अमेरिकन मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा

अमेरिकन मध्यावधी निवडणुका, अधांतरी निवाडा

अमेरिकेतली मध्यावधी निवडणूक अधांतरी निवाडा देऊन संपली. अधांतरी अशासाठी की संसदेच्या दोन सभागृहांमधलं काँग्रेस हे सभागृह डेमॉक्रॅट्सच्या ताब्यात गेलं आणि सेनेट हे सभागृह रीपब्लिकनांच्या ताब्यात राह्यलं.
ही निवडणुक ट्रंप या विषयावर होती. ट्रंपच्या बाजूनं कोण आणि विरोधातले कोण या मुद्द्यावर मतदान झालं.
या निवडणुकीचे काही विशेष आहेत.
काँग्रेसमधे १०२ महिला निवडून आल्यात. अमेरिकेत महिलांना राखीव जागा नसतांना महिला प्रतीनिधींची संख्या वाढतेय हे विशेष. बहुतेक प्रतिनिधी, दोन वगळता, डेमॉक्रॅटिक आहेत.
अमेरिकेच्या इतिहासात पहिल्या प्रथमच स्थानिक आदिवासी म्हणजे मूळ निवासी महिला निवडून आली आहे. तिच नाव शेरीस डेविड्स. तिची भाषा गोऱ्या अमेरिकी वळणाची नाही. तिच्या बोलण्यावर, चेहऱ्यावर, कपड्यांवर आणि व्यक्तिमत्वावर मूळनिवासी संस्कृतीची गडद छाप आहे. गोरे सोडून इतर वळणाची इंग्रजी कानावर आली की ती व्यक्ती अॅक्सेंटवाली आहे असं म्हणून आजही टिंगल केली जाते. अशा वातावरणात भरपूरच अॅक्सेंट असलेली महिला निवडून आलीय.
दोन काळ्या आणि मुसलमान महिला निवडून आल्या आहेत. एक आहे रशीदा तालीब. ती आहे मुळातली पॅलेस्टिनी. दुसरी आहे इल्हान ओमार. ती आहे सोमाली. ट्रंप यांनी मुस्लीम आणि महिला यांच्याबद्दल कायम असभ्य भाषेत मोहिम चालवली. दोघीही ट्रंप यांना उघड विरोध करतात, ट्रंप यांना विरोध करण्याच्या मुद्द्यावरच त्या निवडून आल्या आहेत. तालीब यांना तर २०१६ च्या निवडणुकीत ट्रंपच्या साथीदारांनी जाहीरपणे धक्काबुक्की करून कार्यक्रमातून हाकलून दिल होतं.
उघडपणे वंशद्वेशाची भूमिका मांडणारे, असभ्य भाषेत बोलणारे, गौरेतर लोकांविरोधात दंगलीला उघड चिथावणी देणारे दोन उमेदवार, इलिनॉयमधे आर्थर जोन्स आणि कन्नासमधे क्रिस कोबेक, यांना जनतेनं हरवलं आहे.
पदवीधारक मतदारांनी बहुसंख्येनं डेमॉक्रॅट्सना मतदान केलं. कमी शिकलेल्या गोऱ्यांनी ट्रंपना मतदान केलं. खेड्यातल्या लोकांनी ट्रंपना मतदान केलं, शहरातल्या लोकांनी डेमॉक्रॅटना मतदान केलं.
काँग्रेसमधे डेमॉक्रॅटना बहुमत देऊन जनतेनं ट्रंप यांच्याबद्दलची नाराजी व्यक्त केली असा या निवडणुकीचा उघड अर्थ आहे.
परंतू काँग्रेसमधे बहुमत आलं म्हणजे ट्रंप संपले असा होत नाही. अमेरिकन घटना आणि परंपरा या दोन्हीमधे संसद आणि अध्यक्ष यांना नीरंकुष अधिकार दिलेले नाहीत, दोघांनाही एकमेकांना अडवण्याचे अधिकार दिले आहेत आणि त्या अडवणुकीवर मात करण्याच्या चोरवाटाही दिल्या आहेत.
अध्यक्षांचे आदेश हा अमेरिकेचा कायदा असतो. अध्यक्ष कोणालाही न विचारता, स्वतःच्या लहरीनुसार कोणताही आदेश काढू शकतो. तो आदेश फेटाळण्याचा अधिकार काँग्रेसला असतो. पण तो फेटाळला तरी पुन्हा जारी करण्याचा अधिकार अध्यक्षाला असतो. म्हणजे अध्यक्ष त्याच्या मनास वाटेल तसं वागू शकतो फार तर प्रत्यक्ष कारवाई लांबू शकते.
मेक्सिकन हद्दीवर भिंत उभारण्याचा आदेश ट्रंप देऊ शकतात आणि आफ्रिकन देशातल्या मुसलमानांना अमेरिकेत प्रवेश नाकारू शकतात. परंतू भिंत बांधायला काँग्रेस नकार देऊ शकते आणि प्रवेश नाकारणीत काँग्रेस अडथळा आणू शकते. ओबामा यांच्या काळात काँग्रेसवर रीपब्लिकनांचं वर्चस्व होतं. त्यांनी ओबामा यांचे आरोग्य आणि विमा धोरण हाणून पाडलं होतं. ओबामा ते मंजूर करून घेऊ शकले असते पण घटनात्मक वाटेनं जात जात ते मंजूर करायला आठ वर्ष पुरी पडत नसल्यानं ओबामा अध्यक्षपदावरून दूर झाले आणि त्यांचं आरोग्य-विमा धोरण भिजत पडलं.
कांग्रेस ट्रंप यांना छळू शकते, त्यांची धोरणं अडवू शकते. पण ती सुद्धा एक लढाईच आहे, चार दिवसात ते घडू शकत नाही.
ट्रंप यांच्यावर महाअभियोग, इंपीचमेंटची कारवाई काँग्रेस सुचवू शकते. परंतू तो महाअभियोग पार पाडण्यासाठी काँग्रेस व सेनेटमधे लागणारी संख्या मात्र डेमॉक्रॅट्सकडं नाही.
अमेरिकन लोकशाही व्यवस्थेत दोन मोठ्ठे दोष आहेत. एक म्हणजे जनमत विरोधी असलं तरीही एकादा माणूस अध्यक्ष होऊ शकतो. अॅल गोर यांना बुश यांच्यापेक्षा जास्त मतं असूनही ते अध्यक्ष झाले. हिलरी क्लिंटन यांना २५ लाख जास्त मतं असूनही ट्रंप अध्यक्ष झाले. सेनेटर्सच्या बहुसंख्येनं अध्यक्ष निवडून द्यायचा ही अमेरिकन पद्धत एकेकाळी अमेरिकन राज्यघटनाकारांनी स्वीकारली कारण त्यांना जनमत सवंग वाटत असे. जनमतापेक्षा प्रत्येक राज्याला मिळणारी दोन मतं त्यांनी महत्वाची ठरवली. त्याचा हा परिणाम.
दुसरा दोष म्हणजे न्यायाधिशाची नेमणूक राष्ट्रपती करतो, स्थानिक राजकीय पक्ष करतात. अमेरिकेत भारतासारखी स्वतंत्र, राजकीयपक्ष निरपेक्ष न्याय व्यवस्था नाही. त्यामुळंच अध्यक्षाला गुन्हे करायलाही मान्यता देणारा कॅवॅनॉ यांच्यासारखा न्यायाधीश ट्रंप सर्वोच्च न्यायालयावर पाठवू शकतात.
या दोन दोषांचा परिणाम असा की अध्यक्षाच्या झोटिंगशाहीला रोखण्याचे मार्ग अमेरिकेत नाहीत.
ट्रंप हा माणूस अमेरिकेची वाट लावायला निघाला आहे. ट्रंप वृत्तपत्रांना जनशत्रू म्हणतात. ते सतत खोटंच बोलतात. ते कायदा पाळत नाहीत. तो कर भरत नाहीत. परदेश नीती ही ट्रंप इंडस्ट्री आहे असं मानून ते मनास वाटेल तसा विदेशातल्या दंडेलांशी दोस्ती करतात. अमेरिका ही फक्त गोऱ्या ख्रिस्ती लोकांची आहे असं त्याना मनापासून वाटतं. बाकीचे लोक देशात नसलेले बरे कारण ते देशद्रोही असतात असं त्यांना वाटतं. गरीब किवा वंचित हे गरीब किंवा वंचित असतात याला गरीब व वंचितच कारणीभूत आहेत, त्यांच्यासाठी इतरांनी काही करू नये, त्यांचं त्यांनी पाहून घ्यावं असं ट्रंप यांना वाटतं. बंदूक बाळगणं हा मूलभूत अधिकार आहे असं त्यांना वाटतं. आपले अध्यक्षीय अधिकार वापरून त्यांनी समाजात फूट पाडली आहे, देशातल्या सर्व संवैधानिक संस्था खतम केल्या आहेत, एकहाती सत्ता तयार केली आहे.
प्रश्न असा आहे की त्यांच्या मताची नसलेली बहुसंख्य जनता त्यांना कशी रोखणार. खुद्द त्यांच्या पक्षातल्या लोकांनाही त्यांचे अतिरेकी विचार मान्य नाहीत. परंतू आज दुसरं नेतृत्व नसल्यानं रीपब्लिकन पक्षाला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी ट्रंपमागं फरफटत जावं लागत आहे.
ट्रंप यांना वेसण घालणं हे एकट्या काँग्रेसला जमण्यासारखं नाही. कारण सेनेट हे दुसरं सभागृह ट्रंप यांची पाठराखण करेल. शिवाय न्यायव्यवस्थाही त्यांच्याच खिशातली आहे. ट्रंप यांची इंपीचमेंट करायचा ठराव जरी काँग्रेसनं मांडला तरी जोवर सेनेटमधे त्यांना मताधिक्य नाही तोवर तो ठराव मंजूर होणं शक्य नाही. ट्रंप यांच्या योजनामधे अडथळे आणणं येवढंच काँग्रेसला शक्य दिसतय.
म्युलर ट्रंप यांच्या उद्योगांची चौकशी करताहेत. ट्रंप दोषी ठरणार अशी लक्षणं आहेत. ती चौकशी रोखण्याचा उद्योग ट्रंप करत आहेत. जेफ सेशन्स या आपणच नेमलेल्या आपल्याच पाठीराख्याला ट्रंपनी अॅटर्नी जनरलच्या पदावरून हाकललं आहे, म्युलर चौकशी थाबवू शकेल अशा अॅटर्नी जनरलच्या शोधात ते आहेत. चौकशीत ट्रंप दोषी ठरले तरीही ट्रंपना घालवणं फार कठीण आहे, काँग्रेसमधल्या बहुमताचा वापर तिथे यशस्वी ठरणार नाही.
रीपब्लिकन पक्षात फूट पाडून ट्रंप यांना एकटं पाडणं येवढी एकच वाट शक्य दिसते. कालच्या गव्हर्नर पदाच्या निवडणुकीत रीपब्लिकन पक्षाचे कोबेक हरले. कन्सास हे राज्य रीपब्लिकनांचं असूनही, तिथे रिपब्लिकन मताची माणसं बहुसंख्येनं असूनही कोबेक हरले. याचं कारण तिथल्या स्थानिक रिपब्लिकन लोकांनी उघडपणे ट्रंप आणि कोबॅक यांच्या विरोधात बंड केलं. ट्रंप जे काही उद्योग करत आहेत ते खुद्द कंझरवेटिव पक्षाच्या धोरणात बसणारं नाही, ट्रंप हे कंझर्वेटिव नाहीतच असं रिपब्लिकन पक्षाचे अनेक पुढारी जाहीरपणे म्हणाले.
डेमॉक्रॅटिक पक्षात मतमतांतरं आहेत. त्यामुळं त्या पक्षात एकमती नेतृत्व नाही. तो दोष दूर करून ते जर लोकमताला थेट भिडले तर खुद्द रिपब्लिकन पक्षातली माणसंही त्यांना मदत करतील, ट्रंप यांना हाकलून द्यायला मदत करतील.
काँग्रेसच्या बहुमतावर अवलंबून न रहाता जनमत संघटित करणं याच वाटेनं डेमॉक्रॅट्सना जावं लागेल.
।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *