सीरिया यादवी युद्धातल्या होरपळीतलं माणसांचं जगणं

सीरिया यादवी युद्धातल्या होरपळीतलं माणसांचं जगणं

No Turning Back
LIFE, LOSS, AND HOPE IN WARTIME SYRIA
Rania Abouzeid 
।।
२०११ पासून सीरियात यादवी चालली आहे. पाच लाख माणसं या यादवीत मारली गेली. त्यातली बहुतांश सरकारच्या गोळ्या आणि छळाला बळी पडली. दीडेक कोटी माणसं बेघर झाली. बहुतेकांची गावंच उध्वस्थ झाल्यानं त्यांना सीरियात इतरत्र जावं लागलं किंवा परदेश गाठावा लागला.
रानिया अबुझैद या पत्रकार महिलेनं यादवीवर लिहिलेलं पुस्तक सीरियन यादवी घडत असताना सीरियन समाज ती कशी सहन करत होता, कशी जगत होता ते दाखवतं.
सामान्यतः जनतेला युद्ध या नावावर आकडे भरवले जातात. किती मेले, किती जखमी, किती बेघऱ, युद्ध थांबवण्यासाठी आणि करण्यासाठी कोणी प्रयत्न केले. थोर कोण आणि चोर कोण. तारखा, आकडे.
पण युद्धात सापडलेली असतात ती माणसं. मरतात ती माणसं असतात. पोरकी होतात ती पोरं छोटी माणसं असतात. छळाला बळी पडतात ती माणसं असतात. अमानवी हत्या करतात ती माणसं असतात. उध्वस्थ झालेल्या भिंतीत माणसं रहात असतात. घरांच्या ढिगात सापडलेले आकडे माणसं असतात.
सीरियातला एक माणूस सुलेमान. सीरियातल्या तालेवार घराण्यातला तरूण. त्याचे वडील सैन्यात जनरल. त्याचे आजोबा जनरल आणि सीरियातल्या हुकूमशहा हाफेझ आसद यांचे अगदी निकटचे सहकारी. अत्यंत सुखात जन्मलेला आणि वाढलेला सुलेमान धगधगत्या आंदोलनाचा अनुभव घ्यायला गेला, आंदोलनात सामिल झाला. पोलिसांनी त्याला पकडलं. तीन वर्षं अनेक तुरुंगात ठेवलं. मार मार मारलं. अमानुष छळ केला. प्रतिष्ठित वडिलांच्या ताकदीचा काहीही उपयोग झाला नाही. तीन वर्षानंतर तो काही कारण नसताना सुटला. नाना त्रास सहन करत जर्मनीत पोचला. जर्मनीत विसावला.
जर्मनीत त्याला चांगले मित्र भेटले. जर्मनीतली समृद्धी तो अनुभवतोय. पण त्याचं मन तिथं रमत नाही. कधी तरी आपण सिरियात परत जाऊ असं त्याला अजूनही वाटतंय.
रुहा ही सात वर्षाची मुलगी. तिच्या घरावर बाँब पडतात. घर उध्वस्थ होतं. तिच्या मैत्रिणी मरतात. ती स्वतः जखमी होते. तिचे नातेवाईक तुरुंगात छळाला बळी पडत असतात. छोटी रुहा हे सर्व पहात वाढते. एका क्षणी ती तुर्कस्तानमधे स्थलांतरीत होते. तिथं ती जीन्स घालू शकते, फॅशन्स करू शकते, मोकळेपणानं फिरू शकते, शिकते. वडील सीरियातल्या घालमेलीत मार खात जगत असतात आणि मुलगी तुर्कस्तानात. तुर्कस्तानातलं सुख, स्त्रीला मिळणारं स्वातंत्र्य ती अनुभवत असते, सीरियातलं स्त्रीला गुरासारखं वागवणंही तिनं अनुभवलेलं असतं. दोन टोकांच्या जगात रुहा तरूण होते, टीन एजर होते.
रुहा आपल्या नातेवाईकांना भेटायला हद्द पार करून येते. जगले वाचलेले नातेवाईक आणि मैत्रिणी अजूनही डोक्यावर सतत घरघरणाऱ्या बाँबफेकी विमानांच्या सावल्यांत जगत असतात. कागदाची विमानं करून आकाशात भिरकावण्याच्या वयातली रुहा आणि तिच्या मैत्रिणी बाँब मोजतात, मेलेली माणसं मोजतात.
अशा ३४ माणसांचं जगणं रानिया यांनी पुस्तकात चितारलंय.
रानिया २०११ ते २०१६ अशी सहा वर्षं सीरियात फिरल्या. रानिया लेबॅनीज आहेत. त्यांच्याकडं सीरियात फिरण्यासाठी आवश्यक कागदपत्रंही होते. परंतू अधिकृत कागद दाखवले की सरकार पत्रकाराना ताब्यात घेतं आणि सरकारच्या तावडीत सरकार सांगेल तेच पहात हिंडावं लागतं. रानियाला ते नको होतं. सरकारच अत्याचार करतंय म्हटल्यावर सरकारचं म्हणणं ऐकण्यात अर्थ नव्हता.
रानिया कागदपत्रं असूनही लेबनॉनमधून हद्द पार करून चोरून सीरियात जात असत. अनेक वेळा कार्यकर्त्याच्या मोटार सायकलवर बसून. रानिया दिसण्यातच अरब असल्यानं त्यांना मिसळणं काहीसं सोपं जात असे. पण सीरियासारख्या पारंपरीक इस्लामी समाजामधे स्त्रीनं एकटं हिंडणं, पुरुषांमधे बिनधास्त मिसळणं ही गोष्ट पूर्वी कधी घडलेली नव्हती. त्या जात तिथं लोक त्यांच्याकडं आश्चर्यानं, संशयानं पहात. ही मुलगी परदेशी एजंट आहे, हस्तक आहे, परदेशातून हिला मुद्दाम आपल्याव लक्ष ठेवायला पाठवलंय असं लोकांना वाटे.
अल नुस्रच्या, आयसिसच्या भयंकर माणसांना रानिया त्यांच्या अड्ड्यात जाऊन भेटल्या. कारण सीरियाच्या जगण्यातला दहशतवादी हा एक अविभाज्य भाग झाला होता. दहशतवादी कसं जगतात, काय विचार करतात हे रानियांना अनुभवायचं होतं. त्या लोकांना भेटायला गेल्या तेव्हां त्यांचं अपहरण होण्याचीही शक्यता होती. ती त्यांना बेधडक भेटते, त्यांच्याशी समानतेचा पातळीवरून बोलते याचा राग कट्टर पुरुषवादी इस्लामी पुरुषांना होता. ते तिचा जीव घेतील अशी शक्यता होती. त्यांच्या आयुष्यात ते कधीच अशा स्त्रीला भेटले नव्हते. धोका पत्करून रानियानं त्यांच्या मुलाखती घेतल्या.
मुलाखती घेत असताना सभोवताली बाँब फुटत, रॉकेटं पडत. परिसर दणाणत असे. मैत्रिणी झालेल्या स्त्रिया तिला कवटाळून सुरक्षित जागी नेत. धुरळा, किंचाळ्या रानियानं अनुभवल्या.
हे पुस्तक वाचताना कापुश्चिन्सकी या पोलिश लेखकाच्या पुस्तकांची आठवण होते. तोही अशाच धगीमधे जगभर फिरला आणि पुस्तकं लिहिली. पण एका स्त्रीनं जीव धोक्यात घालून फिरणं, तेही कट्टर इस्लामी जगात, ही गोष्ट अगदीच वेगळी आहे.
पुस्तक म्हणजे पत्रकारी आहे. सहा वर्षात अगणीत वेळा रानिया सीरिया, लेबनॉन, तुर्कस्तान या देशात ये जा करत राहिल्या. टिपणं घेतली. शेकडो म्हणजे शेकडो लोकांच्या दीर्घ मुलाखती घेतल्या. त्यातली काही माणसं निवडून त्यावर रानियानी लक्ष केंद्रित केलं. नंतर त्या माणसांना भेटलेली माणसं, त्या माणसानी केलेल्या नोंदी, त्यांच्यावर झालेले आरोप, त्यांचे पत्रव्यवहार, कोर्ट आणि तुरुंगातले त्यांचे रेकॉर्डस अशी अनंत कागदपत्रं त्यांनी तपासली. त्यातून हे पुस्तक उभं राहिलं.
पुस्तकातून ३४ माणसं, त्यांचा परिसर, त्यांचे जिवलग आणि नातेवाईक, त्यांचे शत्रू, या सर्वांचं जगणं, दैनंदिन व्यवहार, वाचकाना कळतात. त्या माणसांच्या विसंगती, त्यांचे आग्रह, त्यांचे पूर्वग्रह, त्यांची बांधिलकी, त्यांच्या अस्मिता, त्यांची चिकाटी, त्यांचा मूल्यांचा अचल आग्रह अशा नाना गोष्टी वाचकाना कळतात. या सर्व गोष्टी कथेप्रमाणं, चित्रपटाप्रमाणं उलगडत जातात. मुद्दे आणि विषय बाजूला रहातात आणि वाचक नकळत त्या माणसांमधे गुंतायला लागतो. उत्तम कादंबरी किवा चित्रपटाप्रमाणं उत्कंठा वाढत जाते, पुढं काय होणार आहे याची उत्सुकता वाढत जाते. चारशे पानं केव्हा संपतात ते कळत नाही.
लाखो माणसाना क्रूरपणे मारणारे आसद आणि त्यांचे हज्जारो हस्तक. सुलेमानचे आई वडील, त्याची भावडं, त्याच्या आत्त्या आणि मावशा, त्याचे मित्र. रुहा, तिची आत्या आणि मावश्या आणि तिच्या भोवतालच्या साळकाया माळकाया.
युद्ध. सभोवताली माणसं मरत होती, जखमी होत होती, घरं उध्वस्थ होत होती. जगणं म्हणजे एक अपघातच होता. त्यातही वरील साऱ्या माणसांत माणुसकी, आपल्या आप्त स्वकीयांबद्दल जिव्हाळा, प्रेम, त्यांच्याशी खस्ता घाण्याची इच्छा इत्यादी गोष्टी होत्या. सभोवताली अमानुष हालचाली आणि त्यात ही माणूसपण जगणारी माणसं.
।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *