाहीच नाही. पांढरा आणि काळा येवढेच रंग, त्यातही छटा नाहीत. सत्य,असत्य. चांगला, वाईट. सश्रद्ध, धर्मलंड. पुरोगामी प्रतिगामी. देशभक्त, देशद्रोही. स्वर्गात, नर्कात. जगा, मरा. दोन टोकं, मधलं काही नाही.

  पुतळे आपण नित्य पहातो ना! . चौकात, पार्कांत, रस्त्यांवर, जागोजाग. प्रचंड. पुतळे बोलत नाहीत, सतत भीती दाखवत असतात, संदेश देत असतात. पुतळे निष्प्राण आणि मुके असतात. रोममधे, क्रेमलिनमधे, तिएनआनमेन मधे. 

सर्वंट्समधली माणसं पुतळ्यासारखीच दिसतात. दिसतात जिवंत पण मेलेली.

चित्रपटातलं चर्च बराकीसारखंच दिसतं. चर्चमधे चारीबाजूनी बंदिस्त असा एक चौक आहे. खोल विहिरीसारखा. त्या चौकात टेबलटेनीस आणि फूटबॉल. त्याच चौकात ताणलेल्या दोऱ्यांवर कपडे सुकत घातलेले.

वाळत घातलेलं कापड पडदा होतं.पडद्याच्या या बाजूला असलेल्या विद्यार्थ्यानं आपली आयडेंटिटी लपवून पलिकडं उभ्या असलेल्या विद्यार्थ्याशी बोलायचं.

चित्रपटाचं कलादिक्दर्शन एका आर्किटेक्टनं केलंय. इमारतीत, परिसरात, बंदिस्तपणा पदोपदी दिसत रहातो. सेमिनरी दिसते, काहीसं गाव दिसतं. कॅनव्हासवर रंगवल्यासारखं, चित्रपटासाठी लावलेल्या प्लास्टरच्या सेट सारखं.

चित्रपटात एक भूमिका एका गाजलेल्या दिक्दर्शकानं केलीय. चित्रपटाचा दिक्दर्शक म्हणतो की त्या सीनियर दिक्दर्शकानं मार्गदर्शन केल्यामुळं कित्येक सुधारणा करता आल्या,चित्रपटाचा दर्जा सुधारला.

चित्रपटात  काळा आणि पांढरा येवढेच दोन टोकाचे रंग. 

दिक्दर्शकाला विचारलं की त्यानं चित्रपटाला सर्वंट्स असं नाव कां दिलं. दिक्दर्शक म्हणाला की कोणतेही सर्वंट ( सेवक) ईश्वराची (चर्चची) सेवा करतात; सरकारची किंवा सत्तेचीही सेवा करतात. याची किंवा त्याची सेवा. आपणही नेहमी कोणा तरी वरिष्ठांची सेवा करतच असतो की.

म्हटलं तर चित्रपट दोन तरूणांचा आहे. त्यांना लष्करात जायचं नाहीये. देशाची आर्थिक स्थिती चांगली नाही, चर्चमधे प्रवेश केला तर आयुष्यभरची पोटापाण्याची सोय होते आणि पुण्यही पदरी पडतं. तरूणांची गोष्ट सांगता सांगता चित्रपट आपल्याला कायच्या कायच कुठं तरी घेऊन जातो. राजकारण, धर्म, सत्ता, जगण्याचा अर्थ इत्यादी पापुद्रे तो उचकटत जातो.

चित्रपट रहस्यकथा आहे, थ्रिलर आहे. चित्रपटात वैचारिक आणि भावनिक असे दोन्ही थरार आहेत.

चित्रपट पहाताना कालवाकालव होते.

।।

Comments are closed.